नवीन लेखन...

इमोटिकॉन्स

संध्याकाळी पावणेसातची वेळ, ठाणे स्टेशन. ठाण्याहून सुटून बदलापुरला जाणारी ६.५१ ची गाडी ३ नंबर प्लॅटफॉर्मच्या इंडिकेटरवर लागलेली, पण प्रत्यक्षात लांबून नुसते लाइटचे डोळे मारत होती. स्टेशनात माणसांचा पूर ! ट्रान्सहार्बर लाईनवाले, बोरिवली – ठाणे बसने आलेले, सी.एस.टी.हून येऊन मुद्दाम या गाडीसाठी ठाण्याला उतरलेले असे वेगवेगळ्या ठिकाणचे थकलेभागले जीव गाडीकडे डोळे लावून उभे होते. दुनिया गेली तेल लावत, कुणाचं काही का होईना, आत्ता मला घरी पोचायचय अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. ६.५१ ला सुटणारी गाडी ६.५० ला फलाटावर लागली आणि धडाधड उड्या मारून लोक गाडीत चढले. सगळ्या सीटस् फुल झाल्या. दरवाजे सुद्धा लोकांनी ब्लॉक केले. जिथे तीनच माणसं आरामात उभीयेत असे काही मोजके दरवाजे उरले होते जिथून माणसं आत जायला वाट काढत होती. आता कुठल्याही क्षणी गाडी सुटायला हवी, पण तो क्षण येणार कधी अशा विचाराने माणसं सिग्नलकडे डोळे लावून बसली होती. इतक्यात उतरत्या जिन्यावरून एक कुटुंब जवळपास धावत फलाटावर उतरत होतं. एक उंचापुरा, धिप्पाड जवान. त्याच्या हातात एक ट्रॉलीवाली जड बॅग आणि खांद्यावर एक मोठी सॅक होती. त्याच्या बरोबर बांधणीचा, सुती पंजाबी ड्रेस घातलेली एक मुलगी, त्याची बायकोच होती ती. तिच्या खांद्यावर आठ- नऊ महिन्यांचं एक गुटगुटीत बाळ खांद्याला घट्ट मिठी मारून गाढ झोपलं होतं. त्याचं बाळसं थेट बाबासारखं होतं. आणि त्यांच्याबरोबर एक टिशर्ट घातलेला पोरगेलसा तरुण, बहुतेक तिचा भाऊ. ते प्लॅटफार्मवर पोचले आणि तो उंचापुरा तरुण पटकन् समोर असलेल्या तीन माणसं उभी असलेल्या दरवाजातून आत शिरला. त्या दरवाज्याला थोडी गर्दी कमी होती. तरी ती बॅग आत घेताना त्याची थोडी झटापटच झाली. त्याच्याबरोबरचा तो मुलगा म्हणाला, ” कल्याणला उतरता येईल का रे ह्या गाडीने? ” तो तरुण झटकन तोंड वळवून दरवाजाजवळच जागा मिळाली तिथे उभा राहिला आणि बायको कुठे दिसतेय ते बघायला लागला. एकूणात दिसत असं होतं की, त्याला अनपेक्षितपणे सुट्टी संपवून, सगळा बाडबिस्तरा गुंडाळून घरून निघायला लागलं होतं. बहुतेक सैन्याची नोकरी होती आणि ताबडतोप हजर राहायचं फर्मान आलं होतं. काय असेल ते, पण बऱ्याच काळाने आला होता, थोडाच काळ थांबला होता आणि बऱ्याच काळासाठी लगेच निघून जात होता एवढं नक्की. इकडे गाडी सुटायच्या आधी झटकन् पाण्याची बाटली घ्यायला म्हणून प्लॅटफॉर्मवरचा तो मुलगा स्टॉल शोधायला गेला आणि पुढच्याच क्षणी दरवाज्याजवळ उभा असलेला तो उंचापुरा तरुण आणि प्लॅटफॉर्मवर उभी असलेली त्याची बायको ह्यांची नजरानजर झाली.आता हा आपल्याला परत कधी भेटणार हे भाव तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. त्याने तिच्याकडे बघून, ” चल निघतो” अश्या अर्थाने मान वळवली आणि तिच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. एवढं नितळ पाणी गालावरून ओघळताना मी अलिकडे पाहिलच नव्हतं. नकळत, मी स्तब्ध !
तेवढ्यात त्याने तिच्याकडे बघून बाळाकडे हात दाखवत काहीतरी खूण केली. बाळ प्लॅटफॉर्मवरच्या गोंगाटाची तमा न बाळगता गाढ झोपलेलं होतं. तिनं अधीर होत बाळाला उठवायचा प्रयत्न केला. बाळानं अजिबात दाद लागू दिली नाही. ती हताश झाली. इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी सुटली. त्याने दरवाजातून बाहेर डोकावत आतून नाईलाजाने हात हलवला. तितक्याच नाईलाजानं बाळाला पुन्हा हलवत ती म्हणाली, ” तो बघ, बाबा टाटा करतोय तुला. ” अचानक बाळाने मान वर केली आणि डोळे तसेच बंद ठेवून ते खुदकन् गालातल्या गालात हसलं आणि पुढच्याच क्षणी पुन्हा निवांत झालं. पुढच्या क्षणी त्या तरुणाच्या डोळ्यात ज्यांचं वर्णन नेमकं शब्दात करता येणार नाही असं काहीतरी दिसायला लागलं. जेमतेम दोन – तीन मिनीटात हे घडून गेलं. पण जे पाहिलं ते पुर्वी कधीच अनुभवलेलं नव्हतं. बाळाकडे पाहात हात हलवणारा तो उंचापुरा तरुण, टचकन् डोळ्यात पाणी आलेली ती बांधणीच्या सुती ड्रेसमधली सहधर्मचारिणी आणि गालातल्या गालात क्षणभरासाठीच खुदकन् हसलेलं ते बाळ यांचे चेहरे मला जसे दिसले तसे दाखवणारे इमोटिकॉन्स अजून वॉटस् अॅप किंवा फेसबुकवर मला सापडत नाहीयेत !

……………………………………….
©डॉ. प्रसाद भिडे
……………………………………….

फेसबुकवरुन आलेला हा लेख. आवडला म्हणून शेअर केला..

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..