नवीन लेखन...

इंन्का साम्राज्याच्या राजधानीत – कुझ्कोत

आता आम्ही सेक्सेवमन या इन्कांच्या आणकी एका भक्कम बांधणीच्या शहराकडे निघालो.बस कुस्कोच्या रस्त्यांवरून चढ चढू लागली. घरे, काही ऐतिहासिक वाटावी अशी तर काही साधी कौलारू. हळू हळू घरे तुरळक होऊन उजवीकडे डोंगर तर डावीकडे खालच्या बाजूस कुस्को दिसू लागले. आम्ही सॅक्सेवमनला पोहोचलो तेव्हा प्रवेश बंद होण्याची वेळ आली होती, पण आम्हाला प्रवेश मिळाला. आता कुस्को शहर फारच सुंदर दिसत होते. जोरदार वारा सुटला होता. थंडी झोंबत होती.

“इन्का संस्कृती ही एकेकाळची अत्यंत प्रगत संस्कृती होती .इन्का लोक प्रामुख्याने सूर्योपासक होते. ‘क्वेचुआ’ व ‘आयमार’ या इन्कांच्या भाषा. कुस्को हा शब्द Qusqu किंवा Qusq या मूळ भाषेतील शब्दावरून आला. Rock of the Owl यावरून Qusq हा शब्द घेतला आहे. प्राचीन काळी एक प्रचंड मोठे घुबड, गरूड किंवा घारीच्या जातीचा पक्षी (कॉंडोर ?) ऍंडीज पर्वतरांगा ओलांडून पुढे उरुबांबा दरीजवळ दमून विसावला, तोच हा खडक. त्यावर प्रथम इन्कापूर्व जमातीने सॅक्सेवमन हे शहर वसवले. तेथे सूर्योपासनेसाठी खूप मोठे देऊळ व आजूबाजूला किल्के लोकांसाठी घरे बांधली. त्याभोवती संरक्षणाची उत्तम व्यवस्थाही केली. त्याची भक्कम तटबंदी व पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवरून किल्के लोकांच्या दूरदर्शीपणाची कल्पना येते. १३ व्या शतकात इन्कांनी किल्के जमातीवर विजय कसा मिळवला ते मात्र कुठे लिखित स्वरूपात सापडत नाही.” गाईडच्या माहितीबरोबर माझी नजर सर्वत्र भिरभिरत होती.

गाईड सांगत होती…” किल्के जमातीने केलेली सॅक्सेवमनची बांधणी ११ व्या शतकातील आहे. दगड उत्तम रीतीने तासून, एकमेकात चपखलपणे बसवून हे शहर बांधले होते. जमिनीलगत भिंतीचे दगड भले मोठे, जड, आतल्या बाजूने सपाट तर बाहेरून गोलाकार आहेत. कोणत्याही प्रकारचा चुना,माती इ. वापरलेले नसूनही ते भुकंपात उत्तम स्थितीत राहिले आहे.” आम्हाला एकाच्या आत एक तीन तट उत्तम दगडी बांधकामाचे बघायला मिळाले. बाकी इमारती वगैरे काही शिल्लक नाहीत. या ठिकाणाचा उपयोग इन्कांनी सैनिकी तळ म्हणून केला होता.

सॅक्सेवमन पाहून आम्ही कुस्कोला परतलो. ११००० फुटावरच्या कुस्कोच्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी विश्रांती आवश्यकच ! एव्हाना बहुतेकांच्या कापराच्या वड्या बाहेर आल्या होत्याच. हॉटेलमध्ये कोकाचा चहा होता. बिन दुधाचा, पाणीदार ,गरम, कडू नाही पण तुरट. पोटात गेला की बरे वाटे हे खरे.

आता माचूपिचूकडॆ लक्ष लागले होते.त्यामुळे दुस-या दिवशी सकाळीच आम्ही माचूपिचूला जाण्यासाठी खाजगी बसने कुझ्कोच्या मुख्य बसस्थानकाकडे निघालो. वाटेत राजवाडा,म्युझीयम यासारखी आणखीही महत्वाची ठिकाणे दिसत होती पण सगळ्यांना ‘उद्या भेटू ’असे सांगत बसस्थानकावर पोहोचलो.तिथे कुझ्को टुरीझमच्या बसेस उभ्या होत्या. त्यातून २०-२५ मिनीटे प्रवासकरून आम्ही १३ किमी. वर असलेल्या‘ पोरोय ’या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. कुझ्कोहून रेल्वेने, बसने व चालत माचूपिचूला जाता येतं. वेळ व श्रम याचे प्रमाण वहानाप्रमाणे कमी जास्त होते. या सगळ्यापैकी रेल्वेचा प्रवास ही प्रवाशांची पहिली पसंती. पण इन्का लोकांचा मार्ग अनुसरून चालत डोंगरद-या पार करून जाणा-यांची संख्याही काही कमी नाही.

ही रेल्वे फक्त परदेशी प्रवाशांसाठी असल्याने तिचे भाडेही सर्वसामान्य जनांसाठी डोईजड होणारेच आहे. स्वच्छ सुंदर पडदे असलेल्या मोठमोठ्या खिडक्या गाडीच्या दोन्ही बाजूंना होत्या. गाडी वातानुकूलित व आरामदायी होती. आम्ही स्थानापन्न झाल्यावर लालचुटुक स्कर्ट व पांढरे स्वच्छ शर्ट घातलेले रेल्वे कर्मचारी हातात निळे व केशरी अश्या दोन रंगांच्या टेबल मॅट्स घेऊन आले. त्यांच्या निळ्या-केशरी रंगावर गर्द हिरवी पाने व लाल-पिवळी फुले उठून दिसत होती. एका टेबलावर निळी तर दुस-यावर केशरी अश्या एका आड एक मॅटस त्यांनी भराभर अंथरली. इतकावेळ सामान्य दिसणारा डबा एकदम ‘रॉयल’ होऊन गेला. प्रत्येकाला चहा/कॉफी, केक, शेंगदाणे, भाजके मके असलेली पिशवी देण्यात आली. कुझ्कोमध्ये ५० पेक्षा जास्त जातीचे व वेगवेगळ्या रंगांचे मके पिकतात हेही कळले. पोरोय नंतरचे मोठे स्टेशन ओयलातांबो हे होते.तिथे बरीच माणसे चढली.गाडीने ओयलातंबो स्टेशन सोडले व गाडीतही पुढच्या प्रवासाच्या निवेदनाची सुरुवात झाली. ओयलातांबो कुस्कोहून १८ कि.मी.वर आहे. तिथूनही प्रवासाची सुरुवात करता येते.

आम्ही माहिती ऐकत ऐकत आजूबाजूला पहात होतो. सकाळची कोवळी उन्हं आम्हाला भेटण्यासाठी खिडकीतून डोकावत होती. उरुबांबा नदी रेल्वेमार्गा शेजारून खळाळत गाडीच्या वेगाशी स्पर्धा करत माचूपिचूकडेच धावत होती. सूर्याच्या किरणांनी तिचा काळसर प्रवाह उजळून निघाला होता.

गाडीतील तपमान सुसह्य असले तरी, ओयलातांबो सुमारे ८००० फुटावर असल्याने हवा तशी गारच होती. बाहेरचे तपमान ११⁰ होते. स्टेशन दूर गेल्यावर गाडी डोंगराच्या बाजूबाजूने धावू लागली. मधे मधे जरा मोकळी जागा येताच १०-१५ एकमजली कौलारू घरांची वस्ती दिसत होती. गाडीचा आवाज ऐकताच छोटी छोटी गोरी गुटगुटीत मुले धावत येत होती आणि टाळ्या वाजवत होती. गाडीला डाव्या बाजूने उरुबांबा नदीची अखंड साथ होतीच. गाडीचा खड खड खड खड आवाज खंडाळ्याच्या घाटाची आठवण करून देत होता. त्याच्या तालावर नदीच्या पाण्यावर लाटा नाचत होत्या. नदीपलिकडच्या डोंगरावर मधून मधून दगडांच्या थरांची छोटी पायवाट दिसत होती. हीच ती इंका लोकांची माचूपिचूला जाणारी प्रसिद्ध वाट. अधून मधून नदी ओलांडायला अरुंद साकव लागत होते. काही लोक अद्यापही या वाटेवरून माचूपिचूला जातात. कुस्कोपासूनची ही वाट अवघड चढणीची आहे. त्यामुळे ती ट्रेकर्सना आकर्षित करते. काहीजण ओयलातांबोहूनही इन्का ट्रेकला सुरुवात करतात व सनगेटपाशी माचूपिचूचे पहिले दर्शन घेतात.

वाटेतल्या लहान स्टेशनांवर गाडी थांबली नाही, पण त्यातल्या त्यात ज्या मोठ्या स्टेशनांवर ती थांबली, तेथे आजूबाजूचे स्थानिक टोप्या,बटवे,पिशव्या,शाली,बाहुल्या यांची विक्री करण्यासाठी गर्दी करत होते. गाडीच्या आतही रेल्वेचे कर्मचारी जाकिटे, अल्पाका लोकरीचे मऊ, ऊबदार, हलके स्वेटर, रंगीबेरंगी शाली ,टी शर्ट इ. ब-याच वस्तू विकण्याचा प्रयत्न करीत होते. एकाच स्कार्फ व शालीचा किती विविध प्रकारे वापर करता येतो हे पाहून खूप मजा वाटली. गाडी चढ उतारावरून धावत होती. वेग फारसा नव्हता, पण अगदीच ‘बार्शीलाईट’ नव्हती. आजूबाजूची गंमत मजेत बघता येत होती. बघता बघता दोन तास कसे संपले, कळलेही नाही. आम्ही ६५०० फुटांवरचे शेवटचे स्टेशन ‘ऍग्वास कॅलिएंतिस’ ला उतरलो. हे स्टेशन ब-यापैकी मोठे होते. स्टेशनबाहेर बाजार भरला होता. विविध खाद्यपदार्थ खिलवण्यासाठी रेस्तॉरंट्सची ही या गर्दीत हजेरी होती. वर डोंगरावर माचूपिचूमध्ये एकच हॉटेल आहे, व तेही बरेच लहान आहे. त्यामुळे अभ्यासकांना ऍग्वास कॅलिएंतिस इथेच रहावे लागते.

2 Comments on इंन्का साम्राज्याच्या राजधानीत – कुझ्कोत

Leave a Reply to Anamika Borkar Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..