नवीन लेखन...

आवाजाचा किमयागार – उदय सबनीस

उदय सबनीस… सॅबीदादा उत्तम अभिनेते आहेतच पण लहान मुलांपासून भारदस्त व्यक्तिमत्त्वापर्यंत अनेकांचा ‘आवाज’ ते होतात…

सकाळचे दहा – साडेदहा झाले असावेत. रोहित प्रधानच्या स्टुडिओ मिक्स बॉक्समध्ये एका सिनेमाच्या मीटिंगच्या निमित्ताने मी गेलो होतो. स्टुडिओत एका कार्टून मालिकेचं डबिंग सुरू होतं. कार्टूनमधील एक पात्र हुबेहूब रंगवण्यात तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट रमला होता. नाजूक, कोवळा आवाज. जणू काही एखाद्या लहानग्याचा असावा. कोणीतरी लहानगा आतून येईल याची वाट बघत असतानाच रेकार्ंडग रूममधून एक ओळखीचा चेहरा बाहेर पडला. मी क्षणभर बघत बसलो. त्यानंतर काही मिनिटे वाट पहिली. कोणीतरी आतून लहानगा बाहेर पडेल याची खात्री मला होती. मात्र काही क्षणांतच ती विरली. क्षणभर हबकूनच गेलो. रेकार्ंडग रूममधून बाहेर पडलेल्या व्यक्तीनेच ते डबिंग केलं होत. एरवी भारदस्त आवाजाच्या, धारदार वाणी असणाऱया व्यक्तीने स्वरबदलाची अशीही किमया साधावी हे प्रत्यक्षात पाहून मी थक्क झालो. ज्येष्ठ अभिनेता म्हणून मला ज्ञात असलेली ही व्यक्ती आज वेगळ्याच क्षेत्रामुळे माझ्यासमोर आली होती. आवाजी श्रीमंती लाभलेली ही व्यक्ती होती उदय सबनीस.

एका क्षेत्रावर आपली पकड मिळवलेली असतानाच वेगळ्या कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करू पाहणं हे एका कलाकारासाठी तसं आव्हानात्मकच असतं. उदय सबनीसांनी मात्र हा धोका पत्करला आणि यशस्वी दुहेरी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रावर आपली चांगलीच पकड मिळवलेली असतानाच म्हटलं तर संबंधित आणि म्हटलं तर तशा स्वतंत्र अशा आवाजाच्या जादुई दुनियेवरही आपली छाप उमटवण्यात उदयला चांगलंच यश मिळालं आहे. हे तसं सोपं काम निश्चितच नव्हतं. उदय सांगतो, ‘‘ दिग्दर्शक संजीव कोलते मला डबिंग क्षेत्रात घेऊन आला. डबिंगची ही वाट सोपी निश्चितच नव्हती. पुढे खूप अभ्यास करावा लागला. अनेक त्याग करावे लागले. तडजोड करावी लागली. ही तडजोड कलेशी कधीच नव्हती. शब्दांचा उच्चार, शब्दांची अचूक फेक, उंची या सगळ्यांचा बारकाईनं मी अभ्यास केला. अभिनयामुळे भाषेचा अभ्यास होताच, परंतु आवाजी दुनियेत सहज वावरता यावं यासाठी मला मेहनत घावी लागली होती.

उदयच्या आवाजी श्रीमंतीकडे एक नजर टाकली तर खरंच उदयने मागे वळून बघितलंच नसावं याची मला खात्री वाटते. कार्टून नेटवर्कच्या पाच हजारांहून अधिक मालिकांसाठी, वर्ल्ड डिस्ने, पोगो या वाहिन्यांसाठी उदयने आवाज दिलाय. आयबीएन लोकमत, ई टीव्ही मराठीसाठी चॅनेल व्हॉइस म्हणून काम केलंय, तर झी टीव्ही मराठीच्या अनेक मालिकांच्या जाहिरातीसाठी उदयने आवाज दिलाय.

‘नटरंग’, ‘खेळ मांडला’ यासारखे साधारण चाळीस मराठी सिनेमे, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फेरारी कि सवारी’सारखे अनेक हिंदी सिनेमे, ‘डॉ. बाबासाहेब’ या इंग्रजी सिनेमात आणि ‘ला कॅक्टस’ या फ्रेंच सिनेमात आपला कसदार अभिनय सादर केलेल्या उदयचं व्यक्तिचित्र कॅमेऱयात टिपण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो. आधी काही पोर्ट्रेट मी टिपले. आम्ही अनेक विषयांवर बोलत बोलत हे शूट आम्ही करत होतो. अनेक सिनेमांच्या शूटच्या गमती जमाती आठवून आम्ही लोटपोट होत होतो. याच क्षणी हसऱया चेहऱयाचा उदय मला टिपता आला. मला उत्तम फोटो मिळाले होते तरीही माझी भूक होती ती अशा एका फोटोची, ज्यातून उदयच्या अभिनय आणि आवाज अशा दोन्ही कलाक्षेत्रांची ओळख मला करता येईल.

फोटोग्राफीत प्रकाश आणि सावली यांचा खेळ करून काढलेले फोटो जास्त अधिक भावतात. अनेकदा सावली फोटोत फार दाखवली जात नाही. नाहीतर त्या फोटोची भाषा बदलते. मात्र, मी उदयच्या फोटोत त्याच्या शरीरालगतची एक गडद सावली टिपली. या फोटोत जो दिसत होता तो अभिनय क्षेत्रातला सगळ्यानांच माहीत असलेला अभिनेता उदय. जो दिसत नाही, परंतु आवाजातून व्यक्त होणारा उदय मी सावलीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. हा फोटो उदय आणि माझ्या आवडीचा आणि म्हणूनच अधिक आठवणीतला ठरलेला.

सतत आणि सर्वाधिक ऐकला जाणारा आवाज असं उदयच्या बाबतीत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिनय क्षेत्रातील उदय आणि आवाजाच्या विश्वात वावरणारा उदय यात अनेक बाबी समान आहेत. त्यातली एक नक्की सांगता येईल ती म्हणजे दोन्ही कलाक्षेत्रातली त्याची प्रामाणिकता. उदयच्या याच प्रामाणिकतेमुळे दोन्ही कलाक्षेत्रांत त्याचं नाव अदबीनं घेतलं जात. अभिनयात वावरणारा उदय वेळेचा पक्का, निर्भीड, तडफदार, कोणत्याही वादविवादात उडी न घेणारा आणि अभिनयात वैविध्य आणणारा आहे. अगदी तसाच तो आवाजाच्या दुनियेतही आहे. एकाच वेळी दोन कलागुणांना समान न्याय देणारे कलावंत फार कमी बघायला मिळतात. उदयला ते उत्तम जमलंय.

— धनेश पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..