नवीन लेखन...

पद्माकर शिवलकर : क्रिकेटमधला शापित यक्ष

(पूर्वप्रसिद्धी – ‘शिवतेज’ दिवाळी अंक २०२५)

भारतीय क्रिकेटला असंख्य गुणवान क्रिकेटपटू देणाऱ्या मुंबईच्या खाणीत अशीही काही अभागी रत्ने निपजली जी कधीही देशाचे प्रतिनिधित्व करू शकली नाहीत. यातले सर्वात ठळक आणि चर्चिले जाणारे नाव म्हणजे ‘पद्माकर काशिनाथ शिवलकर’. या महान डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने यंदा जीवनाच्या क्रीडांगणातून ‘एक्झिट’ घेतली. त्या फिरकीच्या जादूगाराचे हे संस्मरण.

मुंबईतल्या दादर, पोर्तुगीज चर्च येथे १४ सप्टेंबर १९४० रोजी त्यांचा जन्म झाला आणि बराचसा काळ तेथेच व्यतीत झाला. मित्रमंडळीत ‘बाळ’ नावाने ओळखले जाणारे शिवलकर शाळेत बऱ्यापैकी विद्यार्थी असले तरी त्यांचे जास्त लक्ष खेळात आणि जुनी हिंदी गाणी ऐकण्यात असे. त्यांच्या घराच्या आसपास तेव्हा शेते होती आणि घराजवळून जाणाऱ्या एकमेव कॉँक्रीटच्या रोडवर रबरी किंवा टेनिस बॉलने क्रिकेट खेळले जाई. सुरवातीला फक्त प्रेक्षक असणारे शिवलकर मग त्यात प्रत्यक्ष भाग घेऊ लागले. थोड्याच काळात मग डावखुरा गोलंदाज म्हणून ते टेनिसबॉल क्रिकेटमध्ये नावारूपास आले. याच काळात मॅट्रिक झाल्यानंतर मेकॅनिकल इंजिनीयर होण्याची त्यांची मनीषा होती. पण मॅट्रिक झाल्यानंतर ३ वर्षे ना त्यांना VJTI च्या कोर्सला अॅडमिशन मिळाली ना चांगली नोकरी.

आता पुढे कसे होईल या विवंचनेत असतानाच ‘दत्तू साटेलकर’ हा त्यांचा मित्र देवदूतासारखा धावून आला. ब्रॅडबरी मिल्समध्ये एका फिरकी गोलंदाजासाठी नोकरी उपलब्ध होती, म्हणून ते तेथे ट्रायल द्यायला घेऊन गेले. पण तेथे प्रथमच सीझन बॉल हाताळायची पाळी आली आणि ट्रायल घ्यायला होते साक्षात विनू मंकड. या दुहेरी दडपणाने त्यांचे पहिले तीन चेंडू स्वैर पडले. आता नोकरीची आशा संपली असे वाटत असतानाच त्यांची गोलंदाजीची शैली आणि प्रामाणिकपणा बघून विनूभाईंनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि नोकरीबरोबरच क्रिकेटविश्वाची कवाडे उघडली. विनूभाईंच्या मार्गदर्शनाखाली मग त्यांच्या गोलंदाजीत सुधारणा होऊ लागली. सहजसुंदर शैलीबरोबरच विविध डावपेच, अचूकता आणि तासनतास गोलंदाजी करण्याची क्षमता आत्मसात केली. अशातच पुरुषोत्तम शील्डच्या अंतिम सामन्यात मिल्सच्या ‘रुईया क्लब’कडून दादर क्रिकेटर्सच्या संघाविरुद्ध खेळताना त्यांनी प्रभावी गोलंदाजी केली. त्या प्रतिस्पर्धी संघातील माधव मंत्री आणि विजय मांजरेकरसारख्या खेळाडूंना त्यांनी अडचणीत आणले. आपल्या भंडारी समाजातील एवढा गुणवान युवा खेळाडू पाहून मांजरेकर खुश झाले आणि त्याला आपल्या ‘शिवाजी पार्क जिमखान्या’त (शिपाजि)* सामावून घेतले. याच काळात शिवलकर आपल्या सहकाऱ्यांमध्ये ‘पॅडी’ या टोपणनावाने लोकप्रिय होऊ लागले.

‘शिपाजि’*मध्ये त्यांना मांजरेकर, रमाकांत देसाई, हर्डीकर, बाळू गुप्ते, चंदू पाटणकर, वाडेकर, मधु पाटील यांसारख्या दिग्गजांबरोबर कांगा लीगचे सामने खेळायला मिळू लागले. तिकडेच त्यांना क्षेत्ररचनेतले बारकावे शिकायला मिळाले. याचवेळी त्यांना सुधाकर अधिकारींनी सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला आणि मग पुढची ४ वर्षे त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्या. यानंतर माधव मंत्रींमुळे त्यांना प्रतिष्ठित ‘सीसीआय’ क्लबचे २ वर्षांसाठी कॉंट्रॅक्ट मिळाले. तिथे रामचंद, आपटे बंधू, अधिकारी, मश्रुवाला, सेटलवाड यांच्याबरोबर खेळायची संधी मिळाली. दरम्यान मिलची नोकरी सोडून दोन वर्षे ‘स्टेट बँक’तर्फे खेळले आणि कॉंट्रॅक्टर, रामनाथ केणी, रमाकांत आचरेकर यांच्यासाथीने ‘बँक शील्ड’ जिंकून दिली. १९६२ साली त्यांची ‘टाटा स्पोर्ट्स क्लब’साठी खेळायला सुरवात झाली. या प्रवासात शिपाजि*, सीसीआय दोन्हीसाठी पदार्पणात कांगा लीग जिंकली तर टाटासाठी ‘टाइम्स शील्ड’. या उमेदवारीच्या काळात त्यांनी ‘आर्मर’ चेंडूवर प्रभुत्व मिळवले ज्यावर भलेभले फलंदाज चकत असत. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी टाकण्याबरोबरच, फिरकीला पोषक खेळपट्टीवर भेदक गोलंदाजी टाकण्यातही ते पारंगत झाले. शिवाय ते चेंडूला फसवी ऊंची देण्यात वाकबगार बनले. यामुळे अनेक नामी फलंदाजांचा ‘मामा’ होऊन ते यष्टीचीत होत, ज्याचा स्वत: शिवलकरांना फार आनंद मिळे.

त्यांचा पहिला प्रथमश्रेणी सामना झाला तो ‘सीसीआय’साठी एप्रिल १९६२ मध्ये, जागतिक दौऱ्यावर असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय संघा’विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर. बॉब सिम्पसन, टॉम ग्रेव्हनी, काउड्रे, वीक्स, बेनॉ, रामाधीन यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाविरुद्ध शिवलकरनी सामन्यात ७ बळी घेतले. यामुळे त्यांची मुंबई रणजी संघात निवड झाली. पण पहिला रणजी सामना खेळण्यासाठी त्यांना आणखी तीन वर्षे वाट बघावी लागली. दरम्यान ‘सीसीआय’ क्लबबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्याची त्यांना संधी मिळाली. तेथील वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टयांवरही त्यांनी २० सामन्यात १०७ बळी मिळवून साऱ्यांनाच दखल घ्यायला लावली.

१९६५ साली महाराष्ट्राविरुद्ध रणजी पदार्पण केल्यावर मात्र त्यांनी मागे वळून बघितले नाही. १९८१ साली निवृत्त होईपर्यंत ते मुंबई संघाचा कणा होते. यादरम्यान मुंबईसाठी त्यांनी ८ रणजी विजेतेपदे मिळवली आणि ४ इराणी चषकाची जेतेपदे. इतकेच नव्हे तर १९८७-८८ साली चांगल्या डावऱ्या फिरकीपटूची उणीव भासल्याने कर्णधार वेंगसरकरच्या आग्रहाखातर ४८ व्या वर्षी त्यांनी मुंबई रणजी संघात पुनरागमन केले आणि संघाला उपांत्य फेरीत पोहोचवताना आणखी २ सामने खेळले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी कर्नाटकचे विश्वनाथ आणि बिन्नी हे महत्त्वाचे बळी मिळवले. एकूण ७४ रणजी सामन्यात तब्बल ३६१ बळी टिपले जो अजूनही मुंबईसाठी सर्वोच्च बळींचा विक्रम आहे. एकंदरीत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १२४ सामन्यांत त्यांच्या नावावर ५८९ बळी आहेत, तेही अवघ्या १९.६९ च्या सरासरीने. यात सामन्यात दहा बळी १३ वेळा तर डावात पाच बळी ४२ वेळा आहेत.

१९७१ ते १९७५ हा त्यांच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ म्हणता येईल. १९७१-७२ या रणजी मोसमात त्यांनी १४.१८ च्या सरासरीने ६४ बळी घेतले, तर १९७२-७३ या मोसमात १५.०८ च्या सरासरीने ७९ बळी. १९७१ साली रणजी उपांत्य सामन्यात बंगालविरुद्ध दहा बळी घेतले तर अंतिम सामन्यात महाराष्ट्राविरूद्ध आठ. तसेच १९७२ साली म्हैसूरविरुद्ध उपांत्य सामन्यात तेरा बळी आणि अंतिम सामन्यात बंगालविरुद्ध नऊ बळी घेत मुंबईच्या विजयांत सिंहाचा वाटा उचलला. यावरही कडी केली ती १९७३ सालच्या अंतिम फेरीत तामिळनाडूविरुद्ध. चेपॉकच्या भिंगरी खेळपट्टीवर अवघ्या ३५ धावांत १३ बळी घेत मुंबईला फक्त २ दिवसांत विजय मिळवून दिला.

सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या शिवलकरांना एकही कसोटी खेळायला न मिळणे अतिशय आश्चर्यकारक आणि दुर्दैवी म्हणावे लागेल. सुरवातीला बापू नाडकर्णी, सोलकर, दुर्राणी यांच्यामुळे त्यांना भारतीय संघात जागा नव्हती. नंतर बिशनसिंग बेदी उदयाला आला तेव्हा तो अधिक तरुण असल्याने त्याला प्राधान्य दिले गेले. त्याच्या जोडीला चंद्रा, प्रसन्ना, वेंकट असल्याने इतर फिरकी गोलंदाजांना संधी नव्हती. तर १९७९ सालपर्यंत बेदीसह फिरकी चौकडी निवृत्त झाल्यावर शिवलकरना डावलून दिलीप दोशीला संधी दिली गेली. दोनदा ते भारतीय संघात समावेश होण्याच्या उंबरठ्यावर होते असे अनेकांना वाटले. एकदा १९७७ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी संभावित खेळाडूंच्या कॅम्पसाठी त्यांची निवड झाली तेव्हा, आणि दुसऱ्यांदा बेदी निवृत्त झाला तेव्हा. पण दोन्ही वेळा नियतीने त्यांना दगा दिला. नाही म्हणायला १९७३-७४ मध्ये त्यांना भारतीय संघासह श्रीलंकेचा दौरा करायला मिळाला. तिकडे दोन ‘अनधिकृत’ कसोटी सामन्यात त्यांनी चार बळी मिळवले. १९७९-८० मध्ये शिवलकर इंग्लंडमध्ये मायनर काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ‘डरहॅम’साठी खेळले.

१९८१ साली मुंबईसाठी खेळणे थांबवल्यानंतरही नाउमेद न होता, ते उत्साहाने शिपाजि*, सीसीआय आणि टाटा क्लबसाठी ५५ वयापर्यंत समर्पित वृत्तीने, फिटनेस राखून खेळत राहिले. पॅडीना मैदानावर कुठल्याही परिस्थितीत कधीच निराश झालेले वा आक्रस्ताळेपणा करताना कोणी बघितले नाही. पॅडी क्रीडाकौशल्याबरोबरच साध्या, शांत स्वभावाने संघातील लहानथोरांना हवहवेसे असायचे. उशिरा का होईना पण १९९५ साली त्यांना संभाजीनगरमध्ये बेनिफिट मॅच मिळाली ज्यात सुनिल, कपिलसह सचिन, अझर वगैरे भारतातले तेव्हाचे सर्व प्रमुख खेळाडू अगदी आपलेपणाने खेळले आणि पॅडीना थोडी फार आर्थिक मदत झाली.

दरम्यानच्या काळात ‘टाटा केमिकल्स’मध्ये पॅडीनी निवृत्तीपर्यंत इमानेइतबारे नोकरी केली. पुढे मुंबई क्रिकेटशी प्रशिक्षक आणि निवडकर्ता अशा स्वरूपात जोडलेले राहिले. शिवाजी पार्कवर त्यांनी मैदानातील होतकरू प्रतिभा पारखण्यात आणि जोपासण्यात योगदान दिले. कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्या पुढाकाराने ‘शिवाजी पार्क जिमखाना अकादमी’ सुरू झाली, तेथे त्यांनी १० वर्षे आपल्या अनुभवाचा फायदा तरुण खेळाडूंना करुन दिला. तिथूनच श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, हरमीत सिंग सारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडले आहेत. आपल्या प्रत्येक कार्यात त्यांनी जीव ओतला व आनंद घेतला, ‘आपल्यापेक्षा संघाला प्राधान्य’ ही भावना स्वत:ही जोपासली आणि शिष्यांमध्येही रूजवली.

क्रिकेटव्यतिरिक्त पॅडीना संगीताची खूप आवड होती. आपली गायनकला घर, ड्रेसिंगरूम इतपत मर्यादित न ठेवता सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, वाद्यवृंद इथेही आपली कला सादर करीत. कदाचित क्रिकेटमध्ये मिळालेली निराशा ते गायनातून घालवत असावेत. महम्मद रफीचे ते मोठे चाहते होते आणि त्यांची अनेक गाणी ते सुंदररित्या सादर करीत. ‘सुषमा श्रेष्ठ’ सारख्या मोठ्या गायिकेबरोबरही त्यांनी गाणी सादर केली आहेत. शांताराम नांदगावकर लिखित आणि संगीतबद्ध, त्यांनी गायलेली दोन गाणी चांगलीच गाजली – “कशासाठी वेड्या काळजी उद्याची” आणि “हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळून”. कालांतराने ते स्वत: गीतांची रचनादेखील करू लागले होते. मकरंद वायंगणकर, संजय कऱ्हाडे यांच्या आग्रहाने त्यांनी ‘षटकार’ क्रिकेट पाक्षिकात काही काळ लेखनही केले. पुढे अरुण घाडीगावकर यांच्यासह त्यांनी ‘हा चेंडू दैवगतीचा’ हे मोकळेढाकळे आत्मकथन लिहिले. हे शीर्षक त्यांनीच गायलेल्या गीताचे ध्रुपद होते, जे त्यांच्या आयुष्याचे सारही म्हणता येईल.

आपल्यावरील अन्याय त्यांनी आधी ओरडून सांगितला नसला तरी अखेरच्या काही वर्षात त्याबाबत ते भावुक झाले होते. आपल्याला कोणी गॉडफादर नव्हता आणि कोणाला तरी आपण नको होतो, त्यामुळे गुणवत्ता, पात्रता असूनही आपली भारतीय संघात निवड झाली नाही, अशी खंत ते बोलून दाखवत. त्यांच्या ह्या भावनेशी बहुसंख्य क्रिकेटप्रेमी सहमत असतील. रवींद्र नाट्यमंदिरमध्ये एकदा “मराठी माणसावर अन्याय होतोय का?’ या विषयावरील परिसंवादात व्यासपीठावरून त्यांनी हीच भावना मांडली. “मला केवळ एक कसोटी सामना खेळावयास मिळायला असता तरी त्यामुळे माझे हात आभाळाला टेकल्याचे समाधान मिळाले असते. भारतीय संघाची कॅप मला मिळू दिली नाही, ही भळभळणारी जखम आणि त्यातून होणारी असह्य वेदना मी एकट्याने भोगली”, अशी हृदयद्रावक कैफियत त्यांनी मांडली.

सुनिल गावसकरन यांनी आपल्या ‘आयडॉल्स’ पुस्तकात मोठ्या सन्मानाने पॅडींचा समावेश केला आहे. ते कप्तान असताना पॅडींचा भारतीय संघात समावेश करण्यासाठी निवड समितीला राजी करू शकले नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी एका लेखात त्यांना ‘दधीची’ची उपमा देऊन त्यांच्या अपरिमित कष्टांना नमन केले आहे. त्यांचे वाडेकर, सोलकर, वेंगसरकर, संदीप पाटील, मांजरेकर सारखे सहकारीच नव्हे तर विश्वनाथ, कपिलदेव, अमरनाथ, किरमाणीसारखे अनेक प्रतिस्पर्धीही त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतात. कोणीही क्रिकेटतज्ञ जेव्हा ‘सर्वकालीन सर्वोत्तम मुंबई संघ’ काढतो तेव्हा त्यात पॅडींचा समावेश हमखास असतो. २०१७ साली ‘बीसीसीआय’ने त्यांना ‘सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार’ देवून काही प्रमाणात पापक्षालन केले. टाटा कंपनीनेही त्यांना ‘लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’ देऊन गौरव केला आहे.

आपल्या पश्चात शोकसभा आयोजित करू नये, कोणी रडू नये असे त्यांनी शेवटच्या काळात लिहून ठेवले. आपला अखेरचा प्रवास ‘आनंदयात्री’ म्हणून घडू दे, इतकीच त्यांची माफक अपेक्षा होती. ३ मार्च २०२५ रोजी त्यांचे अल्पश्या आजाराने मुंबईत निधन झाले. तेव्हा चालू असलेल्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने हातावर काळी पट्टी बांधून शिवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या लाडक्या रफीचे “मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया”, हे गीत जीवनसूत्र मानणारा हा शापित यक्ष, आपल्या जादुई डावऱ्या फिरकी गोलंदाजीच्या दंतकथा मागे ठेवून अनंतकाळच्या प्रवासाला निघून गेला.

(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)

– गुरुप्रसाद दि पणदूरकर (माहीम, मुंबई)

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 42 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी, अर्थविषयक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना अनेक दिवाळी अंक, हिंदुस्थान पोस्ट साप्ताहिक यांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (विशेषत: क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..