नवीन लेखन...

आली दिवाळी – वसुबारस

वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..!

आज वसुबारस. अर्थात गोवत्सद्वादशी. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली. वसुबारस म्हणजे सवत्सधेनुच्या पुजनाचा दिवस. ज्या गोवंशाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तीची तीच्या वासरासहीत पुजा करण्याचा हा दिवस. गाय हिन्दू संस्कृतीत अत्यंत पूजनीय आहे, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तीच्यापासून उत्पन्न झालेल्या बैलांशिवाय शेती अशक्य..! तीच्याप्रती कृतज्ञता म्हणूनच कृषीसंस्कृतीतील दिवाळी या सर्वात महत्वाच्या सणाची सुरूवात गो-पूजनाने केली जाते. गोठ्यातील गायी, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढ्या हीच शेतकऱ्याची खरी धनदौलत. या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस..

‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ ‘धन’ किंवा ‘संपत्ती’ असा होतो, वसुधा म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन. आता पन्नास-पंचावन्न वयात असलेल्याना आठवत असेल, की त्यांच्या लहाणपणातली गाय हटकून ‘वसुधा’ नांवाची असायची. मला तर ‘वसुधा’ हा शब्द गायीला समानार्थी शब्द वाटायचा, अजुनही वाटतो. गाय आणि जमिन यांना एकच शब्द देण्यामागे, या दोघांचं प्राचीन जीवनातील महत्व आणि अलम मानववंशाला इथपर्यंत पोहोचवल्याचा सन्मान हीच भावना असावी.

‘दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी..’ या दिवाळीच्या प्रसिद्ध गाण्यातील शेवटची ओळ ‘वाघाच्या पाठीत घालीन काठी..!’ अशी आहे..गाई-बैलाच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष वाघाच्या पाठीत काठी घालण्याची तयारी दाखवली आहे, ती या गोधनाच्या प्रेमापोटीच..! यातही आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीचा मोठेपणा पहा.. वाघाच्या पाठीत फक्त काठीच मारायची भाषा आहे, वाघाला जीवे मारायची नाही..! आपल्या निसर्गपूजक पूर्वजांना वाघाचं निर्सगातील महत्वाचं स्थान माहीत होतं व त्याचा आदरही ते करत होते असा ठाम अर्थ यातून काढता येतो..

कोकणातील माझ्या गांवाकडे या दिवशी ह्या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. गोठ्यात शेणाच्या गवळणी व श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवल्या जातात..त्यांची पूजा केली जाते. विशेष म्हणजे ह्या दिवशी घरातल्या स्त्रियाना गोठ्यातलं कोणतही काम करू देत नाहीत. ही आपल्या ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, भूमी, गाय व स्त्री या तीघींमधे असलेल्या प्रसवक्षमतेचा, इतरांच निरपेक्ष भावनेने पालन-पोषण करण्याच्या त्यांच्या भावनांचा, क्षमाशीलतेचा केलेला हा आदर आहे. अशा या दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवशी गाय-वायराचं दर्शन घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका..

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..