नवीन लेखन...

आशा भोसले – एक सांगितिक आश्चर्य

कुणी गजल गायक असतं, कुणी शास्त्रीय गायक असतं, कुणी पाश्चात्य संगीत गाण्यात प्रावीण्य मिळवलेलं असतं, तर कुणी मराठी नाट्यसंगीत लीलया गाऊ शकतं. प्रत्येकाचा आपला एक प्रांत असतो. पण सर्व प्रकारची गाणी गाऊ शकणारा हरहुन्नरी आवाज एखाद्यालाच लाभतो. आपल्याला मिळालेल्या या दैवी देणगीचा चतुरस्र वापर करण्यासाठी मेहनत घेणं हेही प्रत्येकाला जमू शकतच असं नाही. पण थोर गायिका आशा भोसले यांना मात्र ते जमलं. त्यांना मिळालेल्या दैवी देणगीची अपार कष्टानं मशागत करून त्यांनी स्वत:ला घडवलं आणि सर्व प्रकारच्या रसिक कानसेनांचे कान त्यांनी तृप्त केले.

आशाताईंच्या सहा दशकांच्या महान कारकिर्दीकडे नुसती नजर टाकायची म्हटलं तरी थक्क व्हायला होतं. एक हजारांपेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांतून त्यांनी बारा हजारांपेक्षाही जास्त गाणी गायलेली आहेत. शिवाय इतर अनेक भाषांतली गाणी वेगळीच. मग चित्रपटेतर गायन गजला, पॉप म्युझिक, मराठी नाट्य संगीत, भावगीते, बालगीते, भक्तिगीतं, अभंग वगैरे वगेरे वगैरे… चतुरस्र हा शब्दही कमी पडावा अशी कामगिरी त्यांनी केली आहे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

आशाताईंचा जन्म सांगली येथे १९३३ साली झाला. अतिशय सुप्रसिद्ध अशा मंगेशकर घराण्यात त्यांनी जन्म घेतला. आशाताई लतादीदींच्या पाठच्या. मास्टर दीनानाथांच्या आवाजाची देणगी सर्वच मंगेशकर भावंडांना मिळाली. त्याला आशाताईसुद्धा अपवाद नव्हत्या. मास्टर दीनानाथांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांवर बिकट आर्थिक परिस्थिती ओढवली होती. त्या वेळी आशाताईंचं वय केवळ नऊ वर्षांचं होतं.

मास्टर दीनानाथांच्या मृत्यूनंतर मंगेशकर कुटुंबीय काही काळ कोल्हापूर, पुणे येथे वास्तव्य करून मुंबईस विसावलं. परिस्थितीमुळे फार कमी वयात लतादीदींना चित्रपटांत गाणी म्हणायला सुरुवात करावी लागली. त्यापाठोपाठ लगेचच आशाताईंनीही गाण्याला व्यवसाय म्हणून स्वीकारलं. ते साल होतं १९४३. आशाताईंना पहिला ब्रेक दिला दत्ता डावजेकरांनी. `माझा बाळ’ या चित्रपटासाठी गायलेलं `चाल चाल नव बाळा’ हे त्यांनी गायलेलं पहिलं गाणं. १९४८ साली त्यांना ख्यातनाम संगीतकार हंसराज बहल यांनी हिंदी चित्रपटात गायनाची संधी प्राप्त करून दिली. `चुनरिया’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं.

आपल्या कुटुंबीयांचा विरोध पत्करून वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. हे लग्न काही फार काळ टिकलं नाही. सासरच्या कटू अनुभवांमुळे १९६० साली त्यांनी परत आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आशाताईंच्या पदरी दोन मुलं होती आणि त्या तिसर्‍या वेळी गरोदर होत्या. मात्र या दु:खातही अर्थार्जनासाठी त्यांनी आपलं गायन चालू ठेवलं होतं.
व्यावसायिकरित्या स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना अपार कष्ट घ्यावे लागले. त्या काळातील इतर दिग्गज गायिकांच्या तोडीसतोड गाण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.

सुरुवातीच्या काळात त्यांना फक्त खलनायिकांसाठी पार्श्वगायन करावं लागलं. त्यांच्या वाटय़ाला मुख्यत: क्लब साँग्ज येत असत. किंवा मग नायिकांसाठी गाणं मिळालं तरी `ब’ किंवा `क’ दर्जाच्या चित्रपटांसाठी त्यांना अशी संधी मिळे. पण त्यांनी कोणताही नकारात्मक विचार न करता पार्श्वगायन सुरू ठेवलं. त्यांच्या आवाजाची जादू हळूहळू त्या काळच्या प्रथितयश संगीतकारांच्या आणि चित्रपट निर्मात्यांच्या कळायला लागली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल राय यांनी आपल्या `परिणिता’मध्ये (१९५३) आशाताईंना गाण्याची संधी दिली. मग राज कपूर यांनी `बूट पॉलिश'(१९५४)मधील `नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ या गाण्यासाठी त्यांना करारबद्ध केलं.

आणि मग १९५६ साली ख्यातनाम संगीतकार ओ पी नय्यर यांनी बी आर चोपडा यांच्या `नया दौर’मधील वैजयंती मालावर चित्रित केलेल्या सर्व गाण्यांसाठी आशाताईंचा आवाज वापरला. नया दौरमधील साहीर लुधियानवी यांनी लिहिलेल्या `मांग के साथ तुम्हारा’, `साथी हाथ बढाना’ आणि `उडे जब जब जुल्फे तेरी’ या गाण्यांना अपार लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आशाताईंना मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही.

नया दौरमधील गाण्यांना मिळालेल्या लोकप्रियतेनंतर त्या काळातील सर्वच संगीतकारांनी आशाताईंच्या मधुर आवाजाचं महत्त्व ओळखलं आणि त्या काळातील जवळजवळ सर्व प्रथितयश संगीतकारांनी आशाताईंकडून गाणी गाऊन घेण्यास सुरुवात केली.

ओ. पी. नय्यर यांनी आशाताईंच्या नशिल्या आवाजाचा छान उपयोग करून घेतला. तर १९६६ साली संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांनी `आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’या गाण्यासाठी आशाताईंकडून पाश्चात्त्य गायकांसारखी कामगिरी करून घेतली. कालांतराने आशाताईंनी पंचमदांशी लग्न केलं.
नायिकांसाठी पार्श्वगायन करीत असतानाच आपली जुनी ओळख आशाताई विसरल्या नव्हत्या. क्लब साँग्ज गाणं हा त्यांचा हातखंडा होता. हेलन यांच्यासाठी क्लब साँग्ज गाणं त्यांनी चालूच ठेवलं होतं.

`उमराव जान’ या चित्रपटांमधील अभिजात गजला गाऊन त्यांनी आपण अशीही गाणी लीलया गाऊ शकतो हे सिद्ध केलं. या चित्रपटातील गाण्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

आशाताईंच्या चतुरस्र आवाजाचा उपयोग करून घेण्याचा मोह अनेकांना झाला. पंचमदांनी तर खूप विविध छटा असलेली गाणी आशाताईंकडून गाऊन घेतली. `इजाजत’ या १९८७ सालच्या चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेल्या `मेरा कुछ सामान’ या कवितावजा गीतासाठी आशाताईंना दुसर्‍यांदा राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान प्राप्त झाला.

हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायनात व्यस्त असतानाही त्यांनी मराठी संगीताकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. मराठी नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, चित्रपटगीत, बालगीत त्यांनी विपुल प्रमाणात गायली आहेत. शिवाय आसामी, उर्दू, तेलुगू, बंगाली, गुजराथी, पंजाबी, तामिळी, इंग्रजी, रशियन, शेज, नेपाळी, मलाय, मल्याळम अशा इतर भाषांमध्येही त्यांनी गायन केलं आहे.

आशाताईंना उर्दू गजलांबद्दलही विशेष प्रेम होतं. त्यांच्या आवाजातील अनेक गैरफिल्मी गजलांचे अल्बम्स प्रसिद्ध झाले आहेत. सुप्रसिद्ध पाकिस्तानी गजल गायक गुलाम अली यांच्या समवेत `मिराजे गजल’ व इतर अल्बम्स प्रसिद्ध आहेत. मेहदी हसन, जगजीत सिंग यांच्यासारख्या अनेक नामवंत गजलगायकांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांनी गायलेल्या गजलांना आशाताईंनी स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केलं आहे.

हंसराज बहलपासून आजच्या ए. आर. रेहमानपर्यंतच्या चार पिढय़ांच्या संगीतकारांकडे त्या गायल्या. वयाच्या बासष्टाव्या वर्षी उर्मिला मतोंडकरसारख्या तरुण नायिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं.

एवढं वैविध्यपूर्ण गायन करूनही आशाताईंना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत न शिकल्याची खंत होती. तीही त्यांनी पूर्ण केली. वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक अली अकबर खान यांचा गंडा बांधून शिष्यत्व पत्करलं. अलीसाहेबांकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली.
आशाताईंनी केलेली संगीतातली कामगिरी महान आहे. पण त्याही पलीकडे त्यांची आणखी एक ओळख आहे त्या सुगरण आहेत. त्यांना स्वयंपाक करायला खूप आवडतं. गोमांतकीय पद्धतीनं केलेले त्यांच्या हातचे मासे खाणं ही त्यांच्या मित्रमंडळींसाठी खास पर्वणी असते. म्हणूनच की काय त्या दुबई आणि कुवेतमध्ये स्वत:ची रेस्टॉरंट्स चालवतात.

आशाताईंच्या सांगीतिक कारकिर्दीचं जगभरातून भरपूर कौतुक झालं नसतं तरच नवल. त्यांना असंख्य पुरस्कर मिळाले आहेत. फिल्मफेअर ऍवॉर्डच्या त्या सात वेळा मानकरी ठरल्या. शिवाय त्यांना फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित केलं आहे. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सन २०००मध्ये त्यांना दादासाहेब फाळके या चित्रपट क्षेत्रातील सर्व सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर २००८ साली पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आज वयाच्या अठ्ठय़ाहत्तराव्या वर्षी त्या मुंबईतील पेडर रोडवरील `प्रभुकुंज’मध्ये आपली तीन मुलं आणि पाच नातवंडांसमवेत तृप्त जीवन जगत आहेत.
— शुभांगी मांडे

‘महान्यूज’ मधून साभार
रविवार, २२ मे, २०११

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..