नवीन लेखन...

डर्बन भाग २

डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर येते किंवा जोरदार पाउस पडतो आणि वातावरण पुन्हा सुस्नात होते. हवामान कोरडे असल्याने, पावसाची साधी सर देखील, इथले वातावरण थंड करते.

जोहान्सबर्गच्या मानाने, इथली जीवनशैली शांत आहे. अर्थात इथे देखील मॉल संस्कृती रुजली आहे. इथले मॉल्स मात्र अतिशय प्रशस्त आहेत. Pavilion, Gateway सारखे मॉल्स म्हणजे प्रचंड संस्थाने आहेत. एकाच ठिकाणी, जगातील कुठलीही वस्तू इथे प्राप्य असते, भौतिक सुखाच्या परिसीमा इथे गाठलेल्या आहेत. जवळपास ३,४ मजली इमारतीमधून नुसते चालत हिंडणे, हाच पायांना व्यायाम आणि सुखाचे आनंदनिधान असते. डर्बन नॉर्थ भागात तर Pick n Pay Hypermarket म्हणून अवाढव्य मार्केट आहे.
जगातील अति महागडे कपडे इथे बघायला मिळतात. इथल्या वस्तू महाग असतात, हे तर खरेच पण, थोडी माहिती काढली की इथे तशी स्वस्त किमतीची दुकाने देखील आहेत. अर्थात दर्जाच्या बाबतीत कुठेही तडजोड नसते आणि किराणा माल, खाण्याच्या वस्तूबाबत हेच बघायला मिळते. पहिल्यांदा मला नवल वाटायचे, इथे मॉल्समध्ये असंख्य हॉटेल्स असतात पण तिथे कोण खायला/जेवायला येत असेल? नंतर समजले, शिनिवार सकाळ, रविवार सकाळ इथल्या हॉटेल्समध्ये येउन नाश्ता करायची पद्धत आहे. अगदी सकाळ, सकाळी ८ वाजता देखील, शनिवार/रविवारी हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. केवळ, तरुण/तरुणी नसून, कुटुंबाचा सगळा जथ्था इथे हॉटेलमध्ये हजर असतो!!
मला तर नेहमी असेच वाटते, इथला सगळा समाज, हा हॉटेल्स मध्ये खाणे आणि सदैव काहीना काही तरी शॉपिंग करणे, यातच गुंग असतो. त्यातून, इथली खरेदी म्हणजे सदैव क्रेडीट कार्डचा वापर. नगदी चलनाचा वापर फारसा इथे आढळत नाही. तुमच्या पाकिटात, किती क्रेडीट कार्डस आहेत, यावर तुमची पत ठरत असते. सुरवातीला मला देखील नवल वाटायचे पण नंतर मी देखील याच मार्गाने जायला सुरवात केली!! बरे यांचे हॉटेल्स मधील खाणे म्हणजे एक सोहळा असतो. प्रथम ड्रिंक्स ऑर्डर करायचे, नंतर “स्टार्टर्स” मागवायचे. यात जवळपास, एक, दोन तास निघून जातात. त्यानंतर मग, “मेन मेन्यु” ठरवायचा!! यात, ड्रिंक्सचे आचमन चालूच.
इथे मी कितीतरी गोरे लोकं सज्जड पिणारे बघितले आणि त्यांना पिताना बघून, “अजून यांची शरीर यष्टी कशी काय सडपातळ राहू शकते?” याचे नवल वाटायचे!! काळ्यांच्या बाबतीत तर पिण्याबाबत तोड नाही. मी तर कधीच पासंगादेखील पुरू शकलो नाही, शकणारच नाही.
पुढे, या समाजात जसा रुळायला लागलो तशी ध्यानात आले, इथले लोकं – यात स्त्रिया/मुली देखील आल्या, रोज पहाटे व्यायामशाळेत तरी जातात किंवा मैलो न मैल, धावण्याचा जबरदस्त व्यायाम करतात. आदल्या दिवशीचे सगळे खाणे, दुसऱ्या दिवसाच्या व्यायामात रिचवून टाकतात!! इथे सायकलिंग करणे, हा देखील आनंदाचा खेळ असतो. वातावरणात कितीही गारवा असला तरी, विशेषत: डोंगराळ भागात राहणारे, कितीतरी गोरे युवक/युवती, आपल्या सायकल घेऊन, रपेट करीत असताना, नित्याच्या दिसत असतात. अर्थात, यांच्या सायकली देखील देखण्या तर असतातच पण अतिशय दणकट असतात. एकूणच इथल्या समाजात, स्वच्छता, व्यायाम, कायदे पाळणे या बाबतीत जागरूकता आहे आणि मला वाटते, ती लहानपणापासून मनावर बिंबवली जाते.
अर्थात, “गाव तिथे महारवाडा” या उक्तीप्रमाणे उकिरडा प्रत्येक ठिकाणी आढळतो. आपण, साउथ आफ्रिका टीव्हीवर बघतो, त्यामुळे या देशाची चांगली(च) बाजू नेहमी प्रकाशात येते. इथे काही वर्षे काढली म्हणजे अस्तरामागील ठिगळे दिसायला लागतात!! डर्बन इथे देखील गुन्हेगारीचे प्रमाण जरी भयानक नसले तरी नगण्य अजिबात नाही. १९९७/९८ साली, मी रात्री, बेरात्री रस्त्यावरून हिंडत असे, मध्यरात्री समुद्राकाठी जाउन बसत असे पण, जेंव्हा २००९ मध्ये परत इथे राहायला आलो आणि बदलत्या परिस्थितीचे वास्तव भान आले.
हळूहळू, इथले जीवन देखील काहीसे बकाल व्हायच्या मार्गावर लागले आहे. भ्रष्टाचार अगदी आचारसंहिता झाली नसली तरी बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे. त्यातून, इथल्या चलनाचे आंतरराष्ट्रीय पतमापन घसरायला लागले आहे आणि महागाईचे चटके बसायला लागले आहेत. आर्थिक विषयी बोलायचे झाल्यास, या देशात प्रचंड प्रमाणात आयात केली जाते आणि चलन विनिमयाच्या दरातील घसरण, प्रामुख्याने महागाईला कारणीभूत ठरत आहे. अजूनही, इथे गोऱ्या लोकांचा प्रभाव असेल किंवा कायद्याविषयी आदर असेल म्हणा, भारताच्या मानाने, इथे निश्चितपणे, सुस्थित जीवन जगण्याच्या विपुल संधी आहेत. आजही, Tax Evasion संस्कृती भारताइतकी बोकाळलेली नाही. अर्थात, इथे Tax चे प्रमाण बरेच आहे पण त्याचबरोबर ज्या प्रकारच्या सुविधा मिळतात, त्याची तुलना केली तर, युरप किंवा अमेरिकेपेक्षा इथे जीवनमान स्वस्त आहे.
एक अनुभव सांगण्यासारखा आहे. N3 या राष्ट्रीय महामार्गावर, मी गाडी चालवत होतो, महामार्गावर गाडी चालवणे म्हणजे गाडीचा वेग, कमीत कमी ८० कि.मी.!! अशा भरघाव वेगात गाडी धावत असताना, समजा अपघात झाला तर मृत्यूचे प्रमाण हमखास. बराच वेळ गाडी चालवत असताना, माझ्या मागून, एक मर्सिडीज गाडी पुढे गेली. त्यावेळी मी १०० कि.मी. वेगाने गाडी चालवत होतो, तेंव्हा मर्सिडीजचा वेग माझ्यापेक्षा अधिक, हे ओघाने आलेच. त्यापाठोपाठ दुसरी मर्सिडीज, माझ्या गाडीला pass on करून गेली आणि काही क्षणात, माझ्या समोर दोन्ही गाड्या, एकमेकांवर आदळल्या!!
सुदैवाने, माझ्या गाडीपासून, अपघाताचे अंतर तसे सुरक्षित असल्याने, मी गाडीचा वेग कमी केला . एकात गौर वर्णीय तर दुसऱ्यात कृष्ण वर्णीय लोक होते, माझ्या डोळ्यासमोर गाड्यांच्या पुढील भागाचा चकणाचूर होत होता. सुदैवाने, गाडीतील लोकं सुरक्षित होते. त्यातील एकाने, Help नंबर लावला आणि अक्षरश: दहाव्या मिनिटाला, तिथे ३ Ambulance, ४ पोलिस गाड्या आणि वरून helicopter (टेहळणीसाठी) हजर!! लगेच पुढील कारवाईला सुरवात झाली आणि अर्ध्या तासात, तिथे अपघाताची साधी निशाणी देखील उरली नव्हती!! आपण, इथे infrastructure म्हणून धोशा लावतो आणि तसे बघितले त्याची आवश्यकता आहे, कारण आता आपल्याकडे देखील अशाच प्रकारचे प्रचंड महामार्ग अस्तित्वात येत आहेत. पण, त्याचबरोबर अशा सुविधा मिळणे देखील अत्यंत गरजेचे आहे. असे अपघात जरी झाले, तरी रस्ता कमीत कमी वेळात मोकळा करणे, अत्यावश्यक असते.
इथे लोकांच्या गरजेची किती काळजी घेतली जाते, याचे दुसरे उदाहरण देतो. एकतर इथे “वीज” जाणे, असे प्रकार जवळपास नाहीच!! डर्बन इथे राहताना, एकदा, इथे काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासली. अर्थात, इथे वीज नाही म्हणजे आयुष्य ठप्प!! अशा वेळी, डर्बन महापालिकेने, आमच्या भागातील प्रत्येक घरात, एक छापील पत्र पाठवले होते. त्या पत्रात, कुठल्या दिवशी वीज पुरवठा खंडित होणार आहे आणि किती वेळ खंडित होणार आहे, याची सगळी माहिती दिली होती. प्रत्यक्षात काम सुरु होणार होते, ते २ आठवड्यांनी!! तरी देखील कुणालाही गैरसोय होऊ नये, याची इथे नित्यनेमाने काळजी घेतली जाते आणि पत्रात दिलेली वेळ, अत्यंत कसोशीने पाळली जाते. प्रकार, रस्ता दुरुस्तीबाबत चालतो. हे केवळ महामार्गाबाबत घडते असे नसून, शहरातील आडमार्ग जरी दुरुस्तीला काढायचा असेल तरी हीच पद्धत पाळली जाते.
डर्बन शहर माझ्या डोळ्यादेखत विस्तारले पण, प्रत्येक ठिकाणी अत्यंत कसोशीने आणि काटेकोरपणे Planning केले जाते. आहे रिकामी जागा म्हणून बांधली बिल्डींग, असा प्रकार इथे अजिबात चालत नाही. काहीवेळा याचा त्रास होतो म्हणजे समजा, तुम्ही रस्ता चुकलात तर तुम्हाला कमीत कमी, १,२ कि.मी. चा फटका बसतो!! महामार्गावर तर अधिक लांबचा फटका बसतो. महामार्ग आखतानाच, लोकांच्या सोयींचा तसेच commercial complexes ध्यानात घेऊनच बांधले जातात. तसेच अशा नवीन मार्गांवर वृक्षांची लागवड, अत्यंत आग्रहाने केली जाते. डर्बन इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने हिरव्या रंगाचा सोहळा अनुभवता येतो. रिकामी जागा आहे आणि तिथे काही बांधकाम करायचे झाल्यास, तिथल्या वृक्षांची निगराणी कशी राखली जाइल, याचा विचार प्रथम केला जातो. उचलली कुऱ्हाड आणि तोडले झाड, हा इथे अक्षम्य गुन्हा आहे. मी जिथे रहात होतो, तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती आणि संध्याकाळी, रस्त्याच्या कडेने, फिरत रहाणे, हा एक आनंदसोहळा असायचा.
आता, कधीकधी मनात असा विचार येतो, हे इथले सौंदर्य, सोयी, सवलती आणखी किती वर्षे शाबूत राहणार आहेत? डर्बन तसे टुमदार शहर आहे. जोहान्सबर्गप्रमाणे अंगावर येत नाही. जोहान्सबर्ग शहराचा विस्तार बघून, तुमची छाती दबून जाते. डर्बन आकाराने छोटे आहे, म्हणूनच तुम्ही त्याच्या लगेच प्रेमात पडू शकता. हे शहर तुम्हाला प्रेमात पडायला भाग पाडते आणि प्रेमात पडावे, अशा इथे असंख्य जागा आहेत, उद्याने आहेत, लायब्ररी आहे, समुद्र किनारे आहेत. प्रश्न परत, परत मनात येतो, हे शहर किती काळ, आपल्याला असे ओढून घेईल?
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..