नवीन लेखन...

दृष्टिहीन मतदारांच्या मतांची पडताळणी करण्यासाठी प्रणाली

अशी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे ज्याद्वारे दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांचे त्वरित ऑडिओ सत्यापन करता येईल.


दिव्यांग व्यक्ति हक्क अधिनियम, २०१६ ह्यातील कलम ११ मध्ये असे नमूद केलेले आहे की, भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ह्या गोष्टींची सुनिश्चितता करतील की सर्व मतदान केंद्रे दिव्यांग व्यक्तींसाठी प्रवेश करण्यायोग्य असतील तसेच निवडणूक प्रक्रिये संदर्भातील सर्व सामग्री त्यांना सहज उपलब्ध व समजण्यायोग्य असेल. उपरोक्त कायदा हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या दिव्यांग व्यक्तिंच्या हक्कांवरिल कराराला प्रभावी बनविण्यासाठी व त्यासंबंधित प्रकरणांना हाताळण्यासाठी बनविण्यात आला आहे. “दिव्यांग व्यक्तिंचे हक्क” हा संयुक्त राष्ट्र संघाचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करार आहे ज्याचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना समाजात संपूर्ण आणि प्रभावी सहभाग व समावेश मिळवुन देणे हा आहे.

४ जुलै २०१८ रोजी नँशनल कन्सल्टेशन आँन अॅक्सेसीबल इलेक्शन मधे संमत झालेल्या स्ट्रेटेजिक फ्रेमवर्क फॉर अॅक्सेसीबल इलेक्शन नुसार भारतीय निवडणूक आयोग प्रतिसादक्षमता, आदर आणि सन्मान या मूलभूत तत्वांचा आधारावर दिव्यांग मतदारांचा निवडणुक प्रक्रियेतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि सुधारित सेवांद्वारे त्यांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना निवडणुकीत मत देण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा व साधनांचा वापर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

तसेच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ नुसार सरकारद्वारे कोणत्याही नागरिकाशी (दिव्यांग असलेल्यांसह) धर्म, वंश, जाती, लिंग किंवा जन्मस्थळ ह्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे. तरीही दिव्यांग व्यक्ति प्रदीर्घ काळापासुन त्यांनाही इतर नांगरिकांप्रमाणे मत देण्याचा अधिकार मिळावा म्हणुन संघर्ष करत आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे २.६८ कोटी दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यापैकी जवळपास ५० लाख व्यक्ति ह्या दृष्टिहीन आहेत. दृष्टिहीन मतदार त्यांचा बरोबर असणाऱ्या व्यक्तिच्या मदतीने निवडणुकीत मतदान करू शकतात. असे इतरांच्या मदतीने केलेले मतदान हे गुप्त आणि स्वतंत्र नसले तरीही अशा मतदारांना त्यायोगे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येते. तथापि सध्याच्या ईव्हीएमद्वारे मतदानाच्या पद्धतीमध्ये, दृष्टिहीन मतदाराला सहाय्य करणाऱ्या व्यक्तीने खरोखरच दृष्टिहीन मतदाराच्या इच्छेप्रमाणेच मत दिले आहे की नाही हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नाही.

दृष्टिहीन मतदारांच्या सोयीसाठी ईव्हीएमच्या बॅलेटिंग युनिटवर ब्रेल लिपीत चिन्ह असतात. अशा मतदारांचा मार्गदर्शनासाठी बॅलेटिंग युनिटच्या उजव्या बाजूस व उमेदवारांना मत देण्यासाठी असलेल्या बटणाशेजारी १ ते १६ अंक ब्रेलच्या चिन्हात उमटवलेले असतात. तथापि, दृष्टिहीन मतदार जरी बटण दाबू शकत असले तरी प्रत्यक्ष कोणाला मत दिले गेले हे जाणून घेऊ शकत नाहीत. आपले मत नोंदविण्यात आले आहे की नाही आणि नोंदवले गेले असेल तर ते ज्या उमेदवाराला द्यायचे होते त्यालाच ते दिले गेले की नाही ह्या गोष्टींची मतदाराला खात्री नसते. शिवाय, प्रत्येक दृष्टिहीन व्यक्तीस ब्रेल लिपि समजतेच असे नाही.

वोटर वेरीफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपँट) ही एक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) सह संलग्न असेलेली स्वतंत्र प्रणाली आहे जी मतदारांना त्यांचा इच्छेनुसार मत दिले गेले की नाही याची पडताळणी करण्यास मदत करते. तथापि, अशी कोणतीही सुविधा अस्तित्वात नाही ज्याद्वारे दृष्टिहीन मतदार त्यांनी दिलेल्या मतांची पडताळणी करू शकतील. अशी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे ज्याद्वारे दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांचे त्वरित ऑडिओ सत्यापन करता येईल.

इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन (आयटीटीएस) उपकरण:

व्हीव्हीपँटमध्ये प्रिंटरद्वारे छापल्या गेलेल्या पेपर स्लिपची प्रतिमा कॅप्चर करून त्यातील मजकूर वेगळा करणे आणि तो मजकूर ध्वनित रूपांतरित करून मतदाराला हेडफोनद्वारे ऐकवणे हि या स्वतंत्र व रियल टाइम कार्य करणाऱ्या प्रस्तावित प्रणालीची मूलभूत संकल्पना आहे.

आयटीटीएस उपकरणामध्ये चार मुख्य घटक असतातः कॅमेरा, प्रोग्रामेबल सिस्टीम (ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन सॉफ्टवेयर आणि टेक्स्ट टु स्पीच इंजिन), हेडफोन्स आणि बॅटरी. ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन सॉफ्टवेयर व्हीव्हीपँट मधील पेपर स्लिपवर छापलेल्या उमेदवाराच्या चिन्हाची प्रतिमा मजकूरात रूपांतरित करू शकत नाही म्हणुन अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव आणि चिन्हाच्या प्रतिमेसोबतच चिन्हाचे नाव सुद्धा व्हीव्हीपँट मशीनमध्ये लोड करणे आवश्यक आहे.

आयटीटीएस उपकरण हे व्हीव्हीपँट यंत्राचा आत अशा प्रकारे बसवले जाईल जेणेकरुन मतदारांना व्हीव्हीपँट च्या पारदर्शी खिडकीतून पाहण्यासाठी कोणताही अडथळा होणार नाही आणि ७ सेकंदांपर्यंत जी छापील पेपर स्लिप व्हीव्हीपँटमधे दाखवली जाते ती कॅमेरा लेन्सच्या दृश्य क्षेत्रात येईल. बाह्यतः  त्यामध्ये आवाज नियंत्रित करता येइल असा हेडफोन्सचा एक सेट असणे आवश्यक आहे.

बूथमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदार हेडफोन लावेल. जेव्हा मत दिले जाते तेव्हा व्हीव्हीपँटमध्ये एक पेपर स्लिप छापली जाते ज्यात अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव, चिन्हाची प्रतिमा आणि चिन्हाचे नाव असते व ती ७ सेकंदांसाठी पारदर्शक खिडकीच्या माध्यमातून दाखविली जाते. आयटीटीएस उपकरण पेपर स्लिपची प्रतिमा आपल्या कॅमेर्याद्वारे कैप्चर करते. प्रतिमेमधून मजकूर काढणे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन सॉफ्टवेयरद्वारे केले जाते आणि मजकूराला ध्वनित रूपांतरित करण्याची प्रक्रिया टेक्स्ट टु स्पीच इंजिनद्वारे केली जाते. त्यानंतर ऑडिओ आउटपुट हेडफोन्सद्वारे ऐकला जाऊ शकतो. यामध्ये अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव आणि उमेदवाराच्या चिन्हाचे नाव असते. हेडफोन्सवर ऐकणारा मतदाता त्याचा इच्छेनुसार त्याचे मत दिले गेले आहे की नाहि हे ताबडतोब पडताळून पाहू शकतो. त्यानंतर, या प्रक्रियेदरम्यान आयटीटीएस उपकरणामध्ये तयार झालेल्या तात्पुरत्या फाइल्स आपोआप हटविल्या जाउन नवीन फाइल्स साठी जागा तयार होते.

ह्या स्वतंत्र कार्य करणाऱ्या प्रस्तावित प्रणालीमध्ये फेरफार होण्याची शक्यता नाही. ईव्हीएमचे निर्माता (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) प्रचलित तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त आणि कार्यक्षम इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन (आयटीटीएस) उपकरणं तयार करण्यास सक्षम आहेत.

मतदान हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक आविष्कार आहे ज्याचे लोकशाही व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. निवडणूक यंत्रणेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि ईव्हीएममध्ये दृष्टिहीन मतदारांचा विश्वास प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांना मतदानाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मतदारांना त्यांचे मतदान यशस्वी झाले आहे असा अनुभव स्वतः येणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या निकालावर विश्वास ठेवण्यापूर्वी मतदारांना प्रथम त्यांनी मतदान यंत्रणेचा यशस्वीपणे वापर केला आहे हा विश्वास वाटणं आवश्यक आहे. हा विश्वास नसेल तर निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.

म्हणून, दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांची पडताळणी करण्यास सक्षम बनविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये “इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन” ही प्रणाली समाविष्ट केली पाहिजे.

डॉ. अक्षय बाजड
मुंबई, महाराष्ट्र

ईमेल: akshaybajad111@gmail.com

(लेखकाचा परीचय: लेखक हे सुशासन आणि सामाजिक धोरण या विषयाचे स्वतंत्र अभ्यासक आहेत.)

16 जून 2021

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..