नवीन लेखन...

केसांची निगा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Hair care from the perspective of ayurveda

केसांच्या समस्या – प्रमुख कारणे

वर बघितल्याप्रमाणे ‘केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे’ हे केसांचे तीन प्रमुख विकार आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा आपल्या हाडांचा मळ आहे. हाडे चांगली सशक्त व सुदृढ असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला किंवा अपघातामुळे फ्रॅक्चर वगैरे झाल्यास केस भरपूर गळू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांच्या आजारावर उपचार करुन ठीक झाल्यानंतर केसांची वाढ पूर्ववत सुरु होते. शरीरात हाडांमध्ये वात दोष प्रामुख्याने असतो आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ औषध म्हणजे तेल. अशा प्रकारे केसांचा आणि तेलाचा अप्रत्यक्ष संबंध आहे. केसांना नियमित तेल लावणार्‍यांचे पण केस गळून टक्कल पडते तर काहीजण आजिबात तेल लावत नाहीत तरीपण केस गळत नाहीत. याचे कारण म्हणजे हाडांचे आरोग्य. शरीरात एक दोष वाढला की तो दुसर्‍या दोषाला कमी करतो. केसांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो.

केशस्वास्थ्याचा विचार करतांना आहारातील काही घटकांचा परिणाम होतो का हे समजणे पण आवश्यक आहे. शरीरातील हाडा-मासापासून तर नख-केसांपर्यंत सर्व गोष्टी आपल्या आहारातूनच तयार होत असतात. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर शरीरातील धातूंमध्ये त्याचे परिणाम आजाराच्या स्वरुपात दिसू लागतात. केसांना पोषण मिळते आपल्या आहारतूनच. आहारात काही घटक कमी-अधिक होत असतील तर केसांच्या गळण्याला निमित्त होऊ शकते. केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ. मीठ म्हणजे केसांचा एक नंबरचा शत्रू. ज्यांच्या खाण्यात मीठ थोडे वरचढ असते त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ मिठापेक्षा थोडे अळणी अन्न घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड ह्यांसारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर असते. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळावेतच. आहारात मीठ जास्त घेण्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे वाढते.

केसांच्या सुयोग्य पोषणासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांची व कॅल्शियमची नितांत आवश्यकता आहे. दूध, मांसाहार, द्विदल धान्य, सोयाबीन अशा पदार्थांमध्ये सकस प्रथिने असतात. तीळ, पालेभाज्या, केळी, संत्री, बदाम, कोबी, फ्लॉवर सारख्या अनेक गोष्टींमध्ये प्रचुर प्रमाणात कॅल्शियम असते. संपूर्णपणे शाकाहारी असणाऱ्यांनी ह्यांचे सेवन आहारात नियमितपणे केले पाहिजे.

अनुवांशिकता हे केसांच्या विकारांचे एक प्रमुख कारण आहे. केस हा पित्रुज भाव असल्याने वडिलांच्या गुणसूत्रानुसार ह्याचे स्वास्थ्य असते. अनुवंशिकतेचा विचार केला तर वडिलांचे केस ज्या विशिष्ट वयात गळू लागले त्याच वयात मुलांमध्येही केस गळती सुरु होऊ शकते.

मानसिक ताण, चिंता, क्रोध हे केसांच्या समस्यांचे महत्वाचे कारण आहे. अशा मानसिक असंतुलनामुळे कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन ह्यांची वाढ होऊन केसांना धोका संभवतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या काही वनस्पतींच्या सेवनाने ह्या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येते.

प्रदूषण हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनेशन करण्याची पद्धत आहे. ह्या पद्धतीत क्लोरिनचे प्रमाण अधिक झाले व केस धुण्यासाठी असे पाणी वापरले तर केस गळती झपाट्याने होऊ लागते. ह्यावर सोपा उपाय म्हणजे स्नानासाठी वापरावयाचे पाणी २ – ३ तास बादलीत काढून ठेवावे. ह्याने त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाते व केसांना होणारी इजा टाळता येते. प्रदूषित हवा, त्यातील कमी झालेले प्राणवायूचे प्रमाण व वाढलेले इतर घातक वायु हे असंतुलन रोखणे जवळजवळ अशक्यच आहे. निसर्ग संगोपन, वृक्षारोपण व संवर्धन हे ध्येय प्रत्येकानेच पाळणे नितांत गरजेचे आहे.

केसांची निगा – समज / गैरसमज

केसांच्या चिकित्सेबद्दल विचार करताना शांपू आणि तेल ह्याशिवाय काही उपचार असू शकतो असे सर्वसामान्यांच्या मनातही येत नाही. ह्याचे मुख्य कारण आहे जाहिरातींचा भडिमार. ह्या उत्पादनांच्या इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात की नेमकं काय योग्य आहे हेच कळेनासं होतं.

“कोणता शांपू चांगला?” अशी विचारणा बरेच लोक करतात. मुळात शांपूचा उपयोग काय हे लक्षात घेतले पाहिजे. शांपू हा फक्त केस धुण्यासाठी वापरला जाणारा फेसाळणारा साबणासारखा (इमल्सिफायर) पदार्थ आहे. केसांवरील तेलकट अंश ह्यात विरघळतो आणि पाण्याने धुवून टाकला जातो. शांपूचा संपर्क केसांशी फक्त काही सेकंद असतो. तेवढ्या थोड्या वेळात त्याचा कोंड्याशी काय म्हणून संपर्क होणार? कोंडा हा एक त्वचा रोग आहे आणि त्वचारोगावर इलाज करायचा असेल तर जे काही औषध त्वचेवर लावाल ते निदान तासभर तरी त्या ठिकाणच्या त्वचेवर राहिले पाहिजे. शांपूचा परिणाम फक्त कोंडा वाहून नेण्यासाठी होऊ शकतो. कोंडा निर्माण होण्याची क्रिया त्याबे थांबू शकत नाही.

हर्बल शांपू प्रकाराचे प्रस्थ सध्या फार वाढलेले दिसते. ह्या हर्बल शांपूमध्ये वनस्पतींच्या अर्काचा फक्त थोडासाच अंश असतो, बाकी सर्व रसायनेच असतात. रासायनिक घटक असल्यामुळे ते वाईट असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु हर्बल म्हणण्यासारखे त्यात वास्तविक काहीच नसते. केसांना मुलायम (हेअर सॉफ्टनिंग) करणारे, चकाकी (ग्लॉस) देणारे शांपूही आजकाल मिळतात. ह्या शांपुंमध्ये मुख्यतः रासायनिक स्निग्ध पदार्थ असतात, जे  केसांना मुलायम करतात, गुंतागुंत होऊ देत नाहीत व चकाकी देतात. तरीदेखील हा कृत्रिमपणा केसांच्या स्वास्थ्यासाठी कितपत सुरक्षित आहे हा वादाचा मुद्दा आहे. शांपूचा दर्जा ठरतो त्याच्या pH वरून. शांपू हा अॅसिडिक किंवा अल्कलाईन नसावा, तो न्युट्रल असावा हे सर्वात महत्वाचे.

केसांसाठी तेल आवश्यक आहे खरे, पण ते केवळ केसांना वर वर लावून उपयोगी नाही, तर ते मुळाशी शोषले जाणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार तेल नाकात टाकावे म्हणजे त्याचा परिणाम केसांच्या मुळांपर्यंत होतो. आयुर्वेदाच्या तत्वानुसार नाक हे शिरोभागाचे द्वार आहे. त्यातील यंत्रणा व श्लेष्मल स्तरांमधून द्रव्याचे शोषण होते.

पुढचा महत्वाचा भाग आहे औषध पोटातून घेण्याचा. पोटात घेतलेल्या औषधी द्रव्यातील कार्यकारी घटक रक्ताद्वारे केसांच्या मुळांमार्फत केश संरक्षण व वर्धन करून अस्थि धातु पोषणाचेही कार्य करतात. झाडांच्या पानांवर पाणी किंवा खत शिंपडून उपयोग नाही तर ते पोषक घटक झाडाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. केसांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. आयुर्वेदात काही विशिष्ट वनस्पती व औषधी द्रव्ये ह्यासाठी वर्णित आहेत. ह्यांच्या सेवनाने अगदी ५ – ६ दिवसांतच फरक दिसू लागतो असे अनुभव प्राप्त झाले. साधारण दोन ते तीन महिन्यांत केसांची लक्षणीय वाढ दिसून येते. ही औषधे ३ महिने सातत्याने घेतल्यावर १५ ते २० दिवस बंद करुन पुन्हा चालू करावीत. एकच एक औषध सतत चालू ठेवण्यामुळे शरीर प्रतिसाद देणे बंद करते. म्हणून ही गॅप ठेवावी.

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on केसांची निगा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

  1. Age 36
    केस खूप गळतात
    कोणतीही औषधे चालू नाहीत
    कोणताही आजार नाही
    कोंडा होतो खूप

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..