चिंतनशील दिग्दर्शक श्याम बेनेगल

चिंतनशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी झाला.

श्याम बेनेगल यांनी कलाक्षेत्रातील कारकीर्दीस ‘लिंटास’ या प्रख्यात जाहिरात संस्थेतून सुरुवात केली. लिंटासमध्ये कॉपी रायटर म्हणून प्रवेश केल्यानंतर आपल्या प्रतिभेच्या जोरावर अनेक पदे भूषवित त्यांनी एकाहून एक सरस जाहिराती केल्या. जाहिरात क्षेत्रात जवळपास नऊशे जाहिरातींचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तो घेऊनच त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

विशेष म्हणजे प्रसिद्ध चेहरे अभिनेते घेण्यापेक्षा त्यांनी पुण्याच्या एफटीआय व दिल्लीच्या एनएसडीमधून निघालेल्या नवीन सृजनावर कलम केले. त्यांना पैलू पाडले. आपल्या चित्रपटामधून त्यांना प्रतिभाविष्काराची संधी दिली. त्यामुळेच पुढे जाऊन त्यामध्ये अमरीश पुरी, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, शबाना आझमी, स्मिता पाटील, अन्नू कपूर यासारखे हिरे चित्रपटसृष्टीस गवसले.

१९७३ साली त्यांनी पहिला चित्रपट ‘अंकुर’ दिग्दर्शित केला. यामध्ये त्यांनी दक्षिण भारतातील प्रस्थापित सरंजामशाही व्यवस्थेचे दर्शन घडविले. अंकुर चित्रपट पूर्वीच्या सर्व व्याख्या बदलणारा ठरला. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने आणि त्याच्या रचनेच्या दृष्टीने अंकुर पूर्णपणे वेगळा ठरला. बर्लिन महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आणि ऑस्करसाठी अंकुर चित्रपटाची निवडही झाली होती. समीक्षकांनीही या चित्रपटाविषयी भरभरून चर्चा केली.

‘निशांत’ चित्रपटात त्यांनी जमीनदारी व सरंजामशाही व्यवस्थेत सामाजिक संतुलन बिघडून साचलेल्या व्यवस्थेत सामान्य व्यक्तींवर होणारे अन्याय, अत्याचारास अभिव्यक्ती दिली. या चित्रपटात असहाय्य पतीची व्यथा मांडून त्यांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले.

बेनेगल यांचे चित्रपट देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती, प्रश्न, समस्या, रूढी परंपरा या विषयांभोवती गुंफलेले असतात.

गुजरातमध्ये आणंद येथील अमूलच्या माध्यमातून घडलेल्या धवलक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘मंथन’ सारखा चित्रपट सकारात्मक संदेश देतो. ही प्रयोगशीलता चित्रपटसृष्टीत अपवादानेच आढळते. विशेष म्हणजे या चित्रपट निर्मितीसाठी वित्तपुरवठा केला तो डेअरीच्या सदस्यांनी, हाही प्रयोगच. प्रत्येकी दोन रूपये प्रमाणे सर्वांनी आपला वाटा उचलला.

‘भूमिका’ मधून त्यांनी कलाकाराच्या आत्मभानाची कथा रेखाटली आहे. आत्मिक समाधानासाठी कलेच्या सवौच्च शिखरावर जाण्याची धडपड व कलेत पूर्णत्वासाठी स्वतःशीच चाललेला संघर्ष यातून त्यांनी मांडला. हा चित्रपट मराठी नाट्य अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारीत आहे.

समांतर सिनेमाची थोडी पीछेहाट झाल्यानंतर बेनेगलांनी आपला मोर्चा नवीन माध्यमाकडे वळविला. दूरचित्रवाणीत माध्यम क्रांतीस तेव्हा नुकतीच सुरूवात झाली होती. अशावेळेस बेनेगल यांनी पंडित नेहरू यांच्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ पुस्तकावर आधारीत ‘भारत एक खोज’ या मालिकेची निर्मिती केली. ही मालिका प्रचंड गाजली.

‘सुरज का सातवा घोडा’ हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. हा चित्रपट धर्मवीर भारती यांच्या कादंबरीवर आधारीत होता. यातून त्यांनी काळानुसार बदलणारे संदर्भ व सामाजिक मुल्यांवर भाष्य केले होते. मांडणी, हाताळणी, विषय या सर्वांत हा चित्रपट म्हणजे प्रयोग आहे.

बेनेगल यांनी स्वातंत्र्य चळवळीतील दोन टोकाचे महानायक महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांनाही आपल्या पद्धतीने पड़द्यावर सादर केले. ‘द मेकींग ऑफ महात्मा ‘ व नेताजी सुभाषचंद्र बोस : द फॉरगॉटन हिरो’ हे त्यांचे चित्रपटही वेगळे आहेत. मेकींग ऑफ महात्मा मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वकिली करायला गेलेल्या मोहनचंद करमचंद गांधी यांचा महात्मा गांधी होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटला आहे. सुभाषचंद्र बोस चित्रपटात नेताजींच्या प्रारंभिक जीवनापासून जर्मनी, जपानचा पाठिंबा मिळवून व आझाद हिंद फौजेची स्थापना करून इंग्रजांविरुद्ध आघाडी उघडेपर्यंतचा प्रवास दाखविला आहे. या दोन्ही चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कौतुक झाले.

‘झुबेदा’ सारखा व्यावसायिक व कलात्मकतेचा संयोग असलेला चित्रपटही त्यांनी तेवढ्याच ताकदीने उभा केला. दहशतवादाच्या रस्त्यावर चुकलेल्या एका तरूणाची कथा मांडणारा द्रोहकाल हाही त्यांचाच चित्रपट. त्यांनी युनिसेफसाठी काही शैक्षणिक मालिकाही काढल्या.

आरोहण या चित्रपटासाठी १९८२ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या श्याम बेनेगल यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. त्याचबरोबर सुमारे चाळीस माहितीपटांची निर्मितीही त्यांनी केली. श्याम बेनेगल राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.

पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, आणि कोलकाता विद्यापीठाची डी. लिट. व्ही. शांताराम जीवनगौरव असे अनेक सन्मान बेनेगल यांना मिळाले आहेत.

श्याम बेनेगल यांचे चित्रपट –

अंकुर, मंथन, निशांत, सुरज का सातवा घोडा, त्रिकाल, भूमिका, जुनून, समर, झुबेदा, कलयुग, मंडी, द्रोहकाल, मेकिंग ऑफ महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2275 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…