नवीन लेखन...

बिहारमध्ये राजकारण्यांची सत्त्वपरीक्षा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून रणमैदान गाजायला लागले आहे. लालू यादव-रामविलास पासवान यांची आघाडी, नितीशकुमार-भाजपची युती आणि काँग्रेस या तीन मुख्य स्पर्धकांमुळे बिहारचे निवडणूक समर गाजणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार रूप पालटत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे.

अखेर एकदाची बिहारमधील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुका तिरंगी होणार आहेतच पण, या त्तिकोणातील प्रत्येक पक्ष आणि आघाडी आपल्या परीने एका निर्णायक अवस्थेत असून जणू सत्त्वपरीक्षा देत आहे. लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांनी या राज्याच्या सामाजिक जीवनाची रबडी करून टाकली होती. त्यामुळे बिहारची प्रतिमा डागाळली होती. लालूप्रणित जंगलराज संपवणे अगत्याचे आहे असे मागील निवडणुकीत जनतेला वाटले आणि एका विशिष्ट अवस्थेत जनता दल (अ) आणि भाजपा यांच्या आघाडीच्या हाती बिहारची सत्ता आली. भाजपाप्रणित आघाडी मोडीत निघत आहे असे चित्र निर्माण होत असतानाच बिहारमध्ये मात्र ती सत्तेवर आली आहे. या आघाडीने बिहारमधले लालूराज संपवण्याचे वचन जनतेला दिले होते. ते बर्‍याच अंशी पाळले आणि लालूंच्या राज्यात मोकाट सुटलेल्या अनेक राजकीय गुंडांना जेलची हवा खायला लावली. त्यामुळे नितीशकुमार यांची राज्यात चांगली प्रतिमा निर्माण झाली. बिहारचे राजकारण कितीही जातीय असले तरीही नितीशकुमार यांच्या नावाला राज्यातील विविध जाती- गटांमध्ये चांगले स्थान मिळाले आहे. असे असले तरीही त्यांच्या सुराज्य निर्मितीच्या दाव्याला सणसणीत चपराक लगावणारी घटना नुकतीच घडली. माओवाद्यांनी चार पोलिसांना पळवून नेले आणि त्यातील एकाची हत्या करून तिघांना सोडून दिले. निवडणुकीच्या तोंडावरच ही घटना घडल्यामुळे नितीशकुमार अडचणीत येऊ शकतात. न आले तरी लालूप्रसाद यादव त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. बिहारमध्ये माओवाद्यांनी अशी गडबड करणे ही नाही तरी सरकारची नाचक्की आहे. कारण बिहार हे काही नक्षलग्रस्त राज्य नाही. पूर्वी ते तसे होते पण राज्याचे विभाजन झाले आणि आदिवासीबहुल झारखंड नक्षलवादासह वेगळा झाला. राज्याचे विभाजन झाल्यापासून म्हणजे 2003 पासून तेथील नक्षलवाद्यचा उपद्रव कमी झाला होता. पण, नेमका तो आताच वाढला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्याने डोके वर काढले.

केवळ डोकेच वर काढले आहे असे नाही तर नक्षलवाद्यांनी चक्क चार पोलिसांना पळवून नेऊन ओलीस ठेवले. चिता वाटावी अशीच ही बाब. ही नितीशकुमार यांची खरी परीक्षा आहे. केवळ नितीशकुमार यांचीच नव्हे तर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचीही ही परीक्षा आहे. कारण या आघाडीचा आत्मविश्वास बराचसा डळमळीत झाला आहे. मध्यंतरीच्या काळात आघाडीला बरेच धक्के बसत गेले. त्यामुळे ती अस्तित्वात राहते की नाही, असे प्रश्न निर्माण झाले. पंजाबमध्ये या आघाडीच्या हाती सत्ता आहे आणि कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल ही राज्ये भाजपाच्या ताब्यात आहेत. मात्र, आघाडीचा प्रयोग यशस्वी होतो की नाही, अशी शंका उपस्थित करणारे वातावरण निर्माण झाले. बिहारची निवडणूक जिंकली तर या आघाडीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. एकंदरीत, या आघाडीसमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे. 2006 मध्ये या आघाडीच्या हाती निसटत्या बहुमतानेच सत्ता आली. 243 सदस्यांच्या सभागृहात या आघाडीला 122 सदस्यांची गरज असताना 112 जागा मिळाल्या होत्या. मात्र, दहा आमदारांचा पाठींबा मिळवून नितीशकुमार यांनी बहुमत सिद्ध केले आणि पाच वर्षे सत्ता टिकवली.

आता त्यांच्यासमोर लालूप्रसाद यादव यांचेच खरे आव्हान आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राजदने गेल्या निवडणुकीत 58 जागा मिळवल्या होत्या. हे संख्याबळ अगदीच दुलर्क्षित करण्यासारखे नाही. परंतु, ते त्यांनी काँग्रेसशी आघाडी करून मिळवले होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस आणि लालूप्रसाद यांचा काडीमोड झाला आणि लालूप्रसादांची खरी ताकद यापेक्षाही कमी आहे असे दिसून आले. त्यामुळे आता लालूप्रसाद यादव किती प्रभाव पाडतील याच्या केवळ अटकळी बांधण्याशिवाय आपल्या हाती काही नाही. मात्र, आपण स्वत:च्या ताकदीवर फार मोठी मजल मारू शकणार नाही, असे खुद्द लालूप्रसाद यादव यांनाच वाटत असावे. म्हणून त्यांनी एरवी ज्यांच्याशी सतत वैर घेतले त्या रामविलास पासवान यांच्याशी युती केलेली आहे. 2006 मध्ये बिहारमधले लालूराज संपले आणि लालू-राबडी दांपत्याला सत्ता सोडावी लागली. त्याला बर्‍याच अंशी पासवान कारणीभूत ठरले होते. ते पासवान आता लालूप्रसाद यांच्याशी हातमिळवणी करत आहेत आणि बिहारमधली सत्ता आपल्या हाती येईल असा विश्वास बाळगून आहेत.

रामविलास पासवान यांनी 2006 च्या निवडणुकीत डाव्या आघाडीशी युती करून 26 जागा पटकावल्या होत्या. आता मात्र डाव्या आघाडीपासून फटकून राहून त्यांनी लालूंशी सोबत करायचे ठरवले आहे. या आघाडीचे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून लालूप्रसाद यादव यांचे नाव जाहीर झाले असून उपमुख्यमंत्री म्हणून पासवान यांच्या बंधूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. स्वत: पासवान उपमुख्यमंत्री व्हायला तयार नाहीत. कारण त्यांची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा अजून निमालेली नाही. राज्यातील जातीचे गणित या आघाडीला कितपत अनुकूल ठरते हे आता निवडणुकीतच कळणार आहे.

दोन प्रमुख पक्षांच्या साठमारीत कॉंग्रेसची मात्र वेगळी धडपड चालली आहे. काँग्रेसला 2014 मध्ये केंद्रात स्वबळावर सत्ता मिळवायची आहे. मात्र, केंद्रातील हे ‘सेंटपरसेंट काँग्रेसचे स्वप्न बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातील स्थितीवर अवलंबून आहे. म्हणूनच काँग्रेस बिहारमध्ये लालूंची साथ सोडून स्वबळावर नशीब आजमावत आहे. खरे म्हणजे बिहारमधली काँग्रेस मृतप्राय झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशाच मृतप्राय झालेल्या काँग्रेसला थोडे बळ देण्यात राहुल गांधी यांना यश आले आहे. बिहारमध्ये त्यांना कितपत यश मिळते हे तेथील मतपेढ्यांच्या राजकारणावर अवलंबून आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावतीने ब्राम्हण समाजाला आकृष्ट केले. त्यामुळे हा मतदार भाजपापासून दूर गेला. नंतर तो काँग्रेसकडे सरकला. तेथील सामाजिक वातावरणात झालेल्या एका बदलामुळे काँग्रेसच्या लोकसभेतील जागा 10 वरून 20 वर गेल्या. तसाच विजय बिहारमध्ये मिळू शकतो का, याची चाचपणी राहुल गांधी करत आहेत. मात्र, अजून तरी भाजपाची बण-राजपूत ही उच्चवर्णीय मतपेढी भाजपाच्या मागेच उभी आहे. तेव्हा काँग्रेसला बिहारमध्ये नेमके कसे स्थान मिळणार हे आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळे मुख्य लढत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि लालूप्रसाद यादव यांच्या आघाडीमध्ये होईल असा अंदाज आहे.

बिहारमधील निवडणूक म्हटली की, ती अनेक प्रकारे गाजणार हे साहजिकच आहे. नितीशकुमार आणि भाजपाची युती सत्तेवर येण्यास पासवान आणि लालूप्रसाद यादव यांचे वेगवेगळे लढणे कारणीभूत ठरले होते. या दोन नेत्यांच्या उमेदवारांमध्ये झालेली फाटाफूट नितीशकुमार यांच्या विजयाला कारणीभूत ठरली होती. यावेळी असे होणार नाही. लालू आणि पासवान एकत्र झाल्याने या आघाडीची ताकद वाढली आहे. दुसरीकडे भाजपा आणि नितीशकुमार यांच्यातील शीतयुद्धही मतदारांपर्यंत व्यवस्थित पोहोचले आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदींच्या बिहारमधील सभेच्या निमित्ताने नितीशकुमार यांनी व्यक्त केलेली नाराजी अवघ्या देशात चर्चेचा विषय ठरली. ही नाराजी या निवडणुकीत भोवू शकते. साहजिकच भाजपला नितीशकुमार यांना सांभाळून घेत राजकारण करावे लागणार आहे. निवडणुकीला दीड महिना बाकी असताना एकूण राजकारण कोणत्या दिशेने वळण घेते हे आता पहायचे.

— अरविंद जोशी
(अद्वैत फीचर्स)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..