नवीन लेखन...

हरवले माझ्या कोकणातले काही तरी

जुन्या नव्याचा वाद हा जुनाच आहे. कालची पिढी आणि आजची पिढी ह्यांच्या जीवनशैलीत आणि विचारसरणीत (एका पिढीचे) अंतर हे रहाणारच. आपले मन पण अशा गोष्टीची तुलना करत राहात असते. जुन्या आठवणी आल्या कि काही गोष्टी आठवतात ज्या आज अनुभवता येत नाहीत अथवा दिसत नाहीत. काही गोष्टी काळाच्या ओघात दिसेनाशा होणार असतात हे आपण जाणून असतो पण काही करू शकत नाही. पण त्या गोष्टी दृष्टीआड झाल्या की हुरहूर लागून राहाते. मी गावाकडे कोकणात बऱ्याच वेळा जात असतो. जेव्हा जातो तेव्हा काही जुन्या गोष्टींची आठवण होते आणि मनात त्या काळाची आणि आजची  तुलना सुरु होते. मग काय हरवले ह्याची एक यादीच मनात घेर धरू लागते.

  • एस टी ची घर-घर ऐकत १४- १६ तास प्रवास केल्यानंतर गावाकडे उतरल्यावर एक प्रकारची शांतता जाणवायची; ती निरव शांतता एकदम अंगावर यायची. बारीक छडी हातात घेऊन जोरात डावी उजवीकडे फिरवली तरी शांत हवा कापल्याचा सप-सप आवाज यायचा. आता तशी शांतता हरवल्यासारखी वाटते. कदाचित आता हवेत एफ एम रेडिओ चे, टी व्ही चॅनेल चे आणि मोबाईल चे सिग्नल भरल्यामुळे ती निरवता निघून गेली असावी
  • पूर्वी घराच्या कौलातून चुलीत पेटवलेल्या लाकडांचा धूर येताना दिसायचा- आता बव्हंशी घरांमध्ये गॅस च्या चुली आल्या आणि चुलींचा धूर हरवला.मातीच्या चुली गेल्या, फुंकण्या गेल्या आणि चुलीबरोबर तिच्या बाजूला ठेवलेली लाकडे गेली.
  • पूर्वी घरे मातीच्या भिंतींची असत, जमिनी मातीच्या आणि छप्पर नळ्यांचे. घरासमोर शेणाने सारवलेले खळे असायचे. खळ्या किंवा गोठ्याला ला वेगळा आडोसा करायचा असेल तर बांबू आणि झाडाच्या पानांची किंवा गवताची झडी बनवून आडोसा केला जायचा. पावसाच्या दिवसात चिव्याची (बांबूची) भेत आणि गवत वापरून तात्पुरत्या पावळ्या केल्या जायच्या. आता घरे सिमेंटची आणि पावळ्या प्लास्टिक च्या झाल्या आणि नैसर्गिक झड्या हरवून गेल्या
  • घरावर नळे असायचे आणि “नळे परतण्याचा” एक मोठा कार्यक्रम मे महिन्यात पावसाच्या आधी केला जायचा; पुढे मंगलोरी कौले आली – स्लॅब ची घरे आली आणि “नळे परतण्याचा” कार्यक्रम हरवला. ह्या नळ्यांवर तंबाखू भाजला जायचा, धूप दाखवला जायचा, चिलटे आणि मच्छर घालवण्यासाठी धूर घातला जायचा-नळे गेले आणि त्यांचा (खापरांचा) असा वापर करणे काळाआड झाले.
  • जुन्या काळात मातीच्या घागरी, गोली आणि मडकी घरोघरी दिसायची . तसेच मोठमोठे तांब्या पितळेचे हंडे, तपेल्या आणि कळशा असायच्या. पाण्यासाठी तांब्याचे अथवा पितळेचे फिरकीचे तांबे असायचे. आता प्लास्टिक ची भांडी आली, बिसलेरी च्या बाटल्या आणि फ्रिज आले आणि गोली-घागरी हरवल्या. तेलाच्या बुधल्या गेल्या, चिनी मातीच्या बरण्या गेल्या.
  • न्हाणी घरात चुलाणावर पाणी तापत मोठे पितळेचे हंडे ठेवलेले असायचे, ते एवढे काळे झालेले असायचे की ते धातूचे आहेत कि मातीचे असा संशय मनात यायचा. आता गिझर आले आणि हे जुने हंडे हरवले.पूर्वी तर न्हाणी घर म्हणजे घराबाहेर टाकलेला एक मोठा दगड असायचा ज्यावर उभे राहून अथवा बसून आंघोळ केली जायची. आडोशासाठी त्याला झडी बांधली जायची.
  • पूर्वी घरात नक्षी काम केलेल्या, पितळेच्या कडी कोयंडे असणाऱ्या मोठं मोठ्या लाकडाच्या पेट्या असायच्या, भिंतीला फडताळे असायची ती सर्व आता हरवली
  • घरात लाकडाच्या पेट्या तर प्रवासासाठी डोक्यावरून घेऊन जायच्या पत्र्याच्या पेट्या; आता हाताने ओढून घेऊन जायच्या चकचकीत ब्यागा आल्या आणि पत्र्याच्या पेट्या इतिहास जमा झाल्या
  • पानसुपारी तंबाकू ठेवण्यासाठी पितळेच्या पेट्या किंवा शोभेच्या चार चाके असलेल्या पितळेच्या  गाड्या असायच्या; त्या तसल्या पेट्या आता दिसत नाहीत. घराघरात मोठे चोपाळे, छपरी पलंग असायचे. चोपाळे कधी कधी झोपाळे म्हणून पण वापरले जात. ते हरवले. बीन बॅग्स आल्या आणि कापडाच्या आराम खुर्च्या हरवल्या.
  • पूर्वी घरात धान्य ठेवण्यासाठी मोठं मोठ्या कणग्या आणि छोटे गवताचे बनवलेले बिवळे असायचे ते आता हरवलेत
  • घराघरात दिसणारी धान्य मोजायची मापे – टिपरी, शेर, पायली, खंडी, मण नव्या गणने मध्ये बाद होऊन बसली
  • पूर्वी मातीच्या चुली आणि व्हायल असायचे, चूल पेटवायला फुंकण्या असायच्या आणि जेवण करण्यासाठी मातीची मडकी, बिड्याचे तवे आणि करवंटीचे डाव असायचे; हे सर्व हरवलेत. मिक्सर आले आणि पाटा वरवंटा अडगळीला जाऊन पडले.
  • घरांमध्ये पीठ काढायला दगडी जाती, भात भरडायला लाकडी जाती, जमिनीत बसवलेले उखळ आणि मुसळ असायचे – यांत्रिकीकरणात हे सर्व हरवले गेले.
  • बऱ्याच घरांच्या भिंतींवर नांगर, इरले, मोठ्या ढालग्या (टोपल्या), ढेकळे फोडायचा खुटा टांगलेले असायचे; शेतकर्याच्या घराची हि प्रतीके आता हरवत आहेत
  • घासलेटचे दिवे, लामण दिवे, चिमण्या, कंदील, जोक्या (सुकलेल्या बारीक काठ्या ज्या पेटवून (चूड)कमी अंतरावर जाण्यासाठी वापरात असत)  पेट्रोमॅक्स चे दिवे वीज आल्यानंतर जे गायब झालेत ते आता दुकानात हि सापडत नाहीत.
  • मातीच्या भिंतींना केला जाणारा गेरूचा गिलावा आणि मातीच्या जमिनीला केले जाणारे सारवण आणि त्यानंतर त्यावर पांढऱ्या चुन्याने बोटे वापरून केले जाणारे नक्षीकाम काळाच्या ओघात हरवले आहे
  • जुन्या घरांमध्ये घरातल्या लाकडी वाशांवर खडू ने सुविचार लिहिलेले असत – सुविचार लिहून घर आणि घरातली माणसे  सुशिक्षित असल्याचा दावा करणारी ही पद्धत हरवली आहे
  • पूर्वी चाकरमान्याला देण्यासाठीच्या भेटी असायच्या त्या म्हणजे चण्याच्या पिठाचे लाडू, किंवा शेंगदाण्याचे लाडू आणि नारळाची कापे, डांगराचे पीठ / पिठी साठी पीठ, गावठी तुपाचे डब्बे – हे सर्व लुगड्याच्या अथवा धोतराच्या कापडात गुंडाळून गठली करून भरल्या जायच्या; प्लास्टिक आले आणि ह्या लुगड्याच्या गठली च्या भेटी लुप्त झाल्या.
  • घराघरात ग्रामपंचायतीचे नळ आले आणि विहिरीवरची आणि व्हाळावर कपडे धुणार्यान्ची लगबग कमी झाली. व्हाळावर बांधले जाणारे लाकडी साकव पण आता फार कमी ठिकाणी दिसतात

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी माणसे माया लावणारी होती, देता-घेताना “तोल मोल के बोल” न करणारी , परसातले आंबे – फणस असेच उचलून हातात देणारी; ती जुनी – जाणती, माया करणारी, खरखरीत हात डोक्यावर फिरवून आशीर्वाद देणारी माणसे? ती पण हरवत चालली आहेत…

— प्रकाश दिगंबर सावंत

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..