सीएन टॉवर ….. एक आधुनिक आश्चर्य !

मे महिन्यात कॅनडातील वातावरण आल्हादकारक होते. उन्हाळ्याला नुकताच सुरवात झालेली; पण आपल्याकडे असते तशी उष्णतेची तीव्रता नव्हती. उबदार हवामान आम्हा पती-पत्नीना चांगले मानवले. त्यामुळे कॅनडाला जाण्यापूर्वीची भिती मनातून पार निघून गेली. स्वच्छ, सुंदर वातावरणात मन रमून गेले होते. सुंदर निसर्गाने मनाला भुरळ घातली होती. उन्हाळा असला तरी अधून-मधून पावसाच्या सरी यायच्या नि पुन्हा ऊन पडायचे…… भारतातल्या श्रावणासारखे वातावरण! त्यामुळे बाहेर फिरण्यात मोठी मौज वाटायची.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

मी कन्येच्या घरी हॅलिफॅक्समध्ये रहात होतो. मोठमोठी सरोवरे, तीन्ही बाजूनी पसरलेला विस्तीर्ण अटलांटिक महासागर, हॅमलॉक नि पॉईंट प्लीझंट सारखे सुंदर व हिरवेगार पार्क, पर्यटकांनी गजबजलेले बंदर……. सगळ्या गोष्टी कशा मनाला रमविणाऱ्या नि खुलविणाऱ्या होत्या. बीचवर फिरण्याची मजा तर औरच! महासागरातील लाटांचा लपंडाव, नौकाविहार करणारे पर्यटक, महासागरात दूरवर तरंगत जाणारे एखादे जहाज, तेवढ्याच आनंदात समुद्रावर हवेत घिरट्या घालणारे समुद्र पक्षी नि किनाऱ्यावरील रंगीबेरंगी जनसागर …… साऱ्या गमती-जमती पहाण्यात वेळ आनंदात निघून जायचा. त्यामुळे साडेतीन महिने कसे गेले समजलेच नाही. नोव्हास्कोशिया आणि न्यु ब्रुन्सविक प्रांतातील पर्यटन स्थळं पाहून मनाचा विरंगुळा तर झालाच, शिवाय ज्ञानातही भर पडली. मन प्रसन्न व प्रभावित झाले होते.कॅनडाला येताना एका मित्राने सहज सल्ला दिला –

‘कॅनडाला निघालाच आहेस तर नायगारा धबधबा आणि टोरेंटो शहर जरूर पाहून ये.’

पण नेमक्या याच स्थळांना अजून जायचे राहिले होते. ही दोन्ही ठिकाणं ओंटारिओ प्रांतात येतात. हॅलिफॅक्सहून टोरेंटो सुमारे 1264 किलोमीटरवर आणि त्याच्यापुढे सुमारे 130 किलोमीटरवर नायगारा धबधबा. मी कन्येला या स्थळांबाबत सहज म्हणालो नि तिने विमानाचे तिकीट बुक करून टाकले.

अडीच तासाच्या विमान प्रवासानंतर टोरेंटोला येऊन पोहोचलो. प्रथम दर्शनीच शहराची भव्यता, स्वच्छता मनाला भावली. ही कॅनडाची राजकीय राजधानी नसली तरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. टोरेंटो म्हणजे कॅनडाचं वैभवच! इथे पोहोचताच मला प्रकर्षाने आठवण झालीती मुंबईची! अनेक बाबतीत टोरेंटो म्हणजे कॅनडाची मुंबई असेच वाटून गेले. मुंबईची गर्दी इथे दिसणार नाही; परंतु उद्योग, व्यापार आदी बाबतीत या शहराचं मुंबईशी बरच साम्य आहे. इथले सुंदर व भव्य रस्ते, विस्तीर्ण ओंटारिओ सरोवर, टोलेजंग इमारती….. साऱ्या गोष्टी नवख्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. नायगारा म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार, तर टोरेंटोतील शिल्पाकृती… त्यातल्यात्यात सीएन टॉवर म्हणजे मानवाच्या बुद्धिकौशल्याचा साक्षात्कार ! सोन्याच्या अंग़ठीत हिरा शोभून दिसावा, त्याप्रमाणे सीएन टॉवर टोरेंटोच्या वैभवात भर घालणारा एक कृत्रिम हिराच!

कॅनडाचा इतिहास, संस्कृती आणि आधुनिक प्रगतीचे चित्र या शहरात पहावयास मिळाले. उत्तर अमेरिका खंडातील हे चौथ्या क्रमांकाचे व कॅनडातील प्रथम क्रमांकाचे मोठे शहर. ओटावा कॅनडाची राजधानी असली तरी टोरेंटोचे स्थान देशाच्या इतिहासात वेगळेच आहे. टोरेंटो ….ओंटारिओ प्रांताची राजधानी तर आहेच शिवाय कला, संस्कृती आणि प्रगतीचे माहेरघर म्हणून या शहराची ओळख आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी शहराच्या वैभवात भर घातली आहे ती सीएन टॉवरने. मला टोरेंटो शहराचे आकर्षण वाटण्यामागे आनखी एक कारण होते नि ते म्हणजे इथली भारतीयांची लक्षणीय लोकसंख़्या. या शहराच्या जडण-घडणीत भारतीयांचा सिंहाचा वाटा आहे.

शहरातल्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी खासगी यात्री बसची व्यवस्था आहे. आम्ही डबल डेकर यात्री बसमधून शहरातील पर्यटन स्थळे पहायला निघालो. बसच्या वरच्या भागाचा टॉप (छत) खुलाच होता. त्यामुळे शहराचे मुक्त दर्शन घेण्यात कोणतीच अडचण नव्हती. शहरातील महत्वाच्या व उंच इमारतीची माहिती बसमधील गाईड ध्वनिक्षेपकावरून देत होता. महत्वाची पर्यटन स्थळे पहाण्यास प्रवाशाना वेळ देण्यात येत होती.

गगनभेदी इमारती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गाईड त्यांचे महत्व विषद करीत होता. फर्स्ट कॅनेडियन प्लेस (1165 फूट), कॉमर्स कोर्ट वेस्ट (942 फूट), ट्रुंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर (908 फूट), स्कोशिया प्लाझा (902 फूट), टीडी कॅनडा ट्रस्ट टॉवर (862 फूट), टोरेंटो डोमिनियन बॅंक टॉवर (732 फूट) अशा एका पेक्षा एक टोलेजंग व ऐतिहासिक इमारती प्रेक्षकांना आकर्षित करीत होत्या. पण मला ओढ लागली होती ती सीएन टॉवर पहाण्याची !

आमची यात्री बस टॉवरच्या शेजारी थांबली नि आम्ही धावतच गेलो. ती गगनचुंबी इमारत पाहून प्रथम दर्शनीच आश्चर्याचा धक्का बसला. इमारत जमीनीपासून वरपर्यंत भाल्याप्रमाणे निमुळती होत गेलेली! तिचे उंच गेलेले शेवटचे टोक पहातांना डोकीवर टोपी असती तर ती निश्चितपणे खाली पडली असती. 

‘वंऽडरफुल !’

शेजारचा गोरा एकदम उद्गारला. त्याबरोबर त्याच्याकडे माझे लक्ष गेले. माझ्याकडे पाहून तो पुन्हा म्हणाला, 

रियली, वंडरफुल स्कील ऑफ आर्किटेक्चर!’

य्याऽऽ!’ मी प्रतिसाद दिला.

त्याच्या बोलण्यात तथ्य होते. मानवाच्या बुद्धीकौशल्याचा हा एक अद्भुत नमुनाच होता. बाहेरून इतके कुतुहल निर्माण करणारी ही इमारत आतून कशी असेल? टॉवरच्या उंच टप्यावरून शहर व परिसर कसा दिसत असेल ? ….. कल्पनेत रमण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ओढ लागली. तिकिट काढून आम्ही रांगेने आत जाऊ लागलो. आत सोडताना सर्वांची कडक तपासणी करण्यात येत होती. सुरक्षेच्यादृष्टीने ते आवश्यकही होते. आम्ही तळमजल्यावर आलो. त्याची भव्यता नि अंतर्गत रचना नवलाईने पहातच राहीलो. बाहेरून इवलासा वाटणारा तळमजला किती विस्तीर्ण ! अंतर्गत रचना म्हणजे शिल्पकलेचा एक चमत्कार!  गोलाकार वळणे घेत, तळ घरातील विविध व आकर्षक स्टॉल्स पहात आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. इथून वर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था आहे. त्यातून थेट 346 मीटरवर (1135.17 फूट) असलेल्या स्कायपॉडवर आम्ही जाऊन पोहोचलो.

गोलाकार स्कायपॉडवर पर्यटकांची मोठी गर्दी होती. सारेच कुतुहलाने बाहेरचा परिसर पहात होते. मी सहज खाली नजर टाकली, तोच छातीत धस्सऽऽ झाले. तसे घाबरण्याचे कारण नव्हते. स्कायपॉडला सुरक्षित जाळी व काचेचे आवरण आहे. त्यामुळे कुणी खाली पडण्याची शक्यता नाही. गोलाकार स्कायपॉडवरुन सभोवतालचा परिसर पहात एक फेरी पूर्ण केली. शहराचे अनोखे दृश्य मनाला प्रसन्न करीत होते. याच टप्यावर हॉरिझोन रेस्टॉरंट आहे. याच्या खालच्या मजल्यावर ग्लास फ्लोअर (काचेच्या फरशा) व आऊट डोअर स्काय टेरेस बसविण्यात आले आहे. सीएन टॉवरचे हे एक वैशिष्ट्यच मानावे लागेल.

ग्लास फ्लोअर हा एक चमत्कार आहे. स्कायपॉडच्या कांही भागावर फरशी बसवावी त्याप्रमाणे काच बसविलेली आहे. मात्र त्याच्या खाली कशाचाच आधार नाही. या पारदर्शक काचेतून थेट जमीनीवरील इवलीसी घरे व रस्त्यावरून धावणारी वाहने नजरेस पडतात. काच फूटली तर……. कल्पना न केलेलीच बरी ! पण गेली चार दशकं असा कोणताच प्रकार घडलेला नाही. काच आहे तशीच आहे. लोक बेदिक्कतपणे त्यावर नाचतात, बसतात, झोपतात नि कौतुकाने फोटो घेतात. पारदर्शक काचेमुळे त्यावर बसलेले लोक अधांतरी असल्यासारखे वाटायचे. आम्हीही त्याचा अनुभव घेतला. ग्लास फ्लोअर हे सीएन टॉवरमधील एक आश्चर्यच आहे.

टॉवरची एकूण उंची 1,815 फूट (553 मीटर) असली तरी 1,465 फूटावर (447 मीटर) स्कायपॉडचा दुसरा विशेष टप्पा आहे. तेथे जाण्यासाठी वेगळे तिकिट घ्यावे लागते. लिफ्टने आम्ही तिथेही गेलो. जमीनीपासून एवढ्या उंचीवर येण्याची आमची ही पहिलीच वेळ होती. महत्प्रयासानंतर 8,848 मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर गाठल्यानंतर शेरपा तेनसिंगला झाला नसेल इतका आनंद आम्हाला झाला. खाली चौफेर नजर टाकली, तोच मनात धस्सऽऽ  झालं. सौभाग्यवतीना तर चक्करच आली. पण सुरक्षा काचेमुळे खाली पडण्याची भिती नव्हती. तसा तिला धीर दिला नि तिच्या मनातली भिती घालविली. सभोवार टोरेंटो शहराच एक अनोख दृश्य पहायला मिळालं. जमीनीवरून दिसणाऱ्या टोलेजंग इमारती टॉवरवरून इवल्याशा वाटत होत्या. रस्त्यावरून धावणाऱ्या कारगाड्या खेळण्यातल्या गाड्या प्रमाणे दिसायच्या. बाजूलाच असलेले विस्तिर्ण ओंटारिओ सरोवर, सरोवराच्या मध्यभागी एक लहानसे सुंदर बेट होते, पाचूच्या बेटासारखे सुंदर नि तितकेच मोहक…. सारेच कसे मनाला वेड लावणारे !

बाकीच्या तीन दिशांना पसरलेली शहराची व्याप्ती तितकीच मनोवेधक! टॉवरवरून नायगारा धबधब्याच विलोभनीय दृश्य नजरेस पडतं. परंतु ढगाळ वातावरणामुळे आम्हाला त्याचा आनंद लुटता आला नाही. त्यामुळे मन कांहीसं खट्टू बनलं.टॉवरच्या सभोती फिरून नयनरम्य दृश्य न्याहळण्यात बराच वेळ निघून गेला. मध्येच पावसाची रिमझिम  आली नि आकाशातला काळा पडदा बाजूल हटला. एव्हाना सूर्य पश्चिमेला झुकला होता. मावळतीला सोनेरी किनार आली, आकाशाच्या अंगणात संध्येने सोनेरी सडा घालावा तशी! सुर्याचे रसरसशीत लाल बिंब शहरापलिकडच्या डोंगरावरील गर्द वृक्षराजीला जणु प्रेभराने अलिंगण देत होते. शेजारच्या सरोवरातील आरशात न्याहाळून संध्या आपली शृंगार साधना करू लागली. स्वच्छ पाण्यातील सूर्याचे स्पष्ट प्रतिबिंब  संथ लाटांबरोबर हिंदोळ्या घेताना रमणीय वाटायचे. या विलोभनीय दृश्यावरून नजर हटत नव्हती. एवढ्यात सुर्य ढगाआड लपला नि पूराच्या पाण्यासारखा काळोखही दाटू लागला. क्षितीजाची कडा काळ्या रंगाने साखळली. निसर्गाचे मनोवेधक दृश्य कुठल्याकुठे अदृश्य झाले. त्याबरोबर सभोवतालच्या निसर्ग सौंदर्यावर खिळून राहीलेली नजर बाजूला हटली.

आता माघारी परतण्याच्याच तयारीत होतो, तोच स्कायपॉडच्या खाली सहज नजर गेली नि एक थरारक दृश्य पाहून मनाचा थरकाप झाला. टॉवरच्या एका अरुंद काठावरून कांही लोक बेद्दिकत फिरतांना दिसले नि छातीत धस्सऽऽ झालं. टॉवरच्या खाली सहज नजर गेली तरी कमकुवत मनाचा माणूस बेशुध्द होऊन पडेल, इथे तर हे लोक टॉवर भोवती असलेल्या इवल्याशा काठावरून फिरत होते. एखाद्याचा तोल जाऊन खाली पडलाच तर…. प्रथम दर्शनी हे एक अविचारी साहस असल्याची भावना झाली. पण यात धोका असता तर आयोजकांनी तो स्वीकारलाच नसता असाही विचार येऊन गेला.

ते खरेच होते. हा एक ‘एज्य वाकींग’चा प्रकार आहे. त्यात सुरक्षेच्या उपाययोजना असल्या तरी येरागबाळ्याचे हे काम  नव्हे’ हेच खरे! साहस दाखऊ इच्छिणाऱ्या धाडशी प्रवाशांसाठी दीड फूट रुंद काठावरून टॉवरच्या सभोती मुक्तपणे फिरण्याचा (एज्य वाक) हा एक अनोखा कार्यक्रम! 365 मीटर (1197.50 फूट) उंचीवरचा हा प्रयोग धोक्याचा नसला तरी तेवढाच धाडशी आहे. एवढ्या उंचावरून खाली पाहिले तरी चक्कर येईल, मग चालत जाणे तर बाजूलाच. अर्थात या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या लोकांच्या कमरेला सुरक्षा दोरीने बांधलेले असते. त्यामुळे खाली पडण्याचा धोका नसला तरी मनाची तयारी मोठी असावी लागते. हा प्रयोग पाहूनच आम्ही गर्भगळीत झालो, मग भाग घेणे बाजूलाच !

टॉवरच्या 351 मीटर उंचीवर रेस्टॉरंट आहे. येथे भोजनाचा अस्वाद घेणाऱ्या प्रवाशानां सभोवतालच्या भव्य व सुंदर शहराचे दर्शन घेत एक आगळी मौज लुटता येते. सुमारे दीड तास आम्ही या साऱ्या गोष्टींचा आनंद लुटला नि शेवटी लिफ्टमधूनच तळमजल्यावर आलो. तिथे टॉवर संबंधी पडद्यावर एक माहितीपट दाखविण्यात येत होता. त्यातून टॉवरची बरीच माहिती मिळाली.

1973 मध्ये टॉवरच्या बांधकामाला सुरवात झाली. 1975 मध्ये तो बांधून पूर्ण झाला. यासाठी सुमारे 40 महिन्याचा कालावधी लागला. 1,537 कामगार इमारतीच्या पूर्णत्वासाठी रात्रंदिवस कष्ट घेत होते, झटत होते. 1976 पासून तो लोकांसाठी खुला झाला. 1975 मध्ये जगातील सर्वात उंच इमारत म्हणून गिनिज पुस्तकातही त्याची नोंद झाली. (अर्थात पुढील काळात कांही टॉवरनी ही उंची मागे टाकली आहे.) ‘अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हील इंजनिअर्स’ संस्थेने 1995 मध्ये अधुनिक जगातील सातवे आश्चर्य म्हणून सीएन टॉवरला जाहीर केले.

कॅनडातील 16 दूरदर्शन, एफएम आकाशवाणी आदी संपर्क माध्यमांचे हे प्रमुख केंद्र आहे. टोरेंटोला जाऊन शिल्पकला क्षेत्रातील हे आश्चर्य न पहाता येणं म्हणजे अरसिकताच ठरेल. शहराच्या कोणत्याही भागातून हा टॉवर स्पष्टपणे दिसतो. कॅनडावासियांना जसा या वास्तूचा अभिमान आहे, तेसेच ते त्यांचे प्रेरणास्थानही आहे. टॉवरमधून आम्ही बाहेर आलो नि कांही तरी वेगळं पाहिल्याचा मनाला आनंद झाला.  शिल्पकलेचा एक विलक्षण नमुना नि तिथला अनोखा अनुभव मनात कायमचा घर करून राहीला आहे.

— मनोहर (बी. बी. देसाई)

 

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 6 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..