नवीन लेखन...

माजी सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर

अभ्यासू राजकारणी, शिवसेनेचे धुरंधर नेते व ज्येष्ठ साहित्यिक नेते, माजी सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांचा जन्म २३ जानेवारी १९३५ रोजी मुंबई येथे झाला.

प्रमोद सच्चिदानंद नवलकर हे त्यांचे पूर्ण नाव. राजकीय पुढारी असले तरी प्रमोद नवलकरांची ओळख महाराष्ट्राला होती ती सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व म्हणून. रेकॉर्डब्रेक स्तंभलेखक , खुशखुशीत वक्ता, बातमी राहणारा सामाजिक कार्यकर्ता, मराठीतल्या स्टिंग ऑपरेशनचा जनक आणि मुंबईचा ज्ञानकोष अशी त्यांची चतुरस्त्र ओळख होती.

’भटक्याची भ्रमंती’ हे नवशक्तीच्या रविवारच्या आवृत्तीचं एक खास आकर्षण असे. प्रमोद नवलकर ५२ वर्ष सातत्यानं हा स्तंभ लिहित होते. या स्तंभातून त्यांनी वाचकांसमोर मुंबईतलं रात्रीचं आयुष्य उभं केलं. स्मगलिंग, वेश्या व्यवसाय, मटक्यांचे अड्डे, सर्व थरातील भ्रष्टाचार यावर त्यांनी जीव धोक्यात घालून लिहिलं.

३० जून १९५३ रोजी लेखन प्रारंभ केलेल्या या ‘भटक्या’ची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं देखील दखल घेतली. तसेच ‘भ्रमंती’ हा दिवाळी अंकही प्रमोद नवलकर सातत्यानं २५ वर्ष प्रकाशित करत असत. त्यातलं लिखाणंच एक टाकी असायचं असं नाही तर लिहिण्यापासून ते हातगाडीवरून गठ्ठे पोहोचवण्यापर्यंतची सर्व कामंही ते स्वतःच करत असत. प्रमोद नवलकर यांनी मिड-डे, महाराष्ट्र टाईम्स, मार्मिक, सामना, नवशक्तीसाठी ते लिखाण केले होते. प्रमोद नवलकर यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले होते.

शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होते. शिवसेनेच्या उदयानंतर ते अनेक मुंबईकर मराठी माणसांप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंकडे ओढले गेले. तोपर्यंत ते शैलीदार लेखक आणि धडपडणारे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होतेच. सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले. लगेचच ७२ साली जनसंघाच्या जयवंतीबेन मेहतांना हरवून ते आमदार झाले. विधानसभेवर निवडून जाण्याची ती पहिलीच आणि एकमेव वेळ. तेव्हापासून मनोहर जोशी , सुधीर जोशी आणि नवलकरांचं त्रिकुट जमलं.

त्यांनी गिरगाव चौपाटीवर नाना-नानी पार्कची निर्मिती केली. ते शिवसेनेच्या पक्षाचे आघाडीचे नेते म्हणून कार्यरत होतेच पण मॅकिनॉन अँड मॅकेंझी या ब्रिटिश कंपनीत कारकून ते जनरल मॅनेजर अशी मजल त्यांनी मारली आणि नंतर कंपनीचे सन्माननीय सल्लागार म्हणून काम केलं.

प्रमोद नवलकर १९८० मध्ये विधानसभा सदस्यांद्वारा आणि १९८८, १९९४ व २००० असे सलग तीन वेळा मुंबई पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर तर १९७२ मध्ये मुंबईतील गिरगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे त्यांना १९९९-२००० चा विधानपरिषदेतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला होता. १९९१-९२ मध्ये ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता होता त्यांनी राज्य मंत्रिमंडळात परिवहन, शालेय शिक्षण, व्यापार व वाणिज्य, सांस्कृतिक कार्य, शिष्टाचार, दारुबंदी प्रचार कार्य आणि माहिती व जनसंपर्क इत्यादी विविध खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम प्रकारे कार्यभार सांभाळला होता.

प्रमोद नवलकर यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट, रमाधाम वृध्दाश्रमाचे विश्वस्त, फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशन, बी.ई.एस.टी. ऑफिसर्स असोसिएशन, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डचे अध्यक्ष, तसेच, गिरगाव युवक सभेचे संस्थापक व मुंबई विद्यापीठ एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य म्हणून काम केले होते.

प्रमोद नवलकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे सदस्य व बी.ई.एस्.टी.चे चेअरमन पदही भूषविले होते.

नवलकर यांना प्रियदर्शनी पुरस्कार, आय लव्ह मुंबई पुरस्कार व उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

प्रमोद नवलकर यांनी मुंबई महानगर, प्रहार, थैमान, प्रभात, भटक्या, सावली, बेधडक, विरंगुळा, सहज आठवणी, सुरुंग, झपाटा, गंडेरी, कल्लोळ हळुवार, मनोवेध, आनंद, संवेदना, पायपीट उमाळा, निवडक नवलकर, धडाका, निरागस, धुमाकूळ, पारुद, निशाण, जिव्हाळा, झेप इ पुस्तके लिहिली आहेत.

त्यांनी मार्मिकचे सहसंपादक, तसेच भ्रमंती, कोकण मित्र व पप्रभातचे संपादक म्हणून काम केले होते.

प्रमोद नवलकर यांच्या पत्नी वंदना नवलकर या गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या. त्या पाठारे प्रभू सोशल समाज या संस्थेच्या विश्वस्त होत्या. मुंबईकरांच्या घरच्या जेवणाची भूक भागवणाऱ्या ‘कुटुंब सखी’ ची स्थापना वंदना नवलकर यांनी केली. एका लहानशा खोलीत तीन महिलांना सोबत घेऊन अवघ्या तीन हजार रुपयांच्या भांडवलावर ‘कुटुंब सखी’ हा लघुउद्योग सुरू केला होता.

प्रमोद नवलकर यांचे निधन २० नोव्हेंबर २००७ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..