अनिल कार्की यांची ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी आहे. या कवितेचा मराठी अनुवाद:
“पुस्तके बदलायची आहेत तुम्हाला!”
शेतकऱ्याच्या पोरांनी
पुस्तकाचं पहिलं पान
उघडलं
आणि बराच वेळ शोधत राहिले पुस्तकांत
आपल्या बापाला…
कारागिराचा मुलगा
शोधत राहिला आपल्या बापाला,
जगातील सर्वात मोठ्या वाड्यांचा,
मिनारांचा इतिहास
पुस्तकात वाचताना…
गवत कापणाऱ्या माउलीची मुलं
तिलाच शोधत राहिली
डोंगरांच्या गोष्टी वाचताना
पुस्तकांमध्ये…
न्हाव्याची लेक
शोधत राहिली
कात्रीतून उमटणाऱ्या
चिमणीच्या चिवचिवाटासारख्या आवाजात
आपल्या बापाला…
पुस्तकांमध्ये…
सफाई कामगाराचा मुलगा
शोधत राहिला एक ‘स्वच्छ’ उत्तर
की त्याचे वडील का नाहीत पुस्तकांत?
कोण सांगणार यांना
की हे जग फक्त
डॉक्टर, इंजिनिअर, मास्तर अन् प्राध्यापकांचे आहे,
तहसीलदार अन् जिल्हाधिकाऱ्यांचे आहे;
यात मजूर, शेतकरी,
न्हावी आणि कष्टकरी बायांना कोणतीही जागा नाही…
माझ्या लाडक्या लेकरांनो,
ही पुस्तकं बदलायची आहेत तुम्हाला!
~ मूळ हिंदी कवी: अनिल कार्की
मराठी अनुवाद : विजय नगरकर


Leave a Reply