नवीन लेखन...

छायाचित्र नव्हे, ‘प्रकाश’चित्र!

पुण्यात मिठाईसाठी चितळे बंधू व फोटोसाठी कान्हेरे बंधू प्रसिद्ध आहेत. चितळेंच्या मिठाईची चव जिभेवर रेंगाळते तर कान्हेरेंचे फोटो चिरंतन स्मृती जागवतात.
विजय टाॅकीजला लागूनच असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ‘कान्हेरे फोटो स्टुडिओ’ होता. या इमारतीत खाली एक कॅन्टीन होतं. चित्रपटाच्या मध्यंतरात चहा, वडापाव साठी तिथे गर्दी व्हायची. तिथून लाकडी जिन्याने दुसऱ्या मजल्यावरील अरुंद गॅलरीतून शेवटी गेलं की दोन खोल्यांमध्ये ‘कान्हेरे फोटो स्टुडिओ’ होता. शाॅर्टकटने जायचं असेल तर विजय टाॅकीजच्या पायऱ्या चढून वरती डाव्या हाताला आठ पायऱ्यांनी वर गेल्यावर स्टुडिओत जाता येत असे.
कान्हेरे बंधू हे एकूण चार भाऊ. त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु केलेला फोटोग्राफीचा हा व्यवसाय चारही बंधूंनी पुढे नावारूपाला आणला.
अरविंद सामंत यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रिमियर शो व प्रेस पार्टीचे फोटो काढण्यासाठी गणेश कान्हेरेला निमंत्रण ठरलेले असायचे. त्यावेळी गणेशशी आमचा परिचय झाला. गणेश हा उंचीने साडेचार फुटी, तब्येतीने गिड्डा, हिटलरसारखे चापून बसवलेले केस, चायनीज डोळ्यांवर नाकावर घसरलेला चष्मा, तलवार कट मिशी, पॅन्टमध्ये इनशर्ट करुन ढेरीला आवळून बसवलेला काळा बेल्ट व पायात काळे बुट असा टकाटक दिसायचा.
गणेश फोटोग्राफी फार उत्तम करायचा. त्यामुळे अरविंद सामंत यांचेकडे जाहिरातीसाठी आलेल्या अनेक चित्रपटांच्या ‘प्रिमियर शो’ ची कामे त्याने केली. प्रसंगी मुंबईलाही जाऊन त्याने रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी चित्रपट समारंभाचे फोटो काढले. कधी गणेश आमच्या ऑफिसवर गप्पा मारायला येत असे. वेळ असेल तर आम्ही त्याच्या स्टुडिओत जाऊन त्याने केलेले फोटोग्राफीचे नवीन काम पहायला जात असू. त्यावेळी स्टुडिओत तिघेही बंधू काम करायचे. गणेश नंतरचा श्याम व धाकटा प्रकाश इथेच भेटले. सर्वात मोठ्या भावाचा स्टुडिओ राजेंद्र नगरला आहे.
काही वर्षांनंतर श्यामने सातारा रोडला स्वतःचा स्टुडिओ थाटला. गणेशने आयडियल काॅलनीत मोठ्या जागेत स्टुडिओ सुरू केला. प्रकाशने मूळ स्टुडिओचे नूतनीकरण करुन कामास सुरुवात केली. या स्टुडिओत डीके नावाचा एक मदतनीस खूप वर्षांपासून काम करीत होता. तो ब्लॅक ॲ‍ण्ड व्हाईट रोल डेव्हलप करणे, प्रिंट काढणे, लायटिंग करणे व बाहेरची कामे कराथचा.
आमच्याकडे कोणी नाट्य निर्माता आला की, आम्ही त्याला कलाकारांचे फोटोसेशन करुन घ्यायला प्रकाशकडे पाठवत असू. लावणी निर्माते डिझाईन करून घेण्यासाठी आल्यावर त्यांनाही फोटोंसाठी प्रकाशकडे पाठवायचो. अशावेळी निर्माता आम्हाला विनंती करीत असे की, तुम्हीही बरोबर चला व फोटो डिझाईनला लागतील तशा पोजेस कलाकारांना सांगा.
मेकअपला दोन तास लागायचे. प्रत्येक डान्सरचे सोलो फोटो वेगवेगळ्या बाजूने काढले जायचे. नंतर चार किंवा सहा जणींचे एकाच पोजमध्ये फोटो घेतले जायचे. अकरा वाजता सुरू झालेले काम संपायला चार वाजायचे. मधे दोन वेळा चहा झालेला असायचा. रोल डेव्हलप केल्यावर प्रिंट मिळायच्या. मग आम्ही डिझाईनला सुरुवात करायचो.
सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार बण्डा जोशी, संतोष चोरडिया, दिलीप हल्याळ, मधुकर टिल्लू, मकरंद टिल्लू, मंजिरी धामणकर अशा अनेकांचे फोटोसेशन मी प्रकाशकडून करुन घेतले आहे. प्रकाश हा बडबड्या स्वभावाचा असल्याने कोणाशीही त्यांची पहिल्या भेटीतच मैत्री होत असे. बण्डा जोशींनी त्याला आपल्या कन्येच्याही लग्नाच्या फोटोंचे काम दिले. दहा वर्षांपूर्वी संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार यांचे मी प्रकाशकडून फोटो काढून घेतले. त्या फोटोंमधून त्यांचे जिवंत व्यक्तीमत्व जाणवते, इतके ते उत्तम आले. आजही प्रसिद्धीसाठी तेच फोटो, त्या वर्तमानपत्रांना देतात.
नवीन डिजीटल तंत्रज्ञान आले आणि रोलचे कॅमेरे कालबाह्य झाले. प्रकाशने नवीन महागडे डिजीटल कॅमेरे घेतले. आता हाताशी त्याचा चिरंजीव यतिन आला होता. तो हळूहळू वडिलांच्या हाताखाली तयार होत होता. लावणीचा बहर ओसरला होता. त्यामुळे ती कामं कमी झाली. पुण्यातील नाटकांचे निर्माते बोटावर मोजण्याइतकेच राहिले. पूर्वी गणपतीच्या सीझनमध्ये अनेक नाटकं बसविली जात असत, त्यांचे देखील प्रमाण कमी झाले.
प्रकाशला मालकाने नवीन बांधकाम करण्यासाठी स्टुडिओ खाली करायला सांगितलं. हाॅटेल व भाडेकरुंना आधीच बाहेर काढले होते. प्रकाशने दैनिक ‘प्रभात’ समोर दुसऱ्या मजल्यावर एक जागा भाड्याने घेऊन स्टुडिओ सुरू केला. भाडे जास्त होते, पण त्याशिवाय पर्याय नव्हता. या जागेतही आम्ही विजय जोशी यांच्या नाटकातील कलाकारांची फोटोसेशन केली. प्रकाशकडे गेल्यावर त्याने केलेले लग्नाचे, मुंजीचे अप्रतिम अल्बम बघायला मिळायचे. चहा व्हायचा. काही वर्षांतच त्याने ही जागा सोडली व चित्रशाळा चौकात ‘रंगवर्षा’ समोर पहिल्या मजल्यावर नवीन स्टुडिओ सुरू केला. मात्र आता कामं फारच कमी झालेली होती.
आमच्याकडे कुणी वैयक्तिक फोटो काढण्यासाठी आले तर आम्ही त्यांना प्रकाशकडे घेऊन जायचो. मनोहर कोलते, प्रकाश घोडके, राजेंद्र दीक्षित, हिम्मतकुमार, विजय जोशी असे कित्येकांचे त्याने काढलेले सोलो फोटो अप्रतिम ठरले आहेत.
काळ बदलत गेला. मोबाईलमुळे फोटोंचे महत्वच संपले. महागड्या मोबाईलवर स्टुडिओसारखे फोटो कोणीही काढू लागले. परिणामी प्रकाशला कामाअभावी स्टुडिओचे भाडे भरणेही कठीण जाऊ लागले. मी त्याला भेटलो तेव्हा तो खूपच निराश झालेला दिसला. त्याने स्टुडिओ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता फक्त लग्न, मुंजी, समारंभाच्याच ऑर्डर घेण्याचे त्याने ठरविले. मदतीला यतिन होताच. तिकडे गणेशने देखील स्टुडिओ पहिल्यासारखा चालत नसल्याने ती जागा एका क्लाससाठी भाड्याने दिली व त्या मिळणाऱ्या भाड्यावर चरितार्थ चालू ठेवलाय.
आता कधी विजय टाॅकीज समोरुन जाताना, दैनिक ‘प्रभात’ जवळून जाताना, चित्रशाळा चौकातून ‘रंगवर्षा’ दुकानाशी आल्यावर प्रकाशची प्रकर्षाने आठवण येते. आता फोटोग्राफी व्यवसायाला ते ‘पूर्वीचे दिवस’ राहिलेले नाहीत हेच खरं!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१५-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on छायाचित्र नव्हे, ‘प्रकाश’चित्र!

  1. सर, फारच छान लेख
    मी 1981 ला येथे आल्यावर विजय टॉकीज जवळ हा स्टुडिओ बाहेरून बघितला होता

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..