नवीन लेखन...

नोव्हेंबर १६ : संथ टॅवेर आणि गावसकरचा विश्वविक्रम

 

कसोटी सामन्यांचे सौंदर्यशास्त्र एकदिवसीय किंवा विसविशीत स्पर्धांहून निराळे आहे. फलंदाजांच्या तंत्राचा खरा कस पाच दिवसांच्या सामन्यातच लागतो. कसोट्यांमध्ये वेळ मारून नेण्यास काही वेळा अतिशय महत्त्व येते आणि चेंडू आणि बॅटमधील लढा मग खर्‍या अर्थाने रोमांचक बनतो.

 

१६ नोव्हेंबर १९८२ हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या अशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस होता. पर्थमधील वाका मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ४११ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने १३ धावांची आघाडी मिळवून डाव घोषित केला.

 

ज्येफ कुकने क्रिस टॅवेरच्या साथीत इंग्लंडचा दुसरा डाव सुरू केला. संघाच्या दहा धावांवर कुक बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या डावाचे ‘वय’ ३२ मिनिटे एवढे होते. एवढ्या वेळात टॅवेरने खाते उघडले नव्हते. आणखी ३१ मिनिटांनंतर अखेर त्याने पहिली धाव घेतली. पहिल्या डावात त्याने १४-मिनिटे-कमी-८-तासांत ८९ धावा केलेल्या होत्या. या खेळीदरम्यान ६६ धावांवर तो दीड तास अटकून उभा होता. मागच्या सामन्यातही धाव न घेता तो तासभर खेळत ‘उभा’ राहिला होता. आता त्याने दोन तास आणि सात मिनिटांच्या खेळात न-ऊ धावा काढल्या. डावात बाद होणारा तो तिसरा फलंदाज ठरला.

 

प्रेक्षकांच्या गोंधळासाठी हा सामना गाजला. दुसर्‍या संध्याकाळी खेळपट्टीवर धावत आलेल्या एका आक्रमक प्रेक्षकाला रोखण्याच्या प्रयत्नात टेरी आल्डरमनचा खांदा निखळला. उरलेल्या हंगामात तो प्रथमश्रेणीतही खेळू शकला नाही. खेळपट्टीवर झालेल्या आक्रमणाने जायबंदी झालेला आल्डरमन हा पहिलाच खेळाडू ठरला. प्रेक्षकांच्या दोन गटांदरम्यान झालेल्या भांडणांचे पर्यवसान २६ जणांच्या अटकेत झाले.

 

टॅवेरच्या द्राविडी प्राणायामानंतर बरोबर एका वर्षाने अहमदाबादमध्ये झालेला कसोटी सामना भारतीयांसाठी लक्षणीय ठरला – १३८ धावांनी पराभूत होऊनही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील या तिसर्‍या सामन्यात पहिल्या

डावातील विंडीजच्या २८१ धावांना उत्तर देताना भारत ४० धावांनी पिछाडीवर पडला. या डावातील ९० धावांच्या खेळीदरम्यान

सुनील गावसकरने इंग्लंडच्या ज्येफ बॉयकॉटचा ८,११४ कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होण्याची ही पहिलीच वेळ होती. विंडीजच्या दुसर्‍या डावात कपिलदेवने साडेतीस षटके गोलंदाजी करताना ८३ धावा देऊन नऊ गडी बाद केले. एकाच डावात नऊ गडी बाद करणारा कपिलदेव हा इतिहासातील दहावा खेळाडू ठरला. अशी कामगिरी करणारा तोवरचा कपिल हा पहिलाच कर्णधार ठरला.

 

चौथ्या डावात विजयासाठी २४२ धावांचे आव्हान भारतीयांना मिळाले होते. वैयक्तिक आणि संघाच्याही एका धावेवर सुनील गावसकर परतला आणि शेवटच्या जोडीसाठी मनिंदरसिंग (१५) आणि सय्यद किरमानी (नाबाद २४) यांनी केलेली ४० धावांची भागीदारी सर्वोच्च ठरली. या दोघांव्यतिरिक्त केवळ अंशुमन गायकवाड (२९) आणि अवांतर (२२) याच भारताच्या डावातील दोन-आकडी धावा ठरल्या. भारत सर्वबाद १०३.

 

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..