नवीन लेखन...

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी अमरावती जिल्यातील अचलपूर येथे झाला. भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले.

नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावोलौकिक मिळवला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे.

कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले.

भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या ” दोस्त हो” आणि ” जिंदादिल ” ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.

भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
“आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे”
भाऊसाहेब पाटणकरांची स्वत:च्या मृत्युवरील ही शायरी.
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मेलो आता, बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..