नवीन लेखन...

व्यर्थ शक्तिपात

प्रकाशन दिनांक :- 17/08/2003

हिंदू मान्यतेनुसार मनुष्य योनीतला जन्म अतिशय दुलर्भ मानला जातो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे सुटायचे असेल, मोक्ष साधायचा असेल तर तो केवळ मनुष्य जन्मातच साधता येतो. आधीच मनुष्य योनीतला जन्म दुलर्भ आणि त्यातही तो भारतासारख्या देवभूमीत होणे तर अधिकच दुलर्भ. हा दुलर्भ योग, मोक्ष साधण्याची ही अपूर्व संधी सद्यस्थितीत थोडेथोडक्या नव्हे तर चक्क 105 कोटी मनुष्य प्राण्यांना लाभली आहे. देवभूमी भारतात सध्या 105 कोटी जीव मोक्ष प्राप्तीच्या अगदी निकट पायरीवर आहेत, परंतु म्हणतात ना, ‘दात आहेत, पण चणे नाही’ किंवा ‘चणे आहेत, पण दात नाही’ तशी काहीशी परिस्थिती आहे. मोक्ष वगैरे पारमार्थिक संकल्पना फार दूर राहिल्या, साध्या प्राथमिक पातळीवरील भौतिक सुखांनाही हे देवभूमितले देवपुत्र पारखे होत आहेत. ज्याला संसार धड करता येत नाही त्याने संन्यासाच्या भानगडीत पडू नये म्हणतात. त्याच धर्तीवर असेही म्हणता येईल की, ज्याला साधी भौतिक सुखे कशी मिळवतात हे कळत नाही त्याने मोक्ष वगैरे साफ विसरून जावे.
पृथ्वीवरील इतर कोणत्याही देशातील मनुष्याच्या तुलनेत आम्ही भारतीय स्वर्गस्थ देवांचे अधिक लाडके. ‘अमृतस्य पुत्ता:’ असा आमचा गौरव. आम्ही अमृताचे अधिकारी. परंतु आमची सध्याची अवस्था मात्र स्वत:च्याच नाभीतील सुगंधाने बेभान होऊन रानोमाळ भटकणाऱ्या कस्तुरीमृगासारखी झाली आहे. प्रत्येक जण एक अंतहीन जीवघेणी धावपळ करताना दिसतो आणि ही धावपळसुध्दा दिशाहीन आहे. आपण करीत आहोत ते योग्य आहे अथवा नाही याचे भानच हरविले आहे. मनुष्य जन्म दुलर्भ मानला तर या जन्मातला प्रत्येक क्षण लाखमोलाचा असला पाहिजे. प्रत्येक क्षण खर्च करताना त्यातून मिळू शकणाऱ्या लाभाची चिकित्सा व्हायला पाहिजे, परंतु तसे कधीच होत नाही. मानवी आयुष्याचे भाग करायचे झाल्यास साधारणपणे खऱ्या

अर्थाने आयुष्य सार्थकी लागू

शकण्याची संधी फार थोड्या काळासाठी उपलब्ध असते

असे म्हणता येईल. पहिल्या पाच वर्षापर्यंतची शैशवावस्था, त्यानंतर बालपण. साधारण 25 व्या वर्षापर्यंत शिक्षण, पुढची दहा ते पंधरा वर्षे कर्तृत्व दाखविण्याचा काळ. त्यानंतरची काही वर्षे आयुष्याची, संसाराची नीट घडी बसविण्यात जातात. पुढे सुरू होतो वानप्रस्थाश्रम. परमार्थ वगैरेची चिंता याच काळात भेडसावू लागते. त्यापुढचा काळ मात्र नंदादीपासारखे शांतपणे तेवण्याचा. आयुष्यभराच्या तपश्चर्येतून मिळालेला ज्ञानाचा प्रकाश इतरांना देण्याचा आणि त्या प्रकाशात स्वत:ही उजळून निघण्याचा. हे शांतपणे तेवणारे नंदादीपच कोणत्याही समाजासाठी प्रभावी मार्गदर्शक ठरत असतात. त्यामुळेच त्यांना जपायचे असते. परंतु दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. कोणीही कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. प्रत्येकजण आपल्यापरिने आयुष्याचा हिशोब मांडताना दिसतो आणि सरते शेवटी बहुतेकांचे हिशोब चुकलेले दिसतात.
घोडा का अडला, पाणी का सडले, तलवार का गंजली, भाकरी का करपली? या सामाईक उत्तर असलेल्या प्रश्नांच्या मालिकेत एका प्रश्नाची अजून भर टाकता येईल आणि तो म्हणजे आम्हा भारतीयांना वैयक्तिक आणि सोबतच देशाचा विकास का साधता आला नाही? या पाचही प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ‘न फिरवल्याने’. कार्य कोणतेही असो ते बलाशिवाय होऊ शकत नाही आणि बल लावण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते, असे विज्ञान सांगते. विकासाचे कार्यदेखील ऊर्जेमुळेच घडून येते आणि त्यासाठी गरज असते ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करण्याची. आपली चूक नेमकी तिथेच होत आहे. ऊर्जा तर भरपूर आहे, पण ती वापरायची कशी, किती आणि केव्हा याचेच आम्हाला ज्ञान नाही. हे ज्ञान ज्यांना आहे ते एकतर सांगायला तयार नाहीत किंवा त्यांचे ऐकायला आपल्याजवळ वेळ नाही. त्यामुळेच आपले प्रयत्न
िष्फळ ठरत आहेत. विकासाची गाडी मग ती वैयक्तिक असो अथवा सामूहिक जागची हलायला तयार नाही. धड संसारही होत नाही अन् धड परमार्थही साधल्या जात नाही. देशाची अवस्थादेखील तशीच. धड विकसितही नाही. धड अविकसितही नाही. विकसनशील नावाची मधलीच कुठली तरी अवस्था. अर्थात ही अवस्था बदलणे फारसे कठीण नाही, फक्त आपल्या शक्तीचा आपल्या ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने वळविणे आवश्यक आहे. विकास अडला आहे तो उर्जेचा हा प्रवाह न फिरविल्यानेच! साधारण आपल्या निदर्शनास असे येते की, जेव्हा देशाचा किंवा समाजाचा विचार केल्या जातो किंवा आपण करतो तेव्हा आपण स्वत:ला अगदी अलगद बाजूला ठेवतो. माझ्या एकट्यामुळे काय फरक पडेल किंवा मी एकटा काय करू शकतो, ही भावना त्यामागे असते. परंतु तसे नसते. देशाचे स्वत:चे कुठले अस्तित्व नसते, आकार नसतो, चरित्र नसते. देश ही संकल्पना व्यापक असली तरी त्या संकल्पनेचे प्रतिबिंब प्रत्येक व्यक्तीत असते. प्रत्येक व्यक्तीच देश असते. देशामुळे व्यक्तीचे अस्तित्व नसते तर व्यक्तीच्या अस्तित्वाने देशाला आकार प्राप्त होतो. आपण स्वत:ला देशापासून वेगळे करू शकत नाही. त्यामुळे आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक विचार आपल्या सोबतच आपल्या देशाचेही भवितव्य घडवू किंवा बिघडवू शकतो, याचे भान असणे आवश्यक ठरते. प्रत्येकाला याची जाणीव असायला हवी. ही गरज जितकी देशाची आहे तितकीच देशवासियांची आहे. परंतु दुर्दैवाने या जाणिवेची जाणीव करून द्यायला कोणी तयार नाही. भारताला महान विकसित राष्ट्र म्हणून उभे करण्याचे स्वप्न प्रत्येक राजकीय नेता जनतेसमोर ठेवत असतो. परंतु त्यासाठी नेमके काय करायचे, हे कोणी सांगत नाही. कळतच नसेल तर सांगतील तरी काय? हा देश महान होऊ शकतो, अगदी सहज होऊ शकतो. शेवटी ही देवभूमी आहे. इथे कमी आहे तरी काय? शंभर कोटी डोकी आणि दोनशे कोटी हातांनी मनावर घेतले तर काय होऊ शकत
ाही? फक्त या हातांना, डोक्यांना योग्य दिशेने चालना देण्याची गरज आहे. त्यांच्या शक्तीस्त्रोताचा योग्य प्रकारे वापर करण्याची

गरज आहे.
सध्या नाशिक – त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा सुरू आहे. हजारो

साधु – संत, लाखो भाविक तिथे जमले आहेत आणि वर्षभर ही वर्दळ राहणार आहे. प्रश्न केवळ भाविकांच्या भक्तीचा नाही. त्या अनुषंगाने इतरही अनेक प्रश्न निर्माण होतात. या लाखोंच्या समुदायाची बडदास्त ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी हजारो कोटी गोदेच्या पाण्यासारखे वाहवल्या जात आहे. मानवी श्रमाचे वाया जाणारे तास गृहीत धरल्यास हा खर्च कितीतरी वाढतो. या खर्चापासून होणारी मिळकत किती, हा प्रश्न उपस्थित केल्यास काय उत्तर देता येईल. हा प्रचंड पैसा आणि ही प्रचंड मानवी श्रमशक्ती योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे खर्च झाली असती तर? आज कित्येक गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. पक्या सडका नाहीत, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा नाही, शाळा नाहीत. कुंभमेळ्यावर सरकारतर्फे होणारा खर्च आणि तिथे येणाऱ्या लाखो भाविकांचा वाया जाणारा वेळ, वाया जाणारे श्रम जर या खेड्यापाड्यांच्या विकासाकडे वळवता आले असते तर! परंतु ही जाणीव सरकारला नाही आणि जनतेलाही नाही. आम्ही वाया घालवत असलेल्या शक्तीचे, ऊर्जेचे हे एकच उदाहरण नाही. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. क्रिकेटसारख्या सर्वच दृष्टीने निरर्थक खेळापायी वेडी झालेली जनता आपला वेळ, पैसा आणि श्रमशक्ती अक्षरश: वाया घालवित असते. क्रिकेटचे सामने असले की, हजारो लोक मैदानावर आणि अक्षरश: कोट्यवधी दूरचित्रवाणीसमोर निव्वळ बसून असतात. या लोकांनी त्याऐवजी प्रत्येकी तासभर जरी कुदळीचे धाव घातले तरी उत्तरेतील गंगा दक्षिणेतील गोदावरीला सहज जोडता येईल; परंतु हे कळेल तेव्हाच ना! इंग्लंडला क्रिकेटचे माहेरघ
म्हटले जाते. लंडन तर क्रिकेटची मक्काच. परंतु माझ्या लंडन मुक्कामात मला कोणत्याही गल्लीबोळात किंवा मैदानावर क्रिकेट दिसले नाही. इंग्लंडमध्ये क्रिकेट नाहीच असे नाही, परंतु क्रिकेटने आपल्याकडे जशी वेडाची परिसीमा गाठली आहे, तशी तिकडे नाही. तिथे क्रिकेटपेक्षा फुटबॉल अधिक लोकप्रिय आहे.
सांगायचे तात्पर्य एवढेच की, आपण आपली प्रचंड ऊर्जा शक्ती, जी मानवी श्रमात, बुध्दीत दडलेली आहे, अक्षरश: वाया घालवित असतो. आपला बहुतेक वेळ संदर्भहीन बोलण्यात, संदर्भहीन ऐकण्यात आणि निरर्थक वागण्यात खर्च करीत असतो. हीच ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित केली तर आपल्या देशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही दिवसातून दहा वेळा घर झाडून स्वच्छतेचा दिखावा करू, परंतु धुळ का निर्माण होते याचा शोध घेऊन ते कारणच समूळ नाहिसे करण्याचा प्रयत्न करणार नाही. प्रत्येक बाबतीत असेच आहे.
नदीत गळ टाकून शांतपणे बसणाऱ्या कोळ्यासारखी आपली अवस्था आहे. माशाला वाटले तर तो गळाला लागेल, अन्यथा आम्ही ‘ठेविले अनंते तैसेची राहू’. भारतात दोन प्रकारचे लोक राहतात. एक ज्यांना काहीच कळत नाही म्हणून काहीच न करणारे आणि दुसरे ज्यांना काहीच कळत नाही म्हणून काहीही करणारे. ज्या दिवशी या देशातील लोकांना आपण काय करतो आहोत किंवा काय केले पाहिजे हे कळेल त्याच दिवशी ‘मेरा भारत महान’ हे अभिमानाने म्हणण्याचा हक्क त्यांना प्राप्त होईल.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..