नवीन लेखन...

मुंबई ते कल्याण रेल्वेप्रवासाची नांदी

1 May 1854, Beginning of connecting Mumbai with Rest of India

१८५४ मध्ये मुंबईजवळचा पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा खोदून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला.

त्यापूर्वी जेमतेम एक वर्षाआधी भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई – ठाणे दरम्यान सुरु झाली. या दिवसाला भारताच्या इतिहासात मोठे महत्त्व आले. मात्र त्यानंतर केवळ एकाच वर्षात ब्रिटिशांनी आणखी एक आविष्कार दाखवून ही रेल्वे थेट कल्याणपर्यंत नेली आणि तीसुद्धा पारसिकचा डोंगर खोदून.. आणि भव्य बोगद्यातून रेल्वेमार्ग टाकून. १ मे १८५४ हा दिवस कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खरा सोन्याचा ठरला आणि त्यासाठी त्यांनी ब्रिटिशांचे मनोमन आभार मानायला हवेत. का, ते समजण्यासाठी पुढे आणि शेवटपर्यंत वाचा…..

१८३० मध्ये जगातील पहिली रेल्वे सुरु झाली. त्यानंतर केवळ चौदा वर्षात भारतात रेल्वे आली. इंग्लडमध्ये बनवलेल्या लॉर्ड फॉकलंड इंजिनने भारतातील पहिली रेल्वे खेचली. त्याच्या दिमतीला सिंध, सुलतान आणि साहिब या नावांची तीन इंजिने होती.

दुपारी साडेतीन वाजता ही गाडी मुंबईतील ५०० प्रतिष्ठीत नागरिकांसह पहिल्या प्रवासाला निघाली. तोफांची सलामी, बॅंडपथक हे तर तयार होतेच. बोरीबंदर ते ठाणे असा प्रवास ५७ मिनीटात झाला. ठाण्याला उपस्थितांना मेजवानी दिल्यानंतर ठाणे बोरिबंदर प्रवास ४० मिनीटे करण्यात आला आणि १८ मे १८५३ (सोमवार) पासून आगगाडी आम जनतेच्या प्रवासासाठी सुरु झाली.

यानंतरच्या काळातही लोहमार्ग ठाण्याच्या पुढे टाकण्याचे काम सुरु होते. मुंबईजवळच्या पारसिकच्या डोंगरातून बोगदा खोदून त्यातून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला. या मंडळीत स्त्रियादेखील होत्या. या वाफेच्या इंजिनाला प्रथम वर्गाचे सात व दुसर्‍या वर्गाचा एक डबा जोडण्यात आलेला होता. गाडीला खानपानाचाही एक डबा जोडण्यात आला होता. सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी बोरीबंदर स्थानकावरुन सुटलेली ही गाडी १ तास १० मिनीटांचा प्रवास करुन सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचली. कल्याण स्टेशनपर्यंत ही गाडी नेण्यात आली नाही तर स्टेशनच्या आधी खाडीकिनार्‍यालगत गाडी थांबवण्यात आली. येथेच सैनिकी बॅन्डपथकाने बॅन्डची सलामी दिली. मेजवानी देखील येथेच देण्यात आली. कल्याणपर्यंत रेल्वे धावली या आनंदाप्रित्यर्थ फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. तीन तासाच्या मनोरंजनानंतर जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परतीच्या प्रवासाला निघालेली गाडी रात्री अकरा वाजता बोरीबंदरला परत पोहोचली.

त्यावेळी डोंबिवली, कळवा, मुंब्रा ही स्टेशने नव्हती. हाच लोहमार्ग मग पुढे पुण्यापर्यंत वाढवण्यात आला. पुढे कल्याण हे या मार्गावरील जंक्शन स्थानक बनले. रेल्वेस्थानक, कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्यासाठी लागणारा दगड या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे या उभारणीचा खर्च आणि वेळ वाचणार होता. मात्र, त्याच वेळी तत्कालीन कल्याण पालिकेने रेल्वेला पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. त्या वेळी कल्याणला काळा तलावातून पाणीपुरवठा होत होता. पाणी मिळणार नाही म्हटल्यावर रेल्वेची पंचाईत झाली. त्यामुळे ग्रेट इंडियन पेनन्सुला कंपनीने अंबरनाथला जंक्शन करण्याचा विचार सुरू केला. परंतु अंबरनाथ परिसरात बांधकामासाठीचा दगड उपलब्ध नव्हता. अखेर अंबरनाथजवळील काकोळे तलावावर धरण बांधून तेथून पाणी कल्याण स्थानकापर्यंत आणण्यात आले. पुढे कल्याण हे जंक्शन बनले. भारताच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या बहुतांश गाडय़ा कल्याण स्थानकातून जातात. रात्रंदिवस प्रवाशांची प्रचंड गर्दी कल्याण स्थानकावर असते.

आता दुर्दैवाचा भाग बघा. १६० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भविष्याचा विचार करुन ज्या काही सुविधा आणि सुखसोयी आपल्यासाठी निर्माण केल्या त्यांचा लाभ आपण अजूनही घेत आहोत. पारसिकच्या त्याच बोगद्यातून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. ठाण्याच्या खाडीवरचा तोच जुना पुल अजूनही रेल्वेसाठी वापरला जातोय.

मात्र आपल्याच लोकांनी बांधलेले एक्स्पेस-वे, मुंब्रा बायपास, कल्याण-शीळ रस्ता यासारखे रस्ते खड्डेमुक्त होण्याऐवजी दर पावसाळ्यात खड्डेयुक्त होत आहेत. ठाणे कल्याण दरम्यान अजूनही थेट रेल्वेमार्गाला समांतर रस्ता होत नाही. १६० वर्षांपूर्वी ब्रिटिशांना पारसिकचा बोगदा खणण्यासाठी जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्यापेक्षा कितीतरी पटींनी श्रेष्ठ तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. मग १०-१५ किलोमिटरचा एक रस्ता आम्हाला बनवता येत नाही की त्यात हितसंबंध गुंतलेले आहेत? वरळी सी-लिंक सारखा मोठा पूल जर ४-५ वर्षात बनू शकतो तर मग ठाणे कल्याण रेल्वेला समांतर रस्ता का होत नाही?

निदान या रेल्वेसाठीतरी खरोखरच कल्याण-डोंबिवलीकरांनी ब्रिटिशांचे आभार मानले पाहिजेत. पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा बांधून रेल्वे सुरु झाली नसती तर कदाचित स्वतंत्र भारतात अजूनही हे काम कोणत्या कॉन्ट्रक्टरला द्यायचं, कोणाचे किती टक्के, टोल किती घ्यायचा यातच गुरफटून राहिलं असतं !

— निनाद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..