पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-ब / ११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ]

ऐतिहासिक कवितांमध्ये तर अनेकदा मरणाचे उल्लेख असतातच  –

शिवरायाचा सिंह सिहगडिं पडला समरांगणीं

मराठा गडी यशाचा धनी   ।।

–     कुंजविहारी

खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या

उडविन राईराईएवढ्या  ।।

स्वातंत्र्य-युद्धाच्या संदर्भातील पद्यातही  मरणाचे उल्लेख विपुल असतात . भा. रा. तांबे च्या,‘झाशीवाली’ कवितेतील ‘ती पराक्रमाची ज्योत मावळे इथें झाशीवाली’ या ओळीचा उल्लेख आधीं आलेलाच आहे. आणखी कांहींचें काव्य पहा –

 

भेटेन नऊ महिन्यांनी   ।

आणि हें रामप्रसाद बिस्मिल या स्वतंत्र्यसेनानीचें ( उर्दू ) –

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

देखना है, ज़ोर कितना बाज़ू ए क़ातिल में है ।

आणि, त्याच संदर्भात हें हिंदी सिनेगीत पहा  –

वतन की राह पे वतन के नौजवाँ शहीद हों ।

मृत्यूची दोन रूपें पहा खालच्या दोन पद्यांमध्ये .  हा लढाईतील मृत्यू   –

हा कोण इथें पडलेला

गोकलखाँ लढनेवाला  ।

( गोकलखाँ – सरदार बापू गोखले )

 

‘केशवकुमार’ (आचार्य अत्रे) यांनी, यावर विडंबनकाव्य लिहून , मरणोल्लेख असा केला आहे –

हा कोण इथें पडलेला

कादरखाँ काबुलवाला  ।

 

आपल्या हें ध्यानात येतें की, प्राणांची बाजी लावून लढणारे सेनापति बापू गोखले असोत , किंवा किसमिस विकणारा कादरखाँ पठाण असो, त्यांचे मरण हें सारखेंच (same) असतें. त्यावरून, समर्थ रामदासांचें दासबोधातील मृत्यूविषयींचें निरूपण आठवतें . (रामदासांचें एक अवतरण आधी दिलेलेंच आहे).

रेव्हरंड  ना.वा. टिळक यांच्या ‘केवढें हें क्रौर्य’ या कवितेतील, एका पक्षिणीच्या मृत्यूचें हें वर्णन पहा . पहिल्या पंक्तीपासूनच ही कविता मरणासन्न पक्षिणीच्या स्थितीचें व मनस्थितीचें, आणि तिच्या impending मरणाचें, हृदयाला भिडणारें वर्णन करते. हें पहिलें कडवें पहा –

क्षणोक्षणीं पडे, उठे परि बळें, उडे बापडी

चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झांपडी

किती घळघळा गळे रुधिर लोमलांगातुनी

तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी .

 

तिच्या मृत्यूचें वर्णन करणारे हें अंतिम कडवें पहा –

मातीत ते पसरले अतिरम्य पंख

केलें वरी उदर पांडुर निष्कलंक

चंचू तशीच उघडी, पद लांबवीले

निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले .

 

ही कविता वाचून, आदिकवी वाल्मीकीच्या ‘मा निषाद..’ या काव्यमय उद्गारांची आठवण होते. मात्र, वाल्मीकीच्या काव्याचा संबंध मैथुनात-मग्न पक्षिणीच्या मृत्यूशी आहे ; तर कविवर्य टिळक , घायाळ अवस्थेतही आपल्या लहानलहान पिल्लांची काळजी करणार्‍या माता-पक्षिणीचें वर्णन करतात. ही कविता एखाद्या पक्षिणीच्याच काय, पण कुठल्याही मातेच्या मृत्यूला लागू पडते.

नामदेव ढसाळ , अनिल कांबळे, प्रकाश खरात वगैरेंच्या खालील काव्यांमध्ये मृत्यूविचारामधील ‘सामाजिक अंग’ स्पष्ट दिसतें.

ढसाळ यांचे कांहीं काव्यांश पहा :

– या निर्लेप जंगलात मला कधी आठवत नाहीं

त्यानें केलेली हाराकिरी.

– बेघर पोरांचे पाय कबरस्तानामधे दिसताहेत

…..

गुडघे टेकून रडू कबरीकबरीवर ..

– मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणार्‍यांनी

काय बदलावं

ढसाळांच्या एका  काव्यांशाचें इंग्रजी भाषांतर  :

While we are being slaughtered

not even a sigh for us

escapes their generous hands.

अनिल कांबळे यांचा एक शेर पहा –

खोकतांना बाप मेला, माय आजारात गेली

घेउनी देहास अपुल्या, लेक बाजारात गेली .

हल्लीहल्लीच, नोव्हेंबर २०१६ मध्ये, प्रकाशित झालेल्या प्रकाश खरात यांच्या ‘जन्ममरण वर्दळीवर येतांना’ या काव्यसंग्रहातील एक काव्यांश पहा –

एक महामानवानं

जन्माला घातलेल्या सूर्यावर

फितूर मारेकरी घालतायत् तलवारींचे घाव …

शिरीष पै यांचे हे दोन हायकू पहा –

मृत्यूनंतर चितेवरती

हें शरीर जळत राहील

त्याला चटके थोडेंच लागतील ?

 

खालील हायकूत एक वेगळीच भावना शिरीष पै दाखवून जातात –

विषारी ओषध मारलें

झुरळ तडफडून मेलें

समाधान वाटलें .

*

(पुढे चालू) ……

— सुभाष स. नाईक    
Subhash S. Naikसुभाष नाईक
About सुभाष नाईक 211 लेख
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची तीन पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. ‘The Earth In Custody’ हे पुस्तक ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी कवितांचें पुस्तक आहे. इतर दोन पुस्तकें ही, ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर आणि इतर अनेक वृत्तपत्रांत/नियतकालिकांत, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…