
एक दिवस मला सोसायटीच्या जवळ झाडाच्या सावलीत एक कुटुंबं बसलेलं दिसलं. नवरा, बायको व पाच वर्षाचा मुलगा. कुटुंबातला पुरुष व महिला पिशवीतून सामान बाहेर काढून ठेवत होती. पोरगं खेळत होतं. मी बाहेर जाऊन परत आलो तेव्हा त्यांचे काम सुरू झाले होते. कल्हई लावणारा होता तो. पेव्हर ब्लॉकचे फुटपाथ व कॉंक्रीटचा रस्ता यामुळे माती असलेली जमीन दिसत नव्हती. त्यामुळे कल्हईवाल्याने शेगडी पेटवली होती. जमिनीत खड्डा केला नसल्याने हातपंपाची व भात्याची गरज नव्हती. पण फुकणी होती. आसपासच्या बिर्हाडांमधून कल्हई लावायला काही पितळी भांडी आलेली दिसत होती. पाण्याची बादली, चिमटे, कापडाचे बोळे, नवसागर ठेवलेली ताटली, कथलाच्या तारा, वगैरे. रस्त्यावरची गर्दी खेचणारांमधे गारूडी, जादूगार, डोंबारी, बहुरूपी, धारवाला असे अनेक जण असायचे. तसाच एक असायचा कल्हईवाला. त्याची ही मांडामंड, नेपथ्य जसे साठ वर्षापूर्वी होते तसेच आज दिसत होते. कमी होती ती बघ्यांची, विशेषतः पोरांची.
स्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो. म्हणून त्याला काम मिळते आहे. तांबे, पितळ यांचा वापर स्वयंपाकासाठी कमी झाला असला तरी काही घरांमधे शोभेस्तव घंगाळं, ताम्हण, घागर, ताट-वाटी-भांडं यांचे सेट मांडले जातात. पितळी पातेली व परात यांचा मात्र चांगला वापर होत असतो. म्हणून कल्हई करावी लागते आहे.
भांडं निखार्यांवर पालथं ठेऊन तपविणे, त्यात कथलाच्या तारेने रेषा ओढणे, नवसागर टाकून पांढर्या धुराच्या पडद्याआड बोळा फिरवणे या क्रिया पाहण्यासारख्या असतात. ‘बोळा फिरवणे’ म्हणजे बट्टयाबोळ करणे नव्हे, तर भांडं स्वच्छ करणे. नंतर ते गरम भांडं पाण्याच्या बादलीत बुडवलं जातं. बघणार्याचे डोळे, नाक व कान कामाला लागलेले असतात. धूर, वास, आवाज मेंदूत साठवले जातात. कल्हईची तयारी दिसताच मला ते सर्व आठवले. मी नेलेल्या भांड्यांना कल्हई होईपर्यंत तेथेच थांबलो. आवडता सिनेमा पुन्हा पाहण्यात जो आनंद असतो तसा भास मला झाला. कल्हईवाला गेल्यावर निखारे विझले की खड्डा वाकरून कथलाच्या लहान-लहान गोळ्या शोधणे हे एक काम असे. आज ते करायला तिथे खड्डा नव्हता आणि पोरंही नव्हती.
– रविंद्रनाथ गांगल


Leave a Reply