नवीन लेखन...

सिमेंट प्लांटची भ्रमंती

“छोटू,भैया आओ हम अपने बीच की ये दिवार तोड दे.
भैया ये दिवार टूटती क्यू नही है.
टूटेगी कैसे अंबुजा सिमेंट्स से जो बनी है!!”

ही टीव्हीवरची सिमेंटच्या मजबूतपणाची जुनी जाहिरात अजूनही आठवत असेल.प्रत्येक बांधकामात लागणारा हा सिमेंट अविभाज्य घटक आहे.सिमेंट नक्की कोठे व कसे बनते हा प्रश्न आपल्याला पडत असेल. सिमेंट तयार करण्याचे अनेक कारखाने भारतात जवळजवळ सर्व राज्यात कमी अधिक प्रमाणात आहेत.माझ्या ऑफिसमधील कामाच्या निमित्ताने भारतातील वेगवेगळ्या राज्यातील सिमेंटच्या प्लांटवर नेहमी जाणे व्हायचे.हे सर्व प्लांट शहरी भागापासून दूरवर डोंगराळ आणि दुर्गम भागात असतात.तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची वेगवेगळी साधने बदलत प्रवास करावा लागत असे.प्लांटपर्यंतचा प्रवास आणि तिथला काम करण्याचा अनुभव हा इतर प्रवास आणि अनुभवापेक्षा  वेगळा असायचा.त्याच आगळ्यावेगळ्या भ्रमंतीचे हे वर्णन.

पुण्याहून बस किंवा रेल्वेने प्रवास करत त्या राज्याच्या मोठ्या शहरापर्यंत आधी जावे लागे.मग तिथून प्लांटजवळच्या तालुकाच्या गावापर्यंतचा प्रवास होत असे.बस मोठ्या शहरात आली की नव्या शहराचा नजारा बघण्याऐवजी ऐवजी राहण्यासाठी स्टॅडजवळ एखादे चांगले लॉज बघणे हे महत्वाचे असायचे.छोट्या गावाहून पुढे जाण्यासाठी प्रायव्हेट बसचा प्रवास असायचा.दुर्गम भाग किंवा ग्रामीण भागात प्रायव्हेट बसचे पेव भरपूर प्रमाणात असते.कारण अशा प्रत्येक भागात गव्हमेंटची बस असेलच असे काही सांगता येत नाही.प्रायव्हेट बसमधला प्रवास सगळा अ‍ॅडजेस्ट करण्याचा असायचा.म्हणजे गर्दीने खचाखच भरलेला,प्रवासी सोडून उरलेल्या  जागासुद्धा भरपूर  सामानाने व्यापलेल्या असायच्या .त्यामध्येच कोंबड्या,मेंढ्या,आणि इतर पाळीव प्राणी देखील आणले जायचे.त्यामुळे आपल्या शेजारी माणूसच उभा असेल किंवा आपल्याकडे शांतपणे बघणारे एखादी मेंढीपण असेल असे काही सांगता यायचे नाही.स्पीकरवर मोठ्या आवाजात शक्य तेवढा बास वाढवून नेहमी ‘पssरदेसी पssरदेसी जाना नही.’ यासारखी कोणती तरी गाणी लावली असायची.कधीतरी टीव्हीवर  साउथ साईडचे अशक्य फायटिंग करणारया हीरोचे पिक्चर सक्तीने बघावे लागत.८-१० किलोमिटर लांबूनच सिमेंटचा प्लांट स्पष्ट दिसायचा.तिथे जाण्यासाठी बसमधून मेन रोडवर मधेच उतरावे लागे.त्या दुर्गम भागात ओला किंवा उबरची टॅक्सी सर्व्हिस कधीच नसायची. जिथे उतरावे लागे तिथे काही रहदारी नसायची.त्या अनोळख्या ठिकाणाहून खडबडीत रस्त्यावरून  एखाद्या रिक्षेने त्या प्लांटच्या दिशेने प्रवास असायचा.वाटेत फक्त काटेरी झुडपं आणि लाइमस्टोनच्या खाणी दिसायच्या. सिमेंट बनवण्यासाठी लाइमस्टोन हा मुख्य घटक लागतो.लाईमस्टोन खाणीजवळ वेगवेगळ्या कंपनीचे कारखाने असतात.अनेक वर्षाच्या करारावर हा लाइमस्टोन चा खडक खाणीतून ती सिमेंट कंपनी घेत असते.खाणीमध्ये ब्लास्टिंग करून तो खडक मिळवला जातो.आणि ट्रकने तो सिमेंट प्लांटपर्यंत येतो.

रिक्षाने त्या प्लांटच्या गेटपर्यंत आलं की शेवटी आणखी एक प्रवासाचा शेवटचा टप्पा असायचा.ह्या गेटपासून प्लांटचे मेन गेट लांबवर असायचे.तिथे पोहचण्याचा प्रवास हा जिकिरीचा असायचा.ट्रक किंवा दुसरे कोणते वाहन मिळाले नाही तर चालत मेन गेटपर्यंत चालत जाणे हा पर्याय असायचा.मग एकट्यानेच बाग  खांद्यावर अडकवून रस्ता तुडवत जात जावे लागे.सोबतीला अरुण वरूण हेदेखील असायचे.अरुण म्हणजे डोक्यावर तळपतं उन आणि वरूण म्हणजे अधेमध्ये पडणारा पाऊस.वाटेत कधी एखादा बाईकवाला दिसला तर गाडीवरून जाता येत असे.काही प्लांटचे कडक नियम असल्याने टू-व्हीलर चालवणाऱ्या आणि मागे बसणाऱ्याला  हेल्मेट सक्तीचे असायचे.म्हणून गाडी समोरून गेली तरी हेल्मेट बरोबर नसल्याने त्यावर बसून जाता येत नसे.गेटच्या अंतराप्रमाणे २-३ किलोमीटरची पायपीट केल्यावर मेन गेट येत असे.हा प्रवास करताना कधी कधी पोहचेपर्यंत दुपार होत असे. जिथे हा प्लांट असायचा  तिथे मोठे हॉटेल,रेस्टोरंट असे काही जवळपास नसायचे.स्वीगी, झोमँटो तर कुठे नामोनिशाण नसायचे. एखादा ढाबा लागायचा तिथे जेवण उरकून पुढे मार्गस्त व्हायचे. अशातच त्या रस्त्यावर चालत असताना लांबून ‘पीssपीss’ असा आवाज आल्यावर ट्रक येत असल्याची चाहूल कानी पडायची.हात केल्यावर बरेचसे ट्रक नुसतेच धूळ चारून पुढे जायचे.पण काही ट्रक थांबायचे.बारीक तोंड करून “मेन गेट जाना है” असे सांगितल्यावर तो ड्रायव्हर केबिनचे दार उघडायचा आणि मग ट्रकमध्ये आडवी फळी ओलांडून आत बसायचं.ट्रक ड्रायव्हरबरोबर त्या केबिनमधून  प्रवास करणं हा एक वेगळा अनुभव असायचा.बसण्यासाठी वेलवेटची गादी,आणि फक्त गेयर फिरवण्यासाठी लागणारी जागा सोडली तर सर्व बाजूने सीट कुशनने सर्व जागा व्यापलेली असायची.समोरच्या बाजूला दोन मोठ्या काचा आणि त्याच्या मधल्या भागात एक देव्हारा  त्यात बहुधा शंकर,तिरुपती,किंवा एखाद्या देवीची फ्रेम, खाली फर्स्ट एडच्या बॉक्समध्ये काडेपेटी उदबत्ती वगैरे वगैरे दिसायची,वरपासून खालीपर्यंत येणारा हार,भोवती फुलांची सजावट,वरच्या बाजूला एलइडी च्या बल्बच्या तीनरंगी माळा अशा  सगळ्या गोष्टीनी ट्रकची केबिन सुशोभित केलेली असायची.गाडी किंवा बसपेक्षा ट्रकमधली बसायची जागा थोडी उंच असते.त्यामळे उंच जागेवरून बाहेर बघणे थोडे आगळे वाटे.५-१० मिनिटाचा प्रवास झाल्यावर ट्रकमुळे अगदी मेन गेटपर्यंत जाता येई.पण या प्रवासाचे पैसे ते सच्चे ट्रक ड्रायव्हर कधीच घेत नसत.मेन गेटवर दूरपर्यंत ट्रकची रीघ लागलेली असायची.सिमेंट,कोळसा,लाइमस्टोनची ने-आण करण्यासाठी हे ट्रक ओळीने दूरपर्यंत असत.सिक्युरिटी केबिन मधून प्लांटच्या कामासाठी लागणाऱ्या ट्रकच्या नंबरची मोठ्या लाऊडस्पीकरवर घोषणा होते.मग एक-एक ट्रक प्लांटमध्ये रवाना होतात.

मेन गेटवर माझ्या हातातील  प्रवासी बॅग पाहून थोडेसे संशय नजरेने “किधर जाना है?” असे चौकशी करणारे गार्ड स्वागताला असायचे.सिक्यूरीटी  केबिनमध्ये गेल्यावर प्रथम  कोठून आला? कोणाला भेटायचे अशी प्रश्नांची सरबत्ती असायची.मग ज्या व्यक्तीला भेटायचे त्यांना फोन जोडून दिला की मग प्लांटमध्ये  जाण्याचा  गेटपास बनत असे.कोणत्याही प्लांटवर सेफ्टीला अनन्यसाधारण महत्व असते. कारण उंचावर,मोठमोठ्या मशीनशेजारी काम करताना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ही असावीच लागते.म्हणून पायात सेफ्टी शूज,लाईफ जाकीट ,डोक्याला हेल्मेटचे शिरस्त्राण घालून त्या सिमेंटच्या युद्धभूमीवर जाण्यास सिद्ध व्हावे लागे.प्लांटवर नियमांचे पालन कसे करावे,आपत्कालीन परिस्थितीत काय करावे.या बद्दलची एक व्हिडीओ दाखवली जायची.कधी त्यावर छोटी परीक्षादेखील व्हायची.प्लांटमध्ये आत गेल्यावर पहिल्यांदा समोर असायची ती मेन ऑफिसची अ‍ॅडमीन बिल्डींगची आकर्षक इमारत.समोरच्या बागेत थुईथुई उडणारे कारंजे,काळ्या पिवळ्या रंगाचे बेरीगेटस,रेषेत आखून दिलेले पार्किंग,बिल्डींगमध्ये फॉर्मल रिसेप्शन,कंपनीच्या फाउंडर लोकांचे चंदनाचा हार घातलेले फोटो,सिमेंटच्या उत्पादनाची प्रगती दाखवणारे चढते आलेख हे दृश्य सर्व प्लांटमध्ये असायचे.हे सर्व पहात पहात मशीनच्या चहाचे एकदोन घोट घेऊन स्टोअर डीपार्टमेंटकडे जायचे.ह्या स्टोअरमध्ये प्लांटला लागणारी  बाहेरून मागवलेली यंत्रसामुग्री,मशीनचे इतर पार्ट आणि स्पेअर गोष्टींचा स्टॉक असतो.आतमध्ये मोठमोठाल्या  रॅकवर नंबर नुसार शिस्तबद्ध क्रमात सामान लावलेले असायचे.अंधुक प्रकाशात फाईलींचे गठ्ठे घेऊन लिखापडी करणारे लोकं तिथं काम करत बसलेले  दिसायचे.

सिमेंट बनवण्याचा मुख्य खडक म्हणजे लाइमस्टोन हा कन्व्हेयरच्या साह्याने इकडेतिकडे वाहून नेला जातो.त्यावर होणाऱ्या इतर प्रोसेससाठी संपूर्ण प्लांटमध्ये हे कॉन्वेयर चढत्या उतरत्या उंचीने फिरवलेले असतात.प्लांटमध्ये प्रीहिटर हा सर्वात उंच भाग.तेथे जाण्यासाठी २०-२५ मजले असतात.किलन ही एक मोठ्या व्यासाची लांब अंतर असणारी फिरत राहणारी अजस्त्र यंत्रणा,इथे कच्चे सिमेंट तापवण्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे २००० डिग्रीएवढे तापमान असते.किलनच्या बऱ्याच लांबून  जरी गेलं तरी त्याची धग जाणवत असे. क्वचित कोठूनतरी सिमेंटच्या पावडरचे ठिपके शर्ट-पॅन्ट वर पडायचे.आणि अंगावर इतरत्र होणारा धुरळा नंतर झाडावा लागे.सिमेंट मिल हा एक नेहमी ‘काना’वर दडपण ठेऊन सहन करावा लागणारा पण कामाचाच भाग असणारा अनुभव असायचा.शेवटच्या टप्यात तयार झालेले सिमेंटचे छोटे गोळे पिठासारखे बारीक करण्याची गिरणी म्हणजे सिमेंट मिल.लांबून एखाद्या छोट्या मिसाईल सारखी दिसणारी,शेकडो नटबोल्टने जोडलेली,एका ठराविक स्पीडला फिरणारी ही मिल आतील लोखंडी गोळ्यांमुळे प्रचंड आवाज करते.शेजारचा माणूस  कानात मोठ्याने जरी बोलला तरी त्याचा आवाज येत नसे.असा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकत तेथील काम करावे लागे. जिथे या मशीन्स असायच्या तिथे कामाच्या सुरक्षेबाबत बरेचसे पोस्टर लावलेले असायचे.त्यावरील अ‍ॅनिमेशनयुक्त संवादाची चित्रेसुद्धा पाहण्यासारखी असतात.

एवढ्या मोठ्या प्लांटमधील मशीन्स आणि इन्स्ट्रुमेंटस योग्य रीतीने चालले आहेत का नाही,सर्व बाजूंनी प्रोसेस सुरळीतपणे चालू आहेत का?  इलेक्ट्रिक मशीन्स चे सर्व पॅरामीटर्स  योग्य पातळीत आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी CCR (मध्यवर्ती नियंत्रण कक्ष) हे डिपार्टमेंट असते.सर्व ठिकाणांहून तिथेपर्यंत वायर्समधून सिग्नल आणला जातो.तिथे एका जागी बसून सर्व प्लांटचे सिंहावलोकन करता येते.हे सर्व पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनची एक संपूर्ण लाईन असते.SCADA मुळे अ‍ॅनिमेटेड दृश्यासारखी सर्व मशीन्स चालतीबोलती आणि जिवंत  दिसतात.मशीनमध्ये होणारे सर्व बदल अगदी अचूकपणे येथे दिसत असतात.तिथून नियंत्रण करणारे इंजीनीयर्स हे कायम वॉकी-टोकी घेऊन संबधित विभागाला माहिती कळवत असतात. काहीवेळा मशीनच्या ठिकाणचे रीडिंग  आणि CCR मधील रीडिंग यात बदल दिसतो.मग कुठे नक्की गडबड आहे हे शोधेपर्यंत सर्वांची बरीच तारांबळ उडते. दुपारच्या जेवणासाठी एक गाडी येत असे.ती प्लांटवरच्या भागातून फिरत फिरत सर्व इंजिनीअरना घेऊन गेस्ट हाऊस ला जात असे.तिथे भाताचे एक मोठे पातेलं आणि सांबर रसमच्या एक-दोन बादल्या,एक उडदाचा पापड,भाज्या असा लंचचा थाट असायचा,किंवा उत्तर भारतात फुलके,भाज्या आणि थंडगार ‘छाछ का गिलास’ हा मेनू असायचा.

नवीन इन्स्ट्रुमेंट बसवण्यासाठी किंवा काही कारणाने बंद असलेले मशीन चालू करणे हे काम सर्व्हिस इंजीनियरचे काम असते. टन पर हवर्स या दराने तेथील प्रोडक्शन चालू असल्याने बंद मशीन शक्य तेवढ्या वेळात तातडीने चालू करणे.ही प्लांटची महत्वाची गरज असते.म्हणून प्लांटमधल्या लोकांसाठी  सर्व्हीस इंजिनियर हा ’अगदी देवासारखा धावून आलास बाबा’ या धारणेचा  असतो.मशीन कधी चालू होणार हे त्या मशीनची कंडीशनच सांगू शकत असे.कोणते काम काही मिनिटात होत असे तर काही पंधरा-पंधरा दिवस चाले.आपण मशीन चेक करण्याच्या वेळी बाजूने कुतूहल म्हणून इतर लोक सुद्धा गोळा होतात.हे असच का? तसच का? हे विचारून भंडावून सोडतात.त्यांच्या शंकेचे पूर्ण समाधान होईपर्यंत तिथून निघता येत नसे.सगळे काम झाले की एक रिपोर्ट बनवून झाल्यावर सुटकेचा निश्वास टाकायचा आणि मग परतीचा प्रवास सुरु व्हायचा.

संध्याकाळी ठराविक वेळेपर्यंत सर्व काम आटपून गेटपास,हेल्मेट आणि जाकीट पटापट सिक्यूरीटीमध्ये देऊन प्लांट बाहेर जाणारी गाडी मिळवावी लागे.भेटलेल्या ऑफिसरची भेटून आल्याबद्दल  कधी चुकून  सही घेणं विसरलं की परत सही घेण्यासाठी पायपीट करणे हेदेखील असायचे.सहा-सात वाजता  मेन गेटवरून जवळच्या शहराकडे जाणारी गाडी लागलेली असायची.बाहेर पडायला दुसरी कोणती गाडी पुन्हा मिळत नसे.या गाडीत प्लांटमधला सगळा स्टाफ असायचा.दिवसभर मोठमोठ्या मशिन्सबरोबर अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने काम करणारे हे  इंजिनीअर पूर्ण दिवसात या गाडीतच तेवढे हास्यविनोदात रमलेले असायचे.गाडी जशी पुढे जाईल तसे रात्रीच्या त्या काळोखात सर्व बाजूने असलेल्या नाईटलॅम्पमुळे संपूर्ण सिमेंट प्लांटचे  दृश्य  मनाला मोहून टाकायचे.

हा प्रवास करताना बऱ्याच अडचणीदेखील असायच्या.कधी रिझर्वेशन मिळायचे कधी नसायचे,मिळेल त्या वाहनाने प्रवास करायचा,कधी लांबच्या पल्य्याच्या रेल्वे लेट असायच्या त्यामुळे पुढेचे प्लांनिंग कोलमडायचे,एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतेच वाहन नसायचे.त्यासाठी कित्येक वेळ एकटेच अनोळख्या जागी थांबावे लागे.मिळेल ते अन्न खावे लागे, शक्य असेल तिथे चार्जिंग,रेंज असेपर्यंत फोन करावे लागत.राजस्थानचे उन,हिमाचलची थंडी,आणि अचानक गाठणारा पाऊस अशा वातावरणाशी जुळवून घ्यावे लागे.पण आजही सिमेंट प्लांट म्हणलं की आठवतो ”अनेक वाहनांचा प्रवास,ट्रकची वर्दळ असणारे प्लांटचे गेट,प्लांटमधील शिस्तीने काम करणारे लोक,कायमची कुरकुर करणारे कन्व्हेयर,दूरवरून ऐकू येणारा 4 7 12 च्या शिफ्टचा सायरनचा मोठा आवाज,हुप्प हुश्य आवाज करणारी मशीन्स आणि अखंड कार्यरत राहणारा सिमेंट प्लांट”….

तर असा होती ही सिमेंट प्लांटची भ्रमंती.ऑफिसच्या कामांमुळे वेगवेगळ्या अनुभवांची आयुष्यभर पुरणारी एक शिदोरीच मिळाली हे मात्र नक्की…..

— पवन श्रीपाद जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..