नवीन लेखन...

कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

आधुनिक शिक्षण, मिळालेले ज्ञान आणि आत्मसात केलेल्या बुद्धीच्या जोरावर आजचा माणूस प्रगत आणि संवेदनशील झाला असल्याचे मानले जात असले तरी, अद्यापही तो ‘समजूतदारपणा’च्या कसोटीवर खरा उतरला नसल्याचे सभोवताली घडणार्‍या घटनांवरून समोर येत आहे. सध्या कोरोना नावाच्या एका विषाणू संसर्गाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या भूमीतून निघालेला कोरोना व्हायरस आता भारतासहित जगाच्या जवळपास प्रत्येक देशात जाऊन पोहोचला आहे. या विषाणूंच्या संसर्गाने सगळ्या व्यवस्थांना धक्का दिला असून सर्वत्र आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या साऱया पार्श्वभूमीवर संयम, शिस्त, स्वच्छता आणि जबाबदारी यांचे पालन करत कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज असताना काही लोक मात्र अफवा, अज्ञान, भीती आणि समज- गैरसमजाचा संसर्ग पसरविण्यात गुंतले असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. ‘अमूक भागात ‘करोना’चे आणखी दोन रुग्ण आढळले…, करोनावर टमुक संस्थेने औषध शोधले आहे आहे.., मास खाल्ल्याने करोनाचा प्रादुर्भाव होतो..तर अमुक खाल्याने करोनाचा संसर्ग होत नाही..!’ अशा अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘व्हायरल’होऊ लागल्या आहेत. कोरोना विषाणूपेक्षाही कितीतरी वेगाने अफवांचा हा विषाणू जगभर फैलावतो आहे.. जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण करतो आहे. तर दुसरीकडे एक विशिष्ट वर्ग निव्वळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी सॅनिटाईझर आणि मास्कचा काळाबाजार करुन आपत्तीतही इष्टापत्ती शोधण्याचा प्रयत्न करतोय!

ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या समजूतदारपणावर आणि त्याच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल काय? माणसाच्या माणूसपणाची खरी परीक्षा अडचणीच्या काळात होत असते.. त्यामुळे
आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन आपापल्या भूमिका समजावून घेतल्या पाहिजेत. आज कोरोनासारख्या जागतिक आजाराची मगरमिठी संपूर्ण मानवजातीभोवती करकचून घट्ट आवळली जात असताना आपण त्याला रोखण्याचा समजुतदारपणा दाखवणार आहोत की, नुसता अफवांचा संसर्ग वाढवण्यात धन्यता मानणार आहोत ? यावरही या निमित्ताने चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नाही. याआधीही अनेक साथीच्या रोगाचा सामना आपण केला आहे. आणि प्रत्येक वेळी आशा संकटांचा सामना करतांना माणसाची संयमी आणि संतुलित भूमिका कामी आल्याचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासापासून बोध घेत नाही. सद्याच्या काळात तर माणसाची अवस्था कळतं पण वळत नाही, अशीच झाली आहे. घडलेल्या घटनेपेक्षा त्याबाबत उठणाऱ्या अफवा अधिक धोकादायक आणि नुकसानकारक असतात, याचा अनुभव आपण अनेकदा घेतला. मात्र तरीही खातरजमा केल्याशिवाय एकादी माहिती किंव्हा घटनेचा तपशील आपण फॉरवर्ड करु नये, हे शहाणपण आपल्याला सुचत नाही. सोशल मीडियावर असतांना जणू काही आपली बोटं आपल्या काबूत नसतात.. त्यामुळेच आलेली पोस्ट फॉरवर्ड करताना आपल्याला परिणामांची जराही चिंता वाटत नाही.

करोना संसर्ग भारतात अधिकृतपणे दाखल होण्याआधीचं त्याबाबत गैरसमजाचेच व्हायरस सगळय़ात जास्त वळवळताना दिसले. कोरोनाच्या बाबतीत चिकनचा काही एक संबंध नसताना कोंबडीचे मांस खाल्ल्याने कोरोना होतो, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. स्वतःला सुशिक्षित आणि समजूतदार म्हणविणार्‍या माणसांनी ती इतकी फॉरवर्ड केली की महाराष्ट्रातील सगळा कुक्कुटपालनाचा व्यवसाय मातीत मिळाला. करोनाचे रुग्ण देशात आणि राज्यात आढळल्यानंतर तर सोशल मीडियावर अफवांचे पेवचं फुटले. काही जणांनी ऐकीव माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल केली. संशयित किंवा रुग्णांचे पत्ते, सोसायट्यांची अधिकृत जाहीर न झालेली किंवा खातरजमा न केलेली माहिती देखील समाज माध्यमांवर पसरवण्यात आली.

सध्या तुम्ही सोशल मीडियावर नजर टाका.. कोरोना संसर्ग टाळण्याच्या उपायांचा त्यावर अक्षरशः पाऊस पडतो आहे. गोमूत्र प्या, आले-लसूण खा, तपकीर ओढा,अल्कोहोल घ्या. असे नानाविध उपाय उपचारकर्ते सुचवत आहेत. इतकेच नाही तर, करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून ज्या बंदीच्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यावरही काहींनी वेगळेचं शोध लावले असून समाजात भयगंड निर्माण करण्याचा दुर्दैवी प्रकार चालवला आहे. वेगाने पसरणाऱया अफवा या कोरोना विषाणूपेक्षा भयंकर असून त्याचं निराकरण करण्याच वेगळेच काम शासन व्यवस्थेला करावे लागत आहे. स्वतःला समजूतदार आणि सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या समाजाची ही लक्षणे खरोखर समजूतदारपणाची आहेत का? हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे.

कोरोना व्हायरस नावाचा विषाणू सैतान धुमाकूळ घालतो आहे.. सगळ्या मानवजातीवर संकट उभे ठाकले आहे.. खरंतर या आपत्तीच्या प्रसंगी माणसातलं ‘माणूसपण’ हजारो पटींनी वाढायला हवं! पण काही काळाबाजारी प्रवृत्ती या आपत्तीच्या काळातही निव्वळ आर्थिक स्वार्थ जपताना दिसतात. करोना प्रतिबंधित उपाय म्हणून वापरले जाणारे मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या वाढलेल्या किंमती माणसाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उभ्या करत नाहीत का? दहा रुपयांचा मास्क शंभर रुपयाला विकला जातोय..त्यातही बनावट मस्कची संख्या अधिक आहे. हात स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझरचाही काळाबाजार आणि बनावटीकरण सुरू झाले आहे. संकटांचाही व्यापार करणाऱ्या या प्रवृत्तीला काय म्हणावे?धंदा आणि नफा यांचा विचार करण्याचा हा प्रसंग नाही. इतकी ही सामाजिक जाणीव आपल्याला असू नये का? बनावट मास्क आणि बनावट सॅनिटायझरमुळे करोना व्हायरस थांबण्याऐवजी पसरत जाईल. हे उमजत असूनही फक्त पैसा कमविण्यासाठी असं अमानुष कृत्य केल्या जात असेल तर करोना संसर्गापेक्षाही स्वार्थाचा हा संसर्ग धोकादायक म्हणावा लागेल!

प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवत असते. करोना संसर्गाचे उभं राहिलेलं संकटही त्याला अपवाद नाही. माणसाच्या माणूसपणाची ही परीक्षा आहे. संकटं येतात जातात..अशी अनेक संकटं आली आणि गेली..याही संकटाचे सावट लवकरच दूर होईल! पण, या अटीतटीच्या काळात आपण माणूसपणाला पारखे न होण्याची काळजी घेतली पाहिजे. करोनाचा संसर्ग जितका धोकादायक आहे त्यापेक्षा कितीतरी अफवांचा व्हायरस कितीतरी भयानक आहे. करोनाचा विषाणू दहा वीस लोकांना बाधा करू शकेल. मात्र अफवांचा जंतू सगळ्या मानवी समाजाला पोखरून टाकेल! त्यामुळे आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सोशल मीडिया हे ‘सोशल’ होण्याचं प्रभावी साधन आहे. त्याचा वापर आपण सकारात्मक पद्धतीने करावा. अर्धवट माहिती किंवा कोणतीच अफवा त्यामाध्यमातून पसरणार नाही, याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. चुकीची माहिती पसरत असल्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून काळाबाजार करणाऱ्या प्रवृत्ती त्याचा अतिरेकी लाभ होत आहेत. करोनाचा प्रसार रोखण्याची जितकी जबाबदारी आपली आहे तितकीच या प्रवृत्तीला लगाम घालण्याचे कर्तव्यही आपलेच आहे. ‘घाबरू नका, पण काळजी घ्या’ असे संयमी आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केल्या जातेय.. त्या पद्धतीने आपण खबरदारी घेतली तर कोरोनाचा हा धोका निश्चितच परतवून लावू.

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..