नवीन लेखन...

इंन्का साम्राज्याच्या राजधानीत – कुझ्कोत

ऍग्वास कॅलिएंतिस पासून माचूपिचूचा डोंगर लागतो. ट्रेकिंग करणारे येथूनही चालत जातात. आपल्यासारखे टूरिस्ट बसने जातात. बस बराच वळणा वळणांचा व चढ उतारांचा रस्ता पार करून सुमारे २० मिनिटांत माचूपिचूच्या पायथ्याशी पोहोचली. तिथून पुढे अर्धा तास चालावे लागले. चालताना एका वळणावरून लक्ष सहज उजवीकडे गेले… आजपर्यंत चित्रातच बघितलेले माचूपिचू स्पष्टपणे दिसत होते.

“ अहो बघितलं का? किती सुंदर नां ? अन आखीव रेखीव ही !” असे उद्गार आपोआपच तोंडातून निघून गेले. हिरवागार माचूपिचू व शेजारचा ‘हायनापिचू’चा डोंगर मध्यान्हीच्या उन्हात तळपत होते. त्यांच्या पायथ्याशी विळखा घालून उरुबांबा धावत होती. सूर्य जरी डोक्यावर आला होता तरी हवेत चांगलाच गारठा होता. मनसोक्त फोटोशूट करत आम्ही पुढे निघालो. एका घडीव दगडांच्या भव्य कमानीने आमचे स्वागत केले. हेच ते माचूपिचू शहर व त्याची वेस.
तिथे प्रवेशाकरिता शुल्क भरावे लागते. ते भरून आम्ही आत प्रवेश केला. तिथे हवे तर माचूपिचूचा शिक्का तुमच्या पासपोर्टवर मारून मिळतो. इतक्या जगप्रसिद्ध ठिकाणी भेट दिल्याचा पुरावा आपल्या पासपोर्टवर उठवून घेणा-यांची एकच गर्दी त्या काउंटर पाशी झाली होती. आम्हीही अर्थातच त्याला अपवाद नव्हतो !

वेशीतून आत प्रवेश करताना अंगावर रोमांच उभे राहिले. आता आम्ही १५ व्या शतकातील इंका राजा पाचांकुतीच्या वैभवशाली राजधानीत प्रवेश करीत होतो. माचूपिचू, वायनपिचू, हायनापिचू वगैरे डोंगरांमुळे तयार झालेल्या ‘पवित्र दरी’च्या माचूपिचू डोंगरावर पाचांकुतीने या शहराची निर्मित केली (असे सांगितले जाते). पेरूच्या कुस्को भागातील उरुबांबा प्रांतातील माचूपिचू जिल्ह्यात कुस्कोपासून ८० किमी अंतरावर आखीव रेखीव घडीव दगडांमधून निर्माण झालेलं माचूपिचू शहर १०० वर्षं इंकांच्या पूर्ण वैभवात नांदत होतं. स्पॅनिश आक्रमकांनी कुस्को व आसपासचा भाग ताब्यात घेतल्यावर माचूपिचू हळू हळू ओसाड पडलं असावं व त्याभोवती जंगल वाढलं असावं. दुस-या एका अंदाजानुसार स्पॅनिश लोकांपैकीच कोणीतरी आणलेल्या देवीच्या रोगाने माचूपिचूच्या रहिवाशांचा बळी घेतला व जंगलाने त्यांच्यावर पांघरूण घातले. स्पॅनिश लोकांना पक्त ८० किमी वरचं माचूपिचू सापडलं नाही याचं कारण त्याभोवती वाढलेलं अफाट जंगल. इ.स. १५७० च्या सुमारास हे शहर उंच उंच व घनदाट जंगलात पूर्ण अदृश्यच झालं !

येल विद्यापीठातील इतिहासाचे प्रा. हिरम बिंगहॅम इन्का संस्कृतीचे अवशेष शोधण्याच्या मोहिमेवर १९०९ मध्ये पेरूमध्ये दाखल झाले. इन्कांचा शेवटचा राजा पाचांकुतीच्या शेवटच्या ठिकाणाचा—विल्काबांबाचा– शोध त्याला घ्यायचा होता. १९११ साली तो विल्काबांबाचा घेत उरुबांबा नदीच्या उजव्या किनारपट्टीवर आला. तेथे त्याला डाव्या किना-यावरील हायनापिचू डोंगरावर काही अवशेष दिसले. पाचांकुतीच्या विल्काबांबा ठाण्याचेच ते अवशेष असावेत असे वाटून त्याने तेथे जाऊन शोध घेतला. तोपावेतो उरुबांबा नदी पार करणे फार अवघड होते. बिंगहॅमने पूल बांधून ती प्रथम पार केली. हायनापिचूवर शेती करणारे एक जोडपे त्याला भेटले. त्यांच्या मदतीने त्याने शोध चालूच ठेवला. आणि…….. इतिहासाचा एक अमूल्य ठेवा त्याला गवसला. विल्काबांबा नाही, पण माचूपिचू व हायनापिचू यांच्या खोबणीत वसल्रेल्या माचूपिचू शहराचा त्याला शोध लागला. त्याला वेढून टाकणारे जंगल साफ करायला त्याला ४ महिने लागले. हे अवशेष पाहून तो आश्चर्याने थक्कच झाला. तुटक तुरळक अवशेषांऐवजी एक संपूर्ण शहरच त्याच्या हाती लागले. ते जगासमोर यायला ‘नॅशनल जिओग्राफिक’चा १९१३ चा अंक कारणीभूत झाला. तेव्हापासून आजतागायत प्रवाशांची रीघ तेथे लागलेली आहे.

इंन्कांची भाषा ‘क्वेचा’मध्ये माचू चा अर्थ जुने व पिचू चा अर्थ शिखर आहे. ते शहर दुरून पाहिले तर एकाद्या ध्यानस्थ वृद्ध ऋषीप्रमाणे दिसते. सुबक घडीव दगडांचे हे भक्कम बांधकाम भूकंप, वेळी अवेळी पडणारा प्रचंड पाऊस, जमिनीचे स्खलन, वाईट हवामान या सर्वांना तोंड देत आजही सुस्थितीत उभे आहे हे एक आश्चर्यच ! घरे, खोल्या, अन्नाची कोठारे,देवळे यांच्या भिंती इतक्या व्यवस्थित आहेत, की फक्त छपरे घातली तर आजही तेथे वस्ती करता येईल. राजवाडा, राणीवसा, कर्मचा-यांची घरे, मठ, मंदिरे अशा सुमारे १४० इमारतींचे तरी अवशेष तेथे आहेत. इंका लोकांना लेखन कला अवगत नव्हती. त्यामुळे हे शहर कोणी, कशासाठी, केव्हां बांधले, त्याला किती दिवस लागले, खर्च किती आला, बांधकामाची पद्धत काय याविषयी कोणतीही लेखी माहिती उपलब्ध नाही. परंतु स्पॅनिश लोकांच्या बखरीतील माहितीनुसार ही एक पवित्र जागा असून इंन्का राजाच्या निवासासाठी ते बांधले असावे असा इतिहासकार जोहान रिनहर्डचा अंदाज आहे.

वरचे, मधले आणि खालचे गावठाण असे या शहराचे सरळ सरळ तीन भाग झालेले दिसतात. एक एक भाग पहात जसजसे पुढे जावे, तसतसे आपले आश्चर्य वाढतच जाते. इन्कांच्या संस्कृतीत माचूपिचू हा डोंगर अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे त्यांच्या धर्मस्थळात त्याचा समावेश होतो. या ठिकाणाचा वापर समाज विघातक कृत्ये करणा-यांना स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी केला जात असावा असे एक मत, तर ही शेतीची प्रयोगशाळा असावी असेही एक मत आहे.

शहराच्या सर्व भागात ८-९ फुटी उत्तम दगडी रस्ते बांधलेले आहेत. वरच्या भागातून खालच्या भागाकडे पाणी वाहून नेण्यासाठी तसेच खराब पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेले गोलाकार दगडी नळे आजही उत्तम अवस्थेत दिसतात. या नळांमधून पाणी खळाळत उरुबांबा नदीत मिसळत होतं. जागोजागची पाण्याची दगडी कारंजी तर सुरेखच होती. त्यातून पाण्याचे फवारे वाहत्या वा-याबरोबर आमच्या अंगावर येऊन आम्हाला गारठवून टाकत होते.

पुरातत्त्व विभागाच्या संशोधनानुसार शहराचा सर्वात उंचीवरचा विभाग पवित्र कार्यासाठी, दुसरा राजवंशासाठी व तिसरा सामान्य जनांसाठी वापरात होता. पवित्र भागात सूर्यमंदिर, तीन खिडक्यांचे दालन व इंतीहुआना यांचा समावेश होतो. इंतीहुआना किंवा इंतीवाताना म्हणजे सूर्य (इंती) दिसणारे ठिकाण (हुआताना). हे इन्कांचं घड्याळच म्हटलं पाहिजे. येथे एक आयताकृती शिळा एका चौथ-यावर उभी बसवली आहे. वर्षातून दोनदा जेव्हा सूर्य बरोबर या शिळेवर येतो, त्या दिवशी तिची सावली दिसत नाही. तसेच २१ जूनला दक्षिण दिशेला आणि २१ डिसें.ला उत्तर दिशेला लांबच लांब छाया दिसते. त्यावरून इंका लोक सूर्याचा दक्षिणेकडे अगर उत्तरेकडे सुरू होणारा प्रवास ठरवत असावेत. किंवा इंती हुआतानाचा उपयोग कॅलेंडरसारखाही होत असावा. सूर्यमंदिर व तीन खिडक्यांचे दालनही याच भागात आहे.

राजवाड्यापैकी मोठा भाग राजाचा व छोटा राणीवशाचा. त्यांच्या शयनगृहाच्या बाथरूमच्या भिंती अतिशय उत्तम पॉलिश केलेल्या घडीव दगडांच्या आहेत. जमिनीपाशी रुंद व वर निमुळत्या होत जाणा-या या भिंती दगडी चिरे नुसते एकमेकात बसवून उभारल्या आहेत. इथल्या वाईट हवामानामुळे तसेच प्रचंड पाऊस व भूस्खलनामुळे चुन्याचा वापर न करता दगडातच विशिष्ट प्रकारे एकमेकात गुंतवता येतील अशा खोबणी करून भिंती बांधल्या आहेत. त्यांचा आकार पहाता, छपरे मध्ये उंच जुळणारी व दोन्हा बाजूस उतरती होत जाणारी असावीत असे दिसते.

राजवाड्याच्या खालच्या उतारावर इतर राजपरिवार, त्याच्या आणखी खाली मंत्रीमंडळ वगैरेंची व्यवस्था होती. या सर्व पातळ्यांमध्ये छोट्या दगडांच्या चिपा, त्यावर वाळू, वाळूवर माती अशा प्रकारे सपाट पातळ्या बघायला मिळतात. त्यावर छान हिरवेगार गवत होते,अधुनमधून छोटी छोटी पिवळी फुले शोभून दिसत होती.

2 Comments on इंन्का साम्राज्याच्या राजधानीत – कुझ्कोत

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..