नवीन लेखन...

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

पारिजातकाचे शात्रीय नाव Nyctanthes arbor – tristis आहे. ही भारतात उगवणारे एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे.

पारिजातक हा साधारण मध्यम उंचीचा किंवा लहान भारतीय वृक्ष. कोणत्याही प्रकारच्या मातीत आणि कमी पाण्यातदेखील वाढणारे हे सदाहरित झाड. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवतो व यास “प्राजक्त” म्हणूनही ओळखतात. आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. याच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्या एवढी मोठी, काळपट, खरखरीत तसेच काहीशा कातरलेल्या कडा असलेली असतात. (काही वेळेला पानाच्या कडा कातरलेल्या नसतात किंबहुना कधी कधी एकाच झाडावर दोन्ही प्रकारची पाने पाहायला मिळतात). याचे पानावर टोकाकडून देठाकडे बोट फिरविल्यावर, त्यावर काटे असल्याचा भास होतो.

पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे.

याची फुलं म्हणजे सौंदर्य आणि सुगंध याचा उत्तम मिलाफ आहे. ही फुलं पांढ-या पाकळ्याची आणि देठ केशरी रंगाचे असतात. अत्यंत नाजुक असे हे फुल हातात घेतले की लगेच सुकते. पारिजातकाची फुले रात्री उमलतात; त्यांचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा असतो.

प्राजक्तांच्या फुलांना साधारण ४ ते ८ पाकळ्या असतात. पाकळ्या टोकाकडे किंचीत दुभंगलेल्या असतात. पिंगट पांढरी फुले , नाजुक केशरी देठ, आणि मधुर सुवास आपल्याला हरखुन ठेवतो. ह्या फुलांचा देठ गडद भगव्या रंगाचा असतो. ही रंगसंगती खूप सुंदर दिसते. ही फुले इतकी नाजूक असतात की त्यांना खूप हळुवारपणे हाताळावे लागते. जरासुद्धा धसमुसळेपणा या फुलांना सहन होत नाही. फुले रात्री उमलतात नि पहाटे सूर्योदयापूर्वी देठासकट गळून पडतात. सकाळी ही फुले ताजी असतात आणि दुपार झाली की कोमेजतात. झाडावर पारिजातकाचे फूल पाहायचे असेल तर रात्रीच त्याला भेटावे लागेल. सकाळी फुलांचा जमिनीवर सडा पडलेला असतो. देवाला वाहण्यासाठी ही फुले वापरली जातात व ते पाहून मन प्रसन्न होते. हे झाड हलवले की ही फुले टप टप खाली पडतात. वर्षभर फुले येत असली तरी पावसाळ्यात याला विशेष बहर येतो. पारिजातकाची फुले गोळा करून गणपती बाप्पाला त्याचा हार, कंठी, बाजुबंद बनवला जातो. पारिजातकाच्या बिया चपटय़ा; आधी हिरव्या नंतर पक्व झाल्यावर त्या चॉकलेटी रंगाच्या होतात. बियांपासून नवीन रोपांची निर्मिती होते, तसेच फांद्यांपासूनदेखील नवीन रोपे तयार करता येतात.

पौराणिक महत्व :

वैदिक परंपरेप्रमाणे हरिवंशात व नंतर ब्रह्म वगैरे पुराणांत पारिजातकाचे आख्यान सापडते. अमृतमंथनाच्या आख्यानात चौदा रत्नांपैकी हे रत्न असून समुद्रातून निघालेला हा वृक्ष देवांनी स्वर्गात नेला असा उल्लेख आढळतो. हरिवंशात सत्यभामेच्या रुसण्याचे सुप्रसिद्ध वर्णन आहे.

पारिजातका विषयी बऱ्याच आख्याईका आपल्या संस्कृतीत ऐकीवात आहेत. जसे की एकदा देवर्षी नारदाने, श्री कृष्णाला पारिजातकाची फुले भेट म्हणुन दिली. श्री कृष्णाला ती खुप आवडली. त्यांनी ती रुक्मिणीला दिली. रुक्मिणी पारिजातकाची फुले पाहुन हरखुन गेली आणि तिने लगेच ती आपल्या केसात माळली. ही वार्ता सत्यभामे पर्यंत पोहचताच तीला खुप राग आला आणि तिने श्री कृष्णाजवळ हट्टच धरला की मला हा वृक्ष आपल्या वाटीकेत लावायचे आहे. श्री कृष्णाचे सत्यभामेच्या हट्टा पुढे काही एक चालले नाही.त्याने इंद्राशी युद्ध करुन हे वृक्ष मिळवला आणि सत्यभामेने ते मोठ्या आनंदाने आपल्या वाटिकेत लावला. पण झाले असे की वृक्ष सत्यभामेच्या वाटिकेत आणि फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असे. त्यामुळे देखिल सत्यभामेचा, रुक्मिणी बद्दलचा मत्सर वाढतच गेला..

तसेच पारिजातका संदर्भात अजुन एक कथा ऐकायला मिळते, ती म्हणजे पारिजात नावाची एक राजकन्या होती. तिचे सुर्यावर अतोनात प्रेम होते. तिच्या लाख प्रयत्ना नंतर देखिल ती सुर्यदेवाचे मन जिंकु शकली नाही. आणि सुर्यदेवाचा नकार हा तिच्या आत्महत्येस कारणीभुत ठरला. असे म्हणतात की तिच्या अस्थींच्या राखेतुन ह्या वृक्षाचा उगम झाला. म्हणुन या झाडाचे नाव पारिजात. या झाडाची फुले रात्रीच उमलतात आणि रात्रीच गळुन पडतात. असे वाटते की रात्र भर हे झाड फुलांचे अश्रु ओघळत असते. सुर्योदयाच्या पुर्वी जवळ जवळ सगळी फुले गळुन पडलेली असतात. जणु काही सुर्यदेवावर चा राग हे झाड व्यक्त करत असते. म्हणुन ह्या झाडाला The Tree of sorrow / The Sad Tree म्हणुनही ओळखतात.

पारिजात वृक्ष नसुन “रत्न” आहे, जे समुद्र् मन्थनातुन उत्पन्न झाले आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, ऐरावत, चंद्र अशी एकामागून एक अमूल्य रत्ने समुद्रातून बाहेर पडत होती. देव आणि दानव शर्थीचे प्रयत्न करून समुद्रमंथन करीत होते. त्यातून अकरावे रत्न बाहेर आले, ते म्हणजे पारिजातकाचे झाड. अशी पारिजातकाच्या जन्माची कथा सांगितली जाते. पुढे इंद्र देवाने ते स्वर्गलोकात जाऊन लावले असा उल्लेख हरिवंश पुराणातही आहे. असे म्हणतात की स्वर्ग लोकातली अप्सरा “ उर्वशी”, तिचे नर्तन झाल्यावर आपला थकवा या झाडाला स्पर्श करुन घालवीत असे.

वेंकटेश सुप्रभातमच्या तिसऱ्या चरणात ( प्रपेती ) पारिजातकाचे सुंदर वर्णन केले आहे.

स्वामिन् सुशील सुलभाश्रितपारिजात
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २॥

हे वेंकटेश, तू आश्रितांच्या इच्छा पूर्ण करणारा पारिजात आहेस.

मराठी साहित्यातील पारिजात :

‘बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी’ हे एक मराठी नाटकातील गाणे आहे. ‘सुवर्णचंपक फुलला विपिनीं, रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा मनीचा मावळला…’ पारिजातकाचे हे वर्णन त्याच्या गुणांना साजेसे आहे. ‘आज अचानक असे जाहले सांजही भासे मला सकाळ, प्राजक्ताच्या आसवंत सखि, सवें मौक्तिकें आणि प्रवाळ!’ असे कवी बा.भ.बोरकरांनी ह्या फुलांचे समर्पक वर्णन केले आहे.

पारिजात नाव घेताच सुगंध दरवळतो. पहाटे चे मंद मंद आसमंत, गार वारा, कोवळे उन आणि त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा सारेच कसे सुखद, आल्हाददाई वाटते.
हे गणपतीच्या आवडते फुल तर आहेच पण श्री कृष्णाला देखिल तितकेच प्रिय आहे. असे म्हणतात की लक्ष्मी पुजनात ह्या फुलांना विशेष स्थान आहे. बंगाली लोक दुर्गा पुजेत ही फुले आवर्जून वाहतात. मल्हारी मार्तंडाला देखिल हे फुल वाहतात याचा उल्लेख मल्हार पुराणात ही आहे. लक्ष्मी देवतेला प्रसन्न करण्यासाठी पारिजातकाची फुले अर्पण केली जातात. या झाडावरुन पूजेसाठी फुले तोडणे निषिद्ध मानतात. केवळ जमिनीवर पडलेली फुलेच पूजेसाठी वापरावी, असे म्हटले जाते. १४ वर्षांच्या वनवासात सीता पारिजातकाच्या फुलांनी स्वत:चा साजशृंगार करायच्या, असे म्हणतात.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील पारिजातकाचा वृक्ष हा महाभारताच्या काळातील असल्याचे मानले जाते. तो सुमारे ४५ फूट उंच आहे. अज्ञातवासात असताना कुंतीने पारिजातकाच्या फुलाने शिवशंकराची उपासना करण्याची इच्छा व्यक्त केली. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनाने हे झाड स्वर्गातून आणले आणि तिथे लावले. तेव्हापासून या झाडाची पूजा केली जात आहे. अशीहि एक आख्यायिका आहे.

संस्कृत मध्ये पारिजातका बद्दल एक प्रसिद्ध श्लोक आहे. त्यात पारिजातकाच्या छायेचे उत्तम वर्णन केले आहे. “छायायाम पारिजातस्य, हेम सिंहासनो परी” याचा अर्थ असा आहे कि सोन्याच्या सिंहासनावर बसण्यापेक्षा पारिजातकाच्या छायेखाली बसणे केंव्हाही श्रेष्ठ आहे.

पारिजातकाचे उपयोग :

याच्या गडद भगव्या देठापासून रंग तयार करतात; हा रंग रेशीम तसेच कपडय़ांना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग म्हणून वापरला जातो, तसेच लिपस्टिकमध्ये देखील हा रंग वापरतात. दिवसा फुलांचा रंग फिकट तर रात्री गडद दिसतो. पारिजातकाची फुले औषधात वापरली जातात.

याच्या पानांचे आयुर्वेदात प्रचंड उपयोग नमूद केलेले आहेत. कोणत्याही प्रकारच्या तापावर या पानांचा काढा हा अत्यंत गुणकारी मानला जातो. मलेरियात विशेष करून पारिजातकाच्या पानांचा काढा दिला जातो. तसेच संधिवात आणि आतडय़ातील जंतावरदेखील हा काढा गुणकारी आहे. पारिजातकाच्या पानांचा रस हा कफावर गुणकारी आहे. रोजच्या चहात पारिजातकाचे एक/ अर्धे पान टाकून प्यायल्यास अनेक विकारांपासून सहज मुक्ती मिळू शकते. पारिजातकाची साल पावडर करून सांधेदुखीत वापरली जाते, तसेच ती तापातदेखील गुणकारी आहे.

फुलांपासुन खाण्याचा पिवळा / केशरी रंग तयार केला जातो. तसेच पुष्पौषधी मधे देखिल याच्या फुलांचा अर्क/तेल वापरले जाते. तसेच फुलांपासुन विविध प्रकारची अत्तरे आणि सौन्दर्य प्रसाधने तयार केली जातात. पारिजात फुलापासून हर्बल तेल देखील तयार करण्यात येते. या फुलांमध्ये सूजनिवारक (अँटी इन्फ्लेमेटरी) गुणधर्म आहेत. ज्यामुळे शारीरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते. याच्या तपकीरी हृदयाकार बिया, त्या सुद्धा बहुगुणी. बियांची पावडर करुन त्या पासुन कृमी नाशक, तसेच केसातील कोंडा आणि त्वचा रोगांवरील औषधे तयार केली जातात.

औषधी तेलामध्येही या फुलाचा वापर केला जातो. पारिजातच्या पानांपासून तयार केलेला हर्बल टी आरोग्यासाठी लाभदायक असतो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. या हर्बल चहातील घटक शरीराचा थकवा दूर करण्याचे कार्य करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेलाचा वापर केल्यास शारीरिक दुखण्यापासून तुम्हाला आराम मिळतो.
सोबतच डेंग्यू झालेल्या रुग्णाची हाडे भरपूर प्रमाणात दुखतात. ही त्रासदायक समस्या दूर होण्यास बराच वेळ लागतो. असह्य वेदनेमुळे रुग्णाचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो. या दोन्ही प्रकारच्या दुखण्यातून आराम मिळावा, यासाठी तज्ज्ञांकडून पारिजात फुलाचे तेल वापरण्याचा सल्ला दिला होता. पण डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरच या तेलाचा वापर करावा, ही बाब लक्षात ठेवावी.

तेल असतं अँटी अ‍ॅलर्जिक

पारिजात फुलाच्या तेलामध्ये अँटी अ‍ॅलर्जिक गुणधर्म असतात. याच कारणामुळे सौदंर्य प्रसाधने, बॉडी सीरम इत्यादी उत्पादनांमध्ये या फुलाच्या तेलाचा वापर केला जातो. पारिजातच्या बिया, पाने आणि फुलांमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. एखादी जखम भरण्यासाठीही या फुलाचा लेप वापरला जातो.

दररोज त्याची एक बी घेतल्याने मूळव्याध बरा होतो असे म्हणतात. त्याची फुलं हृदयासाठी चांगली मानली जातात. पारिजातकाच्या फुलांचा रस घेतल्यास हृदयरोग टाळता येतो. फुले कुटून मधात मिसळल्यास कोरडा खोकलाही बरा होतो.

प्रतिकारक क्षमता – पारिजातकाच्या पानांचा रस किंवा याचा चहा बनवून नियमाने प्यायल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सर्व प्रकारांच्या आजाराशी लढण्यास सक्षम बनतं. सध्याच्या कोविड महामारीत हे अत्त्यंत महत्वाचे आहे.

सायटिका व स्लिप डिस्क या व्याधीत पारिजातकाची ६०-७० ग्रॅम पाने साफ करून ३०० मि.ली. पाण्यात उकळावी. २०० मि.ली. पाणी शिल्लक राहील्यावर पाणी गाळून प्यावे. २५-५० मि.ग्रॅम केसर घोटून त्या पाण्यात मिसळावे. १०० मि.ली. पाणी सकाळ-सायंकाळ प्यावे. १५ ते २० दिवस असे केल्याने सायटिकाचा आजार समूळ नष्ट होतो. स्लिप डिस्कमध्येही हा प्रयोग गुणकारी आहे. (वसंत ऋतूत ही पाने गुणहीन होतात, म्हणून हा प्रयोग वसंत ऋतूत लाभदायी ठरत नाही.)

पारिजातकाच्या प्रत्येक भागाचा आयुर्वेदात उपयोग सांगितला आहे. म्हणून त्याला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात. चौदा रत्नांपैकी असे हे एक दुर्मिळ नि अत्यंत सुवासिक, नाजूक फुले देणारे, औषधी स्वर्गीय रत्न आपल्या घराच्या आवारात असायलाच हवे. अशा ह्या प्राचीन पारिजात वृक्षाचे भारतीय पोस्टाने तिकीटही काढले आहे.

– डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ:
विकिपीडिया, मराठी विश्वकोश, इंटरनेट मायाजालवरील लेख व माहिती.
गोडांबे यांचा लोकसत्ता फेब्रु. २०१७, मधील लेख

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 58 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..