नवीन लेखन...

डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ्

डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ्

दक्षिण आफ्रिकन हृदयशल्‍यविशारद डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. दुसरी मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्‍याचा मान डॉ. अॅड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍याकडे जातो. ६ डिसेंबर १९६७ रोजी अमेरिकेतील न्‍यूयॉर्क मधील ‘मायमोनिडेस मेडिकल सेंटर’ येथे ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केली आहे. प्रस्‍तुत शस्‍त्रक्रिया हा त्‍यांच्‍या शिरपेचातील मानाच्‍या तुर्‍यांमधील एक!

४ ऑक्‍टोबर १९१८ रोजी न्‍यूयॉर्क शहरात कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांचा जन्‍म झाला. अतिशय लहान असतांना त्‍यांनी ठरविले होते की मोठेपणी त्‍यांना डॉक्‍टर व्‍हायचे आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्‍यापूर्वी त्‍यांनी गणितामध्‍ये पदवी घेतली. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच तंत्रज्ञानाकडेही त्‍यांचा कल होता. निष्‍णात शल्‍यचिकित्‍सेबरोबर हृदयशस्‍त्रक्रिया सुलभ व्‍हाव्‍यात व हृदयविकारावर उपचार करता यावेत म्‍हणून त्‍यांनी काही उपकरणे विकसित केली. भाऊ आर्थर (तो इंजिनिअर होता) याची कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांना यात मदत झाली. खरे तर शाळेत असल्‍यापासूनच त्‍यांची पाउले याकडे वळली होती. तेव्‍हा देखील आर्थरच्‍या मदतीने त्‍यांनी घरीच इलेक्‍ट्रोकार्डिओग्राफ (ईसीजी) तयार केला होता. यासाठी त्‍यांनी जुन्‍या रेडिओच्‍या भागांचा उपयोग केला.

१९४३मध्‍ये वैद्यकीय पदवी घेतल्‍यानंतर त्‍यांनी दोन वर्षे सैन्‍यदलात नोकरी केली. त्‍यापूर्वी ब्रुकलिन येथील एक रुग्‍णालयात ते प्रशिक्षणार्थी होते. सुरुवातीस त्‍यांचा कल मेंदूविकारतज्‍ज्ञ होण्‍याकडे होता. तेव्‍हा मेंदूवरील शस्‍त्रक्रिया सुलभ रितीने करता याव्‍यात यासाठी त्‍यांनी एक ‘चिमटा’ (क्लॅम्‍प) विकसित केला होता. त्‍यावरील त्‍यांचा शोधनिबंधही प्रसिद्ध झाला.

तो काळ दुसर्‍या महायुद्धाचा होता. सैन्‍यदलाला मनुष्‍यबळाची गरज होती. प्रशिक्षित डॉक्‍टरांची तर अधिकच होती. कॅन्‍ट्रोव्हिटझ् लष्‍करात दाखल झाले व १९४६ मध्‍ये ‘मेजर’ पदावरून निवृत्त झाले. लष्‍करातून बाहेर पडल्‍यावर त्‍यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेचे प्रशिक्षण घेतले. १९५५ पर्यंत ते ब्रॉंक्‍स येथील मॉंटफिअर रुग्‍णालयात कार्यरत होते. तेथे ते शल्‍यचिकित्‍सेचे प्रमुख झाले. येथेही त्‍यांनी प्रचंड काम केले. या रुग्‍णालयात काम करीत असतांना त्‍यांनी श्‍वान तसेच इतरही प्राण्‍यांवर प्रयोग केले व left ventricular assist deviceतयार केले. तसेच‘हार्ट-लंग मशीन’ मध्‍ये वापरता येईल असे प्राणवायूचा पुरवठा करणारे (ऑक्सिजन जनरेटर) उपकरण विकसित केले. याशिवाय हृदयशल्‍यचिकित्‍सेदरम्‍यान रक्‍तवाहिन्‍यांच्‍या जागांची योग्‍य योजना करण्‍यासाठी उपयुक्‍त होईल अशी उपचारप्रणाली देखील  विकसित केली.

याच कालावधीत कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी जिवंत, स्‍पंदन करणार्‍या हृदयाची धडधड नियंत्रित करून ती चित्रफीत प्रदर्शित केली.

ब्रॉंक्‍स येथील रुग्‍णालयात काम केल्‍यानंतर १९५५ पासून कॅन्‍ट्रोव्हिटझ्ब्रुकलिन येथील मायमोनिडास मेडिकल सेंटर येथे शल्‍यविशारद म्‍हणून रुजू झाले. त्‍या दरम्‍यानची एक महत्त्वाची घटना म्‍हणजे १९५८च्‍या फेब्रुवारी महिन्‍यात एका सहा वर्षांच्‍या लहानग्‍यावर हृदयशस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. जन्‍मतःच त्‍याच्‍या हृदयामध्ये छिद्र होते. या ‘ओपन हार्ट शस्‍त्रक्रियेत’ कॅन्‍ट्रोव्हिटझ्  यांनी विकसित केलेल्‍या हार्ट-लंग मशीनचा वापर करण्‍यात आला. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी ‘बुस्‍टर-हार्ट’ हे तंत्रही विकसित केले होते. एका श्‍वानावर त्‍यांनी हा प्रयोग यशस्‍वीरित्‍या करून पाहिला. या प्रणालीत ‘बुस्‍टर-हार्ट’ हृदयाचे २५% पर्यंत रक्‍ताभिसरणाचे काम करीत असे.

१९६०च्‍या दशकात जनरल इलेक्ट्रिक या कंपनीच्‍या सहकार्याने कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी शरीरात बसविता येईल असा (इम्‍प्‍लॅंटेबल) ‘पेस मेकर’ विकसित केला. मे १९६१ मध्ये पहिला ‘पेस मेकर’ एका रुग्‍णाच्‍या शरीरात बसविण्‍यात आला. या उपकरणाला शरीराबाहेरून नियंत्रित करता येई. ६४ ते १२० ठोके अशी त्‍याची व्‍याप्‍ती होती. शारिरीक व मानसिक ताणामुळे हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात. असे वाढू शकणारे ठोके लक्षात घेऊन तो बनविण्‍यात आला होता. या व्‍यतिरिक्‍त आर्थर बरोबर त्‍यांचे प्रयोग चालूच होते. श्‍वानांवर ते प्रयोग करीत. या प्रयोगांतूनच त्‍यांनी ४ फेब्रुवारी १९६६ रोजी एका रुग्‍णावर शस्‍त्रक्रिया करून ‘पर्मनंट पार्शल मेकॅनिकल हार्ट’ बसविले. दुर्दैवाने शस्‍त्रक्रियेनंतर २४ तासांत तो रुग्‍ण दगावला. परंतु त्‍याचे कारण त्‍याला आधीपासून असलेला यकृताचा विकार हे होते.

मायमोनिडास रुग्‍णालयात कार्यरत असतांनाच कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी अमेरिकेतील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. याआधी तीनच दिवस डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे यशस्‍वी केली होती. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी केलेली शस्‍त्रक्रिया जरी दुसरी असली तरी ती अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण होती कारण डॉ. बर्नार्ड यांनी केलेली शस्‍त्रक्रिया प्रौढ व्‍यक्‍तीवरील होती तर कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी केलेली शस्‍त्रक्रिया एका १९ दिवसांच्‍या नवजात अर्भकावर केलेली होती. नवजात शिशूवरील ही जगातील पहिली हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया त्‍यामुळे अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण मानली जाते.

कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांचे संपूर्ण आयुष्‍य त्‍यांनी वैद्यकीय सेवेला व वैद्यकीय संशोधनाला वाहून घेतले होते. आर्थरसह काम करीत असतांना त्‍यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण उपकरण विकसित केले ज्‍यामुळे हृदयशल्‍यचिकित्‍सा सुलभ होण्‍यास मदत झाली. ते उपकरण म्‍हणजे ‘इन्‍ट्राएऑर्टिक-बलून-पंप’ होय. हे उपकरण अशा पद्धतीने बसविण्‍यात येते की महारोहिणीशी ते निगडित होईल. या उपकरणाच्‍या स्‍पंदनांमुळे हृदयावरील ताण हलका होतो. (It is inserted via the femoral artery in the groin and is placed in the descending thoracic aorta just beyond the origin of the artery to the left arm.)

१९६७च्‍या ऑगस्‍ट महिन्‍यात या उपकरणाचा प्रथम वापर करण्‍यात आला. एका ४५ वर्षे वयाच्‍या महिलेला हृदयविकाराचा झटका आला असता या उपकरणाच्‍या मदतीने तिचे प्राण वाचू शकले. १९८०च्‍या दशकानंतर याचा विस्‍तृत वापर होऊ लागला. २००८ पर्यंत (म्हणजेकॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍या निधना पर्यंत) ३० लाख रुग्‍णांसाठी या पंपाचा वापर करण्‍यात आला होता.

१९८३ मध्‍ये कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी त्‍यांची पत्‍नी जीन हिच्‍यासमवेत ‘एल. व्‍हॅड टेक्‍नॉलॉजीज’ या कंपनीची स्‍थापना केली. हृदयशल्‍यचिकित्‍सेसाठी लागणारी उपकरणे तयार करणे व विकसित करणे हेच या कंपनीचे ध्‍येय आहे.

हृदयशल्‍यचिकित्‍सेतील कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍या मोलाच्‍या योगदानाबद्दल ‘अमेरिकन सोसायटी फॉर आर्टिफिशिअल इन्‍टर्नल ऑर्गन्‍स’ या संस्थेच्‍या वतीने त्‍यांना २००१ साली ‘जीवन गौरव’ पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले.

संपूर्ण आयुष्‍य वैद्यकीय सेवा व संशोधनास समर्पित केलेल्‍या डॉ. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांचे १४ नोव्‍हेंबर २००८ रोजी, वयाच्‍या ९०व्‍या वर्षी मिशिगन येथील अॅनआर्बर येथे निधन झाले.

–—–—

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..