नवीन लेखन...

गृहिणी… सखी… सचिव

वृत्तपत्र वाचताना बऱ्याच उद्विग्न करून टाकणाऱ्या बातम्या वाचायला लागतात. त्यात ‘ किरकोळ कारणावरून पत्नीचा खून’ ही एक नेहमीची बातमी आहे. चारित्र्याच्या संशयावरून, घरगुती भांडणातून, पैशाच्या हव्यासातून हे प्रकार घडतातच. पण रवा वाचनात आलं की, घरात मित्रांबरोबर पत्ते खेळायला विरोध केला म्हणून एकानं मित्राच्या मदतीनं पत्नीला जाळलं. हे सारं अतिभयानक आहे. कदाचित हे प्रातिनिधिक नसेलही. कित्येक सुखी – शांत संसार समाजात सुरू असतात. त्याची बातमी कशी होईल? एखाद्याच नराधमाचं कृत्य बातमीच्या स्वरूपात लोकांपुढे येतं, असंही असेल. आपलं दुर्दैव एवढंच की, एकही दिवस अशा बातम्यांविना जात नाही.

यावरून सहज मनात विचार आला, संसारात स्त्रीचं स्थान काय? भारतीय संस्कृतीमध्ये ते काय आहे? प्रत्यक्षात तसंच आहे का? आणि आपोआप एक सुंदर संस्कृत ओळ आठवली. रघुवंशातील सुकुमार राणी ‘इंदुमती’ मृत्यू पावली त्यावेळी ‘अज’ राजाला म्हणजे तिच्या पतीला झालेल्या शोकाचं फार सुरेख वर्णन कालिदासानं केलं आहे. भारतीय काव्यामध्ये हा ‘ अजविलाप प्रसिद्ध आहे. अज म्हणतो, ‘इंदुमती’ माझी कोण नव्हती? माझी भार्या, गृहिणी, सखी, सचिव, प्रिय शिष्या सारं काही तीच होती.

सामान्यत: भारतीय संस्कृतीनं पत्नीला पतीच्या बरोबरीचं, सन्मानाचं स्थान दिलं आहे. ही संस्कृती मानते की स्त्री पतीची पत्नी असतेच, त्याचबरोबर ती गृहिणी’ आहे. गृहिणी याचा अर्थ ‘घर सुनियंत्रित ठेवणारी. ‘ नियंत्रण ठेवण्याच्या अधिकारात काय नाही? पतीनं आणलेलं धन कसं खर्च व्हावं हे ठरवण्याचा अधिकार, घरातल्या मुलांवर सुसंस्कार व्हावेत म्हणून घरात कोणत्या वस्तू किंवा व्यक्ती याव्यात, कोणत्या येऊ नयेत हे ठरविण्याचा अधिकार, घरातली दैनंदिन शिस्त जपणं हे सारे तिचे अधिकार अर्थात हे अधिकार काही उगाचच दिले गेलेले नाहीत. भारतीय संस्कृतीनुसार आदर्श गृहस्थाश्रम तो जिथे घरातील वृद्धांची सेवा होते, कर्त्या पुरुषाला विसाव्याची जागा मिळते, अतिथींचा सत्कार होतो. या जबाबदाऱ्या पार पाडायच्या, तर हे अधिकार इवेतच नाही का?

स्त्री’ ही पतीची सखी असते. ‘सखी’ या शब्दात अत्यंत नाजूक भाव आणि फार मोठी जबाबदारी आहे. ‘सखी’ ती जिच्याजवळ मनातलं सारं गूज सांगावंस वाटतं. अपमानाची शल्यं मोकळेपणाने दाखवता येतात. मनातलं दुःख बोलता येतं. काही स्वप्नं सांगता येतात. यशही अभिमानानं दाखवता येतं. कारण ही व्यक्ती अशी असते – जी आपल्या पराभवाला हसणार नाही. उलट तो पचवून पुढे जाण्याची स्फूर्ती देईल. आपल्या यशानं जी सुखी होईल, अपयशानं व्यथित !

सखी’ या शब्दात मनाची तार जुळणं अपेक्षित आहे. भारतीयांनी ‘पत्नी’ ही केवळ उपभोग्य वस्तू मानली नाही; तर सर्वात जवळची ‘व्यक्ती’ मानली हेच यातून दिसून येत नाही का? असं म्हणतात की, सात पावलं चाललं की ‘मैत्री दृढ होते. विवाहामधली सप्तपदी जन्मोजन्मीच्या ‘मैत्री ‘चं प्रतीक असेल तर ‘मैत्री’ ही समान दर्जाच्या व्यक्तींमध्येच होते. त्याअर्थी पती-पत्नी यांचा समान दर्जाच या संस्कृतीला अभिप्रेत नव्हता काय? आणि ‘मैत्री’ कधीच एकतर्फी नसते. पत्नी जर ‘सखी’ असेल, तर पतीनंही वरील सर्व अर्थानी पत्नीचा ‘सखा’ व्हायला नको का?

पत्नीचं आणखी एक रूप सचिवाचं ! अजासारख्या पराक्रमी राजानं ज्याच्या हाताखाली कितीतरी सचिव असतील, त्यानंही आपल्या पत्नीला आपली ‘सचिव’ मानलं आहे. पत्नी ‘सचिव’ तेव्हाच होऊ शकते जेव्हा पतीच्या व्यवसायाबद्दल, त्याच्या कामाच्या स्वरूपाबद्दल तिला पूर्ण माहिती असते.

तुला काय करायचंय त्याच्याशी? मी तुला काही कमी पडू देत नाही ना? बास !” हे वाक्य आपल्या संस्कृतीत बसत नाही. उलट प्रत्येक बाबतीत पत्नीचा सल्ला घेणं इथे महत्त्वाचं मानलं आहे. कोणताही धार्मिक विधी, यज्ञ-याग हे पत्नीशिवाय होऊ शकत नाही. अगदी संसार सोडायलासुद्धा पत्नीची परवानगी लागते. प्रसंगी आपल्या पतीला योग्यायोग्यतेचा सल्ला पत्नी देऊ शकते. अर्थात हा सल्ला तिनं आपल्या स्वार्थासाठी द्यायचा नसतो. म्हणून तर तिला ‘सहधर्मचारिणी’ देखील मानलं जातं. ती पतीच्या बरोबरीनं धर्माचं आचरण करणारी असावी. अन्याय, अधर्माच्या पक्षातली असू नये ही अपेक्षाही तिला ‘सचिवपद’ देताना तिच्याकडून केली गेली. सामान्यत: आपल्या जन्मजात व्यवहारकुशलतेनं स्त्रियांनी संसाराचं सोनंच केलंय. अतिशय उत्तुंग विचारांच्या अशाही स्त्रिया या देशात होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या पतीचा ध्येयमार्ग हा जास्त श्रेष्ठ, दिव्य आहे हे लक्षात घेऊन प्रसंगी संसार गमावला पण पतीला ध्येयमार्गावरून ढळू दिलं नाही.

ज्या पुरुषांच्या मागे ‘तू चुकतो आहेस’ हे ठामपणे सांगणारी पत्नी असते,

तो पुरुष आयुष्यात यशस्वी होतो असं म्हटलं जातं. हे वाक्यही तिला ‘सचिव’ म्हणून मान्यता देणारंच नाही का?

सामान्यतः स्त्रियांना असा पुरुष पती म्हणून हवा असतो, जो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असेल. हा स्त्रियांचा नैसर्गिक स्वभाव आहे की त्यांच्यावर पिढ्यान्पिढ्या झालेल्या संस्काराचा परिणाम आहे कुणास ठाऊक. पण कर्तृत्व, ज्ञान या सगळ्यांमध्ये पती आपल्या पुढे असण्यात त्यांना आनंद मिळतो. अशा वेळी पतीनं आपलं ज्ञान पत्नीलाही देणं अभिप्रेत असतं. म्हणून पत्नी ही आवडती ‘शिष्या ‘देखील असते.

स्त्रीला आपल्याकडे ‘शक्ती’ मानतात. सर्वसामान्य परिस्थितीत स्त्री पतीच्या आधारानं सारा ‘कर्तेपणा’ त्याच्याकडे देऊन त्याची सेवा करीत राहते. मात्र एखादा फारच कठीण प्रसंग आला तर, खंबीरपणे उभी राहून ती त्याचा प्रतिकार करते.

तिच्यामधलं सारं सामर्थ्य त्यावेळी दिसून येतं. अशा वेळी प्रसंगी ती आपल्या पतीची ‘आई’ ही बनू शकते.

म्हणूनच ‘स्त्री’ हा या संस्कृतीचा मानबिंदू मानला गेला. तिच्या एका अपमानासाठी इथे महायुद्धं घडली.

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ हे आपल्याच संस्कृतीतलं वचन आहे.

पण आज प्रश्न पडतो – हे सारं फक्त सिद्धांतस्वरूपातच का राहिलं? व्यवहारात स्त्रीला हे स्थान मिळालं का? बहुधा नाहीच. मंदिरामंदिरात पूजली जाणारी स्त्री घरात मात्र उपेक्षित राहिली. ‘मिळवत्या’ स्त्रीला आज घरात मिळणारा मान हा पुन: एकदा तिच्यामधल्या ‘पुरुषी कामाला’ दिलेला आहे. ‘स्त्री’ला ‘स्त्री’ म्हणून तिच्या घरातल्या भूमिकेबद्दल सन्मान फार क्वचित मिळतो. स्त्रियांवर होणारे अत्याचार हे संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व कदाचित करीत नसतीलही, पण त्यांची संख्या नगण्य नाही हे दु:ख आहे.

‘नारी को देवी कहकर इस देशने दासी जाना है

जिसका कुछ अधिकार नहीं वो घरकी रानी माना है।’ ‘

अशी आजची अवस्था आहे.

अशा वेळी वाटतं, आमच्या संस्कृतीचं कोणतं रूप खरं? ‘लक्ष्मी’ मानून ‘ स्त्री ‘ची पूजा करणारं? की उपभोग्य वस्तू मानून मनात येईल तेव्हा तिला फेकून देणारं. अत्यंत उच्च तत्त्वज्ञान आणि अत्यंत हीन आचार यांचा वाईट मिलाफ भारतात दिसून येतो तेवढा क्वचितच इतरत्र दिसत असेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..