कार्यकाळ: २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८
जन्म: ४ डिसेंबर १९१९ मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२

स्वच्छ प्रतिमा जपणाऱ्या इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदाचा कार्यभार करण्यासाठी फारसा कालावधी मिळाला नाही. असे असले तरी दीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली.
भारताचे बारावे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी राजकारणात येण्यापूर्वी काही काळ पत्रकार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. १९९६ साली काँग्रेसच्या पाठिंब्यावर केंद्रात देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोर्चाचे सरकार स्थापन झाले खरे, परंतु वर्षभराच्या आत काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या मनःस्थितीत आल्यामुळे संयुक्त मोर्चाने नेतृत्वात बदल करीत इंद्रकुमार गुजराल यांची पंतप्रधानपदी निवड केली. अर्थात तत्कालीन राजकीय अस्थिरतेमुळे गुजराल यांनाही वर्षभरातच पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणाऱ्या गुजराल यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. अभ्यासू, प्रभावी वक्तृत्व आणि उच्च वैचारिकता असे गुजराल यांचे व्यक्तिमत्त्व होते. इंदिराजींच्या हत्त्येनंतर गुजराल यांची उपेक्षा होऊ लागल्याने त्यांनी काँग्रेसचा त्याग करीत जनता दलात प्रवेश केला. जनता दलाचे देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त मोर्चाच्या सरकारमध्ये गुजराल यांनी परराष्ट्रमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात गुजराल यांनी पाकिस्तान सोबतचे भारताचे संबंध सुधारण्यावर भर दिला. देशाचा आर्थिक विकास उंचावला जावा यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. भ्रष्ट झालेल्या नोकरशाहीवर अंकुश ठेवण्यासाठी गुजराल यांनी कठोर उपाययोजना केल्या. वयाच्या ९२व्या वर्षी गुडगाव येथे त्यांचे निधन झाले.


Leave a Reply