नवीन लेखन...

अशोक पत्की – जिंगल्स किंग

पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर! अशी तब्बल २५ वर्षे मी या क्षेत्रात काम केलेलं आहे. माझं स्वत:चं, त्याचबरोबर पी. वैद्यनाथन्, वनराज भाटिया, सुरेशकुमार यांचीही कामं त्यात असायची. एक वादक म्हणून मी भरपूर काम केलंय या मंडळींबरोबर! पूर्वी अशी पद्धत प्रचलित होती, की एकाच जिंगल्सच्या तीन- तीन चाली आम्हाला लावाव्या लागत. त्यातली मग क्लायंट आणि एजन्सीला कोणती आवडलीय, हे ते फोनवरून सांगत. त्यांच्या पसंतीस उतरलेली जिंगल मग दुसऱ्या दिवशी ध्वनिमुद्रित केली जाई.
स्ट्रँड सिनेमा (कुलाबा) येथे एक स्टुडिओ होता. आर. टी. व्ही. सी. नावाने तो प्रसिद्ध होता. कुसूम कपूर व रावसाहेब यांचा तो स्टुडिओ होता. रावसाहेबांचे टुरिस्ट हॉटेल कोल्हापुरात खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे त्याकाळी जिंगल्ससोबत अध्र्या तासाचे जाहिरातींचे रेडिओ प्रोग्रॅमही व्हायचे. मराठीमध्ये ‘राघू-मैना’ व हिंदीत ‘तोता-मैना’! त्यात सर्व बडी माणसं ‘ड्रामा’ करायची. छोटी छोटी गाणीही त्यात असत. तबस्सुम, सुधा चोपडा, हरीश भिमानी, विनोद शर्मा, विजय बहेल अशी त्यावेळची मातब्बर निवेदक मंडळी त्यात असायची. आणि गाणं आलं की ती स्वत:च गायचीदेखील! गाण्यांना चालीही मी तिथल्या तिथे लावून त्यांना शिकवायचो आणि रेकॉर्ड करायचो. दिवसभरात असे दोन प्रोग्रॅम होत. म्हणजे जवळजवळ १५ ते १६ गाणी!

एकदा गंमतच झाली. मला दोन-अडीचपर्यंत ताप होता. मी कुसुमजींना फोन केला, की मला ताप आहे, मी नाही येऊ शकणार. उभं राहायचीही मला ताकद नव्हती. त्या म्हणाल्या, ‘आता कसं होणार? दोन्ही प्रोग्रॅम आज रात्रीच रेडिओला पाठवायचे आहेत. उद्या ब्रॉडकास्टिंग आहे. तू टॅक्सी कर आणि इथे ये.. प्लीज!’ मलाही त्यांची अडचण कळत होती. मी अंगात ताप असताना तसाच गेलो. त्यांनी माझ्या हातात स्क्रिप्ट दिलं. मी तो दिवस अक्षरश: झोपून पेटीवर कम्पोझिशन केलं आणि त्यांना शिकवलं. तापाने फणफणलेला असूनही मी दिवसभर काम केलं. सगळ्यांना माझं भारी कौतुक वाटलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या एपिसोडला ‘फ.अ.ढ.अ.’ चा सवरेत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळाला मला!

सिनेमातल्या पाच मिनिटांच्या एखाद्या गाण्याला चाल लावणं म्हटलं तर सोपं असतं. तुम्हाला आठ-दहा दिवस आधी हातात गाणं मिळतं. त्यावर विचार करायला भरपूर वेळ असतो. निर्माता, दिग्दर्शक व कवीबरोबर त्यावर चर्चा होते. विचारांची देवाणघेवाण होते. आणि मग गाणं ध्वनिमुद्रित होतं. या साऱ्यासाठी वेळच वेळ असतो. नाटकाचंही तसंच असतं. पण जिंगल म्हणजे तुमची खरी सत्त्वपरीक्षा असते. सर्व काही उत्स्फूर्तपणे तिथल्या तिथे करावं लागतं. तीच जिंगल जर दुसऱ्या भाषेत करायची असेल तर त्याच मास्टर ट्रॅकवर प्रत्येक भाषेतल्या स्क्रिप्ट रायटरबरोबर बसून नव्याने जिंगल तयार करावी लागते. त्याच मूळ ‘मीटर’मधला त्या- त्या भाषेतला चपखल शब्द अनुवादकाला त्याकरता शोधावा लागतो. त्यानंतर गायकाला त्याचं उच्चारण शिकवावं लागतं. अमूक एक शब्द उच्चारताना जीभ कुठे लावावी? टाळ्याला की दातांना? वगैरे बारीकसारिक गोष्टी त्याला शिकवाव्या लागतात. कविता कृष्णमूर्तीला दक्षिणी भाषा तसेच बंगाली, ओडिशा, आसामी, हिंदी, इंग्लिश उत्तम अवगत असल्यामुळे तिला याचा त्रास होत नाही. पण विनय मांडके, सुषमा श्रेष्ठ, प्रीती सागर, विनोद राठोड यांना अन्य भाषांतील जिंगल्ससाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

काही एजन्सीवाल्यांना काही नवीन प्रयोग करण्याच्या भरात वाटतं की, दहा-बारा सेकंदात एखादी जिंगल करायची तर त्यात कठीण ते काय? आपण अनू मलिक वा भप्पी लाहिरींकडून ती करून घेऊ. एकदा असे एक-दोघेजण गेले त्यांच्याकडे. पण ते म्हणाले, ‘आपको टय़ून सुनाते है. लेकिन वह डेढ- दो मिनिटसे कम नहीं होगी.’ आम्हाला मात्र आता जिंगल्स निर्मितीची इतकी सवय झाली आहे, की जणू रक्तातच भिनलं आहे ते! अर्थात हा सवयीचा परिणाम आहे. मला झटपट चाल लावण्याची सवय लागली ती जिंगल्समुळेच! हातात कागद पडला की दहाव्या मिनिटाला माझी चाल तयार असते. माझी एक खासियत आहे. पेटीवर हात ठेवून सूर छेडता छेडता ओठांवर कधी हसू यायचं तेच कळायचं नाही. विनय मांडकेने याचा अभ्यास केला होता. माझ्या तोंडावर हास्य दिसलं, की तो ओळखायचा, की अशोकला हवी ती चाल सुचली आहे!

अशोक पत्की
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..