नवीन लेखन...

चन्द्रशेखर अष्टक स्तोत्रम् – मराठी अर्थासह

 

मार्कण्डेय पुराणाचे रचयिता मार्कण्डेय ऋषींनी हे अष्टक रचून शंकराचा धावा केला अशी लोककथा आहे. मृगशृंग ऋषींचा पुत्र मृकण्डू याला संतान नसल्याने त्याने भगवान शंकराची आराधना केली. शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला, परंतु दीर्घायुषी पुत्र मंद बुद्धीचा तर अल्पयुषी पुत्र (१६ वर्षे) अत्यंत बुद्धिमान असेल असा विकल्प दिला. मृकण्ड ऋषींनी दुसरा विकल्प निवडला. तोच हा पुत्र. मृकण्डाचा पुत्र म्हणून त्याचे नाव मार्कण्डेय. १५ वर्षे विद्याध्ययन केले. १६ व्या वर्षी जेव्हा कृतांत काळ आला तेव्हा मार्कण्डेयाने भगवान शंकराचा धावा केला. यमदूतांनी आपल्याला ओढून नेऊ नये म्हणून त्याने शिवलिंगाला घट्ट मिठीच मारली. शंकराने प्रसन्न होऊन त्याचे रक्षण केले व यमाला रिक्तहस्ते परत पाठवून दिले. त्यानंतर त्याने हे स्तोत्र म्हटले अशी समजूत आहे.

सदर अष्टक मार्कण्डेय ऋषींनी रचले आहे. त्याच्या पठणाने अकाल मृत्यू टळतो, तसेच हे मानवाला सांसारिक कष्टांपासून वाचवणारे कवच आहे अशी भाविकांची धारणा आहे.


चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर पाहि माम् ।
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥१॥

मराठी- हे शंकरा, माझे पालन कर. हे शंकरा माझे रक्षण कर.

हे सदाशिव शंकरा जगती करी मम रक्षणा ।
हे सदाशिव शंकरा जगती करी मम पालना ॥ ०१


रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनं
सिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युताननसायकम् ।
क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदिवालयैरभिवन्दितं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥२॥

मराठी-  चांदीसारख्या शुभ्र पर्वता (हिमालया) चे शिखर हेच ज्याचे घर आहे, ज्याने रत्नखचित मेरू पर्वताचे धनुष्य बनवले, त्याला सर्पराज (वासुकी) ची प्रत्यंचा जोडली, ज्याच्या बाणावर श्रीविष्णू आरूढ झाला, आणि ज्याने तीन नगरे झपाट्यात जाळून टाकली, ज्याला देवता वंदन करतात, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील?

मेरुचे धनु, वासुकी गुण, विष्णु सायक ज्या करी          (गुण- धनुष्याची दोरी)
नष्ट तीन पुरे झणी, सुर पाउले नमिती बरी ।
जो वसे शिखरी हिमालय, तो मला नित आसरा
काय काळ करी तिथे मज, त्यास पाड नसे जरा ॥ ०२

टीप- या श्लोकाला संदर्भ शिव पुराण व मत्स्य पुराणातील, शंकराने सर्व देवांच्या साहाय्याने त्रिपुरांचा नाश केला त्या कथेचा आहे.


पञ्चपादपपुष्पगन्धपदांबुजद्वयशोभितं
भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम् ।
भस्मदिग्धकलेबरं भव नाशनं भवमव्ययं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥३॥

मराठी- पाच वृक्षांच्या फुलांनी आणि त्यांच्या सुवासाने ज्याची पदकमळे सुशोभित (आणि सुगंधित) झाली आहेत, कपाळावरील नेत्रातून बाहेर पडलेल्या अग्नीने ज्याने मदनाला जाळून टाकले, ज्याने सर्वांगावर राख फासली आहे, जो या जीवनातील दुःखे नष्ट करतो आणि जो सर्वकाळ अस्तित्त्वात रहातो, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

पावले  सुम पंचकी खुलली सुवास उफाळला
वन्हिने नयनातल्या उघडून मन्मथ जाळिला ।
सर्वव्यापक, दुःख नाश करीत, राख तनूवरी
त्यास पाड नसे जरा मज काळ काय तिथे करी   ॥ ०३

टीप- येथे पहिल्या चरणातील ‘पंचपादप’ चा संदर्भ मंदार,पारिजात,संतान,कल्पवृक्ष आणि हरिचंदन या ‘देवतरु’ या उपाधीने ओळखल्या जाणार्‍या झाडांशी आहे.


मत्तवारणमुख्यचर्मकॄतोत्तरीयमनोहरं
पङ्कजासनपद्मलोचनपूजितांघ्रिसरोरुहम् ।
देवसिन्धुतरङ्गसीकर सिक्तशुभ्रजटाधरं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥४॥

मराठी- ज्याने माजलेल्या हत्तीचे कातडे आपल्या पाठीवर पांघरले आहे, ज्यामुळे तो (आणखीच) मनोहर दिसत आहे, ज्याच्या पदकमळांची कमळात बसणारा (ब्रह्मा) आणि कमळासारखे नेत्र असणारा (विष्णू) पूजा करतात, स्वर्गंगेच्या लाटांमुळे ज्याच्या शुभ्र जटांवर पाण्याचे तुषार फवारल्यासारखे दिसतात, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

जो दिसे रमणीय ओढुन मत्त कुंजर चामडे
पादपद्म विधी-अनंतहि पूजिती नत त्यापुढे ।      (विधी-ब्रह्मा, अनंत-विष्णू)
जान्हवी जल लाट फेकत शुभ्र थेंब जटांवरी
शंकरा शरणा मला मग काळ काय तिथे करी ॥ ०४


यक्षराजसखं भगाक्षहरं भुजङ्गविभूषणं
शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेबरम् ।
क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥५॥

मराठी- कुबेराचा मित्र असणार्‍या, भगाच्या डोळ्याचे हरण करणार्‍या, नाग हेच ज्याचे अलंकार आहेत, ज्याच्या शरीराचा डावा भाग नगसुता पार्वतीच्या रूपाने सुशोभित झाला आहे, विषप्राशनामुळे ज्याचा गळा निळा झाला आहे, ज्याच्या हाती परशू आहे, ज्याच्याबरोबर (शिरावरील चंद्रामध्ये) एक हरीण आहे,अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

मित्र वैश्रवणा, भगा नयनारि, पन्नग दागिना
पार्वती विलसे सदाशिव अंग वाम सुलक्षणा ।
प्राशुनी विष नील कंठ मृगा सवे परशू करी
शंकरा शरणा मला मग काळ काय तिथे करी ॥ ०५


कुण्डलीकृतकुण्डलेश्वर कुण्डलं वृषवाहनं
नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम् ।
अन्धकान्तकमाश्रितामरपादपं शमनान्तकं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥६॥

मराठी- ज्याच्या कानावर सर्पराजाचे वेटोळे कर्णभूषण म्हणून घातले आहे, नंदी ज्याचे वाहन आहे, जो त्रिभुवनाचा स्वामी असून नारद इत्यादी मुनीश्रेष्ठ ज्याच्या ऐश्वर्याचे गुणगान करतात, ज्याने अंधकासुराचा नाश केला, जो शरणागतांसाठी कल्पवृक्ष आहे, ज्याचे यमावर नियंत्रण आहे, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

वर्तुळाकृति वासुकी श्रवणी, नि नंदिक वाहना           (नंदिक- नंदी, शिवाचे वाहन)
तीन लोकधनी, मुनीजन गात वैभव वंदना ।
अंधका वधिले, शिवा, शरणास कल्पतरू खरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०६  

टीप- काही अभ्यासकांनी ‘अन्धकान्तकमाश्रितामरपादपं’ चा संदर्भ वृष्णिवंश व अंधक वंशाच्या शिव भक्तीशी लावलेला दिसतो.


भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं
दक्षयज्ञविनाशनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम् ।
भुक्तिमुक्तिफलप्रदं सकलाघसंघनिबर्हणं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥७॥

मराठी- या भव रूपी जगातील रोग्यांना औषधस्वरूप असणार्‍या, सर्व संकटांना दूर सारणार्‍या, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणार्‍या, ज्याच्या ठायी (सत्व,रज,तम हे) तिन्ही गुण एकवटले आहेत, अशा तीन लोचन असलेल्या, भौतिक सुखोपभोग आणि मोक्ष रूपी फळ देणार्‍या,पातकांच्या राशींचा नाश करणार्‍या अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

तोडगा भव रोगियां, विपदा समस्त दुरी झणी
दक्षहोमविनाश, सुंदर नेत्र तीन, त्रयो गुणी ।
सौख्य मोक्षद,  पापनाशक  आसरा मज शंकरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०७ 


भक्तवत्सलमर्चितं निधिक्षयं हरिदंबरं
सर्वभूतपतिं परात्परमप्रमेयमनुत्तमम् ।
सोमवारिदभूहुताशनसोमपानिलखाकृतिं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥८॥

मराठी- ज्याची (भक्तजन) पूजा करतात, जो भक्तांप्रती दयाळू आहे, जो अक्षयनिधी आहे, या दिशाच ज्याची वस्त्रे  आहेत, जो सर्व प्राणिमात्रांचा स्वामी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अमर्याद आहे, ज्याच्यापेक्षा अधिक उत्तम कोणीही नाही, जो सूर्य,चंद्र, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आदि स्वरूपात विराजमान आहे, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

सेवकां कनवाळु, पूजत भक्त, अक्षय राशि जो
जो दिगंबर, भूतनाथ, अनंत, उत्तम सर्व जो ।
तेज वायु रवी रसा नभ इन्दु  जो जल साजिरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०८ 


विश्वसृष्टिविधायिनं पुनरेव पालनतत्परं
संहरन्तमपि प्रपञ्चमशेषलोकनिवासिनम् ।
कीडयन्तमहर्निशं गणनाथयूथसमन्वितं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥९॥

मराठी- जो या विश्वाचा आणि सृष्टीचा निर्माता आहे, तसाच त्याचे पालन करण्यातही तत्पर आहे, आणि शेवटी योग्य वेळी असंख्य जनांसाठी वसतीयोग्य अशा या जगाचा सर्वनाश करतो, आपल्या भूतगणांच्या गटांसमवेत रात्रंदिवस खेळत असतो, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

निर्मितो जगता, नियामक सृष्टिची जपतो धुरा
शेवटी जग नाश मानव वास जो करितो बरा ।
संघनायकसंग खेळत आपल्या नित जो खरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०९


मृत्युभीतमृकण्डुसूनुकृतस्तवं शिवसन्निधौ
यत्र कुत्र च यः पठेन्न हि तस्य मृत्युभयं भवेत् ।
पूर्णमायुररोगतामखिलार्थसंपदमादरात्
चन्द्रशेखर एव तस्य ददाति मुक्तिमयत्नतः ॥१०॥

मराठी- मरणाची भीती असलेल्या मृकण्डूच्या पुत्रा (मार्कण्डेया) ने केलेले हे स्तवन जो कोणी शंकराच्या जवळ किंवा जेथे कोठेही पठण करेल, त्याला मृत्यूचे भय राहणार नाही. सदाशिवच त्याला संपूर्ण निरामय आयुष्य, सर्व पुरुषार्थपूर्ण धनदौलत आणि (जनमानसात) आदर व सहज मुक्ती प्रदान करतो.

मृत्युचे भय ज्या मृकण्डुसुतास ही सुचली स्तुती
गातसे कुणि ही कुठे हि तयास वा शिव संगती ।
काळभीति तया  नसे, परिपूर्ण सार्थक जीवनी
शंभु दे धन स्वास्थ्य आदरयुक्त, सद्गति देउनी ॥ १०  

इति श्रीचन्द्रशेखराष्टकस्तोत्रं संपूर्णम् ॥

— धनंजय बोरकर
९८३३०७७०९१

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 55 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

9 Comments on चन्द्रशेखर अष्टक स्तोत्रम् – मराठी अर्थासह

 1. खूप सुंदर आणि लयबद्ध भाषांतर. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 2. Dhananjay,
  Very effective translation and very appropriate Marathi shlok . You deserve a lot of praise for this.
  Many many Congrats for this creation.

 3. अत्युत्तम आणि तितकेच सुलभ गेय केले आहे. मराठी भाषेचे वैभव वाढवणारी ही रचना आहे. धन्यवाद????

 4. उत्कृष्ट. आतापर्यंतच्या रचनांपेक्षा हा बाज वेगळा आणि अवघड आहे. नेमक्या मराठी लपेटीत सम्यक भाव दाखवणे सोपे नाही. पण मुशायर्‍याच्या अंगाने चित्र चांगले झाले आहे. ….. भाऊसाहेब पाटणकरांची आठवण झाली!

 5. अतिशय सुदंर भाषांतर पाठांतर करतेवेळी भाशातरासहित अभ्यासले तर लवकर पाठ होवू शकते

 6. अतिशय सुरेख समश्लोकी अनुवाद आणि सुलभ भाषांतर

 7. धनंजयजीः
  आपले भाषांतर स्पष्ट असल्याने हे स्तोत्र समजणे सोपे झाले आहे.
  मराठी काव्यात केलेले रूपांतरपण लयबध्द झाले आहे.
  मनात एकच शंका येते. या काव्याला मार्कंडेय अष्टकम् न म्हणता श्रीचंद्रशेखरांचे नाव
  का बरे दिले आहे?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..