चोरावर मोर !

मी त्या वेळी कुलाबा पोलीस स्टेशनला पोलीस उप-निरीक्षक या पदावर नेमणुकीस होतो. रविवारचा दिवस होता. मी स्टेशन हाउस ड्यूटीवर होतो. साधारण सकाळी ९ च्या सुमारास एक पारशी सद्गृहस्थ एका १३-१४ वर्षाच्या मुलास बरोबर घेउन माझे समोर आले. त्यांची त्या मुलाविरुद्ध घरातला ट्रान्झीस्टर चोरल्याची फिर्याद होती. त्यांनी स्वत:चे नाव फिरोज व मुलाचे नाव बाबा असल्याचे सांगितले. तो मुलगा त्यांचे कडे ६-७ महिनांपासून घर कामाला होता. ते खुश्रूबाग या पारशी कॉलोनीत राहत असल्याची सांगितले. बाबा हा त्यांचेकडे जेऊन खाऊन दर महा १०० रुपये पगारावर नोकरी करीत होता. फिरोज यांनी त्याचा पगार दर महा बँकेत ठेवत जाईन व गरज असेल तेंव्हा त्यास देईन असे ठरले होते.

काही दिवसांपासून बाबा फिरोज यांना त्याच्या पगाराचे पैसे मागत होता. तो उगाचच पैसे खर्च करील म्हणून फिरोजने त्यास पैसे दिले नाहीत व त्याचा राग येऊन बाबाने त्यांच्या घरातला ट्रान्झीस्टर आदले दिवशी चोरला अशी फिरोज यांची तक्रार होती. त्यांची मी बाबास पोलिसी खाक्या दाखवावा अशी अपेक्षा होती.

मी हे ऐकून घेतल्या नंतर बाबास दुसऱ्या खोलीत घेउन गेलो व दरडावणीच्या सुरातच त्या बद्दल विचारले. तो अतिशय काकुळतीस येऊन त्याने काही एक चोरी केली नसल्याचे सांगू लागला. त्याने त्याच्या कामाचा ७ महिन्यांचा साचलेला पगार रुपये ७०० ची मालाकापाशी मागणी केली होती. ते पैसे देण्यास त्याचा मालक फिरोज टाळाटाळ करीत होता. केवळ ते पैसे देऊ लागू नये म्हणून फिरोज त्याचेवर खोटा आळ घेत आहे असे तो मला पुन: पुन: सांगत होता. ही हकीकत बाबा मला सांगत असतानाच माझ्या आधीपासून पोलीस स्टेशन ला नेमणुकीस असलेल्या माझ्या सहकार्याने मला बाजूस बोलावून घेतले. त्याने आलेले सद्गृहस्थ त्याचे नोकरा विरुध्द चोरीची तक्रार घेउन आले आहेत काय असे मला विचारले. मी त्यास होय म्हणून सांगताच या पारशी इसमाने याचे आधी दोन वेळा आधीच्या नोकरा विरुध्द अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. नोकराचे पैसे द्यावे लागू नये म्हणून मुद्दाम अशा खोट्या तक्रारी देण्याची त्या सद्गृहास्थास सवयच आहे अशी त्याने मला माहिती दिली.

माझे समोर फिरोज देत असलेली तक्रार खोटी आहे असे दाखवणारा कोणताही पुरावा नव्हता. तसेंच त्याची तक्रार ही सकृत दर्शनी दखल-पात्र स्वरुपाचा गुन्हा झाल्याचे दर्शवित असल्याने ती नोंदवून घेणे व गुन्हा दाखल करणे क्रम प्राप्त होते. फिरोज देत असलेल्या फिर्यादीचा खरे-खोटे पणा तपासण्यासाठी मी एक शक्कल काढली. माझ्या एका पोलीस हवालदारास बाजूला बोलावून त्या फिरोजचा पत्ता त्यास दिला. त्यास त्या पत्त्यावर जाऊन त्यांचे घरी जे कोणी असतील त्यांना ‘फिरोजने घरचा ट्रान्झीस्टर घेउन त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले आहे’ असे कळविण्यास सांगितले. नंतर मी फिरोज यांना त्यांची फिर्याद सविस्तर पणे स्व-हस्ते लिहून देण्यास सांगितली व त्यांना लिहिण्यासाठी कागद दिले.

पोलीस स्टेशन मधील स्टेशन हाउस ड्यूटी ऑफिसरच्या खोलीची रचना अशी होती ड्यूटी ऑफिसरच्या खुर्चीतून पोलीस स्टेशनमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती दिसत असे. थोड्याच वेळात मी पाठवलेल्या पोलीस हवालदारा बरोबर एक स्त्री हातात ट्रान्झीस्टर घेउन पोलीस स्टेशन मध्ये शिरताना दिसली. मी लगेच बाहेर जाऊन त्या स्त्रीला वेगळ्या खोलीत नेऊन बसवले. एव्हाना फिरोजने त्याची फिर्याद कागदावर लिहून काढली होती. मी ती संपूर्ण वाचली. फिरोजने चोरीस गेलेल्या ट्रान्झीस्टर चे सविस्तर वर्णन कंपनीच्या मॉडेल नंबर सकट केलेले होते. ती फिर्याद वाचून होताच मी फिरोजचे अभिनंदन केले व त्यास त्याचा ट्रान्झीस्टर शोधून काढल्याचे सांगितले. तो अवाक होऊन माझे कडे पाहू लागला. मी हवालदारासा चोरीस गेलेला ट्रान्झीस्टर घेउन येण्यास सांगितले व तो फिरोजला दाखवून तो त्यांचाच चोरीस गेलेला ट्रान्झीस्टर आहेना असे विचारले व त्याचा मेक आणी नंबर दाखविला. त्याने देखील उसने हास्य आणून आनंद झाल्याचे दाखावण्याचा प्रयत्न केला पण त्याचे चेहऱ्यावरून तो पुरता भांबावून गेल्याचे साफ दिसत होते. त्या नंतर मी हवालदारास चोरास घेउन येण्यास सांगितले. तो त्याचे बरोबर त्या स्त्रीस घेउन आला. तिला पाहताच फिरोजचा चेहरा काळा ठिक्कर पडला. त्याने शरमेने मान खाली घातली व माझ्या कडे दीनवाणे पाहू लागला. मी त्यास ती स्त्री कोण आहे ओळखतो का म्हणून विचारतच त्याने रडवेल्या स्वरात ती त्याची पत्नी असल्याचे सांगितले.

त्या बिचाऱ्या माउलीस काय चालले आहे ते काहीच कळत नव्हते. ती फिरोजकडे व माझ्याकडे आळीपाळीने पाहू लागली. शेवटी तिने मलाच हे काय चालले आहे असे विचारले. मी तिला घडलेली हकीकत सांगितली. ती हकीकत ऐकून ती लज्जित झाली व तिच्या नवऱ्याच्या वतीने माझी माफी मागू लागली. तिने तिच्या नवऱ्याची सर्वांसमक्ष चांगलीच खरडपट्टी काढली.

मी फिरोजला आता त्याच्या बायडीस अटक करू का? असे विचारले असता ते खजील झाले. पुन: असे कधीही न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले व त्याचा नोकर बाबा याची देखील माफी मागितली. त्यांनी बाबाचा संपूर्ण पगार देखील एक रकमी देऊन टाकला. बाबाला देखील त्याचेवरील बालंट दूर झाल्याने आनंद वाटून समाधान झाले.

—  अविनाश यशवंत गद्रेBe the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…