नवीन लेखन...

बंदूक कलाशनिकोव्हची

१९४७ साली जनरल कलाशनिकोव्ह यांनी तयार केलेली एके -४७ ही रायफल आज केवळ रशियन प्रभावाखालील देशांतूनच नव्हे, तर भारतीय सैन्यदलात देखील वापरली जाते. इतकेच नव्हे, तर जगभरात सक्रिय असणाऱ्या अनेक दहशतवादी संघटनांमध्येही तिचा सळसुळाट झालेला आहे.

ही रायफल इतकी लोकप्रिय होण्याची कारणे तसेच तिचा व तिच्या जनकाचा इतिहास यांकडे नजर टाकली तर अनेक रंजक गोष्टी आपल्यासमोर येतील.

मिखाइल कलाशनिकोव्ह यांचा जन्म १९१९ साली एका रशियन कुटुंबात झाला. त्याच सुमारास घडलेल्या दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे १९१८ साली रशियात झालेली बोल्शेविक क्रांती आणि १९१४ ते १९१८ च्या दरम्यान झालेले पहिले महायुद्ध. जन्माच्या वेळेपासून असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले असणार.

स्वतःला बलाढ्य महासत्ता म्हणवणाऱ्या रशियाचे पहिल्या महायुद्धात पाच लाख जवान कामी आले होते व सतरा लाख जवान जखमी झाले होते. युद्धानंतर लेनिन व स्टॅलिनच्या प्रभावाखाली असलेल्या रशियात मिखाइल लहानाचा मोठा झाला. लहानपणापासूनच त्याला शिकार, कविता आणि यंत्रे अशा परस्परविरोधी गोष्टींचा छंद होता. या यंत्रांच्या आवडीतूनच पुढे जन्म झाला ‘ एके -४७ ‘ चा.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मिखाइल लाल सेनेतील रणगाडा विभागात कार्यरत होता. तांत्रिक ज्ञान व शारीरिक बळ यांच्या जोरावर बढती मिळवत तो लवकरच सार्जंट झाला. १९४१ मध्ये एका लढाईत जखमी झाल्यामुळे काही महिन्यांसाठी त्याला इस्पितळामध्ये राहावे लागले. रुग्णशय्येवर पडल्यापडल्या त्याच्या कानांवर इतर जखमी सैनिकांची संभाषणे पडत होती. पायदळातील सैनिकांना मिळणाऱ्या सुमार दर्जाच्या बंदुकांमुळे रशियन सैनिकांची मोठी प्राणहानी होत होती, असे बऱ्याच सैनिकांचे मत होते. मिखाइलच्या मनाला ते शल्य बोचत राहिले. बरे झाल्यावर त्याने प्रथम रशियन बंदुकांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष पुरवले. यंत्राविषयीच्या त्याच्या आवडीचा त्याला इथे उपयोग झाला.

प्रयत्नांती त्याने एका नवीन सबमशीनगनचे मॉडेल बनवले. सैन्यदलातील तंत्रज्ञांना ते पसंत पडले नाही, पण त्याचा परिणाम म्हणून त्याची बदली सैन्याच्या शस्त्रास्त्रे विकसित करणाऱ्या विभागात झाली. तेथे त्याने काही कार्बाइन्सची मॉडेल्स बनवली. तीही स्वीकृत झाली नाहीत. परंतु नाउमेद न होता तो काम करतच राहिला.

या परिश्रमातूनच ‘ अॅव्हटोमॅट ‘ लाशनिकोव्ह १९४७ या रायफलचा जन्म झाला. ‘ ॲव्हटोमॅट ‘ या रशियन शब्दाचा अर्थ आहे ‘ स्वयंचलित ‘.

काही शस्त्रतज्ज्ञांच्या मते, एके-४७ या रायफलीचा आराखडा एसटीजी – ४४ या जर्मन सैनिकांकडे होता, कारण जर्मनी तेव्हाही धातुशास्त्र व अभियांत्रिकीमध्ये युरोपातील सर्वात अग्रेसर देश होता. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी पराभूत झाला असला तरीदेखील जर्मन तंत्रज्ञांना मात्र जगभरातून गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या होत्या. रशियानेही काही जर्मन तंत्रज्ञांना शस्त्रे विकसित करण्यासाठी पाचारण केले होते. मिखाइलने त्यांच्याबरोबरच काम केले. या महायुद्धातील अनुभवांवर आधारलेली नवीन शस्त्रे विकसित करण्याचे काम जगभरात चाललेच होते. सर्वसाधारणपणे एकाच पातळीवर चाललेल्या या संशोधनामुळे एके – ४७ व जर्मन रायफलच्या आराखड्यात साम्य आढळणे स्वाभाविकच होते.

‘वॉर्सा ‘ करारानंतर रशियन प्रभावाखाली असलेल्या अनेक देशांवर आपले नियंत्रण कायम ठेवण्यासाठी रशियाला नवनवीन शस्त्रांची गरज होतीच. त्यासाठीच त्यांनी जर्मन व रशियन तंत्रज्ञांच्या या ताफ्याला कामास लावले होते. यातील जर्मन तंत्रज्ञांच्या नव्या मॉडेल्सना मागे टाकून मिखाइलची एके -४७ रायफल रशियन सैन्याधिकाऱ्यांच्या पसंतीस उतरली. लगोलग ती रशियन पायदळामध्ये मुख्य शस्त्र म्हणून वितरित करण्यात आली.

एके -४७ च्या अनुषंगाने आलेल्या या वैयक्तिक इतिहासापासून थोडे दूर जाऊन आता आपण जागतिक स्तरावरील स्मॉल आर्म्स ( लघुशस्त्रांच्या ) इतिहासाकडे नजर टाकू.

‘लघुशस्त्रे ‘ म्हणजे अशी हत्यारे की, ज्यांचे ‘ कॅलिबर ‘ म्हणजे ‘ नळीचा व्यास ‘ हा १५ मिमी. किंवा त्यापेक्षा कमी असतो. ही हत्यारे पायदळातील सैनिक सहजतेने हाताळू शकतो. म्हणून त्यांना ‘ वैयक्तिक हत्यारे ‘ म्हणूनही संबोधले जाते.

चौदाव्या शतकात ‘ मॅच लॉक ‘ या प्रकारच्या बंदुकींचा शोध लागला. यात जळती वात चापाच्या साहाय्याने नळीतील दारूपर्यंत नेली जाऊन बंदूक उडत असे. यातच पुढे प्रगती होऊन ‘ फ्लिंट लॉक ‘ ही बंदूक उदयाला आली. तिच्यात जळत्या वातीऐवजी चकमक वापरली जात असे. या बंदुका ठासणीच्या होत्या. नळीच्या पुढील टोकाकडून आधी स्फोटक द्रव्ये व नंतर धातूची गोळी भरली जायची. ही ठासण्याची क्रिया वेळखाऊ असल्याने दुसरी गोळी ठासून भरेपर्यंत शत्रुसैनिक बरेच पुढे येत असत. त्यावरचा उपाय म्हणून काडतुसाचा शोध लागला. काडतूस म्हणजे स्फोटक द्रव्य आणि धातूची गोळी यांना एकत्र ठेवणारी डबी. हे काडतूस सहजतेने नळीच्या मागील बाजूने भरले जाऊ लागले. यापुढे ओघानेच येणारी सुधारणा म्हणजे मॅगझीन ( कुपी ) लावून स्प्रिंगच्या  साहाय्याने बंदुकीत भरली जाणारी काडतुसे.

पुढची पायरी म्हणजे बंदुकीच्या नळीची लांबी वाढवून गोळीचा पल्ला वाढवणे. पण यामुळे अचूकता कमी होण्याची भीती असते. ते टाळण्यासाठी गोळीला पुढे जाताना स्वतःभोवती फिरण्याची गती ( परिवलन ) देणे आवश्यक होते. त्यासाठी नळीला आतल्या बाजूने स्प्रिंगच्या आकाराचे चर किंवा पन्हाळी खोदल्या जाऊ लागल्या. यालाच ‘ रायफलिंग ‘ असे म्हणतात. म्हणूनच ज्या लघुशस्त्राच्या नळीला आतून ‘ रायफलिंग ‘ आहे, त्या सर्व शस्त्रांना रायफल हे नाव दिले गेले.

सध्या जगभरात वापरात असलेल्या सर्व लघु शस्त्रांमध्ये रायफलिंग असते. अपवाद केवळ ‘ शॉटगन ‘ या प्रकाराचा. हे हत्यार कमी पल्ल्यासाठी वापरले जाते.

लघु शस्त्रांमध्ये रायफल, मशीनगन, सब – मशीनगन, पिस्तुल अथवा रिव्हॉल्व्हर, स्वयंचलित रायफल आणि अॅसॉल्ट ( कमी अंतरावरील हल्ल्यासाठी वापरली जाणारी ) रायफल यांचा समावेश होतो. एके – ४७ ही अॅसॉल्ट रायफल आहे.

रायफलची व्याख्या आपण आधीच पाहिली आहे. भारतीय सेनेत १९६२ पूर्वी असलेली ०.३०३ रायफल, नंतर आलेली ७.६२ मिमी एसएलआर ( सेल्फ लोडिंग रायफल ) आणि सध्या प्रचलित असलेली ५.५६ मिमी इन्सास ( इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टिम ) या सर्व रायफल गटात मोडणाऱ्या बंदुका आहेत.

रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल ही सहजतेने हाताळण्याजोगी हत्यारे आहेत. यांच्या नळीमध्येही रायफलिंग असते, परंतु नळीची लांबी कमी असल्याने त्यांचा पल्लाही कमीच असतो. पिस्तुलात मॅगझीनच्या साहाय्याने गोळ्या भरल्या जातात, तर रिव्हॉल्व्हर नावाप्रमाणेच चेंबर रिव्हॉल्व्हर करून नळीत गोळ्या भरते.

सॅम्युअल कोल्ट याने पिस्तुलाचा शोध लावला. त्यानंतर या क्षेत्रात अमेरिकन तंत्रज्ञांनीच बाजी मारली. आजही जगभरात ‘ कोल्ट ‘, ‘ स्मिथ अॅण्ड वेसन ‘, ‘ वेबली स्कॉट ‘ या अमेरिकन कंपन्यांची पिस्तुले उत्कृष्ट समजली जातात. कार्बाइन किंवा स्टेनगन हा पिस्तुल व रायफल यांच्या मधला प्रकार आहे. आकार, पल्ला व अचूकता या तीनही बाबतीत रायफलपेक्षा कमी, परंतु पिस्तुलापेक्षा जास्त आहे.

जगभरातील विविध सैन्यदले आज अंदाजे चाळीस वेगवेगळ्या प्रकारची लघु शंस्त्रे वापरीत आहेत. परंतु त्यातील कुठल्याही शस्त्राला एके -४७ चे वलय अथवा कीर्ती प्राप्त झालेली नाही.

मग एके ४७ मध्ये असे काय खास आहे ?

१. हे हत्यार साडेचार किलोपेक्षा कमी वजनाचे आहे. म्हणजेच इतर लघु शस्त्रांपेक्षा हलके.

२. इतर बंदुकांच्या तुलनेत यात अगदी कमी म्हणजे आठच हलणारे सुटे भाग आहेत.

३. सामान्य लष्करी प्रशिक्षण घेतलेला कुठलाही माणूस हे हत्यार अर्ध्या मिनिटात सुटे करू शकतो किंवा जोडू शकतो.

४. काकडवून टाकणाऱ्या बर्फात पहारा देणाऱ्या रशियन सैनिकांसाठी हे हत्यार बनवले गेले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हवेत हातमोजे घालूनही हे हत्यार सहज चालवता येते.

एके -४७ च्या शोधाला आता पंचाहत्तरी पूर्ण झाली असूनही इतर अद्ययावत बंदुकांच्या तुलनेत तिची मागणी वाढली आहे,

कारण –
१ ) अत्यल्प उत्पादनखर्च,
२ ) टिकाऊपणा,
३ ) सहज उपलब्धता. या रायफलची रचना इतकी सोपी आहे, की अनेक देशांनी तिच्या उत्पादनाचे कारखाने सुरू केले आहेत. भारतीय सैन्यदलदेखील ही रायफल रशियाकडून विकत न घेता, इतर देशांतून कमी किमतीत आयात करत आहे.
४ ) या रायफलचे मॅगझीन थोडे वक्राकार असल्यामुळे चेंबरमध्ये गोळी जाताना कधीही अडथळा येत नाही.
५ ) या रायफलचे कधीही अपघाती फायरिंग किंवा मिसफायरिंग होत नाही.
६ ) हिच्या नळीचे टोक तिरपे कापले असल्यामुळे ‘ फायर ‘ करताना तिला वरील बाजूस गचका बसत नाही.
७ ) या बंदुकीच्या आतील भागांवर क्रोमियमचे प्लेटिंग असल्याने ते गंजत किंवा झिजत नाहीत
८ ) हिचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फायरिंग सुलभ होते. या गुणधर्मामुळेच ही आज जगातील सर्वात लोकप्रिय बंदूक आहे.

आज अंदाजे १० कोटी एके -४७ जगभरात आहेत व त्यात दरवर्षी अंदाजे दहा लाखांची भर पडत आहे. इतर सर्व लघु शस्त्रांची एकत्रित संख्या घेतली, तर त्यापेक्षाही जास्त संख्येने एके – ४७ हे एकाच प्रकारचे शस्त्र उत्पादित होत आहे.

ले. जन. मिखाइल कलाशनिकोव्ह यांना त्यांच्या आयुष्यात बरेच मानसन्मान, प्रसिद्धी व पैसा मिळाला. त्यांचा नव्वदावा वाढदिवस २००९ मध्ये क्रेमलिनच्या राजवाड्यात साजरा करण्यात आला. त्या वेळी एका वार्ताहराने त्यांना विचारले, ” तुम्ही शोध लावलेल्या एके – ४७ मुळे जगात जी हिंसा होते आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?

” त्यांनी उत्तर दिले, ” मी दररोज रात्री शांत झोपतो. कारण, मी या शस्त्राचा शोध मातृभूमीच्या रक्षणासाठी लावला. जर कोणी हे शस्त्र चुकीच्या कामासाठी वापरत असेल, तर तो दोष माझा नसून त्या – त्या देशातील / समूहातील नेत्यांचा व राजकारण्यांचा आहे

– शैलेस रायकर, (निवृत्त सैन्याधिकारी)

मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..