नवीन लेखन...

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना हे एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय –

देवीची उपासना करणा-या भक्तगणांचे हे एक महत्वाचे व्रत मानले गेले आहे. नऊ दिवस देवीची पूजा करून दहाव्या दिवशी या व्रताची सांगता केली जाते.

शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणारी आणि महत्व सांगणारी जी पुराणे आहेत त्यामध्ये कालिका पुराण, देवी पुराण, बुह्न्नंदिकेश्वर पुराण यांचा समावेश होतो. दुर्गापूजा आणि तिचे महत्व या पुराणांनी सांगितलेले आहे. मार्कंडेय पुराण देवीचे माहात्म्य विशेषत्वाने वर्णन करते. समाजात माजलेल्या अनाचाराने त्रस्त देवांनी दुष्टांचा संहार करणयासाठी देवीला आवाहन केले.  विष्णू, शिव, अग्नी अशा देवांच्या तेजापासून देवी उत्पन्न झाली, देवांनी तिला आपापली आयुधे आणि शक्ती दिल्या आणि त्याच्याआधारे  देवीने महिषासुर, शुंभ-निशुंभ, रक्तबीज, चंड अशा घोर राक्षसांचा पराभव केला.

या व्रताचे महत्व देवी पुराणात असे सांगितले आहे की जो कोणी हे व्रत करेल त्याला महान सिद्धी प्राप्त होतील. त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होईल. हे व्रत समाजातील सर्वांसाठी विहित आहे.

शरद ऋतूत केल्या जाणा-या देवीच्या नवरात्री व्रताविषयी शूलपाणी रचित दुर्गोत्सव विवेक, किंवा रघुनंदन रचित दुर्गार्चनपद्धती, विद्यापती लिखित दुर्गाभक्तीतरंगिणी, दुर्गापूजा प्रयोगतत्व असे काही ग्रंथ भाष्य करतात.

हिंदू धर्मामध्ये देवतेचे महत्व सांगणा-या विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत. नवरात्र व्रताचे महत्व सांगणारी  रामायणाशी संबंधित  एक आख्यायिका अशी सांगितली जाते- वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले. शोकग्रस्त राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधता फिरू लागले. या काळात नारदांनी रामाला सांगितले की सीतेच्या पूर्वजन्मात ती एका मुनींची कन्या होती.  रावण तिच्यावर मोहित झाला. पण सीतेने त्याला नकार दिला. त्यामुळे रावण चिडला आणि त्याने सीतेवर बळजबरी करून तिला तो ओढत नेऊ लागला. त्यावेळी चिडलेल्या सीतेने त्याला शाप दिला की तुझा नाश करण्यासाठी मी पुढचा जन्म घेईन आणि त्यावेळी श्रीरामाच्या हातून तुझा वध होईल.

या कथेला अनुसरून रामाने रावणाचा वध करावा यासठी नारदांनी रामला नवरात्रव्रत करायला सांगितले. ते व्रत रामाने केल्यावे देवी त्याला प्रसन्न झाली आणि अष्टमीच्या रात्री देवीने रामाला आशीर्वाद दिला की “तुझ्या हातून रावणाचा वध होईल.” त्यानंतर रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध  केला  आणि सीतेची मुक्तता केली.

देवीच्या कृपेने दुष्ट प्रवृत्तीचा संहार करण्याचे सामर्थ्य श्रीरामाला उपासनेने प्राप्त झाले हा बोध या कथेतून घेण्यासारखा आहे. या नवरात्री व्रतामुळे देवीची कृपा होते आणि भक्ताला धन, धान्य, समृद्धी आणि विजय प्राप्त होतो असे या व्रताचे फल सांगितले गेले आहे.

मध्ययुगीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु होत असे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी नोंदविले आहे.  सुजलां सुफलां भूमी सृजनाने न्हावून निघालेली असताना नव्या वर्षाचे आगमन औचित्यपूर्ण असच असे. देवीच्या नवरात्रीचा हा सोहळा  अतिशय सूचक असाच आहे. हे  केवळ नऊ रात्री करण्याच देवीच पूजन नाही ; तर विविध रूपे धारण करणा-या  लक्ष्मीचे गुण आपल्यातही  यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे हे दिवस आहेत.

मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे-  “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत  देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास  सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि प्रत्येक जीवाच्या इंद्रियांना व्यापणारी ही शक्ती नवरात्रीत भक्ताच्या पूजेचा स्वीकार करते.

नवरात्री व्रताचे स्वरूप असे- घरातील पवित्र जागेवर किंवा देवघरात घटस्थापना करावी. एक वेदी तयार करून स्वस्तिवाचन म्हणजे कल्याणकारी मंत्र आणि श्लोकांचे पठन करून तिथे सिंहावेर बसलेल्या अष्टभुजा देवीची स्थापना करावी. मूर्ती उपलब्ध नसेल  तर नवार्ण यंत्राची स्थापना करावी. देवीच्या शेजारी एक कलश म्हणजे घट ठेवावा, अखंड नंदादीप चेतवावा आणि त्याची नऊ दिवस पूजा करावी. या नऊ दिवसात चढत्या क्रमाने देवीला झेंडूच्या फुलांच्या माला बांधतात. दुरडीमध्ये सात किंवा नऊ प्रकारची धान्य घेवून ती मातीत पेरतात. ही दुरडी देवाशेजारी ठेवली जाते. नऊ दिवस या दुरडीत पाणी शिंपडले जाते. दहाव्या दिवशी तरारलेल्या रोपांचे पूजन केले जाते. ती देवीला वाहिली जातात आणि पुरुष पागोटा किंवा फेट्यावर हे धान्य देवीचा प्रसाद म्हणून खोचतात. महिलाही आपल्या केशरचनेत हे वाढलेले अंकुर माळतात.

घट किंवा कलश हा पावित्र्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. दुर्गार्चनापद्धती या ग्रंथात घटाच्या स्थापनेचा विधी सांगितला आहे- मातीची वेदी तयार करावी. ती शेणाने सारवावी. तिच्यावर गहू इत्यादी धान्ये पसरावी. त्या ठिकाणी सोने, चांदी, तांबे यापैकी जो उपलब्ध असेल तो कलश ठेवावा. तो पाण्याने भरावा. त्या पाण्यात चंदन, दूर्वा, फळे, रत्ने, सोने घालावे. कलशाभोवती वस्त्र  बांधावे. त्यावर एक पूर्णपात्र किंवा ताम्हन ठेवून त्यात तांदूळ भरावेत. या ठिकाणी जलदेवता वरुणाचे पूजन केले जाते आणि देवीचे आवाहनही या कलशावर केले जाते. सोळा उपचारांनी तिची पूजा, अभिषेक आणि प्रार्थना केली जाते.

देवीच्या नवरात्री व्रतात सप्तशती ग्रंथाचे पठन, श्री सूक्ताचे पठन,होम हवन आणि काही प्रांतात देवीला बळी अर्पण करतात. भक्ताने नऊ दिवस उपवास करून हे व्रत करावयाचे असते. काही वेळा धान्य भाजून त्याचे शिजविलेले पदार्थ खाल्ले जातात किंवा एकभुक्त राहून हे व्रत केले जाते.

देवीचे स्तवन करताना समर्थ रामदास म्हणतात-  नवरात्रीमधे निर्माणकर्ता ब्रह्मा, रक्षणकर्ता विष्णु , आणि प्रलयकर्ता  शिव मातृरूपातील देवीचे पूजन करतात प्रतिपदेला. द्वितीयेच्या दिवाशी उग्ररूप धारण केलेल्या  योगिनी शेंदूर भरून,  कस्तुरी  लेवून दुर्जनांचा पराभव करण्यासाठी धावून जातात. मातेच्या वात्सल्यात  आणि पराक्रम –पुरुषार्थात सामावलेली अष्ट्भुजा देवी तृतीयेला स्त्रीसुलभ  मनमोहक  रूप धारण करून सजतेही !  अलंकारांनी स्वत:ची शोभा  वाढविते. विश्वाला  व्यापणारी  जगन्माता , वर देणारी  पंचमीला पूजिली जाणारी ललिता  ही सुद्धा  देवीची साजिरी-गोजिरी  रूपे !ष्ठीला जोगवा मागताना ही देवी षडरिपूंचा  त्याग करून  लीन व्हायला शिकविते. सप्तमीला  भक्तांच्या हाकेला  धावून जाते. अष्टमीला आठ भुजांमधे प्रत्येकी  खड्ग, चक्र,गदा, धनुष्य-बाण , शूल, भृशुण्डी, मस्तक, व शङ्ख धारण करून  नारायणाच्या साहचर्याने  विश्वाचे कल्याण करते.

देवीची उपासना करण्यासाठी महत्वाचे मानले गेले आहे ते वैदिक श्री सूक्त. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाच्या परिशिष्टात ते आले आहे. यामध्येही देवेचे जे गुणवर्णन आले आहे ते प्रत्येक स्त्रीला आदर्श वाटावा असेच आहे. उपासक देवीला प्रार्थना करतो की माझे मालिन्य आणि लोभ, मोह तू दूर कर. पण ही प्रार्थना वस्तुतः प्रत्येक स्त्रीने करावयास हवी.

श्रीसूक्त हे देवीची विविध रूपे आपल्यासमोर मांडते. यातील देवी ही आत्मतृप्ता, गंधयुक्त , नेहमी संतुष्ट,अशी आहे.

चिक्लीत आणि कर्दम म्हणजे चिखल आणि मातीचा ओलावा यांच्यामुळे लक्ष्मी ही पुत्रवती झाली आहे. भारतातील कृषी संस्कृतीत लक्ष्मीच्या या रूपाचे वर्णन अतिशय महत्वाचे ठरते. लक्ष्मी म्हणजे केवळ भौतिक संपत्ती नाही तर मला धान्य देणारी माझे भूमी ही सुद्धा माझी लक्ष्मीच आहे. देवीपाशी पेरलेली धान्ये ही जणू पुढील काळात शेतीसाठी वापरावयाची अंदाज घेण्याची पद्धती असावी. जे धान्य सर्वात जास्त तरारेल ते पुढील रब्बी हंगामात शेतात लावावे असेही सूचन यामागे आहे.

नवरात्री काळात साजरा होणारा कुमारिका मुलींचा भोंडला हे कृषी संस्कृतीचे प्रतीकच मानला जातो. हस्ताचा पाऊसपडल्याने सुजला सुफला झालेली भूमी मन आल्हादित करणारी आहे त्यामुळे भोंडला करताना हत्तीच्या भोवती फेर धरला जातो.

शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात  विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रात्री  ज्ञानाचा अखंड नंदादीप  तेवता ठेऊन ज्ञानरूपी घटातच ती साधना करते, शक्तीसंचय करते आणि झळाळत्या ज्ञानाने व मूर्तिमंत पौरुषाने निघते जग जिंकायला विजयादशमीला !

देवीची हे नऊ दिवसांची उपासना ही व्यक्तीविकासाला बळ देणारी, समाजमन जोडणारी अशीच आहे. त्यामुळे नवरात्री काळात देवीची उपासना करताना तिचा एक तरी गुण माझ्यात यावा यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुष भक्ताने प्रयत्न करायला हवा. देवीची उपासना न करता ज्ञानाचा नंदादीप अखंड आपल्या मनात तेवत रहावा आणि देवीच्या विविध सामर्थ्यांचे प्रकटीकरण आपल्यातून ही व्हावे ही खरी उपासना ठरावी.

— आर्या आशुतोष जोशी 

Avatar
About आर्या आशुतोष जोशी 21 Articles
संस्कृत विषयातील विद्यावाचस्पती पदवी. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास या विषयातील संशोधन आणि लेखन, व्याख्याने आणि शोधनिबंध

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..