नवीन लेखन...

अवखळ आनंदी खमाज

सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे.

“जमानेभर का गम या इक तेरा गम,
ये गम होगा तो कितने गम ना होंगे”
असे लिहून त्याने प्रणयी तडफड व्यक्त केली आहे. वास्तविक, एक कविता किंवा गझल म्हणून या रचनेत तसे फारसे नाविन्य नाही, वेगळा विचार नाही तसेच असामान्य असा आशय व्यक्त होत नाही पण, याच शब्दांना संगीताची जोड मिळाली की लगेच हेच शब्द आपल्या मनात रुतून बसतात.
उस्ताद मेहदी हसन साहेबांनी हीच कमाल, खमाज रागाच्या सहाय्याने अप्रतिमरीत्या सादर केली आहे. मी इथे मुद्दामून गझलेच्या पहिल्या ओळी दिल्या नाहीत पण, आता देतो.
“मुहब्बत करनेवाले कम ना होंगे,
तेरी महफ़िल मे लेकिन हम ना होंगे”
मेहदी हसन यांची ही अतिशय प्रसिद्ध रचना खमाज रागावर आधारित आहे.
शब्दांचे अचूक उच्चारण, खमाज रागावर आधारित असले तरी गझल गायकीचा स्वत:चा असा खास “खुशबू” असतो, त्याची यथार्थ जाणीव करून देणारी गायकी आणि आपण, राग सादर करत नसून, त्या रागाच्या सावलीत राहून, शायरीमधील आशय अधिक अंतर्मुख करीत आहोत, हा विचार, हे सगळे गुण या रचनेत अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतात. रागाच्या सुरांची मदत तर घ्यायची पण, शायरीला प्राधान्य द्यायचे, अशी दुहेरी कसरत मेहदी हसन खरोखरच अप्रतिमरीत्या सादर करतात. कुठेही शब्दांना म्हणून दुखवायचे नाही, ही आग्रह तर प्रत्येक ओळीच्या गायकीतून दिसून येतो.
“अगर तू इत्तफाकन मिल भी जाये,
तेरी फुरकत से सदमे कम ना होंगे”
या ओळी, माझे वरील म्हणणे तुम्हाला पटवतील. वास्तविक, पहिली ओळ खमाज रागापासून थोडी दूर गेली आहे पण, लगेच दुसऱ्या ओळीत, गायकाने चालीचे वळण, योग्य प्रकारे आणून, आपल्या बुद्धिमत्तेचा अफलातून प्रत्यय दिला आहे.
इथे मी थोडी गंमत केली आहे. लेखाचे शीर्षक “अवखळ आनंदी खमाज” असे दिले आहे पण, वरील रचना तर या भावनेपासून फार दूर आहे. हेच तर भारतीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या रागाचे नेहमी एकाच भावनेत वर्णन करणे, सर्वथैव अशक्य!! रिषभ वर्जित आरोही सप्तकात दोन्ही निषाद  बाकीचे सगळे स्वर शुध्द लागतात तर अवरोही सप्तकात सगळे स्वर लागतात पण, निषाद फक्त कोमल वापरला जातो. वादी स्वर गंधार तर संवादी स्वर निषाद असलेल्या या रागाची खरी ओळख तुम्ही (कोमल) निषाद कसा लावता आणि तो लावताना पुढच्या षडजाला किंचित स्पर्श करून अवरोही सप्तकाकडे कसे वळता, या कौशल्यावर आहे. खरे तर या रागात संपूर्ण “ख्याल” फारसे आढळत नाहीत.
वेगळ्या भाषेत, ख्याल गायक, या रागाकडे तसे फार बघत नाहीत असे दिसते. परंतु वादकांचे मात्र अलोट प्रेम या रागाला लाभले आहे तसेच सुगम संगीतात, या रागावर आधारित भरपूर रचना आढळतात. हे थोडेसे पिलू रागासारखे झाले.
उस्ताद विलायत खानसाहेबांनी खमाज वाजवताना हीच असामान्य करामत करून दाखवली आहे. उस्ताद विलायत खान म्हणजे सतार वादनात स्वत:चे “घराणे” निर्माण करणारे कलाकार. वास्तविक सतार म्हणजे तंतुवाद्य, म्हणजेच वाद्यावर “मिंड” काढणे तसे अवघड काम पण तरीही, सतारीच्या तारेवरील “खेंच” आणि मोकळी सोडलेली तार, यातून ते असा काही असमान्य सांगीतिक वाक्यांश “पेश” करतात की ऐकताना रसिक अवाक होतो. विशेषत: द्रुत लयीत, गत संपूर्ण सप्तकाचा आवाका घेत  असताना,मध्येच “अर्धतान” घेऊन, सम, ते ज्याप्रकारे  गाठतात, तो प्रकार तर अविस्मरणीय असाच म्हणायला हवा.
या वादनात उस्तादांच्या कौशल्याची पुरेपूर प्रचीती येते. जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात येईल, वादन “जोड” आणि “झाला” यांच्या मध्ये किंचित गुंतलेले असताना, एके ठिकाणी ठुमरी अंगाची तान घेतली आहे पण तिचे अस्तित्व किती अल्प आहे. आणखी विशेष म्हणजे “जोड” वाजवताना, एके ठिकाणी, तारेवर किंचित दाब देऊन, स्वर रेंगाळत ठेवला आहे, म्हणजे बघा, लय मध्य लयीत चाललेली आहे पण, इथे तान सगळी न घेता मध्येच किंचित खंडित करून त्या रेंगाळलेल्या स्वरावर संपवलेली आहे. फार, फार अवघड कामगत आहे.
कवी अनिलांच्या बऱ्याच कविता, गीत म्हणून रसिकांच्या समोर आल्या आहेत. त्यातलीच ही एक रचना, खमाज रागाशी मिळती जुळती आहे. अर्थात, हे गाणे, गीत म्हणून लिहिले नसल्याने, कविता म्हणून देखील फार सुरेख रचना आहे. संगीतकार यशवंत देवांनी चाल देखील फार सुरेख लावली आहे. मुळात यशवंत देव हे कवी प्रकृतीचे संगीतकार असल्याने, ते कवीच्या भावना फार नेमक्या दृष्टीने अभ्यासतात आणि शब्दांना सुरांचा साज चढवतात. देवांच्या चालीत, कवितेचे मोल, त्यांनी जाणलेले सहज दिसून येते आणि चाल लावताना, ओळीतील कुठल्या शब्दाने, कवितेचा आशय अधिक गहिरा होईल, याकडे लक्ष दिलेले आपल्या देखील लक्षात आणून देतात. त्यांची बहुतेक गाणी तपासली तर असे दिसून येईल, गाण्याच्या पहिल्याच ओळीत, कवितेतील नेमका शब्द पकडून, त्यावर नेमका “जोर” देऊन, कवितेतील आशय व्यक्त करतात. इथे देखील, त्याचा हाच आग्रह दिसून येतो.
“वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर जळते उन,
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला”
प्रणयी ढंगाची कविता आहे. या ओळीतील, “माध्यान्ह” हा शब्द आणि पुढे “जळते उन” हे शब्द ऐका. दुपारचा रखरखाट आहे, डोके उन्हाने तापले आहे आणि असे असून देखील, माझ्या प्रिये, तू कोमेजून जाऊ नकोस. या संदर्भात वरील शब्द ऐकावेत म्हणजे, “शब्दप्रधान गायकी” म्हणजे क्काय याचे आपल्याला उत्तर मिळेल.
हिंदी चित्रपट गीतांत देखील खमाज राग भरपूर पसरलेला आहे. दिलीप कुमारच्या “देवदास” चित्रपटात अशीच अत्यंत मनोरम अशी रचना ऐकायला मिळते. मुबारक बेगमच्या खणखणीत आवाजात ही चीज ऐकायला फारच बहारीचे वाटते.
“वो ना आयेंगे पलट कर, उन्हे लाख हम बुलायेंगे;
मेरी हसरतो से केह दो की ये ख्वाब भूल जाये”.
“वो ना आयेंगे पलट कर,उन्हें लाख हम बुलाये” हीच ती साहीरची अफलातून रचना. खरतर गाणे फार थोडा वेळ, चित्रपटात ऐकायला मिळते पण तरीही सुरांची, स्वत:ची अशी खासियत असते, ज्यायोगे एखादा सूर देखील आपल्या मनावर परिणाम करून जातो. इथे तसेच घडते. मुबारक बेगमचा स्पष्ट, खणखणीत आवाजाने, खमाज रागाची झलक देखील मनाला मोहवून जाते.
मराठी भावगीतात असेच एक मानाचे पान राखून असलेली रचना ऐकायला मिळते. माणिक वर्मांच्या आवाजात “त्या चित्तचोरट्याला का आपुले मी” ही रचना, खमाज रागाशी फार जवळचे नाते सांगून जाते. कविता म्हणून, गझल सदृश रचना आहे. मधुकर गोलवळकरांनी अतिशय सुंदर चाल लावून, या कवितेला अप्रतिमरीत्या सादर केले आहे.
“त्या चित्त – चोरट्याला का आपुले म्हणू मी?
स्मृतीजाल आंसवांचे दिनरात का विणू मी?’
माणिकबाईंचा किंचित “नक्की” स्वरांतला आवाज परंतु शास्त्रीय संगीताच्या रियाजाने, आवाजाला घोटीवपणा प्राप्त झालेला. सहजता आणि संयमितपणा हे त्यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागते. तसेच त्यांनी मराठी भावगीत गायनात उत्तरेचा रंग आणि ढंग व्यवस्थितपणे रुजवला आणि हे वैशिष्ट्य, ही रचना ऐकताना आपल्याला सहज दिसून येईल. गायकी ढंगाची चाल आहे, त्यामुळे गाण्यात, “ताना”,”हरकती” भरपूर आहेत तसेच तालाच्या गमती जमती देखील आहेत. शास्त्रीय संगीताचा रियाज असल्याने, गायनात नेहमी विस्ताराच्या जागा, त्या निर्माण करतात. याचा परिणाम, गाणे ऐकायला अतिशय वेधक झाले आहे.
देव आनंदच्या “काला पानी” या चित्रपटात “नजर लागी राजा” हे गाणे खमाज रागाची व्यवस्थित ओळख करून देते. वास्तविक, “नजर लागी राजा” नावाची बंदिश देखील प्रसिद्ध आहे आणि याच बंदिशीचा आधार घेऊन, चित्रपटात हे गाणे तयार केले आहे.
“नजर लागी राजा तोरे बंगले पर,
जो मै होती राजा बनके कोयलिया,
कुहुकू रहेती राजा तोरे बंगले पर”.
संगीतकार एस.डी.बर्मन यांनी गाणे बनवताना, बंदिशीतील भावनेचा भाग तेव्हडा उचलला आहे आणि त्यावरून गाण्याची चाल बनवली आहे. अर्थात, अशा गायकी ढंगाची चाल गाताना, आशा भोसले यांची गायकी खुलली तर काय नवल!!
“गंगा जमना” चित्रपटात अशाच धर्तीचे एक गाणे आशा भोसले यांनी खुलवले आहे – तोरा मन बडा पापी सांवरिया रे”. खमाज रागाची अचूक ओळख करून घेत येते.
“हां मतलब का है तू मीत बेदर्दी, गरज की रखे प्रीत;
 दुखिया मन को घायल करना, समझे तू अपनी जीत;
तोरा मन बडा पापी सांवरिया रे,
मिलाये छलबल से नजरिया रे”.
या गाण्यात “तोरा मन बडा पापी रे” या ओळीत आपल्याला खमाज राग भेटतो. संगीतकार नौशाद यांनी. गाण्याची प्रकृती ओळखून, उत्तर भारतीय लोकसंगीताची कास धरून, चाल बांधली आहे. अर्थात त्याचबरोबर गाणे कोठीवरील आहे, हे ध्यानात घेऊन, त्यात, “लखनवी” नखरा मिसळला आहे. खमाज “अवखळ” प्रवृत्तीचा आहे, हे नेमकेपणाने दाखवून देणारी ही रचना!!
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..