नवीन लेखन...

जागतिक साक्षरता दिन

आज ८ सप्टेंबर . आजचा दिवस हा सगळ्यांचं आयुष्य बदलवणारा दिवस ठरू शकतो. ७ नोव्हेंबर १९६५ साली युनेस्कोने ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जावा हा निर्णय घेतला आणि ८ सप्टेंबर १९६६ पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण , विज्ञान व सांस्कृतिक विकास आणि त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी युनेस्कोने साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. याच दिनानिमित्त घडलेला एक प्रसंग डोळ्यांसमोर आला.

काही वर्षांपूर्वी शूटिंगच्या कामानिमित्त मी आणि माझा मित्र कोकणात जात होतो. त्यावेळी भूक लागली म्हणून आम्ही एका छोटेखानी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. इतक्यात खांद्यावर एक टॉवेल , हातात पाण्याने भरलेल्या ग्लासांची थाळी असलेला , निरागस आवाज असलेला एक कोवळा मुलगा आमच्याजवळ आला आणि ऑर्डर विचारू लागला. आम्ही ऑर्डर दिली आणि तो निघून गेला. माझ्यात आणि माझ्या मित्रात एक चर्चा सुरू झाली. या चर्चेमागे कारण होतं त्याच्या डोळ्यांतील चमक आणि त्यातील भाव जणू आम्हांला काहीतरी सांगू इच्छित होते.

आमच्या चर्चेमध्ये अगदी बालमजूर कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. सरतेशेवटी मालकाला धडा शिकवायचा हे आम्ही ठरवलं पण इतक्यात कोणीतरी , “ साहेब असं करू नका.” असं म्हटल्याचा आवाज आला. आम्ही बाजूला बघितलं तर आम्ही चमकलोच. तो मुलगा आमची ऑर्डर घेऊन आला होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याला आम्ही बाजूला बसवून चौकशी केली तर तो हे काम त्याच्या मर्जीने करत असून त्याच्या शिक्षणासाठी तो हे काम करतोय हे आम्हाला समजलं. आम्हाला त्यावेळी कसं व्यक्त व्हावं हेच समजत नव्हतं. तो फक्त एवढंच बोलून ऑर्डर देऊन पुढच्या कामासाठी निघून गेला.

खात असताना आमच्या कानात फक्त त्याचं वाक्यच घुमत होतं. शेवटी मी आणि मित्राने १२ पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च आपण आणि इतर सगळे मित्र यांनी वाटून घ्यायचा असं ठरलं. आम्ही सगळ्या मित्रांना फोन करून ते ह्यासाठी तयार आहेत का याचा अंदाज घेतला. जवळपास सगळेच तयार झाले. आमचा नाश्ता उरकून आम्ही बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो आणि तिथल्या मालकाशी त्याच्याबद्दल बोललो. तो मालक खूप भावुक होत बोलला की , त्याला त्याची मदत करायची इच्छा असूनही तो त्याची मदत करू शकत नव्हता. पण आता त्याची चिंता मिटली. आम्ही त्या मुलाला सोबत घेऊन त्याच्या घरी गेलो. झोपडीवजा घर आणि त्यात त्या मुलाला बाप नाही. आई शेतमजुरीची कामं करत संसाराचा गाडा ओढत होती. तिला जेव्हा सांगितलं , ती खूप खुश झाली. आम्ही आमच्याकडे त्यावेळी जेवढे वरचे पैसे होते त्या सगळ्या पैशांचे  अभ्यासाची पुस्तकं , वह्या व इतर साहित्य विकत घेऊन त्याला दिलं आणि पुन्हा कधीही काम न करण्याविषयी त्याला समजावलं आणि आम्ही निघालो. का कुणास ठाऊक पण तो आम्हाला दगा देणार नाही याची आम्हाला खात्री पटली होती. कदाचित हॉटेलमध्ये त्याच्या चेहऱ्यावर पाहिलेले भाव आणि डोळ्यातलं पाणी ह्या दोनच गोष्टी आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी भरपूर होत्या.

आम्ही मदत करूनही जर त्याने मेहनत घेतली नसती तर सगळंच व्यर्थ ठरलं असतं. त्याने आणि त्याच्या आईने इमानदारीने दरवर्षी आम्हाला त्याचा निकाल कळवला. तो मुलगा खरंच हुशार निघाला , त्याने १० ला ७८% आणि १२ वीला ८४% मिळवले. आम्ही सगळे मित्र मिळून पुन्हा एकदा त्याला भेटायला गेलो आणि सगळ्यांनी मिळून एक मोठी पार्टीच केली. सगळे खूप खुश होते. त्यानंतर मात्र तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि त्याने आईला पण कष्टातून मुक्त केलं. सध्या तो आमच्याच क्षेत्रात कार्यरत आहे. तो सध्या animation आणि vfx क्षेत्रात काम शिकत आहे.

मंडळी आजच्या दिवसाला एक निश्चय नक्की करू. जो खरच असा अडला असेल त्याला शिक्षणासाठी मदत करू आणि प्रत्यक्षात जर आपल्याला शक्य नसेल तर एखाद्या योग्य संस्थेला आर्थिक मदत करून अशा अनेक लोकांना शिक्षण घेण्यासाठी मदत करू. शिक्षण जसा आपला हक्क आहे तसा तो इतरांचाही आहे हे लक्षात घेऊन कार्य केलं तर निश्चीतच सगळे लवकरच शिक्षित होतील आणि देशाची प्रगती लवकर होईल.

#International Literacy Day #8 September

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

1 Comment on जागतिक साक्षरता दिन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..