नवीन लेखन...

फेब्रुवारी ०६ : प्रथमश्रेणीतील सर्वात मोठा पाठलाग – युसूफ पठाणचे द्विशतक

 
२ फेब्रुवारी २०१० रोजी हैदराबादेतील राजीव गांधी इंटरनॅश्नल स्टेडिअमवर दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग हा २००९-१० च्या दुलीप चषकाचा अंतिम सामना सुरू झालेला होता.रणजी चषकाप्रमाणेच दुलीप चषक ही भारतातील प्रथमश्रेणीची स्पर्धा आहे. रणजितसिंहजींचे नातलग कुमार श्री दुलीपसिंहजी यांच्या नावाने १९६१-६२ च्या हंगामापासून ही स्पर्धा विभागीय संघांमध्ये खेळली जाते. अधूनमधून या स्पर्धेत काही परदेशी खेळाडूंनी आणि संघांनी अतिथी म्हणून हजेरी लावलेली असली तरी उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि मध्य विभाग अशा पाच विभागांमध्ये ही स्पर्धा खेळविली जाते. आधी नॉक-आऊट पद्धतीने (संघ हरला की बाहेर) खेळली जाणारी ही स्पर्धा १९९३-९४ च्या हंगामापासून साखळी पद्धतीने खेळली जाते. २००३-०४ च्या हंगामापासून एक अतिथी संघ या स्पर्धेत समाविष्ट होतो आहे. घडाभर तेल पुरे…

दक्षिण विभागाच्या कर्णधाराने (दिनेश कार्तिक) नाणेकौल जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ४०० धावांवर त्यांचे दाही गडी बाद झाले. स्वत: कर्णधाराने १८३ धावा काढल्या. दक्षिणेच्या डावात त्यानंतरच्या सर्वाधिक धावा होत्या ५३ (गणेश सतिशच्या) ! इरफान पठाणने १०० धावा देत निम्मा संघ गारद केला.

पश्चिमेच्या फलंदाजांची मात्रा चालली नाही आणि युसूफ पठाणचा अपवाद वगळता (१०८ धावा, ७६ चेंडू, १२ चौकार, ५ षटकार) इतरांनी सफा निराशा केली. धवल कुलकर्णी (फलंदाज क्र. १०, नाबाद २७) हा डावात युसूफनंतर सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला. चंद्रशेखर गणपतीने पाऊणशे धावांमध्ये पाच मोहरे टिपले. दक्षिणेला १४९ धावांची आघाडी मिळाली आणि दिवस-अखेर दुसर्‍या डावात त्यांनी बिनबाद बेचाळीस धावाही काढल्या.

तिसरा दिवसही पुन्हा दिनेश कार्तिकने गाजवला. दीडशे धावा त्याने काढल्या. या खेपेला धवल कुलकर्णीने पाचाळी मिळवली आणि तिसर्‍या दिवशी नऊ षटकांचा खेळ शिल्लक असताना कार्तिकने डाव घोषित केला. ९ बाद ३८६ वर.

पश्चिमेसमोर

आता जिंकण्यासाठी ५३६ धावा काढण्याचे लक्ष्य होते. दोन पूर्ण दिवस आणि नऊ षटकांचा खेळ शिल्लक होता. पहिल्या डावात अवघ्या २५१ धावा त्यांना करता आल्या होत्या.

तिसर्‍या दिवस-अखेर पश्चिमेने बिनबाद ५० अशी काहीशी आश्वासक सुरुवात केली. यात एकट्या चिराग पाठकचा वाटा ४१ धावांचा होता. चौथ्या दिवशी ११७ धावांच्या सलामीनंतर हर्षद खडीवाले बाद झाला, वैयक्तिक ४५ धावा काढून. त्याच्या जागी आलेल्या कर्णधार वसिम जाफरने जबाबदारीने खेळ केला. दरम्यान पाठकने आपले शतक पूर्ण केले. वैयक्तिक १३० धावांवर तो बाद झाला तेव्हा पश्चिमेच्या २२४ धावा झालेल्या होत्या. भाविक ठकेर शून्यावर बाद झाला आणि त्याच्या जागी आला युसूफ खान पठाण. (मोठ्या धावसंख्येच्या डावांमध्ये हटकून आघाडीच्या फलंदाजांपैकी कुणीतरी शून्यावर बाद होतोच, त्याच्याबद्दल पुन्हा केव्हातरी.)

३ बाद २३९. सदुसष्टाव्या षटकातील चार चेंडूंपर्यंतचा खेळ झालेला होता. धावगती सुमारे साडेतीन धावा प्रतिषटक. युसूफ पठाण नुकताच पट्ट्यावर उतरलेला. दुसर्‍या बाजूला वसिम जाफर. पश्चिमेला सामना जिंकण्यासाठी अजून २९७ धावांची आवश्यकता. सामन्याचा इथवरचा रागरंग पाहता बळी न पडल्यास हे आव्हान कठीण नव्हते. चिक्कार वेळ शिल्लक होता.

२६३ वर जाफर गेला (६६ धावा). युसूफ तेव्हा १५ वर खेळत होता. याच धावसंख्येवर दक्षिणेने एक दक्षिणा दिली : युसूफचा झेल एका क्षेत्ररक्षकाने टाकला ! २९४ वर रवींद्र जडेजा गेला (१ धाव) आणि पठाण-बंधू खेळू लागले. डावातील ४५ व्या चेंडूवर षटकार मारून मोठ्या पठाणने आपले अर्धशतक पूर्ण केले. चार चौकार, तीन षटकार.६५ धावांवर गौतमने युसूफ पठाणचा झेल सोडला. गोलंदाज होता पुन्हा औषिक श्रीनिवास !

पठाणांची जोडी चांगलीच जमली. अवघ्या ४७ चेंडूंमध्ये ४२ धावा फटकावून धाकटा पठाण बाद झाला (८ चौकार). पश्चिम विभाग ६ बाद ३७८.यष्टीरक्षक पीनल शहा आता उतरला. मान्यताप्राप्त फलंदाजांपैकी एक-टा (की अकरा-टा) युसूफ पठाणच आता पट्ट्यावर होता. शहा आला तेव्हा विजयी लक्ष्य १५८ धावा इतके दूर होते आणि तळाच्या चार फलंदाजांचीच साथ युसूफला लाभणार होती. आता वेळेलाही महत्त्व होते. समोरच्या टोकाला संघभाऊच उरला नाही तर काय ?….

सामना केलेल्या ८४ व्या चेंडुला सीमारेषेपलीकडचे जग दाखवीत यूसूफने शंभरी गाठली. १० चौकार, पाच षटकार. दुलीप चषकाच्या या अंतिम सामन्यात आता प्रत्येक डावात एकेक शतक झालेले होते.यूसूफ वैयक्तिक १०२ धावांवर असताना गोलंदाज गणपतीलाच त्याचा एक फटका झेलता आला नाही. दक्षिणेने पठाणला दिलेले हे डावातील तिसरे जीवदान होते.वैयक्तिक सव्वाशे धावांवर पुन्हा एकदा श्रीनिवासच्या गोलंदाजीवर केबी पवनला पठाणी फटका झेलवला नाही…चाऽऽऽऽऽर जीवदाने. तीही युसूफ पठाणला !

सामना केलेल्या १४२ व्या चेंडुवर एक चौकार छापवत पठाणने दीडशेचा आकडा पार केला. १६ चौकार, सहा षटकार.पश्चिमेची धावसंख्या ६ बाद ४८३ झालेली असताना क्रिकेटच्या देवीने दक्षिणेला अखेरचा कृपाप्रसाद गणपतीच्या गोलंदाजीवर देऊ केला होता, पठाणचा आणखी एक धोकादायक फटका पण गौतमला तो पकडता….युसूफ आता कुणालाही आता झेल देणार नव्हता. इथवर त्याने १५६ चेंडूंवर १७० धावा तडकावल्या होत्या.११६ चेंडूंमध्ये अवघ्या १६ धावा केवळ एका चौकारासह काढून पीनल शहा बाद झाला तेव्हा पश्चिमेच्या ४८३ धावा झालेल्या होत्या. समोर पठाणसारखा फलंदाज ‘ढगाला लागली कळं’सारखी धावांची बरसात करीत असताना दीड तास आणि ४ मिनिटांच्या खेळात केवळ एक चौकार मारणार्‍या व्यक्तीला कसला पुरस्कार द्यावा ?

बाकी जसं म्हणतात तसं इतिहास आणि औपचारिकता होती. रमेश पोवारने युसूफला चांगली साथ दिली. १८९ धावांवरून रोहन प्रेमला प्रेमाने सलग दोन षटकार मारीत पठाणने २०० पार केल्या. १३७ व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर पठाणने विजयावर छक्का ठोकला. १९० चेंडू-२१० धावा-१९ चौकार-१० षटकार (पाच जीवदाने!)तो खेळायला उतरल्यापासून पश्चिमेला मिळालेल्या

३०२ धावांपैकी २१० धावा त्याच्या होत्या – सुमारे ७० टक्के. चार दिवसांचा हा सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबविण्यावर उभय कर्णधारांची सहमती झालेली होती पण ती वेळच पठाणने येऊ दिली नाही. प्रथमश्रेणीतील पठाणचे हे पहिले द्विशतक होते. (याआधी सर्वोच्च १८३).

प्रथमश्रेणीच्या चौथ्या डावातील ही सर्वात मोठी विजयी धावसंख्या होती (आणि आहे.) त्याआधी श्रीलंकेतील मध्य प्रांताने (कर्णधार कुमार संगकारा) तिथल्या दक्षिण प्रांताविरुद्ध (कर्णधार मर्वन अटापट्टू) चौथ्या डावात ५१२ धावा काढून सामना जिंकला होता. (जानेवारी २००४)

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..