नवीन लेखन...

चिनी कलेची विविधता – भाग १

तिबेट या जगाच्या छपरावर ७-८ दिवस घालवून आमची तिबेटचा निरोप घेण्याची वेळ झाली तेव्हा लक्षात आले की प्रत्येक ट्रीप मध्ये निदान एकतरी स्थानिक कला परदेशवासीयांना दाखवली जाते. कधी नाच असतो कधी आपल्याकडच्या डोंबाऱ्यांच्या कसरतींसारख्या कसरतींचे खेळ असतात, प्राचीन काळच्या राहणीमानाची कल्पना देण्यासाठी एका छोट्याश्या खेड्यात भेट देण्याचा कार्यक्रम असतो. पण असले तिबेटच्या मुक्कामात काहीच नव्हते.तेंव्हा ही सहल कोणत्याही स्थानिक रहिवाशांच्या भेटीशिवायच संपणार असे वाटू लागले. प्रत्येक देशाची पद्धत वेगळी असे जरी मानले तरी मनाला चुटपुट लागून राहिली होती.

तिबेटमध्ये पोताला राजवाडा, जोखांग, सेरासारखी धार्मिक स्थळे फिरून झाल्यावर आम्ही जगातील सर्वाधिक उंचीवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास केला तेव्हा वाटले की या सहलीतील जे काही पहावयाचे होते त्याचा आनंद लुटून झाला आहे. पण पुढेही बरीच गंमत बाकी होती हे कुठे ठाऊक होते? १६००० फूट उंचीवरचा ‘तंगूला’ चा बोगदा पार करून सपाट परमॅफ्रॉस्ट एरिया वरून गाडी धावू लागली, तेव्हा वाटलेला थरार आजही जाणवतोय. गाडीची नागमोडी वळणे, तिचे पुढचे व मागचे एंजिन बंद काचेच्या खिडकीतूनही बघायला मिळण्याइतके वक्राकार पूल, प्रचंड विस्तारलेला सपाट बर्फाचा चिखल, पुलाला आधार देणाऱ्या मोठमोठ्या कमानी, त्याखालून पळणारे प्राणी सगळे आजही स्पष्ट आठवते आहे. कधी डोंगराच्या कडेखांद्यावरून तर कधी पोटातून धावणाऱ्या रेल्वेत बसून आम्ही तिबेट-चायना सीमारेषेवरील ९००० फूट उंचीवरच्या गोलमूड येथे १४ तासांनी उतरलो.

गोलमूडला आम्ही फक्त एक रात्र राहून पुढे सिल्क रूट – रेशीम रस्त्याने-चीनमधील ‘झिनिंग’ गावी जाणार होतो. हाही जवळपास १२ तासांचाप्रवास होता. इथून पुढे विरळ हवामानाचा त्रास होणार नव्हता. बसमोठी, आरामदायक होती. आम्हाला गोलमूडपासून सोबत करणारी गाईड बाई पण एकदम मस्त जॉली होती. सिल्करूट या शब्दाचे आकर्षण लहानपणी पाहिलेल्या “काबुलीवाला” या सिनेमापासूनच होते. हिमालयाच्या पलिकडून उंटावर बसून निरनिराळ्या गोष्टी भारतात विक्रीला आणणारा काबुलीवाला त्यावेळी खूपच ग्रेट वाटायचा. काबूल प्रत्यक्ष कुठे आहे हे तरी तेव्हा कुठे माहीत होते? पण त्याचे भारतातील छोट्या मुलीवर असलेले प्रेम, तिला पाहून आपल्या मुलीची येणारी आठवण, सगळे त्या वयात मन हेलावून टाकत होते यात शंकाच नाही. नंतर फक्त पुस्तकातूनच सिल्करूटचा संबंध आला होता. आता मात्र आम्ही त्यावरून प्रवास करणार होतो याचे खूप औत्सुक्य वाटत होते.

बसमधून आमचा प्रवास झिनिंगकडे सुरू झाला. गोलमूड मागे पडले, डोंगराच्या चढ उतारावरून आमची बस धावत होती. थोडीशी झाडी, कधी एका बाजूला डोंगर व दुसरीकडे दरी तर कधी दोन डोंगरातली खिंड पहाता पहाता आम्ही कधी वालुकामय प्रदेशात येऊन पोहोचलो कळलेच नाही. आता आमच्या बसचा ताकल्माकन वाळवंटाच्या कडेकडेने सिल्करूटवरून प्रवास सुरू झाला. नजर पोहोचेल तिथवर वाळूच्या लाटा दिसत होत्या. फक्त वाळू आणि वाळूच. सोनेरी वर्णाची, उन्हात सोन्याचा गालीचा अंथरल्यासारखी दिसणारी वाळू डोळा भरून पहात होतो.

गाईडला माहिती सांगण्यासारखे फारसे नव्हते तरीही ती या वाळवंटाचा आकार, त्याचे गोबीच्या प्रसिद्ध वाळवंटाशी असणारे नाते, या वाळवंटाला कोणकोणत्या देशांच्या सीमा जोडलेल्या आहेत वगैरे बरेच काही सांगत होती. जगातील सर्व वाळवंटाच्या यादीत याचा नंबर आकारमानाने १८ वा लागतो. या वाळवंटात पाणी असणारी ठिकाणे फारच कमी आहेत त्यामुळे जरी हा ‘रेशीमरस्त्याचा’ नेहमी वापरात असणारा भाग असला तरी मुक्काम करण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने हा प्रवास उंटावरून करणे व्यापाऱ्यांना फार फार अवघड पडत असे. पूर्वी वाळवंट तुडवत, कधी रस्ता चुकत उंटावरून प्रवास करून ताकल्माकन वाळवंटामधून व्यापारी इराण, तुर्कस्तानामधून माल विकण्यासाठी चीनमध्ये येत. या प्रवासाला खूप कालावधी लागे. चीनने बांधलेल्या अनेक महामार्गांपैकी झीनिंग मार्गे जाणारा गोलमूड ते बीजिंग असा G109 हा रेशीमरस्त्यावरचा महत्वाचा महामार्ग म्हणजे ल्हासा बिजींग रेल्वे प्रमाणेच व्यापाऱ्यांसाठी एक वरदानच ठरले आहे. हा नवीन मार्ग २००३ साली तयार झाला.

गोलमूड सुटले, डोंगर संपले व सरळसोट रस्ता सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नजर जाईल तिथवर वाळवंट पसरले होते. पिवळसर तपकिरी रंगाची वाळूच वाळू सर्वत्र दिसत होती. मोठी झाडे तर सोडाच, पण अगदी फूट-दीड फूटी काटेरी खुरटी झुडुपेही अभावानेच. पिवळसर तपकिरी वाळूतून काळपट रेघ ओढावी तसा सरळसोट सुनसान रस्ता दूरपर्यंत दिसत होता. आजूबाजूला ना घरे, ना झाडे, आमची एकमेव बस सोडली तर ना इतर कोणतीही वहाने. वाळवंटामध्ये दूरपर्यंत वाळूच्या लाटा दिसत होत्या. लाटांच्या उंचवट्यावर उभरणारी काळपट धारदार कड उन्हात चमकत होती. क्वचितच दिसणारी अत्यंत अरुंद पानांची काटेरी झुडुपे वाळू बसल्यामुळे तपकिरीच दिसत होती. रस्त्याच्या कडेकडेने नेहमी दिसणारे दिव्यांचे खांबही नव्हते. खूप वेळ असा बसचा प्रवास झाल्यावर अचानकच बस थांबली. बसेस नेहमी प्रवाशांच्या सोयीसाठी जिथे छोटेसे का होईना उपहारगृह आहे, निदान ‘शू सेंटर’ तरी आहे, अशा ठिकाणी थांबतात. इथे अशी कोणतीच सोय नसताना बस का थांबली असावी तेच कळेना.

“बस बिघडली की काय?”
“अगोबाई, आता काय करायचे?”
“आजूबाजूला बघितलत का हो, काहीसुद्धा दिसत नाही. चिटपाखरू सुद्धा नाही बघा.”

वेगवेगळ्या भाषेत पण एकाच अर्थाचे संवाद एकदम सुरू झाले.

“हा आपला टॉयलेट स्टॉप आहे.” ही गाईडची घोषणा ऐकून सर्वजण चकितच झाले.

“अगोबाई, फक्त वाळवंटच दिसतंय, झाडंझुडुपंही नाहीत की आडोसाही नाही.”

“हा काय टॉयलेट स्टॉप आहे?” आमची आपापसातली कुजबूज आता स्पष्ट होऊ लागली.

“बसच्या डाव्या बाजूस जेंटस तर उजव्या बाजूस लेडीज जातील.”
गाईड बाईंनी जाहीर केले. ऊन रणरणत होते, डोळे उन्हाने पूर्णपणे उघडवतही नव्हते. गोलमूडहून निघून बराच वेळ झाला होता, परत केव्हा आणि कुठे थांबणार होतो हे माहीत नव्हते. यामुळे उतरणे भागच होते. सगळे आपापल्या’ अदृश्य विश्रांती गृहा (Rest Room) कडे वळले. स्त्रिया सगळ्या एकमेकींकडे पाहू लागल्या कारण सगळा उघड्यावरचाच मामला, ज्याची कोणालाच सवय नव्हती! तेवढ्यात गाईडबाई एक भली मोठी छत्री घेऊन पुरुषांच्या बाजूला उतरल्या, सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असताना तिने आत्तापर्यंत आमच्या अजिबात लक्षात न आलेल्या रस्त्याच्या खालून जाणाऱ्या ४ फुटी (स्टॉर्म वॉटर ड्रेन) पाईपचे तोंड उघडलेली छत्री लाऊन झाकून टाकले आणि ओरडून समस्त स्त्रीवर्गाला त्या पाईपचा वापर स्वच्छता गृहासारखा करायला लावला. थोडीशी तरी आडोशाची जागा निर्माण झालेली पाहून सर्वचजणी एकदम रिलॅक्स झाल्या. अडचणीवर सांधी युक्ती वापरून माणूस कशी मात करू शकतो याचे उत्कृष्ट शिक्षण अनपेक्षितपणे मिळाले. बस मार्गस्थ झाली तरी बराच वेळ याच ‘शिक्षणा’ची गंमत आठवत होती.

दुपारच्या जेवणासाठी आम्ही वाळवंटात असलेल्या एका छोट्या वस्तीवर थांबलो. वस्ती अगदी ५-१० घरांचीच होती. एकमजली २-३ खोल्यांची छोटी छोटी कौलारू घरं. केवळ पर्यटकांचे आदरातिथ्य करून होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणारी कुटुंब. अत्यंत अगत्यशील, हसरी. २-४ स्त्रिया अन् पुरुषांचा चमू आमची बस थांबण्याची वाटच पहात होता. आमचे स्वागत करून त्यांनी आम्हाला जेवणघरात नेले. ४-५ घरात मिळून एकाच कुटुंबातील सदस्य रहात असावेत असे वाटावे एवढे सगळ्यांच्यात साम्य होते. तिबेटी व चिनी अशा दोनही प्रदेशांची सरमिसळ त्यांच्या वेषभूषेत आणि केशभूषेत झालेली दिसत होती. प्रथम आले चिनी व्हेज क्लियर सूप व ब्रेड. उन्हाळ्याचे दिवस होते त्यात आम्ही भर दुपारी तिथे होतो तरी हवा खूप थंड होती. त्या थंड हवेत गरम गरम सूप एकदम चविष्ट वाटले. त्यानंतर भात, सागो व उकडून मीठ, सॉया सॉस घातलेली स्पिनॅचची भाजी आली. मांसाहारी लोकांसाठी एक चिकन व फिशची डिश आली. मी शाकाहारी असल्याने बटाट्याच्या किसासारखी जिरे, चवीपुरते मीठ, मिरच्यांचे तुकडे व जाड्याभरड्या शेंगदाण्याच्या कुटाने सजविलेली भाजी आली. हा पदार्थ फार म्हणजे फारच चविष्ट होता. बटाटा नक्कीच नव्हता, पण भाजी कशाची असावी याचा अंदाज येईना. कच्ची पपई असावी का, याची खात्री करून घेण्यासाठी बल्लवाचार्यांना पाचारण केले, तेव्हा ती कलिंगडाच्या पांढऱ्या भागाच्या किसाची चिनी पद्धतीने मोठ्या गॅसवर वोकमध्ये भराभर परतून केलेली भाजी होती असे कळाले. हाती उपलब्ध असणाऱ्या सामुग्रीतून तयार झालेला पाककलेचा उत्कृष्ट नमुना अनपेक्षितपणे चाखायला मिळाला. आजही मी ती भाजी करते तेव्हां त्या रेस्टॉरंटची आठवण येते.

पोटभर जेवून, परत कधीही भेटण्याची शक्यता नसणाऱ्या बल्लवाचार्यांना व आमची सरबराई करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना “अन्नदाता सुखी भव” असा मनापासून आशीर्वाद देत आम्ही मार्गस्थ झालो. आता अगदी टळटळीत ऊन होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या सँड ड्यून्सकडे नजर टाकवत नव्हती. वातावरणात थोडीशी सुस्ती पसरली होती. सगळेजण आहारले होते. बसमध्ये मंद संगीत वाजत होते. तोच दूरवर रस्त्याच्या डाव्या बाजूस वाळवंटात थोडीशी काळपट रेषा दिसू लागली. अधून मधून येणाऱ्या वाऱ्यामुळे वाळूचे कण उडत होते. वाटले, अशीच एखादी वावटळ असावी व वाळूचे नवीन थर तयार होत असावेत. पण हळूहळू ती रेघ स्पष्ट होऊ लागली. काहीतरी धावत असल्याचा भास होऊ लागला. आमची बस पण धावत होती. त्यामुळे समोरून येणारे आकार थोड्या वेळात स्पष्ट झाले. गोलमूडच्या दिशेने निघालेले दोन वाशिंडांचे उंट व त्यावरील स्वार दिसू लागले. अचानक उंटांचा काफिला बघायला मिळाला व ‘काबुलीवाला’ चित्रपट आठवला.

हळूहळू मधून मधून ५-६ घरांची वस्ती लागू लागली. पक्की घरं कसली, चार बाजूंनी पडदे लावलेले ५-६ तंबूच होते ते. अशा ५-६ तंबूंच्या वस्तीभोवती एक कापडी कुंपण रस्त्यापासून व वाळवंटापासून वस्तीला वेगळेपण देत होते. अथांग पसरलेल्या वाळवंटात ही कुटुंबे आपला चरितार्थ कसा चालवत असतील, त्यांची दिनचर्या कशी असेल याचा विचार मनात येत होता. आपल्यासारख्या सिमेंटच्या जंगलात रहाणाऱ्या लोकांना त्यांच्या आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही. त्या तंबूच्या दारात उभे राहून रंगीबेरंगी पोलकी, त्याखाली घोट्यापर्यंत येणारे तसेच रंगीत स्कर्ट व दोन वेण्यांच्या वरून गोंड्या गोंड्याचा स्कार्फ बांधलेल्या स्त्रिया, जुनाट कळकट कोट पँटीतले म्हातारे व टी शर्ट व सैलसर विजारी घातलेले पुरुष बसचा आवाज़ ऐकून कुंपणाबाहेर येऊन आम्हाला हात हलवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत होते. क्वचित गोरी गुबगुबीत मुलेही दिसत होती. ४-६ शेरडं मात्र त्यांच्या राखणीला असणाऱ्या कुत्र्यांसह प्रत्येक वस्तीत होतीच. हळूहळू दिवस कलू लागला. संध्याकाळची कळा सगळ्या वातावरणावर पसरली. बसमधली मंडळी ताजीतवानी झाली.

— अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..