नवीन लेखन...

श्री गणपती अथर्वशीर्षाची उपासना





श्री गणपती हे अवघ्या भारताचेच नव्हे तर इतर देशातही प्रसिध्द असलेले दैवत आहे. सर्व कार्याच्या प्रारंभी गणपती पूजन केले जाते. त्याचे मुख्य रूप ॐकार हे आहे. तो विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, बुध्दिदाता आहे. अशा या गणेशाचे पूजन अथर्वशीर्ष म्हणून केले जाते. हे मंत्र अथर्वण ऋषींनी रचलेले आहेत. त्याखेरीज अथर्वशीर्षाचा दुसरा अर्थ असा की अथर्व म्हणजे न थरथरणारा आणि शीर्ष म्हणजे डोके. थोडक्यात याच्या पठणाने मस्तक स्थिर राहते (बुध्दी स्थिर राहते, भरकटत नाही) म्हणूनच सर्व भाविकांनी व विशेषत: विद्यार्थ्यांनी याचे पठण अवश्य करावे.

अथर्वशीर्ष हा उपनिषद् मंत्र असल्याने त्याच्या सुरवातीला व शेवटी शांती मंत्र आहे. अथर्वण ऋषी प्रारंभी मंगलाचरण करण्याच्या हेतूने ॐ हा मंगलमय शब्द उच्चारतात. त्यानंतर त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तत्वमसि हा शब्द खूप महत्वाचा आहे. अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्व. तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहे असे ते म्हणतात. तूच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म आहेस.

त्यानंतर ते गणेशाची आपले रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. त्यापुढे पुन्हा श्रीगणेशाचे वर्णन व स्तुती आहे. तू सत्, चित् व आनंदरुपी असून एकमेवाद्वितीय आहेस. तु ज्ञानमय व विज्ञानमय आहेस. तू सत्व, रज आणि तम या त्रिगुणांपलीकडील तसेच जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांपलीकडील आहेस. स्थूल, सुक्ष्म व आनंदमय अशा तीन देहांपलीकडचा तसेच वर्तमान, भूत व भविष्य या तीन कालांपलीकडचा आहेस. अशाच प्रकारचे सर्वात्मक वर्णन करून ते पुढे गणपती ही देवता असलेला गणेश विद्या (मंत्र) सांगतात. हा एकाक्षर मंत्र आहे. ग् हे या मंत्राचे पूर्वरूप असून मध्ये अकार आहे. शेवटी अनुस्वार

आहे व पुढे बिंदू अनुनासिक चिन्ह आहे. “ॐ गॅं” हे ते मंत्रस्वरूप आहे. ते

जपून झाल्यावर गणपतये नम: म्हणून नमस्कार करावा. मुद्गल पुराणामध्ये असाही उल्लेख आहे कि हा मंत्र देवतापंचायतन आहे. यामध्ये ग् हा ब्रह्मदेवरुपी, अकार विष्णू, अनुस्वार शिवस्वरुप, अनुनासिक सूर्यरुप व ओंकार हे शक्तीरुप असे देवतापंचायतन होते. त्यानंतर गणपतीचा गायत्री मंत्र सांगतात. थोडक्यात यामध्ये नाममंत्र, एकाक्षरमंत्र आणि गायत्रीमंत्र असे तीन प्रकारचे मंत्र सांगितलेले आहेत.

त्यानंतर ध्यानाकरीता गणेशाच्या मूर्तीचे स्वरूप ते वर्णन करतात. ध्यानविधीनंतर पुन्हा समाप्तीच्या वेळचे नमन आहे व त्यानंतर त्याची फलश्रृती सांगितली आहे. याच्या पठणाने सुखप्राप्ती होते, पातकांपासून मुक्ती मिळते. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारी पुरषार्थांचा लाभ होतो. पठण करणारा विद्यासंपन्न आणि निर्भय होतो. तसेच धनवान आणि बुध्दिमानही होतो. अशा प्रकारची विविध फलश्रृती सांगितली आहे.

त्यानंतर पुढीलप्रमाणे अपेक्षा व्यक्त केली आहे. हे अध्ययन गुरुशिष्यांचे रक्षण करो, दोघांना बरोबरच उपयुक्त ठरो, दोघांना बरोबरच पराक्रमी बनवो. आम्हा दोघाही गुरुशिष्यांचे अध्ययन तेजस्वी असो. आम्ही कधीही द्वेष करणार नाही. सर्वत्र नेहमी शांतीचा वास असो. पुढे पुन्हा एकदा सुरवातीचा शांती मंत्र म्हणून याची समाप्ती केली आहे.

— कालिदास वांजपे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..