नवीन लेखन...

दिवस आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे!

काँग्रेस सरकारने आणीबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते‌.

संघ स्वयंसेवकांसोबत समाजातील महाविद्यालयीन तरुणांना सत्याग्रहात उतरवण्याची जबाबदारी विद्यार्थी परिषदेकडे होती. त्यानुसार मोठ्या हिमतीने आणि भवितव्याची चिंता न करता आम्ही या संघर्षात उतरलो. आणीबाणी लागल्यावर नागपुरातील पहिला जाहीर कार्यक्रम २ ऑक्टोबरला आम्ही विद्यार्थी परिषदेने घेतला. मी त्यावेळी नागपूरचा संघटन मंत्री होतो.

अन्यायी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध लढा द्या, असा महात्मा गांधींचा संदेश असलेले पत्रक आम्ही तयार करून सर्वदूर वितरणाची व्यवस्था केली होती‌. हे पत्र छापल्याबद्दल मधुकर आर्ट्सचे मधुकरराव वैद्य यांना मिसामध्ये पकडून जेल मध्ये टाकले गेले. पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे हे समजल्याबरोबर त्या रात्री आम्ही प्रमुख कार्यकर्ते कोणीच आपल्या घरी गेलं नाही. गीतांजली टॉकीज मध्ये दिलीप कुमारचा सगिना महातो सिनेमा लागला होता, तिथे सर्वांनी रात्री ९.३०च्या शोला आम्ही जमलो व पुढची योजना आखली. तेव्हापासून सत्याग्रह आयोजित करण्याच्या दृष्टीने गुप्त बैठकी, प्रवास, विद्यार्थ्यांना तयार करणे असे सुरू होते. एक बैठक रामटेकला अंबाळा तलावावर चंदू जोशी या कार्यकर्त्याचे घरी झाली. सर्वजण वेगवेगळे लपतछपत जमलो. परिषदेच्या विदर्भ प्रांताच्या काही बैठकी वरोरा येथे कृष्णा घड्याळपाटील या कार्यकर्त्याच्या वाड्यावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या. संघटनेची बांधणी आणि सत्याग्रहाची तयारी यात कुठे कसर राहू नये, यासाठी सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने झटत होते.

पोलीस मला पकडायला आले तेव्हा मी घराबाहेर होतो. रामटेक ची बैठक आटोपून परत येत असताना देवनगर चौकात राजू हेडाऊ या मित्राने सांगितले की, घरी जाऊ नको, पोलीस तिथे पाळतीवर आहेत, आणि तेव्हापासून अधिकृतपणे भूमिगत झालो.

मी समजून माझा मित्र दिलीप सांबरे याला पहिले पोलीस पकडायला गेले त्याने तो मी नाही हे सांगितल्यावर आणि आमचे घर दाखवल्यावर पोलीस आमच्या घरी आले. माझा भाऊ त्याचेही नाव दिलीप सांबरे आहे. तो तेव्हा बँकेत होता. पोलीस बँकेत गेले आणि तुम्ही अनिल सांबरे आहे म्हणून त्याला पकडायला लागले. तेव्हा बँकेच्या लोकांनी त्यांची खात्री पटवली की, हा तो नाही, तेव्हाच तो वाचला.

भूमिगत असताना चांगले चांगले ओळख दाखवायचे नाहीत आणि निरोप पाठवायचे की अनिल तुला काय पैसे लागतील ते मी पाठवितो, पण तू घरी येऊ नको. हीच मंडळी जनता पक्षाचे राज्य आल्यानंतर आम्ही कसे अतिशय जवळचे आहोत हे दाखवायचे. मात्र याच काळात अनेक जणांनी कुठलाही विचार न करता भूमिगत काळामध्ये घरी ठेवून घेतलं, आणि सर्व प्रकारे मदत केली. आम्हाला आश्वस्त केले. असे सगळे प्रकारचे अनुभव आले.

नोव्हेंबर मध्ये सत्याग्रहाची तयारी केली. या काळामध्ये थिएटर मध्ये जाऊन गॅलरीतून पत्रकं फेकणे, पहाटेच्या वेळेला किंवा रात्री वस्त्यांमध्ये जाऊन अंगणामध्ये, घरांमध्ये पत्रके टाकणे, रस्त्यात सायकल वरून जाताना रिक्षात बसलेल्या लोकांना किंवा मग कारच्या खिडकीतून पत्रके टाकणे, पत्रके छापून घेणे, वेगवेगळ्या गटांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांच्या लहान लहान बैठकी आयोजित करणे, त्यांना आणिबाणीविरुद्ध पेटवणे, विद्यार्थी वर्गात असंतोष पसरेल ते जागृत होतील, लढायला तयार होतील घरच्यांच्या दबावला ते बळी पडणार नाही, याची तयारी करून घेणे हे सर्व आम्ही करत होतो.
डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही विविध महाविद्यालयांमध्ये सत्याग्रहाचे आयोजन केले. आम्ही अशी स्ट्रॅटेजी केली की आपले अपेक्षित काम झाले की त्या सत्याग्रहाच्या टीमने तेथून निघून जाणे आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन सत्याग्रह करणे. या पद्धतीमुळे अधिक कॉलेजमध्ये सत्याग्रहाचे आयोजन आम्ही करू शकलो. एकूण ५६ विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना डी आय आर खाली अटक झाली आणि त्यांना कमी अधिक काळाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. सत्याग्रह आयोजित करण्याचे कामज आता संपल्यामुळे २९ डिसेंबर १९७५ ला शेवटच्या बॅचमध्ये युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या दोन ठिकाणी आम्ही सत्याग्रह केला. पोलिसांनी पकडल्यावर बर्डी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नेले तिथे माझ्या नावाने मिसाचा वॉरंट असल्यामुळे मला वेगळे करण्यात आले आणि त्याच रात्री दादर एक्सप्रेस ने नाशिक जेलला मला नेले. त्या दिवशी माझ्या डब्यात नागपूरचे ऑल इंडिया रिपोर्टर चे जयंतराव चितळे आणि अकोल्याहून बाळासाहेब ठोंबरे चढले. आणि ३० डिसेंबरच्या सकाळी आम्ही तिघांनी नाशिक कारागृहात प्रवेश केला. तीन महिने नाशिकला राहिल्यावर आम्हा काही तरुण मंडळींची रवानगी नागपूर जेल मध्ये झाली. २२ मार्च ७७ ला सुटेपर्यंत आम्ही नागपूर कारागृहातच होतो.

हा सर्वच काळ मोठा रोमांचकारी, आयुष्यभर लक्षात राहणारा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असा राहिला यात शंका नाही.

अनिल रामचंद्र सांबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..