नवीन लेखन...

एक नाणे, दोन बाजू: पर्यटन आणि पर्यावरण

लेखक गेली ३० वर्षे पर्यटन आणि पर्यावरण शिक्षण ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

घड्याळाच्या काट्यावर धावायला लावणारी नोकरी आणि घड्याळाचा विसर पाडायला लावणारा स्वत:चा व्यवसाय ह्यातच बुडालेल्या आणि ह्याच्या चाकोरीत फिरून दमलेल्या प्रत्येकालाच हवा असतो एक ब्रेक, जरा विरंगुळा आणि तना-मनाला ताजंतवानं करणारा हॉलिडे…मग इतरांसाठी हवीहवीशी असलेली गोष्टच जर तुमच्या चरितार्थाचे साधन असेल तर? ?? जे बाकीच्यांसाठी रूटिनमधून एक सुटका, मोकळीक आहे, तेच तुमचं रूटिन असेल तर? ? ? तर उघड आहे की, तुम्ही पर्यटन उद्योगात कार्यरत आहात. इतरांची सुट्टी मज्जेत जावी, त्यांना रोजच्या चाकोरीतून ब्रेक मिळावा म्हणून २४ X ७ काम करणारा उद्योग म्हणजे पर्यटन अर्थात टूरिझम. जगाला जवळ आणणारा आणि प्रवास करणाऱ्यांचं जग विस्तारणारा उद्योग म्हणजे टूरिझम. सध्याच्या अल्ट्रामॉडर्न, डिजिटल जगातही ज्या दोन उद्योगांचा ग्राहक कमी झालेला नाही, उलट वाढलाच आहे त्यातलाच एक म्हणजे टूरिझम. (दुसरा अर्थात फूड इंडस्ट्री ज्यात रेस्टॉरंट्सपासून ते घरगुती डबे देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो.)

तर आपण बोलतोय पर्यटन उद्योगाबद्दल. आपल्या भारतातील पयर्टन क्षेत्राचा आढावा घ्यायचा झाला तर जुन्या काळात आपल्याकडे जी तीर्थाटनाला जायची पद्धत होती तो भारतातील पर्यटनाचा उगम. पुढे ब्रिटिशांच्या काळात गोया साहेबाने इथला उन्हाळा सोसेना म्हणून अगदी माथेरानपासून मसुरीपर्यंत भारतभरातली हिलस्टेशन्स शोधून काढली आणि उन्हाळ्यात तिकडे जाण्याची पद्धत पडली. हळूहळू बदलत्या काळा बरोबर प्रवासाची साधनं विकसित होत गेली. रस्त्यांच्या जोडीला लोहमार्गाचं जाळं वाढत गेलं आणि भारतातील स्थानिकांसाठीही पर्यटन सोपं होत गेलं. मग पंजाबातील लोकांना कर्नाटकातील उटी किंवा प. बंगालमधील लोकांना काश्मीरदेखील जवळ वाटू लागलं. दुसऱ्या महायुद्धानंतर हवाई सेवा सुरू झाली आणि मग तर अक्षरश: आल्प्सची शिखरं आणि मॉरिशसचे किनारे भारतीयांच्या कवेत आले. ह्या सगळ्या बदलाबरोबर पर्यटन जसं विरंगुळा म्हणून, रिलॅक्सिंगसाठी म्हणून, कामातून छोटीशी विश्रांती म्हणून लोकप्रिय होत गेलं त्याचप्रमाणे रोजगाराचं साधन म्हणून, एक व्यवसाय म्हणून, उद्योग म्हणूनही विस्तारत गेलं.

पर्यटन उद्योगाचं महत्त्व किती आहे तर, भारतातील पर्यटन उद्योगाचं जी डी पी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनातील योगदान सुमारे १० टक्के आहे. २०१९मध्ये भारताला पयर्टनाच्या माध्यमातून सुमारे ३० बिलियन यु. एस. डॉलर्स इतकं परकीय चलन मिळालं. २०१९मध्ये सुमारे पावणे अठरा दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती. मात्र भारतातील पर्यटन उद्योगाचा मोठा हिस्सा व्यापलेला आहे तो देशान्तर्गत पर्यटन करणाऱ्या डोमेस्टिक ट्रॅव्हलर्सनी. ह्यावरून भारतातील पर्यटन उद्योगातील रोजगाराच्या संधींचा आवाका आणि व्याप्ती लक्षात येईल. पर्यटन उद्योगाच्या परिभाषेत सांगायचं तर एक व्यक्ती पर्यटक म्हणून त्याचं गाव-शहर सोडून दुसऱ्या ठिकाणाला भेट देते तेव्हा त्यामुळे दहा ते अकरा जणांना रोजगाराची संधी निर्माण होते. बघा ना, ज्या मार्गाने प्रवास करणार म्हणजे रेल्वे, बस, विमान, बोट त्यावरील कर्मचारी, पर्यटन स्थळावर पोहचल्या नंतर तिथल्या स्थलदर्शनासाठी वाहन म्हणजे त्याचा ड्रायव्हर, पर्यटनस्थळावरील गाईड, तिकडची होटेल्स, त्यातला कर्मचारीवर्ग, खान-पानाची सोय करणारे स्थानिक, स्थानिक उत्पादनं कलाकौशल्यांच्या वस्तू बनवणारे उत्पादक आणि त्या विकणारे विक्रेते अशी रोजगाराची एक लांबच लांब साखळीच पर्यटनामुळे निर्माण होते. त्यामुळे पर्यटन हा करिअरचा एक उत्तम पर्याय नक्कीच आहे.

पर्यटन व्यवसायात काम करायचं, पर्यटनातून रोजगार मिळवायचा तर त्यासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा संस्थेतून पर्यटनाचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. बारावीनंतर किंवा पदव्युत्तर असे कोर्सेस आहेत ज्यामुळे ह्या क्षेत्रातील अनेक गोष्टींचं पद्धतशीर प्रशिक्षण दिलं जातं. एअर टिकिट्स बुकिंग, होटेल रिझव्हेंशन, टूर प्लॅनिंग, कस्टमाईज्ड हॉलिडे प्लॅनिंग असे ह्या विषयाचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते शिकवले जातात. पर्यटनाचं नियोजन अर्थात हा एक भाग झाला आणि त्या नियोजनाची अंमलबजावणी हा पुढचा भाग झाला.

जेव्हा तुम्ही पर्यटकांच्या गटाला सहलीवर घेऊन जाता तेव्हा काळजीपूर्वक केलेलं नियोजन प्रत्यक्षात उतरवताना काय अडचणी येऊ शकतात, तुम्ही त्यावर कशी मात करता, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आवडीनिवडीच्या पर्यटकांना तुम्ही कसं एकत्र ठेवता, त्या सगळ्यांना पसंत पडेल अशी टूर कशी करता ह्यावर तुमच्या सहलीचं आणि तुमचंही यश अवलंबून असतं. हे ट्रेनिंग मात्र कोणत्याही संस्थेत मिळत नाही. ह्यासाठी एखाद्या प्रवासी कंपनीत उमेदवारीच करावी लागते.

टूर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्यांकडे बघितल्यावर वाटतं की, कित्ती मज्जा आहे ह्यांची. लोक जिथे एकदाच जातात अशा पयर्टन स्थळांना हे वारंवार भेटी देतात. लोकांना मोठ्या मुश्किलीने वर्षातून एखादी सहल करता येते आणि टूर मॅनेजर मात्र महिन्यातून चारपाच वेळासुद्धा टूरवर जात असतात. लोकांना सहलीसाठी पैसे खर्च करावे लागतात पण ह्यांना मात्र सहलीवर गेल्याबद्दल पगार मिळतो. पण ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण टूर मॅनेजर ह्या जॉब प्रोफाईलसाठी लक्षात ठेवायची. पर्यटक सहलीवर मजेसाठी, विरंगुळ्यासाठी, कामाच्या धकाधकीतून रिलॅक्स व्हायला जातात. पण टूर मॅनेजर सहलीवर कायम ड्युटीवर असतो. पर्यटकांची सहल सुरळीत व्हावी, त्यांना मज्जा करता यावी, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून टूर मॅनेजरला कायम दक्ष राहावं लागतं. सहलीची व्यवस्था बघताना अनेकदा त्याला स्वत:ला नाश्ताच काय पण जेवायलाही वेळ मिळत नाही. सर्वात शेवटी झोपून सर्वात आधी उठावं लागतं. दिवसभर कितीही दगदग झाली तरी एनर्जी कायम ठेवावी लागते. ऐनवेळी ‘बसच बिघडली’, ‘रस्ताच बंद होता’, ‘रेस्टॉरंटमध्ये जेवणच तयार नाही’ अशा एक ना दोन अनेक अडचणींना त्याला तोंड द्यावं लागतं आणि तेही चेहऱ्यावरची स्मितरेषा ढळू न देता! डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवूनच त्याला वावरावं लागतं. शिवाय पर्यटनाच्या हंगामात सलग आठवडेच्या आठवडे कुटुंबापासून, घरापासून दूर राहावं लागतं. त्यामुळे टूर मॅनेजर होण’ म्हणजे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ विसरून चालणार नाही. तुम्हांला प्रवासाची आवड असेल, तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी सहज संवाद साधू शकत असाल, तुम्हांला लोकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घ्यायची सवय असेल. तुमच्याकडे उत्स्फूर्तता असेल आणि समोर आलेल्या संकटाची पायरी करण्याची हिंमत तुमच्यात असेल तर तुम्ही नक्कीच दूर मॅनेजर व्हायला अतिशय पात्र आहात.

पर्यटनाचं क्षेत्र गेल्या काही दशकांमध्ये चांगलंच विस्तारलं आहे. पूर्वी धार्मिक पर्यटन, कुटुंबाबरोबर केलेलं उन्हाळी पर्यटन, लिझर टूरिझम, ऐतिहासिक स्थळांना दिलेल्या भेटी, असे मोजकेच प्रकार होते. आता मात्र बीच टूरिझम, ॲग्रो टूरिझम, अॅडव्हेंचर टूरिझम, कलनरी टूरिझम, मेडिकल टूरिझम, इको टूरिझम, फोटो टूरिझम, क्रूझ टूरिझम, कल्चरल टूरिझम, हेरिटेज टूरिझम…असे किती तरी प्रकार पाहायला मिळतात. शिवाय अगदी नव्या ‘स्पेस टूरिझम’ची भरही त्यात पडली आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्र हे सतत विस्तारणारं आणि नव्या नव्या वाटांचं क्षेत्र आहे. पयर्टनाचा अगदी जवळचा संबंध कशाशी येतो तर पर्यावरणाशी. तसं बघितलं तर नेहमीच्या त्याच त्याच पर्यावरणाचा म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या परिसराचा, माणसांचा, वातावरणाचा कंटाळा येतो म्हणून तर लोक बदल म्हणून, नवीन काही अनुभवण्यासाठी म्हणून पर्यटनाला जातात. त्यामुळे जिथे अजिबात बर्फ पडत नाही अशा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, ओरिसासारख्या राज्यांतल्या लोकांना हिमाचलप्रदेश, काश्मीर, सिक्कीम-दार्जिलिंग सारख्या हिममय स्थळांना भेट द्यावीशी वाटते तर, मरुभूमीमुळे हिरवाईला मुकलेल्या राजस्थानमधील लोकांना केरळची वनराजी मोहात पाडते. हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशसारख्या सागरसहवासाला मुकलेल्या राज्यातील लोकांना गोवा, पॉन्डेचेरी, अंदमान, महाराष्ट्र, कनार्टकचे किनारे भुरळ घालतात. त्यामुळे बहुतेक सहलींच्या बेतांमध्ये निसर्गरम्य परिसराला वेगळ्या निसर्गाला प्राधान्य दिलेलं पाहायला मिळतं.
त्यात आता निसर्गपर्यटन, कृषिपर्यटन, वन्यजीवपर्यटन, असे प्रकार विकसित झाल्यामुळे आधुनिक, कृत्रिम, मानवनिर्मित शहरांमध्ये अडकलेल्या लोकांची चांगलीच सोय झाली आहे. हरिद्वारच्या गंगेत किंवा मनालीच्या बियासमध्ये राफ्टिंग करण्यापासून ते रणथंबोरच्या पट्टेरी वाघांपासून ते जिम कॉर्बेटपार्कमधल्या हत्तींपर्यंत निसर्गाशी जवळीक साधण्याचे अनेक पर्याय आता उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे पर्यावरण स्नेही पर्यटन’ ही संकल्पना आता हळूहळू रुजू लागलेली पाहायला मिळते. ‘निसर्गाशी संवाद साधायची संधी देणारे पर्यटन’ ही संकल्पना आजच्या काळाची गरज ठरली आहे.

विकासाच्या नावाखाली आणि प्रगतीच्या रस्त्यावरून घोडदौड करताना आज सगळे जगच निसर्गापासून दुरावलेले आहे. हा दुरावा कमी करण्याची संधी पर्यटनातून मिळू शकते. त्यामुळे एक करिअर म्हणून ‘पर्यावरण स्नेही पर्यटन’ हा चांगला पर्याय होऊ शकतो. पर्यटनामुळे कोणत्याही पर्यटनस्थळावर जो ताण निर्माण होतो, कचऱ्यापासून ते पाणी-इलेक्ट्रिसिटी अशा साधनांबाबतची टंचाई निर्माण होते ती थांबवण्यासाठी ‘सस्टेनेबल टूरिझम’ ही संकल्पना पुढे आली आहेच. पर्यटनामुळे पर्यटनस्थळावरच्या पर्यावरणावर, संसाधनांवर, अवास्तव ताण येऊ नये, स्थानिकांसाठी नव्या समस्या उभ्या राहू नयेत ह्याची काळजी घेऊनच पर्यटनाचा आनंद लुटला पाहिजे. हा विचार सहलसंयोजकांनी आपल्या पर्यटकांच्या मनात रुजवला पाहिजे. जर पर्यावरण अबाधित राहिले, जर पर्यावरणाची हानी झाली नाही तरच लोक पर्यटनाला जातील ना? निसर्गरम्य परिसरात प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा ढीग जमला, हिलस्टेशनची हवा वाहनांमुळे प्रदूषित झाली, नद्यांचे पाणी दूषित झाले आणि माणसांच्या उपसर्गामुळे अभयारण्यातले पशु-पक्षी भयभीत होऊन निघून गेले तर पर्यटनाला जाण्यात काही अर्थ राहील काय? त्यामुळे पर्यावरण आणि पर्यटन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कधीही विसरता कामा नये. पर्यटनातून रोजगार मिळवताना पर्यावरणाचं रक्षण करण्याची बांधिलकी जपली पाहिजे म्हणजे पर्यटन आणि पर्यावरणाचं नाणं खणखणीत वाजेल!

-मकरंद जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..