नवीन लेखन...

भिकारी (कथा)

(लेखक अन्तोन चेखॉव्ह यांच्या The Begger या कथेचे मुक्त रूपांतर)

“दया करा मालक, गरीब, भुकेल्या माणसावर दया करा. तीन दिवस झाले पोटात काही गेलं नाही मालक, कुठं धर्मशाळेत झोपायला जायचं म्हटलं तरी लागणारा रुपाया माझ्याजवळ नाही. देवाशप्पथ मालक, मी चांगल्या घरचा माणूस आहे हो. पाच वर्षं शाळामास्तर होतो एका खेड्यात. पण माझ्या वाईटावर असलेल्या लोकांनी संगनमत करून मला काढून टाकलं शाळेतनं. खोटी साक्ष दिली माझ्या विरुध्द हो त्यांनी आणि माझी नोकरी गेली बघा. आख्खं वर्ष झालं मी बेकार आहे. मालक, दया करा.”

लाकूडवखारवाल्या साखरपेकरानी घरात प्रवेश करत असताना मागं वळून बघितलं. अंगावरच्या कपड्यांची लक्तरं झालेला, दारुच्या नशेत असल्यासारख्या डोळ्यांचा आणि दाढीच्या वाढलेल्या खुंटांमधून करपलेले गाल दिसत असलेला माणूस फाटकाबाहेर उभा राहून हात पुढं करून बोलत होता. साखरपेकराना त्या भिकाऱ्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं.

“आता मला नोकरी सांगून आलीय बघा मालक साताऱ्यात. पण तिकिटाला पैसे नाहीत माझ्याजवळ,” भिकाऱ्यानं पुन्हा विनवलं, “शरम वाटतेय हो मागायला, पण इलाजच नाही दुसरा मालक.”

साखरपेकरानी त्याला आपादमस्तक न्याहाळलं. एका पायात वहाण तर दुसऱ्यात फाटका बूट, तुमानीचा एक पाय अर्ध्या चड्डीसारखा फाटलेला तर दुसरा पोटरीपर्यंत येणारा, कळकट दिसणारा माणूस बघून त्याना एकदम आठवलं कुठं बघितलं होतं त्याला आधी ते.

“काय रे, कालच मला भेटला होतास ना अंबाबाईच्या देवळाजवळ?,” ते म्हणाले. “आणि तेव्हा शाळामास्तर असल्याचं नव्हता बोललास, शाळेतनं काढून टाकलेला विद्यार्थी आहे असं म्हणाला होतास. होय ना?”

“नाही, नाही मालक. खरं नाही ते,” चपापलेला तो भिकारी सांगायला लागला, “मी खरंच शिक्षक आहे. हवं तर मी तशी कागदपत्रं दाखवतो तुम्हाला पुरावा म्हणून.”

“बस्स बस्स ! खोटारडा आहेस तू. नक्की तूच होतास तो, शाळेतनं काढून टाकलेला मुलगा आहे असं काल मला सांगणारा. बोल, खरंय की नाही?,” साखरपेकर म्हणाले, “छे: ! लाज कशी नाही वाटत तुला लोकाना असं फसवायला? थांब, पोलिसात तक्रारच देतो तुझ्याविरुध्द. गरीब, भुकेलेला असलास म्हणून काय झालं? अशी निर्लज्ज फसवाफसवी?” साखरपेकरांनी एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि आत जायला वळले.

भिकाऱ्यानं फाटकाच्या खांबावर हात ठेवला आणि एखाद्या घाबरलेल्या सश्यानं बघावं तशी नजर लावत म्हणाला, “नाही मालक, मी खोटं नाही सांगत. माझ्याकडं कागद आहेत हो.”

“कोण विश्वास ठेवील तुझ्यावर? गावकऱ्यांनी कीव करावी म्हणून मास्तर काय, विद्यार्थी काय, काही वाट्टेल ते बनशील. महा लबाड, फसवा आहेस. शी !” भिकाऱ्याची लबाडी साखरपेकरांना जिवापाड प्रिय असलेल्या तत्वांच्या विरुध्द होती. दयाळू, गोरगरिबांना मदत करण्यात हात आखडता न घेणाऱ्या, कनवाळू साखरपेकरांच्या कोमल हृदयाला त्या भिकाऱ्याच्या फसवेगिरीमुळं यातना होणं साहजिकच होतं.

भिकाऱ्यानं जरा वेळ आणाशपथा घेत आपण खरं बोलत असल्याचं पटवून द्यायचा प्रयत्न केला आणि अखेर मान खाली घालून म्हणाला, “खरं आहे तुमचं मालक. मी शाळामास्तर नाही नि विद्यार्थीही नाही. खोटं होतं ते. मी एक बेवारशी गायक आहे. आमचा गाणाऱ्यांचा एक कंपू होता. मी गायचो त्यात. पण मग दारूचं व्यसन लागल आणि मग सगळ्यांनी मला बेवडा, बेवडा म्हणत कंपूतून हाकलून लावलं. भीक मागण्यावाचून काही दुसरा मार्गच उरला नाही मला मालक. खरं सांगून कुणी विश्वास ठेवत नव्हतं माझ्यावर. तेव्हा मग खोटं बोलायची सवय लागली. आता खोटं बोलल्याशिवाय राहवतच नाही मला. खरं बोलून उपाशी रहायचं, डोक्यावर छप्पर नाही, झोपायला जागा नाही असं जिणं जगायचं! त्यापेक्षा खोटं बोलून लोकांच्या सहानुभूतीतून जुजबी का होईना, प्राप्ती होते तिच्यावर जगायची सवय लावून घेतली. तुम्ही म्हणता ते खरं आहे मालक, पण काय करू?”

“काय करू म्हणून मलाच विचारतोस?” साखरपेकर जवळजवळ किंचाळलेच, “काम कर. मूर्ख माणसा, काम कर आणि त्यातून कमाई कर.”

“ठाऊक आहे मला ते मालक. काम केल्यावर कमाई होते. पण …. मला काम कुठं मिळणार हो?”

“दीड शहाण्या, म्हातारा झाला नाहीस अजून, चांगला धट्टाकट्टा आहेस, तरुण आहेस. शोधलंस तर काम मिळेलच तुला कुठंतरी. पण नाही! तू आळशी आहेस, दारुड्या आहेस, हातभट्टीच्या घाणेरड्या दारूचा वास मारतोय तुला, आणि तरीही तुला कसली नोकरी हवी असणार ते कळतंय मला. जिथं काम नसेल आणि पगार जास्त मिळेल अशीच नोकरी हवी असणार तुझ्यासारख्या खोटारड्या, लुच्च्या लफंग्याला. दुसरं काय ! मेहनतीचं काम करणं कसं पत्करशील, नाही का?”

कसनुसं हसून भिकारी म्हणाला, “काय बोलताय मालक? मला कामं कुठली मिळायला. उशीर झालाय त्याला. दुकानात काम बघावं तर त्यासाठी व्यापाराची कला लहानपणापासून यायला पाहिजे असते. कुठल्या कारखान्यातही काम मिळणार नाही कारण त्यासाठी लागणारं असं कुठलंही कौशल्य माझ्यात नाही. मग तुम्हीच सांगा मी काय करू?”

“बकवास ! काही ना काहीतरी सबब सांगतोयस. लाकडं तोडू शकशील की.”

“माझी ना नाही पण तुम्हालाही ठाऊक आहेच की मालक, आजकाल सगळे पट्टीचे लाकूडतोडे बेकार बसले आहेत ते.”

“हं ! तुझ्यासारखे कुचकामी लोक असंच बोलणार. माझ्या लाकूड वखारीत लागतील ती लाकडं फोडशील? मी देतो ते काम तुला.”

“हो मालक, मी तयार आहे त्याला.” भिकाऱ्यानं नाईलाजानं उत्तर दिलं.

“ठीक तर मग. चल, दिलं तुला ते काम.” साखरपेकरानी घाईघाईने घरातून त्यांच्या स्वैपाकिणीला हाक मारली, “पार्वतीबाई”. लुगड्याला  हात पुसत वयस्कर पण भक्कम अशा पार्वतीबाई बाहेर आल्या. साखरपेकरानी त्याना सांगितलं, “पार्वतीबाई, याला आपल्या वखारीत घेऊन जा आणि जळणासाठी म्हणून आणलेले लाकडाचे ओंडके फोडून ठेवायचं काम द्या.”

भिकाऱ्यानं खांदे उडवले आणि अनिच्छेनंच पण नाईलाजानं पार्वतीबाईंबरोबर घराच्या मागे असलेल्या वखारीकडं जायला निघाला. भुकेलेला होता आणि पैसे मिळवायचे या उद्देशानं नव्हे, तर मालकाच्या बोलण्याला बळी पडलो याचं वैषम्य वाटलं म्हणून. खरं तर सकाळी सकाळीच प्यालेल्या बेवड्याचा अजून परिणाम होता त्यामुळं काम करायची तसदी घ्यायला त्याचं शरीर तयार नव्हतं. पण नाईलाज होता.

साखरपेकर घरात गेले आणि जेवणाच्या खोलीतून दिसत असलेल्या वखारीकडे त्यांनी नजर टाकली. खिडकीजवळ उभे राहून ते वखारीत काय घडतंय याच्याकडे पाहू लागले. पार्वतीबाई आणि तो भिकारी दोघेजण घराशेजारच्या वाटेने वखारीकडे आले. पार्वतीबाईनी भिकाऱ्याला एकवार आपादमस्तक बघून घेतलं तणतणत वखारीचं दार उघडलं.

तो ना शाळामास्तर ना शाळेतला विद्यार्थी असलेला ‘गायक’ भिकारी एका मोठ्या ओंडक्यावर बसला हाताच्या दोन्ही तळव्यांत गाल धरून. पार्वतीबाईनी वखारीतून आणून एक कुऱ्हाड त्याच्या पायाशी टाकली आणि बहुतेक त्याला शिव्या देत उभी राहिली. साखरपेकराना काय ते ऐकू येत नव्हतं.  “कजाग आहे बाई,” साखरपेकर पुटपुटले.

भिकाऱ्यानं नाखुशीनंच एक ओंडका जवळ ओढला, आपल्या दोन पायात धरला आणि कुऱ्हाड उगारली. ओंडका सटकला आणि आडवा झाला. भिकाऱ्यानं पुन्हा एकदा ओंडका जवळ ओढला आणि त्याच्यावर सावधपणे पण हलकेच कुऱ्हाड मारायचा प्रयत्न केला. कुऱ्हाडीनं एक ढलपा देखील निघाला नाही ओंडक्याचा आणि ओंडका परत आडवा पडला.

एव्हाना साखरपेकराना त्याच्यावर दया यायला लागली. दारू पिऊन आणि कदाचित विड्या फुंकून छाती पार पोकळ झालेल्या, ताकत नसलेल्या, कदाचित आजारीही असलेल्या माणसाला आपण हे मेहनतीचं काम करायला लावल्याबद्दल आता त्यांच त्यांनाच अपराधी  वाटायला लागलं. पण त्यातूनही त्यांच्या मनात आलं, “करू दे हे काम त्याला. त्याच्या भल्यासाठीच तर आपण ते  करायला लावतो आहोत.” खिडकीपासून बाजूला होऊन ते आपल्या कामाच्या खोलीत येऊन बसले.

तासाभरानं पार्वतीबाईनी येऊन भिकाऱ्यानं दिलेली सगळी लाकडं फोडल्याचं सांगितलं.

“अरे वा ! ठीक तर मग हे दोन रुपये द्या त्याला आणि म्हणावं, हे काम पसंत असेल तर दर आठवड्याला येऊन करत जा. पैसे मिळतील म्हणावं.”

तेव्हापासून दर आठवड्याला सोमवारी तो भिकारी वखारीत येऊन लाकडं फोडून द्यायला लागला. ते काम नसेल तर वखार आणि परिसर झाडून काढायचा. साखरपेकर त्याही कामाचे त्याला पैसे द्यायचे. एकदा त्याला आपली एक जुनी विजारही दिली त्यांनी.

असेच दिवस गेले आणि साखरपेकरानी राहतं घर बदललं. वखार आहे त्या जागेतच ठेवली पण राजारामपुरीतल्या पाचव्या गल्लीच्या कोपऱ्यावरून ते तेराव्या गल्लीत मोठ्या घरात रहायला गेले. तेव्हा घरसामान, फर्निचर वगैरे गाडीत भरून द्यायचं काम त्यांनी त्या भिकाऱ्याला संगितलं. तेव्हाही अगदी एकाददुसरी खुर्ची आणून गाडीत ठेवण्यापलीकडं त्यानं काही काम केलं नाही. त्या दिवशी तो सबंध वेळ मरगळलेलाच होता. नुसताच गाडीच्या अवतीभवती येरझाऱ्या घालत जणू काही काम करतो आहोत असं भासवत होता. सगळं सामान नव्या घरात पोचवल्यानंतर साखरपेकरानी त्याला बोलावलं आणि म्हणाले, “ हे घे तुझ्या आजच्या कामासाठीचे पैसे, तीन रुपये.  मी त्या दिवशी तुला कामं करायला लाग म्हणून सांगितलं त्याचा चांगला परिणाम झालेला दिसतोय. दारू पिणंही कमी झालंय तुझं. काय नाव काय म्हणालास तुझं?”

“लक्ष्मण, मालक.”

“ठीक आहे लक्ष्मण. लिहायला वाचायला शिकलायस का”

“हो मालक.”

“ठीक आहे, मग तुला मी दुसऱ्या चांगल्या कामाला लावतो. लाकडं फोडायचं मेहनत मजुरीचं काम नसेल ते. शाहूपुरी व्यापारी पेठेत माझे एक मित्र आहेत अडत दुकानदार, मी चिठ्ठी देतो ती घेऊन उद्या तू त्यांच्या दुकानात जा. दुकानात गुळाच्या आवक-जावकेच्या नोंदी करायचं काम देतील तुला. पगारही चांगला देतील. नीट मन लावून काम कर. आणि हो, दारू पिणं अजिबात सोडून दे. ऐकलंस का?”

“हो मालक. मेहरबानी मालक.”

साखरपेकरानी मित्राच्या नावे चिठ्ठी लिहिली. मनातल्या मनात धन्य वाटलं त्याना. आपण एका गरीब पण चुकार माणसाला चांगल्या मार्गाला लावलं याचं समाधान झालं. त्या समाधानात चिठ्ठी देताना त्यांनी लक्ष्मणच्या खांद्यावर थोपटलंही आणि त्याला निरोप दिला.

लक्ष्मणनं चिठ्ठी घेतली आणि पुन्हा एकदा “तुमची मेहरबानी मालक” म्हणून निघून गेला. त्या दिवसापासून नंतर तो कधी वखारीकडं फिरकला नाही.

दोन वर्षं उलटली.

साखरपेकर त्या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीपाशी असलेल्या रांगेत उभे होते तिकिटासाठी. लोकांनी डोक्यावर घेतलेलं नाटक होतं, सुवर्णमहोत्सवी प्रयोग होता त्या दिवशी. तिकिटासाठी दोन खिडक्या उघडलेल्या होत्या. अर्थातच दोन्हीकडे रांगा मोठ्या होत्या. एका खिडकीमधून साखरपेकरानी तिकीट घेतलं, पैसे दिले आणि रांगेतून बाहेर पडले. अचानक दुसऱ्या खिडकीसमोरच्या रांगेकडं त्यांचं लक्ष गेलं. चामड्याचं जाकीट आणि बकरी टोपी घातलेल्या एका माणसानं तिकीट घेतलं आणि तोही मागं फिरला.

“लक्ष्मण ! लक्ष्मणच ना तू?,” साखरपेकरानी त्यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या लाकूडफोड्याला ओळखलं आणि विचारलं. “कसं चाललंय तुझं ? बरं आहे ना?”

“चांगलं चाललंय. आता मी वकिलाकडं काम करतो. सातपुते वकील. अशीलांचे दस्तऐवज लिहून देतो. महिना शंभर रुपये मिळतात.”

“छान छान ! देवाची कृपा. मला खूप बरं वाटलं हे ऐकून, लक्ष्मण. अरे, तू माझ्या मुलासारखाच आहेस. म्हणून मी तुला सन्मार्गाला लावलं. तेव्हा तुझ्यावर रागावलो मी, आठवतंय? धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटलं असेल तुला त्या वेळी. पण आज? माझं ऐकलंस तेव्हा म्हणून आजचा हा दिवस दिसतोय तुला. आभार मानायला हवेस तू.”

“आभारी आहे मी तुमचा, मालक,” लक्ष्मण म्हणाला. “त्या दिवशी तुम्ही भेटला नसतात तर आज कदाचित अजूनही मी स्वत:ला शाळामास्तर नाहीतर विद्यार्थी म्हणवत भीक मागत फिरत असतो. तुमच्याकडे आलो म्हणून वाचलो मी.”

“ठीक ठीक. मला आनंद आहे त्यात.” साखरपेकर म्हणाले.

“एक आहे मालक, त्या दिवशी तुम्ही मला जे बोललात, जो उपदेश दिलात तो लाख मोलाचा होता. आभारी आहेच मी तुमचा…. आणि तुमच्या स्वयपाकीण बाई…… पार्वतीबाईचा. देव तिचं भलं करो. फार मोठ्या मनाची बाई. तुमचे उपकार झालेत माझ्यावर, पण मला खरं वाचवलं असेल कुणी तर पार्वतीबाईनी !”

“पार्वतीबाईनी? ते कसं काय?”

“त्याचं असं झालं, तुमच्या वखारीत यायचा न मी, ओंडके फोडायला, तेव्हा माझ्याकड बघून पार्वतीबाई करवादायची, “आरं बेवड्या, मेल्या, कशाला जग्तुयास? मुडदा बशिवला तुजा भाड्या ! त्यो यम बी न्हेत नाई तुला, मुर्दाडा !” आणि कपाळावर हात धरून माझ्याकडं बघत बसायची माझी कीव करत.  म्हणायची, “कसा कमनशिबी हाईस रं पिंडक्या. चांगलं ख्यायाला न्हाई का अंगाव घालायाला न्हाई. दळभद्र्या, पाप्याचं पितर झालाईस. तू काय लाकडं फोडणार? उज्जेड !” आसवं भरायची तिच्या डोळ्यात माझ्याकडं बघत असंच काय काय बोलताना. मग, मालक, ती उठायची आणि स्वत:च लाकडं फोडायची सगळी. आजवर, मालक खरं सांगतो मी, विश्वास ठेवा, इतक्या दिवसात एक सुध्दा ओंडका मी नाही फोडला. सगळे तिनंच फोडले. फोडून झाल्यावर घरातून भाजी भाकरी आणून मला खायला लावायची. आणि वर तुम्ही दिलेले पैसे माझ्या हातावर ठेऊन म्हणायची, “जा आता नीट. याद राख, प्यायचं न्हाई. पिलास तर मला कळंलच पुन्यांदा यीशील तवा. मग ही कुऱ्हाडच घालीन बग तुझ्या टक्कुऱ्यात.” तिची ही आईसारखी माया, खोल मनातून केलेला, काळजीपोटीचा, रांगड्या पण प्रेमाच्या भाषेत केलेला उपदेश ऐकूनच मला उपरती झाली असणार. काय बाई ! काय बाई !! माझ्या आत्म्यालाच हात घातला तिनं ! मग मी मनात ठाम ठरवलं इथून पुढं दारूला हातही लावायचा नाही. आणि…. शेवटच्या दिवशी तुम्ही जायला सांगितलंत ना मालक, तेव्हा आधी मी पार्वतीबाईला भेटलो. पाया पडलो तिच्या. तर माझ्या तोंडावरून हात फिरवून तिनं ‘अला बला’ केली आणि म्हणाली, “जा लेकरा. सम्बाळून ऱ्हा !” कधी विसरणार नाही मी तिला मालक.”

दुसरी घंटा झाली आणि लक्ष्मण निरोप घेऊन नाट्यगृहाच्या प्रवेशदारातून आत गेला. साखरपेकराना भानावर यायला क्षण दोन क्षण जायला लागले. मग तेही आत गेले.

***

(रंग भरण्यासाठी शेवटच्या संभाषणात मी खूपच स्वातंत्र्य घेतले आहे. मात्र संभाषणाच्या ‘आत्म्याला हात लावला नाही’. तो चेकोव्हला अपेक्षित होता तसाच ठेवला आहे.  अर्थात तरीही म्हणतो, “कॉम्रेड चेकॉव्ह, कृपा करून कुठं असाल तिथून क्षमा करा याबद्दल.”)

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

12 Comments on भिकारी (कथा)

  1. कथा खूप छान आहे. संदेश पण छान आहे. अनुवादित वाटत नाही.

  2. अप्रतिम. ही कथा वाचल्यानंतर चेखोव ची मूळ कथा वाचाविशी वाटली.एरवी रशियन कथांचे मराठी अनुवाद रुक्ष वाटतात. परंतु ओल्गा, लुष्कोव ऐवजी पार्वतीबाई, लक्ष्मण अशी नावे आणि आपल्या शाहूपुरी, राजारामपुरी चा मनोवेधक झाला आहे. पुन्हा पुन्हा वाचन केले.

  3. कथा वाचली, खूपच छान वाटली,वर्णनीय आहे.वेगळा विषय आणि वास्तविकतेची सुंदर कल्पना छानपणे रेखाटली आहे.

  4. फारच उत्कंठा वाढवत नेणारी कथा!अनुवादित असली तरी भाषेचा लहेजा आणि निरिक्षण अप्रतिम!!

  5. कथा खूप आवडली. राजारामपुरी, कोल्हापूरची असल्यामुळे आपलीशी वाटली.

  6. कथा खूप आवडली.राजारामपुरी,कोल्हापूर वाचून आपलीशी वाटली.

  7. मलाही कळलं नाही की कथा अनुवादित आहे … कोल्हापुरी भाषेचा बाज अगदी चपखल बसलाय … उत्तम अनुवाद … छान वाटलं वाचून

  8. कथा आवडली.ती इथल्याच मातीतील असावी अशी सुरेख उतरलीय.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..