नवीन लेखन...

आपला हात, जगन्नाथ

माणसाला नेहमीच उद्या काय घडेल? याची उत्सुकता असते. जे घडणार असते, ते अटळच असते तरी देखील त्याबद्दल प्रचंड औत्सुक्य असणारी मंडळी ऐंशी टक्के तरी नक्कीच आहेत आणि त्यांच्यामुळेच ज्योतिषांचा धंदा तेजीत चालतो आहे. भविष्यावर विश्वास ठेवून शांत बसणे हे चुकीचे आहे. मात्र अपयशातून, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तो सल्ला सकारात्मक ‘दिलासा’ही ठरु शकतो.
मी दहावीत असताना वर्तमानपत्रातील छोट्या जाहिराती मध्ये एक जाहिरात वाचली होती. मनीऑर्डरने दहा रुपये व जन्म तारीख, वेळ व ठिकाण पाठविल्यास आम्ही तुमचे भविष्य पोस्टाने पाठवू. मी दहा रुपयांची मनीऑर्डर केली. पुढच्याच आठवड्यात मला पोस्टाने एक पाकीट आले. त्यामध्ये एका वहीच्या पानावर ठोकळेवजा ‘भविष्य’ लिहिले होते जे प्रत्यक्षात ‘वर्तमान’ कधीच झाले नाही.
पन्नास वर्षांपूर्वी लकडी पुलावर, शनिवार वाड्यासमोरील नव्या पुलावर, सारस बागेजवळ पिंजऱ्यामध्ये पोपट घेऊन भविष्य सांगणारे अनेकजण उन्हातान्हात बसलेले दिसायचे. त्यांनी पंचांगांचे गठ्ठे, हातावरील हस्तरेषा दाखविणारी चित्रं ठेवलेली असायची. कधी एखादं गिऱ्हाईक मिळालं की, तो पोपटाला पिंजऱ्याबाहेर काढून मांडलेल्या चिठ्यांतून एक चिठ्ठी काढायला लावायचा. मग ती चिठ्ठी वाचून त्या गिऱ्हाईकाला भविष्यातील भरभराट ऐकवून तृप्त करायचा.
काही वर्षांनंतर एखादी जागा भाड्याने घेऊन ज्योतिषी जाहिरात देऊ लागले. मी काॅलेजला असताना उंबऱ्या गणपती चौकात एक प्रसिद्ध ज्योतिषी होता. तो हात पाहून तंतोतंत भूतकाळ सांगत असे. त्याला ‘कर्णपिशाच्च’ विद्येमुळे समोरच्या व्यक्तीबद्दल अचूक समजत असे. त्या आधारावर तो भविष्य मात्र ठोकून देत असे. त्याला भेटलेल्या कित्येकांनी त्यांचे अनुभव मला सांगितले होते.
त्याच काळात लक्ष्मी रोडवरील हमाल वाड्यात एक धोतर कोट घातलेली सत्तरीची वयस्कर व्यक्ती जुनी पुस्तके विकत असे. जोडीला भविष्यही सांगत असे. कित्येक जणांना मी त्याच्याकडून भविष्य पाहताना पाहिलंय.
एकदा एका मित्राच्या सल्यावरुन फडतरे चौकातील एका अवचट नावाच्या ज्योतिषाकडे गेलो. त्याने सालानुसार पुढे काय काय घडेल ते लिहून दिले व कालसर्प शांतीसाठी नाशिकचा एक पत्ता दिला. मी शांती करुन आलो, मात्र काहीही फरक जाणवला नाही.
आमचे मोरे नावाचे एक कलाकार मित्र होते. ते घरी पत्रिका पहायचे. आमच्या साडेसातीच्या कालावधीत आम्ही त्यांच्याकडे जाऊन अडचणी सांगत असू. त्यावेळी त्यांच्या सकारात्मक सल्ल्याने आमची उमेद टिकून राहिली.
सदाशिव पेठेत एक सुप्रसिद्ध ज्योतिषी, ज्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यांच्याकडे मी गेलो. रांगेत तासभर उभे राहिल्यावर माझा नंबर आला. त्यांनी माझ्या पत्रिकेवर एक नजर टाकली व परत दिली. पैसे मात्र घेतले. अपेक्षेने आलेल्या माणसाला सल्ला न देता मोबदला घेणारे ‘भट’ इथेच भेटतात.
काही वर्षांपूर्वी ‘नाडी ज्योतिष’च्या अनेक जाहिराती वाचनात येत असत. ती वाचून मी कोथरूड येथील पत्यावर गेलो. माझ्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या दाक्षिणात्य लोकांनी माझी पट्टी शोघली व ती पट्टी वाचून हिंदी भाषेत भविष्य सांगितले. त्यांनी एक कॅसेट व वहीमध्ये भविष्य त्यांच्या भाषेत लिहून दिले. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्यांनी पूजा करण्यासाठी सहा हजारांची मागणी केली. मी माझ्या ‘नाडी’वर नाही, मनगटावरच विश्र्वास ठेवला.
माझी आतेबहीण फारच भावना प्रधान आहे. तिने वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून हाॅटेलवर उतरलेल्या एका ज्योतिषाकडे गेली व काहीही आडपडदा न ठेवता तिने कौटुंबिक समस्या सांगितली. तो कावेबाज होता. त्याने सत्तर हजार रुपयांत ‘काळजीमुक्त’ करतो, असे तिच्या मनावर बिंबवले. तिला सत्तर हजार शक्य नव्हते, तो पस्तीस हजारांपर्यंत खाली आला. तिने दोन दिवस मागून घेतले. घडलेला प्रकार तिने मला सांगितला. मी त्या पत्यावर पाॅश हाॅटेलमधील त्याच्या रुमवर गेलो. त्याला माझे भविष्य विचारल्यावर तो टाळाटाळ करु लागला. त्याला फसणारी मोठी गिऱ्हाईकं हवी होती. मी बहिणीला सावध केले. विनाकारण बसणारा फटका थोडक्यात वाचला. हे भोंदू ज्योतिषी, खरं म्हणजे ‘लुटारू’च आहेत.
काही वर्षांपूर्वी उंबऱ्या गणपती चौकातील एका ज्योतिषाची वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जाहिरात येत असे. अनेकजण वेळ घेऊन त्याला भरमसाठ फी देऊन भविष्य विचारत. त्याने सांगितलेल्या पूजा विधी करुन काम होतंय का याची वाट पहात रहात असत. त्याने जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असे, ज्यांना साडेसाती आहे त्यांनी भेटू नये. आता ती जाहिरातही नाही आणि तो ज्योतिषीही नाही.
हडपसर मधील एका ज्योतिषाने वर्तमानपत्रात अशी जाहिरात दिली होती की, एक हजार रुपये फी मध्ये तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख सांगू. माझा एक मित्र त्यांच्याकडे गेला. त्यांची फी दिली. ज्योतिषाने त्याला कुंडली पाहून साचेबद्ध उपाय करायला सांगितले व सहा महिन्यांनंतरची एक तारीख दिली. प्रत्यक्षात ती तारीख उलटून गेली तरी काहीही घडले नाही. त्या ठगाने मात्र आपली पोतडी भरली.
अशाच प्रकारे पंधरा दिवस ठाणे व पंधरा दिवस पुणे असे करणारे एक ‘काका’ होते. ते वर्तमानपत्रात कथेच्या स्वरुपात ‘मोफत भविष्य सल्ला’ म्हणून जाहिरात द्यायचे. कोणीही गेले की, ज्योतिष सल्ला फ्री, ग्रहशांती करायची असेल तर सर्वांना एकच दर होता, पाच हजार दोनशे रुपये फक्त. त्यांच्या भोंदूपणाबद्दल कारवाई झाल्याचे पेपरमध्ये आले. काही दिवस त्यांनी ‘दुकान’ बंद ठेवले. नंतर पुनश्च हरिओम!!
अलिकडच्या दिवसांत हे प्रत्यक्ष ज्योतिषाकडे जाणं कमी झालंय. आता ऑनलाईन भविष्य जाणून घेता येतं. काहीही झालं तरी ‘लग्न’ या एकाच विषयासाठी, त्याचं महत्त्व कायमच राहिल हे मात्र खरं!!
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
१९-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..