नवीन लेखन...

दुर्गुण

 

आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात.

एका गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या मनोभावे सेवेमुळे त्याचे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी शिष्य घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली. गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. त्याचा उपयोग तू तुझ्या जीवनासाठी कर. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. परंतु दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात किंतु आला. त्याला संशय आला की हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच तोच आरसा आपल्‍या गुरुंसमोर हा धरला. इतक्यात गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, काय दुर्गुण आहेत हे तो पाहू लागला. गुरुंच्‍या समोरच त्यांनीच दिलेला आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंगच उडून गेला. कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणातील मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा करतो, ज्‍यांना आपल्या नजरेत पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार ? हे पाहून तो विचार करू लागला की, गुरुवर्य सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत. ज्यांच्या बद्दल आपल्या मनात नितांत आदर आहे त्याच गुरूच्या मनातील रहस्य जाणून त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, मग रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर, नातेवाईकांबरोबर, आप्तेष्टांबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसूनच आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. आणि कसा आश्चर्य ! ते दोघे मायबापही त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसलेच.

शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. कुणाच्या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा त्याच्याकडे फक्त फिरवला आणि काय आश्र्चर्य ! त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि सर्व दुर्गुण खचाखच भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालावधीत जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण नक्कीच सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असतास. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही.

— डॉ. शांताराम कारंडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..