नवीन लेखन...

आत्मचरित्रकार मधुकर केचे

अमरावती शहराचे सुपुत्र जेष्ठ, लेखक, कवी, आत्मचरित्रकार मधुकर केचे यांचा जन्म १७ जानेवारी १९३२ रोजी वर्धा जिल्ह्यातील अंतोरा या गावी झाला.

मधुकर केचे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाबूराव केचे असे होते. त्यांच्या घरात शेतकरी वातावरण व मध्यमवर्गीय परिस्थिती होती. बाबूराव केचे हे अध्यात्मवादी आणि स्वाभिमानी होते. त्यांना वैद्यकीय ज्ञानही होते. ते वृत्तीने विनोदी असून मनाने संवेदनशील होते. शीघ्रकवित्वही त्यांना लाभलेले होते. विदर्भभूमी आणि माणसे त्यांच्याशी ते पूर्ण समरस होऊन गेले होते. मधुकर केचे ह्यांच्या आईचे नाव अनसूया असून त्या स्वभावाने सात्विक, व्यवहारकुशल व वृत्तीने धार्मिक होत्या. त्यांना भागवतराव व मधुकर ही दोन मुले व शकुंतला नावाची मुलगी होती. मधुकर केचे हे सर्व भावंडांमध्ये लहान होते.

मधुकर केचे ह्यांचे प्राथमिक शिक्षण अंतोरा या त्यांच्या जन्मगावी झाले. वर्धा नदीच्या काठावर वसलेले त्यांचे जन्मगाव अंतोरा हे निसर्गरम्य स्थळ असल्याने केच्यांचे बालपणही या निसर्गसान्निध्यात बहरत गेले. केच्यांना बालपणापासून नदीत पोहणे, रानोमाळ भटकणे यांत विशेष आवड होती. यातूनच ते निसर्गाशी किती समरस झाले होते याची कल्पना येते. ‘माझे बालपण’या कवितेत त्यांनी आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिलेला आहे.

माझे बालपण गाणी गात आहे
धो धो पावसाळा लालूच दावत
उघडे नाचत चिखल माखत
आल्या गेल्यास ते वेडावित आहे” (आसवांचा ठेवा, पृ. १३१)

यातूनच त्यांच्या निसर्गप्रेमाची व संवेदनशील मनाची जाणीव होते. पुढे त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोर्शीला झाले. यावेळी त्यांना कानफाडे सरांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभलेले आहे. या काळात त्यांची रानोमाळ भटकंती सुरू असताना झाडावर चढणे, उड्या मारणे, गोठाणावर हुतूतूचा खेळ खेळणे, सालबर्डी ची जत्रा व तेथील नैसर्गिक जीवनात रममाण होऊन जगणे अशा बालपणातील रम्य आठवणी त्यांच्या जीवनात कायमच्या साठविलेल्या आहेत. केचे ह्यांना ज्याप्रमाणे निसर्गप्रेम होते त्याचप्रमाणे शिक्षणाविषयीही विशेष आवड असल्याचेही दिसून येते. बालवयातच त्यांनी वाचनाचा ध्यास घेतलेला होता. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिनही भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथ वाचनामुळे त्यांचे संवेदनक्षम मन अंकुरित झाले होते. याच काळात त्यांनी महात्मा गांधी, विनोबा भावे, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद ह्यांच्या वाङ्मयाचे सखोल अध्ययन केलेले होते. गीता वाचन श्रवणाने त्यांच्या मनावर आगळा असा आध्यात्मिक संस्कारही झाला. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन केचे समाजजागृतीकडेही वळले. याच काळात त्यांची प्रवासाची दिशाही विकसित झालेली दिसून येते. अवघ्या वयाच्या १५ व्या वर्षी ते भक्ताच्या दिंडीसह पंढरपूरला पायी जाऊन आले. यावरून त्यांच्या घरातील आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव केच्यांवर पूर्णत्वाने
झालेला दिसून येतो. केचे १६वर्षांचे असताना १९४८ साली त्यांच्या वडिलांचा आकस्मिक अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूचा गंभीर परिणाम त्यांच्यावर झाला व या विमनस्क अवस्थेत ते मॅट्रिक कसेबसे पास झाले.

वडिलांच्या मृत्यूनंतर केच्यांचे शिक्षण दोन वर्षे थांवले. या काळात त्यांनी सतत वाचनाचा ध्यास घेतला होता व रानोमाळ भटकणेही सुरू झाले होते. एकदा रानोमाळ भटकताना झाडाची फांदी त्यांच्या डोळ्याला लागल्याने त्यांना नेत्रचिकित्सा करावी लागली. हाही अनुभव त्यांना जीवनभर बालपणाची जाणीव करून देणाराच ठरला व इथे त्यांना शिक्षणाचे एक वर्ष आराम करण्यात घालवावे लागले. मधुकर केचे ह्यांच्या जीवनात एकीकडे बालपणाचा आनंद तर दुसरीकडे कौटुंबिक जबाबदारी पहायला मिळते. घरामध्ये जमिनीच्या वाटण्या झाल्यामुळे त्यांचा मन:स्ताप त्यांना असहनीय झाला. यावेळी त्यांना धूम्रपान करण्याची सवय जडली व रागाने ते घराबाहेर पडलेत. “काहीतरी घरगुती रागतम माझ्या अंगाशी येऊन मी विमनस्क अवस्थेत अमरावतीस भटकत असताना मला अचानक आठवलं आपण सेवाग्रामला जायला हवं. घरून रागाने निघून आलोच आहोत. मग लोफरासारखे इकडे-तिकडे भटकण्या ऐवजी सेवाग्राम गेले.

लहानपणी गांधीप्रेमी संस्कार त्यांच्यावर झाले असल्यामुळे काही काळ सेवाग्रामला वास्तव्य करून त्यांनी गांधीप्रणीत अहिंसक ग्रामसुधारणेच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. तेथेच विनोबा भावे यांच्या वाङ्मयाचे सखोल अध्ययन व गीता वाचन-श्रवणाचा त्यांच्या मनावर गडद संस्कारही झाला. परंतु केच्यांचे मन अधिक काळ सेवाग्रामलाही रमले नाही. पुढे त्यांच्यावर रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद ह्यांच्या वाङ्मयाचा गडद प्रभाव पडला व त्यांनी रामकृष्ण आश्रमाची दीक्षा घेतली.

अध्यात्माच्या उत्कट प्रभावाने प्रेरित होऊन याच काळात केचे डोक्यावरील संपूर्ण केस काढून एखाद्या साधुपुरुषासारखे गावाबाहेर राहायला लागले. यावेळी साधू महाराज म्हणून त्यांनी आपला चमत्कारिक ठसा अडाणी माणसांवर उमटविणे सुरू केले. या ढोंगीपणाच्या प्रयोगात ते रमले असताना कमलाबाई शिंदे यांनी केचे यांना बरोबर ओळखले व हा मुलगा असा वाईट मार्गाने वाया जाऊ नये म्हणून त्याला खडसावून घरी आणले व आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यानंतर केचे हे किराणा, कापूस व तुपाचा व्यापार करण्यात रमले.

नागपूरला तूप विकायला जात असताना अचानक एक दिवस त्यांची विदर्भ महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाशी भेट झाली. त्यांनी मधुकर मधील तल्लख बुद्धिमत्ता जाणून शिक्षण घेण्याविषयीचा सदुपदेश केला व त्यानंतर केच्यांनी अमरावतीच्या समर्थ हायस्कूलमध्ये इंटरला प्रवेश घेतला. त्यांचा वाङ्मयीन पिंड यावेळी अधिक बहरला. गो.देशमुख, के.ज.पुरोहित ह्यांच्या विशेष सहकार्य व मार्गदर्शनामुळे थांबलेला शिक्षणप्रवास ताकदीने सुरू झाला. बुधवारा येथील जुनाट वस्तीत खोली करून राहणारे केचे स्वत:च अन्न शिजवून, साध्या पोशाखात कॉलेजला जाऊन गरीब अवस्थेत आपल्या शैक्षणिक धुंदीत जीवन जगत होते. याच काळात त्यांच्या पुस्तकाला पारीतोषिक मिळाले.अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयामध्ये १९५८ ला आपले एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

अमरावतीला केचे शिकत असताना त्यांना कविप्रकृतीचे मित्र मिळाले. कविवर्य सुरेश भट, प्रा. राम शेवाळकर, तुळशीराम काजे, उ.रा.गिरी व मधुकर केचे ही वैदर्भीय कवी मंडळी महाराष्ट्रात नामवंत साहित्यिक म्हणून पुढे नावारूपास आली. १९५० पासून केच्यांच्या काव्यलेखनाची सुरुवात झाली. “बी.ए.च्या वर्गात असताना अभ्यासक्रमाला असलेल्या एका पुस्तकाची मार्गदर्शिकाच त्यांनी सिद्ध केलेली होती. सतत बोलत राहणे आणि चारमिनारचे अग्निहोत्र पेटत ठेवणे ही त्यावेळची त्यांची खूणच झालेली होती. अमरावतीला राजकमल चौकात खापर्थ्यांच्या वाड्यापुढील दुकानओळीत महाराष्ट्र बुकडेपो नावाचे दुकान होते. आणि प्राध्यापक-लेखकांचा तो सायंकाळचा अड्डाही होता.ते दुकान आणि रस्त्याच्या बाजूला असलेले फेमस सोडा फॅक्टरी ही राजकमल चौकातील सायंकाळची सांस्कृतिक केंद्रेच होती. या महाराष्ट्र बुक डेपोतील देशमुखांनी केच्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला होता.” १९५९ साली प्रकाशित झालेल्या ‘दिंडी गेली पूढे’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. मित्राच्या सहवासात केच्यांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. हे सर्व मित्र त्या काळात एकत्र वावरत होते. त्यांच्यातील वाङ्मयीन जाणिवा या भिन्न असल्या तरी कलावंत म्हणून त्यांचा एकत्र होणारा प्रवास अनेक आठवणींनी बहरलेला आहे. राम शेवाळकर म्हणतात त्याप्रमाणे, “केचे भावुक होता, संवेदनशील होता. त्याच्याशिवाय त्याच्या कवितेतील अनुभव इतके उत्कट उतरले नसते. कवितेतील अभिव्यक्ती खूपदा चकित करणारी असे, तरी यात उत्कृष्ट अशी बौद्धिक आतषबाजी जाणवत नसे. कवितेतील अनुभवांच्या घटकांची संगतीही भावनिक असायची. केचे व सुरेश भट कॉलेजमध्ये एक दोन वर्षांनी माझ्या मागे होते. पण आम्ही लिहायला सामान्यपणे सुरुवात बरोबरच केली. अशाप्रकारे केच्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा खरा प्रवास हा महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालेला आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवृत्त करणाऱ्या डॉ.गो. देशमुख, के.ज.पुरोहित ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केच्यांचा वाङ्मयीन पिंड पोसल्या गेला व सुरेश भट, राम शेवाळकर, तुळशीराम काजे यांच्यासारख्यांच्या सहवासात तो अधिक विकसित झाला.

शिक्षणानंतर केचे ह्यांनी आकोटच्या शिवाजी विद्यालयात एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली व त्यानंतर अमरावतीच्या केशरभाई लाहोटी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवारत राहिले व पुढे मराठीचे विभागप्रमुख या पदावरून त्याच महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले. केचे ह्यांच्या सहवासातील विद्यार्थी व प्राध्यापक असणारे डॉ.नरेशचंद्र काठोळे लिहितात की, “सरांच्या सहवासात माझे साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडले. ‘साहित्य संगम’ या साहित्यिकांच्या सहवासातील मंडळामधील सरांचा सहवास घडला त्यामुळे मी त्यांचा लेखनिक असताना जाणवलं की सरांच्या लिहिण्याला धार आहे. न थांबता ते डिक्टेशन द्यायचे, कुठेच खोडतोड नाही. ते सांगायचे व मी टाईप करायचो. पण सांगताना ४ ते कधी थांबले नाहीत.”” असे यशस्वी प्राध्यापक म्हणून केचे अनेकांच्या स्मरणात राहिले आहेत. २७ मे १९६१ साली मधुकर केचे ह्यांचा विवाह बसवंतराव मोहोड ह्यांच्या मुक्ता या मुलीशी झाला. बसवंतराव मोहोड हे अमरावती जिल्ह्यातील माधान येथील मूळचे रहिवासी असले तरी दर्यापूर येथे त्यांचा वकिलीचा व्यवसाय असल्याने त्यांचा मुक्काम दर्षापूरलाच राहिला. मधुकर केचे ह्यांना बडेजावपणा आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगाचे अवडंबर माजवलेले आवडत नसल्यामुळे व-हाडी लोकांच्या हातावर एकेक पेढा देऊन व कुणालाही निमंत्रण न पाठविता अत्यंत सामान्य स्वरूपात त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर अमरावतीच्या राठीनगर येथील निवासस्थानात त्यांचे विवाहानंतरचे सुखाचे दिवस बहरले व पुढे त्यांना क्रमाने सतेज, शार्दूल व सौरभ अशी तीन मुले झालीत.

केच्यांना बालपणापासून भटकण्याची आवड होती व पुढेही ती आवड वाढतच गेली. भ्रमंतीच्या निमित्ताने आलेले अनुभव त्यांच्या लेखनाचे विषय झालेत. व्याख्यानाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात व परीक्षांच्या निमित्ताने विदर्भात भ्रमंती करण्याचे प्रसंग केच्यांवर आलेत व याचा संपूर्णपणे फायदा एक लेखक म्हणून त्यांनी घेतला. नाट्यस्पर्धेचा परीक्षक म्हणूनही एखाद्या केंद्रावर दीर्घकाळ राहण्याचे योग त्यांना आलेत. त्या काळात केवळ विश्रांतीपुरतेच ते निरुपायाने मुक्कामावर असत बाकी दिवसभर ओळखीच्या लोकांच्या भेटी व अनोळखी लोकांशी संपर्क वाढवीत त्यांचा लोकसंग्रह चालू असे. सर्व परिचित अपरिचितांना आतिथ्याची संधी देणे त्यांना आवडायचे. अशा लोकांच्या माध्यमातून त्यात्या गावाशी आलेला आंतरिक परिचय पुस्तकरूपाने पुनरुज्जीवित करण्याची त्यांना सबय होती. वऱ्हाडातील अशा गाबांनी व घर आणि आपले अंत:करण त्यांच्याजवळ खुले केले व आपल्या शब्दसामर्थ्यातून त्यांनी ते अवघ्या महाराष्ट्राजवळ खुले केले. अमरावती जिल्ह्यातील ‘बरूड’ गाव त्यांनी ‘झोपलेले गाव’ अशा रूपाने असेच लोकप्रिय केले. ‘माझी काही गावं’ च्या रूपाने वैदर्भीय संस्कृतीचा व वऱ्हाडी माणसांचा जवळून परिचय त्यांनी घडवून दिलेला आहे.

केचे ह्यांनी कवितालेखनाची सुरुवात वयाच्या चौदाव्या वर्षांपासून केली. पंधराव्या वर्षी ते पंढरपूरला पायी गेले त्यावेळी सुचलेल्या देवविषयक कल्पनांना विवेकनिष्ठ वळण देऊन, अक्षरछंदाचा वापर करून अतिशय हळुवार व भक्तिभावाने ओथंबलेल्या अभंगांना त्यांनी दिंडी गेली पुढे’ यातून साकार केले. सन १९५५-६० च्या दरम्यान ‘सत्यकथे’तून व त्यानंतर पु.शि.रेगे यांच्या ‘छंद’ मधून त्यांनी अभंग या छंदाला नव्या स्पर्शाने संजीवनी देऊन महाराष्ट्रासमोर आणले. या कवितासंग्रहाने सर्व मराठी जगतात त्यांना जिव्हाळ्याचे मित्र दिलेत. १९५९ साली प्रकाशित झालेला ‘दिंडी गेली पुढे’ हा त्यांचा कवितासंग्रह मराठी मनाला सुखावून गेला. दिंडीनंतर १९६१ ला झालेला त्यांचा ‘पुनवेचा थेंब’ हा कवितासंग्रह त्यातील उच्च प्रतिमा व साध्या शब्दकळेने वैशिष्ट्यपूर्ण व केच्यांचे वेगळेपण सिद्ध करणारा ठरला. त्यानंतर १९६३ मधील आसवांचा ठेवा हा कवितासंग्रह या तीनही कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाने लागोपाठ पुरस्कार देऊन गौरविले आहे.
१९६५ पर्यंत तीन कवितासंग्रहांना लागोपाठ राज्यपुरस्कार मिळाल्यानंतर केचे गद्यलेखनाकडे वळले. त्यातही ‘चेहरे मोहरे’ या व्यक्तिचित्रणाला राज्यपुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्राला परिचित नसणारी व अल्पपरिचित असणारी वऱ्हाडातील साधी आणि सामान्य माणसे आपल्या व्यक्तिचित्रांद्वारे त्यांनी महाराष्ट्राला सुपरिचित करून दिली. त्यांच्या १९६९ साली प्रकाशित झालेले ‘चेहरे मोहरे’, १९६५ साली प्रकाशित झालेले ‘वेगळे कुटुंब’ व १९८८ साली प्रकाशित झालेल्या ‘वऱ्हाडी मंडळी’ या तिन्ही व्यक्तिचित्रांतून वऱ्हाडी मातीचा सुगंध सतत दरवळत राहिला. राजकीय क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींपासून ते खेड्यातील जमीन कसणाऱ्या अडाणी माणसापर्यंत सर्वच ढंगाच्या जिवंत वाटणाऱ्या व्यक्तिरेखा केच्यांनी प्रभावीपणे मांडल्या. केच्यांचे संपर्कविश्व अफाट होते. भेटणाऱ्या व्यक्तीचे बोलणे, त्याचे राहणीमान, स्वभाव यांचे सूक्ष्म निरीक्षण करणे, कार्यक्रम अथवा परीक्षेच्या निमित्ताने सतत प्रवास करून तेथील वातावरणात राहून काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करणे, विनोदी गप्पांचा आनंद घेणे याविषयीच्या त्यांच्या कमालीच्या धडपडीतून त्यांचे ललित गद्य अवतरलेले आहेत. ‘आखर आंगण’ (१९६७),’ एक घोडचूक’ (१९७३), ‘बंदे वंदनम’ (१९७९) आणि ‘पालखीच्या संगे’ या त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनातून व-हाडी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडलेले आहे. केचे ह्यांनी सतत केलेली भ्रमंती व त्यातून आलेल्या उत्कट अनुभवातून भटकंती (१९६८), माझी काही गावे (१९८२), झोपलेले गाव (१९७८) व गांधी परि (१९९१) ही प्रवासवर्णने साकार केली. माणसांना असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे प्रत्ये गावाला त्याची स्वत:ची स्वतंत्र आणि ठसठशीत अशी व्यक्तिरेखा असते हे त्यांच्य व-हाडच्या ग्रामचित्रातून त्यांनी सिद्ध केले, आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रात अद्याप पुरेसे न रूळलेले एक दालन सर्वांसाठी निर्देशित केले.

राष्ट्रसंत तुकडोजींच्या वडिलांच्या जीवनावर लिहिलेली ‘मोती ज्याच्या पोटी’ ही त्यांची कादंबरी त्यांच्यातील प्रतिभावंताएवढीच त्यांच्यातील चिकित्सक अभ्यासकामुळे गाजली व वादाचा विषय ठरली. आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेल्या व १९८२ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या कादंबरीला श्री विद्या प्रकाशनाने पुरस्कारही दिला. राष्ट्रसंतांविषयी त्यांच्या मनात बसत असलेल्या आत्यंतिक आदरभाबाविषयी संशय घेण्याचे धाडस कोणालाही जमले नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा हे केचे ह्यांच्या श्रद्धा-भक्तीचे विषय होते. रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या संप्रदायाशी नाते सांगणारा हा कवी आपल्या साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेत त्या सनातन भक्तिभक्ती भावनेशी कायम नाते जोडून राहिले.
केच्यांनी मराठी भाषेमधून जरी प्रथम लिखाणाची सुरुवात केली असली तर वन्हाडी बोलीवरचे त्यांचे प्रेम कायम होते. १९५६ ला त्यांनी नागपूर आकाशवाणीने प्रसारित केलेली पहिली वऱ्हाडी कथा ‘सोयरिकीचे पाव्हणे’ लिहिली व या कथेने वऱ्हाडी माणसाला एक वेगळा आनंद दिला.

गद्याच्या प्रवाहात हरविलेली त्यांची कविता आपल्या पूर्ण सामर्थ्यासह अनुवादातून पुन्हा १९८२ ते १९८५ या काळात प्रकट झाली. मथुरेचे त्रिलोकीनाथ यांचे ‘इंदू एक बिंदू दो’ (१९८२) हे हिंदी पुस्तक व मध्य प्रदेशाचे चिफ जस्टिस तारे यांच्या ‘पृष्पांजली’ (१९८५) या इंग्रजी काव्यसंग्रहाचा केच्यांनी रसाळ असा अनुवाद केला. प्राचार्य शेवाळकर या अनुवादाबद्दल म्हणतात, “पुष्पांजलीचा अनुवाद वाचल्यानंतर असे वाटते की, मराठी कविताच जणू आधी झाल्या व तारेसाहेबांनी त्यानंतर त्याचे इंग्रजीत भाषांतर केले.

गद्याच्या प्रवाहात हरविलेली त्यांची कविता आपल्या पूर्ण सामर्थ्यासह अनुवादातून पुन्हा १९८२ ते १९८५ या काळात प्रकट झाली. मथूरेचे त्रिलोकीनाथ यांचे ‘इंदू एक बिंदू दो’ (१९८२) हे हिंदी पुस्तक व मध्य प्रदेशाचे चिफ जस्टिस तारे यांच्या ‘पुष्पांजली’ (१९८५) या इंग्रजी काव्यसंग्रहाचा केच्यांनी रसाळ असा अनुवाद केला. प्राचार्य शेवाळकर या अनुवादाबद्दल म्हणतात, “पुष्पांजलीचा अनुवाद वाचल्यानंतर असे वाटते की, मराठी कविताच जणू आधी झाल्या व तारेसाहेबांनी त्यानंतर त्याचे इंग्रजीत भाषांतर केले.

गे तू तर सुजलाम,
पुण्य नद्यांची धरती अन् तुझीच बाळे,
पाणी पाणी करती

यातून त्यांच्या भाषांतराची झलक दिसून येते.

केचे हे वृत्तपत्राचे स्तंभलेखक नव्हते. परंतु जुन्या मध्यप्रदेशातील (महाराष्ट्रासह) मंत्री श्री.पी.के.देशमुख हे आपल्या मुलाच्या मरणरात्री कसे वागले हे चितारणारा त्यांचा लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये आला. तेव्हा दैनिक सकाळच्या परुळेकरांनी आपल्या संपादक मंडळाकडून तो उत्कृष्ट स्तंभलेखक म्हणून अभ्यासून घेतला होता. केच्यांनी ललितकृतीप्रमाणेच सासूरवासाने जळणाऱ्या बाया, उसाच्या तुलनेत सावत्रपणाने विकला जाणारा कापूस, बुवाबाजी, मुक्त विद्यापीठ या विषयांवरही आपली लेखणी चालविलेली आहे. लिहिण्याइतकेच केचे बोलण्यातही वरचढ होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत नव्हे तर इतरही प्रांतात त्यांची व्याख्याने, भाषणे कमालीची गाजली. इंदौर, उज्जैन इत्यादी ठिकाणी समीक्षेवर दिलेली भाषणेही महत्त्वपूर्ण राहिली. पणजीला एकदा त्यांना कोणीतरी विचारले – ‘अलीकडे लोक नाट्यछटा का लिहीत नाही? तर केचे ताडकन म्हणाले, ‘नाटकामध्ये टेलिफोनवरचे जे बोलणे आहे ती नाट्यच्छटा नव्हे काय?’ टेलिफोनचे बोलणे आणि नाट्यच्छटा एकमेकांशी जुळतात हे केच्यांच्या समीक्षणात्मक दृष्टीने पहिल्यांदा रसिकांच्या लक्षात आणून दिले. अनेक कविसंमेलनांचे अध्यक्षपद, सूत्रसंचालन यांतून आयुष्यभर केच्यांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला. खळाळून स्वत:ही हसले आणि इतरांनाही हसविले.

अशाप्रकारे विद्यापीठाची कामे, सरकारी समित्या, शाळा-कॉलेजची समारंभीय व्याख्याने, साहित्य संमेलनातील हजेरी, अनेक कविसंमेलनांचे सूत्रसंचालन याशिवाय विदर्भात आलेल्या महनीय व्यक्तीला विदर्भ दाखविण्याच्या निमित्ताने सातत्याने प्रवास होत असतानाही त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली. यांमध्ये त्यांचे कवितासंग्रह, चरित्रलेखन, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, ललितलेख, कादंबरी, समीक्षा, अनुवाद, संपादित पुस्तके व देवकीनंदन गोपाला’ ही चित्रपटकथा यांचा समावेश होता. याशिवाय विविध नियतकालिकांत प्रसिद्ध केलेले त्यांचे लेख संग्रहित केले तर त्यांची साहित्यसंपदाही पस्तीस पुस्तकांच्या घरात जाणे अशक्य नाही. मुक्ता केचे ह्यांनी तसा प्रयत्न करून ‘अंधाराच्या दारी’ हा कवितासंग्रह ५ नोव्हेंबर २००४ ला प्रकाशित केला. ‘हे भ्रम आभास’ या लेखास अनंत काणेकर पारितोषिक प्राप्त झाले. यासोबतच त्यांच्या प्रवासात्मक लेखांचे ‘सागरली मांडवी’ हेही पुस्तक प्रकाशित झालेले आहे.

केचे ह्यांच्या जीवनप्रवासात त्यांनी समाजातील लोकांचे प्रश्न त्यांच्या दुखावलेल्या, सुखावलेल्या भावना आपल्या संवेदनशील मनाने लेखणीतून प्रकट केल्यात. अप्पर वर्धा धरण होण्याच्या काळामध्ये लोकांच्या दुखावलेल्या भावना शब्दांच्या चिमटीत पकडून केचे ह्यांनी ‘दधिची हाडे’ ही नाटिका लिहिली व ती नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित झाली. याबरोबरच बाभूळगावचे इतिहास संशोधनु होळाचे होळकर, सामान्य रुग्णालय (१९७२) या नाटिका त्यांनी लिहिल्यात. १९७२ ला ‘वसंत’ मासिकामधून ‘सामान्य रुग्णालय’ ही त्यांची नाटिका प्रकाशितही झाली. केचे ह्यांचे नियतकालिकांमध्ये ३२ प्रवासवर्णने, १९ कथा, ४ नाटिका, २७ व्यक्तिचित्रे, ५ ललित लेख प्रकाशित झाले आहेत.

केचे ह्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग म्हणजे केचे ह्यांची कविता स्व.पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांनी प्रशंसली होती तो होय. तसेच आधुनिक जगात ज्यांना मातृपीठ समजले जाते त्या मदर टेरेसा ह्यांच्या हस्ते ‘गाडगे महाराज’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन होणे हा त्यांचा सर्वोच्च गौरव ते समजत. ‘देवकीनंदन गोपाला’ या चित्रपटाची कथा आपल्या पुस्तकावरून घेतली असूनही त्यांचा निर्मात्यांनी कुठेही उल्लेख न केल्यामळे त्यांना धडा शिकवावा म्हणन केवळ १ रुपयाचा दावा न्यायालयात दाखल करून तो जिंकला.

केचे ह्यांना आपल्या हयातीत १९८४ ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त झाला, १९८५ मधे घाटंजी येथील ३७ व्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल झाले. १९९० ला तेल्हारा येथील मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. तसेच केचे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे व महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे सदस्य होते. अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. याबरोबरच विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर ते राहिलेले आहेत. नागपूर विद्यापीठ विधी सभेचे सदस्य, नागपूर विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य, अमरावती विद्यापीठ विद्वत परिषदेचे सदस्य, अमरावती विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे येथील सदस्य व औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण महामंडळाचे ते सदस्य होते.

मधुकर केचे यांचे २५ मार्च १९९३ रोजी निधन झाले.

— डॉ.कोमल ठाकरे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..