नवीन लेखन...

आता लढा सुरू झालाय!

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निकराच्या लढ्यात प्रकाश पोहरे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभागी झाले आहेत. त्यामुळे दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘प्रहार’ या स्तंभासाठी ते यावेळी वेळ देऊ शकले नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी दि.1/12/2002 ला प्रकाशित झालेला त्यांचा ‘प्रहार’ पुनर्मुद्रित करीत आहोत. हा प्रहार प्रकाशित झाला तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केवळ 83 वर पोहोचला होता. त्याचवेळी ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते याची जाणीव होऊन प्रकाश पोहरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एका गैरराजकीय मंचाद्वारे आंदोलन करण्याची गरज प्रतिपादली होती. त्यांचे त्या वेळचे चिंतन किती दूरदृष्टीचे होते हे आज सिद्ध होत आहे.
– संपादक

मनुष्य हा संवेदनशील प्राणी आहे. इतर प्राण्यांतही संवेदना आढळते; परंतु ती स्वत:पुरती किंवा फारतर फार आपल्या कळपापुरती. मनुष्याचे तसे नाही. आपल्यासोबतच अवघ्या विश्वाचे कल्याण चिंतण्याचा विचार तो करू शकतो. कदाचित म्हणूनच केवळ बौद्धिकदृष्ट्याच नव्हे, तर सांस्कृतिक प्रांतातदेखील मानवाने विकासाचे शिखर गाठले असावे. स्वत:पलीकडे पाहण्याचा, स्वत:पलीकडे विचार करण्याचा हा गुण मानवाचा स्थायिभाव असला तरी अलीकडील काळात ‘पलीकडे’ पाहणारी मानवाची ही दृष्टी विकृत तर झाली नसावी अशी साधार शंका येऊ लागली आहे. मी आणि माझे घर या संकुचित वर्तुळात स्वत:ला कोंडून घेणाऱ्यांना कदाचित हा बदल जाणवणार नाही; परंतु चळवळीच्या माध्यमातून संघटनेचे जाळे उभारून बहुतांसाठी कार्य करणाऱ्या लोकांना याचा अनुभव येत आहे. प्रसंगी स्वत:च्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून इतरांच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या नशिबात शेवटी काय असते? टिंगलटवाळी, कुचेष्टा, अवहेलना दुसरे काय? हा अनुभव आम्ही पूर्वीही घेतला आहे आणि तोच आतासुद्धा येत आहे. कापसाच्या उत्पादनात वऱ्हाडातील शेतकऱ्यांचे आर्थिक प्राण गुंतलेले आहेत. या पिकाच्या बळावरच वऱ्हाड प्रांतातील शेतकऱ्यांचे अर्थव्यवहार चालत असतात. मुलाबाळांचे  लग्न असो अथवा रोजच्या भाकरीची चिंता असो, ती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या जुळली आहे पऱ्हाटीच्या बोंडाशी. त्यामुळे या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबावर सरकारी धोरणाच्या निष्ठुरतेचा वरवंटा फिरू लागला आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. संघटित शक्तीचा अभाव, योग्य नेतृत्वाची उणीव आणि जनप्रतिनिधींचे दुलर्क्ष या आणि अशाच स्वरूपाच्या विविध कारणांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशी दयनीय झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी थेट शरद पवारांपासून झाडून सारे जनप्रतिनिधी उभे ठाकत असताना विदर्भातील कापूस उत्पादक मात्र सर्वच बाजूने उपेक्षिल्या जात होता. त्याचवेळी विविध राजकीय पक्षांनी या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्या व्यथेला राजकारणातील एक खेळणे करून टाकले होते. त्या पृष्ठभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एखाद्या गैरराजकीय मंचाद्वारे लढा देणे गरजेचे होते. एरवी पक्षीय राजकारणामुळे इच्छा असूनही जनप्रतिनिधी अशा प्रश्नांवर एकत्रित येऊ शकत नाही. ह अडचण दूर करावी आणि सर्वांच्याच चिंतेचा विषय असलेल्या कापसाच्या प्रश्नाला न्याय मिळवून द्यावा हीच या गैरराजकीय मंचामागची भूमिका आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे एकाच राज्याचे दोन भाग आहेत. परंतु या दोन भागांतील जनप्रतिनिधींच्या भूमिकेत किंवा दृष्टिकोनात कमालीचा फरक आहे. पश्चिम महाराष्ट्रातला ऊसउत्पाक शेतकरी सरकारी धोरणामुळे अडचणीत आला आणि तिकडच्या सर्वच जनप्रतिनिधींनी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून राज्य सरकारवर दबाव आणला. अगदी केंद्रातसुद्धा या ऊसउत्पादकांची बाजू जोरकसपणे मांडली. परिणामस्वरूप साखरेवर हजार रुपये प्रतिटन सबसिडी तर मिळालीच, शिवाय साखरेचा 20 टनांचा बफर स्टॉक करण्यास म्हणजेच 2400 कोटी रु. ची साखर खरेदी करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. उत्तर प्रदेशच्या खासदारांनी तर वाहतुकीवरसुद्धा 1250 रु. प्रतिटन सबसिडी मिळविली. अर्थात त्याचा फायदा महाराष्ट्रातील ऊसउत्पादकांनासुद्धा होणार आहे. सांगायचे तात्पर्य, जनप्रतिनिधी जागरूक असतील तर गंभीर प्रश्न सुटायलाही फारसा वेळ लागत नाही. दुर्दैवाने कापूस उत्पादक विदर्भ प्रांतातील जनप्रतिनिधी कापसाच्या प्रश्नावर ती संवेदनशीलता दाखवू शकले नाही. या प्रतिनिधींमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी कापूस उत्पादक संघाच्या माध्यमातून आम्ही विविध चर्चासत्रांचे आयोजन केले. वेळप्रसंगी जनप्रतिनिधींच्या घरांना प्रतीकात्मक ‘घेराव’ घातला; परंतु तरीही अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. शासनाचा व्यवहारसुद्धा कापूस उत्पादकांप्रति पक्षपातपूर्णच राहिला. कापूस उत्पादक संघाने सनदशीर मार्गाने आपले आंदोलन सुरूच ठेवले. मे महिन्यात संघातर्फे कापूस परिषद घेण्यात आली. त्यानंतर संघाच्या माध्यमातून तसेच वैयक्तिकरीत्यादेखील मी मुख्यमंत्र्यांशी बोललो; परंतु शासनाच्या हृदयाला पाझर फुटला नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यास सरकारवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. पूर्वी विदेशी राज्यकर्ते असताना उपोषणाच्या माध्यमातून गांधीजींनी अनेक आंदोलने यशस्वी केलीत; परंतु आजच्या देशी सरकारला सरळमार्गी भाषा समजत नाही. सनदशीर मार्गाने दाद-फिर्याद मागणाऱ्यांच्या नशिबी घोर निराशाच येत असेल तर शेवटी त्यांनी बं ूक उचलून नक्षलवादाचा मार्ग स्वीकारलाच तर चूक कोणाची? विदर्भातला शेतकरी प्रचंड सोशीक आहे. कायदा हातात घेण्याचे धाडस तो करीत नाही. अन्याय अगदीच अनावर झाला तर तो आत्महत्येचा मार्ग चोखाळतो. अशा या सोशीक परंतु संवेदनशील शेतकऱ्याचा सर्वांनीच आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतला. शेतकरी संघटनेचे आंदोलन जोरात होते तेव्हा हाच शेतकरी, ‘शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ म्हणत त्यांच्या पाठीशी उभा राहिला. शरद जोशींची पाठराखण करताना त्याने पोलिस, राजकारणी, विविध राजकीय पक्ष सगळ््यांचाच रोष ओढवून घेतला; परंतु पुढे ती चंद्राची कोरच काळवंडली आणि शेतकऱ्यांचा ‘नेतृत्व’ या कल्पनेवरचा विश्वासच उडाला. ज्याच्यासाठी सगळ््यांचा त्याग केला त्यानेच धोका दिला. या धक्क्यातून विदर्भातला शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. सावरला नाही म्हणून संघटित झाला नाही आणि संघटित झाला नाही म्हणूनच उपेक्षित राहिला. कोणीही यावे आणि आपल्या राजकारणासाठी विदर्भातील कापूस उत्पादकांच्या वेदनेचे भांडवल करावे हे नित्याचेच झाले. मात्र या सगळ््या प्रकाराला खरेतर विदर्भातील शेतकरीच जबाबदार आहे. कारण भोळसटपणा, ज्यासाठी मी नेहमी ‘भयताळ’ असा शब्द वापरतो तो आमचा स्थायिभाव झाला आहे. आम्हांला सर्वच आमच्याचसारखे प्रामाणिक आणि पापभीरू वाटतात आणि आम्ही खुशाल त्यांच्या खांद्यावर मान ठेवतो आणि ती त्याने कापली म्हणजे मग हिरमुसले होऊन कोपऱ्यात ‘कुंथत’ बसतो. बदला घेणे, रुमणे हाती घेणे, बाह्या मागे सारणे आम्हांला कधी जमलेच नाही. आमची सारी मर्दुमकी घरच्या मुलाबाळांवर, बायकोवर, नोकरांवर काढण्यात आम्ही स्वत:ला धन्य समजतो. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या असंतोषाची धग कायम राहावी आणि आपल्या स्वार्थाच्या पोळ््या बिनबोभाट शेकता याव्यात असाच सर्वांचा प्रयत्न राहिला. या प्रश्नावर कायम तो गा काढण्यास कुणीच उत्सुक नव्हते. राजकीय लोकांच्या या हेतूला छेद देण्यासाठीच कापूस उत्पादक संघ हे गैरराजकीय व्यासपीठ आहे. प्रचलित व्यवस्थेत जनप्रतिनिधींना हाताशी धरूनच सरकारदरबारी आपल्या मागण्या मान्य केल्या जाऊ शकतात हे वास्तव कापूस उत्पादक संघाने स्वीकारणे ही काळाची गरज होती. त्यामुळे कापूस उत्पादक संघाच्या व्यासपीठावर विविध पक्षांच्या खासदार, आमदारांना बोलावून त्यांच्याकरवी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक संघाने नागपुरात चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रासाठी सर्वच पक्षांच्या जनप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले; परंतु वसंतराव इटकेलवार आणि रमेश बंग या दोन विद्यमान आणि अशोक धवड या माजी आमदारांचा अपवाद वगळता इतरांनी या चर्चासत्राकडे पाठ फिरविली. सातत्याने नागविल्या जाणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शरद जोशींनी भ्रमनिरास केल्यावर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी जनप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नातून भरून काढण्याच्या संघाच्या प्रयत्नांना जनप्रतिनिधींनीच अपशकून केला. कदाचित त्यांची काही राजकीय मजबुरी असेल किंवा उद्या या प्रश्नाची तड लागल्यास त्याचे श्रेय कापूस उत्पादक शेतकरी संघाला जाईल अशी भीती त्यांना वाटत असावी. कदाचित तसे नसेलही, कुणाचे वैयक्तिक कार्यबाहुल्य असेल; परंतु या प्रतिनिधींची कापूसप्रश्नी असलेली उदासीनता स्पष्ट झाली. केवळ जनप्रतिनिधींनाच दोष देता येणार नाही. संघाचेही काही चुकले असेल. वैयक्तिक संफ, मानपान हाही भाग असू शकतो. नागपूर चर्चासत्राकडे जनप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याची बातमी काही वर्तमानपत्रांनी अगदी मोठाल्या छायाचित्रासह ज्या पद्धतीने प्रकाशित केली तो एकंदर प्रकारसुद्धा व्यथित करणारा होता. शेतकरी, कष्टकरी, समाजातील शोषित वर्गासाठी कुणी काम करीत असेल तर सर्व भेदाभेदांना मूठमाती देऊन त्यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. या प्रकाराने नाउमेद न होता लाख संकटं आली तरी कापूस उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची लढाई सुरूच राहील. कापसाचे पांढरे सोने आज शेतकऱ्यांच्या सरणातून उठणाऱ्या धुराने काळवंडले आहे. या पांढऱ्या सोन्याच्या व्यवहारात आलेल्या अपयशाने 83 पापभीरू शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे. त्या 83 शेतकऱ्यांच्या चितेतून उठलेल्या ज्वाळांची धग आमच्या हृदयात आम्ही जपून ठेवली आहे. शेवटच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहील. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन, जे आडवे येतील त्यांना हात जोडीत आम्ही पुढे जाणारच आहोत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या मार्गावर प्रवास करताना आमच्या वाटेला अवहेलना, टवाळी, कुचेष्टाच येणार याची आम्हांला कल्पना आहे; परंतु ज्यांच्यात काही करायची धमक नाही ते लोकं टिंगलटवाळीखेरीज काय करू शकणार? त्यांच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. शेवटपर्यंत लढावे लागेल. 83 शहीद झालेत. हा आकडा 100 वर पोहोचणार नाही याकरिता दक्षता घ्यावी लागेल.
स्व. कुसुमाठाज म्हणतात

–  दिशाहीन यात्रेच्या या अनंत वाटेवर
येते हाक क्षितिजाची फसवी ,
तरी दुरवर काळाला तुडवीत जा,
एकलाच चालत जा!त्

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..