नवीन लेखन...

चौकट

“गणितात संख्यारेषा (Number Line) असते…. जिच्या मध्यभागी 0 उजवीकडे १,२,३ …..आणि डावीकडे -१, -२ , -३ … असे अंक असतात . आणि या संख्यारेषेवर मोठ्यात मोठ्या किंवा लहानात लहान कुठल्याही आकड्यावर बोट ठेवलं तरी देखील त्याच्या उजवीकडे त्यापेक्षा मोठा आणि डावीकडे त्यापेक्षा लहान आकडा असतोच असतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची देखील अशीच एक रेषा असते ……….काल रेषा (Time Line). प्रत्येक जण आपापल्या सामाजिक ,कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, वैचारिक, धार्मिक अशा अनेक मर्यादेनुसार आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर या काळ रेषेच्या कुठल्या ना कुठल्या बिंदूवर असतो आणि त्या बिंदूच्या थोडं मागे आणि थोडं पुढे , आपल्याला जुळवून घेता येईल एव्हढ्या क्षेत्रात चहूबाजूंनी प्रत्येकानी आखलेली असते स्वतःभोवती एक ………..”चौकट” . आणि त्यांच्या आजूबाजूला असतात अशाच अनेकांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे , मर्यादेप्रमाणे आखलेल्या अनेक चौकटी ….त्यातली अनेक वेगवेगळी माणसं …

कधी अनेक जण नाईलाजानी त्यांच्या त्यावेळच्या चौकटीत असतात आणि संधी मिळाली की लगेच दूरवरच्या चौकटीत जाऊन स्थिरावतात ….. परदेशात जाऊन स्थायिक होण्याच्या विचाराने झपाटलेली मुलं किंवा नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केलेल्या व्यक्ती वगैरे या प्रकारात येतात ….. तर काहींच्या बाबतीत … आयुष्य जसं पुढे सरकतं तसं आपसूकच कळत नकळत , इच्छा असो वा नसो …तरीही ते खूप लांबच्या चौकटीत स्थिरावलेले असतात … बदललेला आर्थिक स्तर , सामाजिक बांधिलकी , वैचारिक प्रगल्भता , नशिबाची साथ अशा अनेक घटकांवर हे चौकट स्थलांतर अवलंबून असतं . ….

काही वेळेस ही चौकट फार कमी वेळासाठी असते ….. म्हणजे platform वर उभं राहून ट्रेनमध्ये शिरे पर्यंत त्याच ट्रेन मध्ये आत बसलेल्यांना बाहेरून नावं ठेवणारा एकदा गर्दीतून पार होऊन आत गेला की लगेच त्या चौकटीत जातो आणि मग आतला होतो …

बरेचदा असं निदर्शनास येतं की प्रत्येक चौकटीतल्या व्यक्ती उजवीकडच्या चौकटीतल्याना जरी अति तर डावीकडच्याना कमी लेखतात … उदाहरणं द्यायची झाली तर बरीच आहेत … कायम साडीत वावरणाऱ्या महिलांना घुंगट घेणाऱ्या महिला जुनाट विचारांच्या वाटतात आणि पंजाबी ड्रेस घालणाऱ्या धाडसी …. तर कायम वेस्टर्न आणि जेमतेम कपडे परिधान करणाऱ्यांना साडीवाल्याच काय तर ड्रेस घालणाऱ्या महिला सुद्धा विचित्र वाटतात ….. नास्तिकांना अस्तिक बुरसटलेले वाटतात तर अस्तिकांना अंधश्रद्धा मानणारे …. शाकाहारींसाठी vegan म्हणजे जरा अती तर मांसाहारीसाठी शाकाहारी म्हणजे घासफूस वाले …… खेड्यापाड्यात राहणाऱ्यांना ज्या मोठ्या शहरात जायचं आकर्षण असतं त्याच शहरात राहणाऱ्यांना परदेशाचे वेध लागलेले असतात…. “”Occasionally”” दारू पिणार्यांसाठी न पिणारे म्हणजे चेष्टेचा विषय तर दुसऱ्या चौकटीतले अट्टल दारुडे हा नावं ठेवण्याचा विषय ………….जो तो आपापल्या चौकटीप्रमाणे दुसऱ्याचा न्यायनिवाडा करत असतो …. आपली चौकट आणि इतर चौकटींच्या तुलना करून आपली मतं मांडत असतो…

एकाच चौकटीत असलेल्यांचं आणि दोन्ही बाजूला जवळपास चौकट असणाऱ्यांचं एकमेकांशी पटण्याची शक्यता जास्त असते पण दोन चौकटींमध्ये अंतर जास्त असलं तर मात्र कठीण ….बहुतांश वेळेस असं दिसतं की …जेव्हा लग्न होऊन मुलगी सासरी येते तेव्हा तिचे सासू, सासरे, नवरा, नणंद हे सगळे साधारणपणे एकाच चौकटीत वाढलेले असतात ……. पण ती मात्र तिची माहेरची एक वेगळी चौकट घेऊन आलेली असते ….. तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमी प्रमाणे अगदी वेगळी चौकट…. दोघेही एकमेकांना आपापल्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न करत असतात … स्वयंपाक करायच्या पद्धती , चालीरीती , आवडीनिवडी … विचार , सामाजिक जाणीवा अशा अनेक गोष्टींची चौकट वेगवेगळी …… दोघेही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर असतीलही कदाचित ….. पण मध्ये येते ती …. ”चौकट” …. दोन चौकटीतलं अंतर कमी असेलं तर ठीक अन्यथा गोष्टी विकोपाला गेल्याची अनेक उदाहरणं आजकाल दिसतात … कारण ठरते हीच ती ”चौकट”… अर्थात अशा दूरवरच्या चौकटीत असुनही हळूहळू सामंजस्याने ते अंतर कमी करत सुखानी संसार करणारी देखील अनेक जोडपी आहेत हे ही तितकंच खरं…

तेव्हा आपण कुठल्याही चौकटीत असू ….ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की आपण सर्वोच्च स्थानी पोहोचलोय किंवा कुठल्याही कारणासाठी एखाद्याला कमी लेखतोय तेव्हा अहंकारांनी आपल्यावर ताबा मिळवायच्या आधीच आपल्या उजवीकडच्या चौकटीत कोणी न कोणी त्याही पेक्षा सरस आहे , उजवं आहे .. असा विचार केला पाहिजे ……. आणि “”या उलट”” …. जाणते अजाणतेपणी कुठल्याही बाबतीत आपल्याला कोणाचा हेवा वाटू लागला की … आपला देखील हेवा ज्यांना वाटू शकतो अशा परिस्थितीत कित्येक जण कुठल्या तरी चौकटीत आहेत असं मनात यायला हवं…. सगळी दुखः आपल्याच वाट्याला का ? असा प्रश्न कधी कठीण प्रसंगी पडला तर नक्कीच विचार करावा की याही पेक्षा अनेक पटीने जास्त दुखः सहन करून त्याला धीरानी सामोरी जाणारे कित्येक जण आपल्या डावीकडच्या अनेक चौकटींमध्ये आहेत ……….

आपण सगळ्यांनीच जर असा प्रयत्न केला तर आयुष्य अधिक सोपं, सहज , सुंदर व्हायला मदत होईल हे नक्की … कशाची आसक्ती नाही आणि विरक्तीही नाही अशी समाधानी मानसिक स्थिती एकदा प्राप्त झाली की मग मात्र कुठलीही चौकट असू द्या …त्या चौकाटीतले चौकट राजा / चौकट राणी आपणच……

© क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..