नवीन लेखन...

अन्नधान्याच्या लागवडीला हवे प्राधान्य

राज्यात आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, यावेळी ज्वारीचे उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित असताना पहायला मिळणारी घट चिंताजनक आहे, याचा शेतकर्‍यांनी विचार करायला हवा. त्यामुळे पर्यायी पिकांची लागवड करताना अन्नधान्याच्या लागवडीलाही महत्त्व द्यायला हवे आहे.

या वर्षी पाऊस परतला असे म्हणता-म्हणता काही भागात त्याने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्याच पण काही ठिकाणी पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला. विशेषत: कोकणात झालेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देशापुढे अगोदरच अन्नधान्याच्या उत्पादनवाढीचे आव्हान उभे असताना या नव्या समस्येची भर पडली. याचा परिणाम म्हणून या वर्षी भाताचे उत्पादन घटणार हे उघड आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्य भागातील रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीचा विचार करायला हवा. वास्तविक आपल्याकडे खरिप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम आहेत. त्यातही ज्वारी, गहू यासारखी अन्नधान्याची पिके रब्बी हंगामात घेतली जातात. त्यामुळे या हंगामाला वेगळे महत्त्व आहे.

राज्यात यावेळी पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. तसेच मध्यंतरी थंडीही जाणवत होती. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांसाठी वाफसा मिळणे कठीण झाले. परिणामी, रब्बीच्या पेरण्या रखडल्या. आता पावसाने माघार घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या पेरण्यांना वेग आला. राज्यातील रब्बी हंगामातील पन्नास टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या. ज्वारी तसेच करडईच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून गहू आणि हरभर्‍याच्या पेरण्या वेगाने सुरू आहेत. एकूण पिकांच्या लागवडीचा विचार करता या रब्बी हंगामात राज्यातील ज्वारीच्या उत्पादनात घट होणार असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी गहू आणि हरभर्‍याच्या उत्पादनात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.

ज्वारी हे गरिबांचे अन्न. सर्वसाधारणपणे इतर अन्नधान्यांच्या किमतींच्या तुलनेत ज्वारीच्या किंमती बर्‍यापैकी कमी रहातात. त्यामुळे सर्वसामान्य स्थितीतील नागरिकांना ज्वारीची खरेदी करणे सहज शक्य होते. गव्हाचा वापर मात्र मध्यमवर्गीय तसेच उच्चवर्गीयांमध्ये होत असल्याचे दिसते. वास्तविक ज्वारीला आरोग्यदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. ज्वारी पचायला हलकी असते. शिवाय त्यात अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्वे आढळून येतात. त्यामुळे दिवसातील आहारात किमान एकदा भाकरीचा समावेश हवाच असे सांगितले जाते. ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्र सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना तर ‘ज्वारीचे कोठार’ असे संबोधले जाते. याचे कारण या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. ही ज्वारी राज्यातील इतर भागांप्रमाणेच अन्य राज्यांमधील बाजारपेठांमध्येही विक्रीसाठी पाठवली जाते. ज्वारीला देशाच्या विविध भागात मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. आता तर परदेशी नागरिकही ज्वारीची भाकरी आवडीने खाऊ लागले आहेत. त्यामुळे ज्वारीच्या निर्यातीस वाव मिळत आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणारी मागणी आणि मिळणारा चांगला भाव लक्षात घेता ज्वारीच्या लागवड क्षेत्रात आगामी काळात वाढ होणे अपेक्षित आहे.

असे असले तरी प्रत्यक्ष चित्र फारसे आशादायक नाही. ज्वारी हे कोरडवाहू क्षेत्रातील पीक समजले जाते. पण अलीकडे सिंचन क्षेत्रातील वाढीमुळे ओलिताखाली आलेल्या जमिनींचे क्षेत्र वाढले असल्याने कोरडवाहू क्षेत्रात घट झाली आहे. याचा परिणाम ज्वारीच्या लागवडीवर होत आहे. अधिक पाण्याची आवश्यक असणारी आणि चांगला भाव मिळवून देणारी पिके घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. उदाहरण द्यायचे तर गेल्या काही वर्षांत राज्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कमी परिश्रमात येणारे आणि अधिक भाव मिळवून देणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. याच कारणामुळे पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणचे शेतकरी उसाच्या लागवडीला प्राधान्यक्रम देताना दिसतात. याचा परिणाम म्हणून अन्य पिकांच्या लागवडक्षेत्रात घट होत आहे. देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्या मानाने अन्नधान्याचे उत्पादन वाढणे गरजेचे आहे. पण तसे होत नसल्यामुळे अन्नधान्याची आयात करणे भाग पडते. ही परिस्थिती पाहता एकेकाळी भारत जगातील अनेक देशांना अन्नधान्य पुरवत होता या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे अशक्य होते.

परदेशातून आयात केल्या जाणार्‍या अन्नधान्याबाबत अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. एक तर हे अन्नधान्य अत्यंत चढ्या दराने आयात केले जाते. त्याची आपल्याकडील बाजारपेठेतील किंमत अधिक असते. असे अन्नधान्य खरेदी करणे गोरगरिबांच्याच नव्हे तर र्सामान्यांच्याही आवाक्यापलीकडचे ठरते. या पार्श्वभूमीवर वारंवार परदेशातून अन्नधान्य आयात करायची वेळ आल्यास गोरगरिबांनी खायचे काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्नधान्याच्या देशांतर्गत उत्पादनवाढीबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.

बदलत्या काळानुरुप कमी कालावधीत येणारी आणि अधिक उत्पन्न मिळवून देणारी पिके घेणे भाग असले तरी पारंपरिक पिकांची लागवड तितकीच महत्त्वाची ठरते. शिवाय अलीकडे संकरित बियाण्यांबाबतही काही समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याचा विचार करता पिकांच्या परंपरागत वाणांचा वापर वाढायला हवा आहे. याचा विचार करता या रब्बी हंगामात ज्वारीच्या पारंपरिक जातीच्या वाणांच्या लागवडीवर शेतकर्‍यांनी लक्ष केंद्रीत करावे असे सुचवावेसे वाटते. राज्यात ज्वारी, हरभरा, गहू, करडई, सूर्यफुल या पिकांच्या तुलनेत अजूनही मक्याच्या लागवडीखालील क्षेत्रात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. राज्यात मक्याचे सरासरी क्षेत्र 71 हजार 800 हेक्टर इतके आहे तर ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्र 30 लाख 86 हजार 100 हेक्टर इतके आहे. बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये खरिप, भात पिकाची काढणी केल्यानंतर रब्बीचे पीक घेतले जाते.

अशा परिस्थितीत नैसर्गिक वा अन्य कारणाने खरिपाच्या पिकांची काढणी लांबली तर रब्बीच्या पिकांची लागवडही लांबणीवर पडते. या वेळी काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. अवकाळी तसेच लांबलेल्या पावसाचा फटका जसा खरिपाच्या पिकांना बसला तसाच दुष्परिणाम थंडीचा कडाका वाढल्यास किंवा अन्य नैसर्गिक संकट उद्भवल्यास होणार आहे. तरिही ढोबळ मानाने पिकांच्या उत्पादनाचा अंदाज काढता येतो. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात तर ही बाब सहजशक्य झाली आहे. दुर्दैवाने कृषी क्षेत्रातील अचूक अंदाजाबाबत हे तंत्रज्ञान फारसे वापरले जात नाही किंवा त्यातून समोर आलेले निष्कर्ष सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे पिकांचे उत्पादन, त्यांना असणारी मागणी, अपेक्षित भाव याचे गणित कोठेच जुळवता येत नाही. कृषी क्षेत्रातील दुरवस्थेचे हेसुध्दा एक कारण आहे.

(अद्वैत फीचर्स)

— अभय अरविंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..