नवीन लेखन...

बाळू आमचा ‘मायाळू’

शनिवारी संध्याकाळी आम्ही न चुकता दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन घ्यायला जातो. गेल्या शनिवारी अप्पा बळवंत चौकाच्या अलीकडे असलेल्या डीएसके बिल्डींगमधून पलीकडे शाॅर्टकटने जावे म्हणून बिल्डींगच्या पायऱ्या चढलो. या बिल्डींगचं वैशिष्ट्य असं आहे की, या टोकापासून पलीकडच्या रस्त्यापर्यंत सत्तर ऐंशी दुकानं ही प्रिंटींग व्यवसायाशी निगडित आहेत.
आम्ही बिल्डींगमधे प्रवेश केला तेवढ्यात ‘ओ नावडकर बंधू, इकडे कुठे आलात?’ अशी हाक ऐकू आली. बघतोय तर, बाळू राजगुरू दुकानातील काऊंटरच्या पलीकडून खुर्चीत बसून बोलत होता. आम्ही त्याच्याजवळ गेलो. बाळूमध्ये गेल्या चाळीस वर्षांत विशेष असा काहीच बदल झालेला नव्हता. तोच उभट हसरा चेहरा, मिडीयम ठेवलेले भांग न पाडता येणारे केस, दाढी मिशी देखील मर्यादितच ठेवलेली, अंगात माॅड टी शर्ट, खाली पॅन्ट. त्याने स्वतःहून बोलायला सुरुवात केली, ‘बंधू, घरी बसून कंटाळा आला म्हणून हे दुकान सुरु केले. एक ऑपरेटर कामावर ठेवला आहे. मग, टी शर्ट प्रिंटींग, बॅजेस, प्रेझेन्टेशन आर्टीकल्स ठेवलेली आहेत. मी दुपारी येतो व आठपर्यंत थांबतो.’ त्यानं काही नमुने दाखवले. चहा मागवला. आमची चौकशी केली. आम्ही त्याचा निरोप घेऊन निघालो.
मी बाळूला पाहून पस्तीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात पोहोचलो होतो. त्यावेळी आम्ही घरीच लग्न पत्रिकांची डिझाईन करीत होतो. त्यावेळी बाळू स्क्रिन प्रिंटींगची कामं करायचा. त्यांच्याकडे एखादं पत्रिकेचं काम आलं की, त्याच्या टू व्हिलरवरुन आमच्याकडे येऊन मजकूर आणि साईज देऊन जायचा. मग रमेश हस्ताक्षरात ते डिझाईन करून देत असे. काही करेक्शन नसेल तर ती पत्रिका स्क्रिन प्रिंटींग करुन बाळू ती ऑर्डर पूर्ण करीत असे. अशी त्याची बरीच कामे आम्ही केली. त्यावेळी त्याचे लग्न झालेले होते. तो रहायचा रामेश्वर चौकातील एका वाड्यामध्ये.
बाळू तसा रमेशचा वर्गमित्रच. रमेशच्या सर्व मित्रांना मी परिचयाचा होतो. दीपक पाटील, शिवाजी एरंडे, मॅक, विजय कदम, किरण मोघे हे घरी येत असत. बाळू वर्गातील सर्वांच्या अडचणीला धावून जात असे. मॅक आणि बाळू दोघेही रुमवर स्क्रिन प्रिंटींग करायचे.
आम्ही ‘गुणगौरव’ मध्ये ऑफिस सुरु केले. बाळूने सातारा रोडला ‘पंचमी’ हाॅटेलच्या शेजारी स्क्रिन प्रिंटींगचे युनिट सुरु केले. तिथे आम्ही त्याला भेटायला गेलो होतो. त्यावेळी तो मंडई सोडून महर्षि नगरला रहायला आला होता. आमच्या अधेमधे भेटीगाठी होत होत्या.
२००० नंतर एकदा बाळू ऑफिसवर आला. ज्ञानप्रबोधिनी मध्ये तो काॅम्प्युटरचा क्लास लावणार होता. त्याने रमेशला क्लासला बरोबर येण्यासाठी गळ घातली. बाळू, बाळूचा एक मित्र व रमेश असे तिघेजण संध्याकाळी क्लासला जाऊ लागले. तिथे एक मॅडम कोरल ड्राॅ व फोटोशाॅप शिकवत होती. पहिल्याच दिवशी रमेशला क्लासमधील शिकवण्याची पद्धत पटली नाही. त्याने मला त्याच्या ऐवजी जायला सांगितले. मी दोन महिने तो क्लास केला. झालं होतं असं की, पंधरा मुलामुलींची बॅच होती. शिकविणारी मॅडम प्रत्येक स्टेप शिकवून झाल्यावर ‘समजले का?’ असं सर्वांना विचारायची. मुलींसमोर समजले नाही, असं कोण म्हणणार? बाळूला कोरल ड्राॅ व फोटोशाॅपची प्राथमिक माहिती होती, त्यामुळे तो ‘समजलं’ असं म्हणत असे. क्लास पूर्ण झाल्यावर बाळूची भेट क्वचितच होऊ लागली.
काही वर्षांनंतर तो मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन ऑफिसवर आला. आपटे रोडवरील कार्यालयात लग्न होते, आम्ही दोघेही आवर्जून गेलो. बाळूला आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच सुटाबुटात पाहिलं. तो ‘लय भारी’ दिसत होता. आम्हाला पाहून बाळूला फार आनंद झाला. त्याने धनकवडी पठारावरील तळजाई रस्त्यावरील बंगल्यावर येण्याचे आम्हाला निमंत्रण दिले.
एका रविवारी आम्ही त्याच्या बंगल्यावर गेलो. बंगला छान, अत्याधुनिक पद्धतीचा होता. हाॅलमधून पहिल्या मजल्यावर जाणारा चित्रपटात शोभेल असा काटकोनात जिना होता. वरती दोन बेडरूम, प्रशस्त बाथरुम, हाॅल सजवलेला होता. एक बेडरुम खास लहान मुलांसाठी होती. भिंतीवर मोठी पेंटींग्ज लावल्यामुळे आर्टीस्टचे घर वाटत होते. चहापाणी झाल्यावर आम्ही परतलो.
एके दिवशी बाळूचा फोन आला, त्याने फोनवरून आम्हाला त्याच्या एकसष्टीच्या समारंभाचे निमंत्रण दिले. बाळूचा वर्गमित्र सुभाषसह आम्ही दोघे संध्याकाळी बाळूच्या बंगल्यावर गेलो. बंगल्याच्या खाली पार्किंगच्या जागेत बाळूच्या एकसष्टीसाठी उत्कृष्ट सजावट केलेली होती. मोठ्या संख्येने बाळूचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होता. बाळूने सर्वांच्या समोर केक कापल्यानंतर मनोगत व्यक्त केले. कराओकेवर हिंदी-मराठी गीतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. त्याला आम्ही शुभेच्छांसह गिफ्ट दिले. निमंत्रितांसाठी खास बुफेची व्यवस्था केलेली होती. रात्री दहा वाजता आम्ही बाळूला निरोप घेऊन घरी परतलो.
बाळू सारखा मनमिळाऊ मित्र, आम्हाला लाभला हे आमचं भाग्य.
इतकी वर्षं त्याला मी पाहतो आहे, तो जसा तेव्हा होता तसाच आजही आहे. कित्येक माणसं परिस्थिती सुधारल्यावर, श्रीमंती आल्यानंतर बदलतात. त्यांना अहंकाराचे वारं लागते. बाळू वाड्यातून चाळीमध्ये, बैठ्या बंगल्यातून मोठ्या टोलेजंग बंगल्यात राहू लागला तरी आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत.
बाळूच्या या समृद्ध उत्तरार्धाचे सर्व श्रेय जाते वहिनींना. बाळू तसा फारच साधा-भोळा, वहिनी मात्र हुशार! त्या लग्नाच्या आधीपासून कन्स्ट्रक्शन व्यवसायात होत्या. लग्नानंतर त्यांच्या व्यावसायिक यशाची चढती कमान उंचावतच गेली आणि बाळूचा बाळासाहेब झाला!
बाळू आता घरच्या जबाबदारीतून मुक्त झालेला आहे. मुला-मुलीचं लग्न झालंय, नातवंडं झालीत. खेड शिवापूरच्या पुढे कापूरहोळ जवळ बाळूने ‘राजगुरू रिसाॅर्ट’ उभं केलंय. गेल्याच वर्षी फेसबुकवर तो कुटुंबासह दुबईची ट्रीप करुन आल्याचे, फोटो पाहिल्यानंतर समजले. फोटोत तो आनंदी दिसत होता, त्याच्या आनंदातच आम्हां बंधूंचा आनंद सामावलेला आहे…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१६-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..