नवीन लेखन...

यात्रा दमणची





दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो.२८ तारखेला सकाळी १० वा वापी रेल्वेस्थानकावर पोहचलो आणि टँक्सी स्टँड्वर दमण….दमण….असा ओरडा कानावर पडला.वापी ते दमण शेअर टँक्सी सर्व्हिस आहे .त्यांमुळे दमणला जाण्याची काळजी नव्हती. रेल्वेस्थानकाच्या जवळच कचोरी खाल्ली आणि थेट टँक्सीत बसलो.वापीत उन्हाळा जाणवत होता परंतु दमणला त्या तुलनेत जरा बरे वाटत होते. दमण टँक्सी स्टँड्वर उतरल्यावर पायी चालण्यास सुरुवात केली.आणि नजरेला पडलेल्या पहिल्याच हाँटेलवर डेरा टाकला.शनिवार आणि त्यातच सुट्टीचा हंगाम यामुळे दमण हाऊसफुल्ल होते.भर दुपारीही पर्यटकांची गर्दी होती.परंतु येथे वर्दळ सुरु होते ती सायंकाळी..

छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी म्हणजे दमण …दमण हे नानी दमण आणि मोटी दमण अशा दोन भागांमध्ये विभागलेले आहे.दमणगंगा नदीवरील पुलांने हे दोन भाग जोडले गेले आहेत ,नदीवरील जूना पूल अतिवृष्टीमुळे कोसळला होता . कोसळलेल्या जागी लोखंडी पूल जोडला आहे .या पुलाजवळ नवा पूल बांधला आहे. नानी दमण गजबजलेला भाग आहे तर मोटी दमण निसर्गरम्य आहे .याभागात निवासी व सरकारी कार्यालये आहेत.याभागात आल्यावर गोव्यात आल्याचा भास होतो. साडेचारशे वर्षे , अगदी भारताच्या स्वातंत्र्यानंतरही 1961 पर्यंत पोर्तुगीज सत्तेच्या अमलाखाली असलेल्या दमणमध्ये पोर्तुगीज अंमलाच्या पाऊलखुणा आजही आपल्याला दिसून येतातं. इथे गुजराती , इंग्रजी , हिंदीप्रमाणेच पोर्तुगीज भाषाही बोलली जाते आणि हिंदू , ख्रिश्चन , मुस्लिम आणि पारशी या सर्वांचं अस्तित्व इथे आढळतं. दमणला पाहण्यासारखे नानी दमण आणि मोटी दमण हे दोन किल्ले ,किल्ल्यातील चर्च . देवका आणि जाम्पोर हे दोन सुंदर समुद्र किनारे.. मिरासोल व वैभव वाँटरपार्क, जेटी गार्डन, अशी

मोजकीच ठिकाणे..हि सर्व ठिकाणे

पाहवी लागतात रिक्षाने..दमणला टूर आँपरेटर हा प्रकारच नाही त्यामुळे सर्व ठिकाणे आपल्याला स्वत:च पाहवी लागतात .त्यात त्रास होतो आणि वेळ वाया जातो.सर्व ठिकाणी शेअर पद्धत असल्याने पैसे वाचतात पण पार्टनरची वाट पाहवी लागते.

आम्ही रहात असलेल्या हाँटेल शेजारीच शाँपिंग मार्केट आहे अशी माहीती हाँटेल मालकाने दिल्यानंतर सौ.चा आनंद गगनात मावेनासा झाला.या मार्केटला फाँरेन गुड मार्केट असे म्हणतात.घड्यांळे.,मोबाईल,कपडे ,परफ्युम,चाँकलेट,चप्पल,इलेक्ट्राँनिक्स वस्तू ,खेळणी ,पर्स ,सौंदर्यप्रसाधने, अशा अनेक एका पेक्षा एक सरस वस्तु या ठिकाणी आहेत.शिवाय परदेशी चाँकलेटस ,बिस्किटे यांचे विविध प्रकार मायमून या दुकानात पहावयास मिळतात.आम्ही बराचसा वेळ मार्केटमध्ये घालवला.ही सर्व दुकाने दमण पोलिस ठाण्या जवळच आहेत.

सायंकाळी आम्ही देवकाबीच गाठला . देवकाबीच दमण पासून ५ कि.मी अंतरावर आहे.दमण मधील अनेक उत्तम हाँटेल या बीचवर आहेत.हा बीच काहीना आवडतो काहीना नाही.हा बीच तसा वेगळा बीच आहे.या ठिकाणी खडक मोठया प्रमाणात आहेत .या खडकांमध्ये पाणी साठलेले होते .त्यामध्ये बच्चेकंपनी मनसोक्त डुम्बत होती.वेगवेगळ्या आकाराचे खडक,शिंपले,सागरीप्राणी येथे दिसतात.याच बीचवर लहान मुलांसाठी बाग आहे.तेथे टाँयट्रेन व लहान मुलांसाठी खेळणी आहेत.आम्ही गेलो तेव्हा ओहोटी होती तरीही खडकांवरुन आत चालत जाऊन समुद्रात जाण्याचा आनंद घेणारे आमच्यासारखे अनेक जण होते.देवकाबीचवरून पुन्हा शेअर रिक्षा पकडून आम्ही दमण शहरात आलो . सायंकाळी उशिरा नानी दमणचा किल्ला पाहण्यासाठी पायीच बाहेर पडलो.नानी दमणमध्ये 1614 ते 1627 दरम्यान मुघल साम्राज्याला आव्हान देण्यासाठी बांधलेला सेन्ट जेरोम फोर्ट आहे. किल्ल्याला तीन बुरुज आहेत आणि दोन द्वारं आहेत. एक शहरात उघडतं , तर दुसरं नदीच्या किनारी बंदरावर उघडतं. किल्ल्यात एक शाळा आणि ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरफटका मारता येतो आणि समोरच मोटी दमणचा किल्ला आणि तिथलं दीपगृह दिसत असतं.या ठिकाणी फोटो काढण्याची मजा कही औरच होती.

सायंकाळी दमण जेटीचा हा परिसर सुंदर वाटत होता .खाडीकिनारी अतिशय सुंदर वाराही सुटला होता .या जेटीवर समुद्रनारायणाचे मंदिर आहे.किल्ल्याजवळच फास्टफूडच्या अनेक गाड्या पर्यटकांची भूक भागवत होत्या.या ठिकाणी मिळणारे अंड्यांचे रोल हे प्रसिध्द स्ट्रीटफूड आहे.या शिवाय रोलचे अनेक प्रकार येथे मिळतात.पिझ्झा ,बर्गरही दमणमध्ये मिळतात,परंतु आम्हाला उत्तम जेवण मात्र दमणला मिळाले नाही,दमणमध्ये मद्य मुबलक व स्वस्तात मिळते.अगदी बीचवरही टोपलीतून स्थानिक महिला बिअर विकत असतात ,त्यामुळे येथे मौजमजा करण्यासाठी येणा-यांची संख्या खूप आहे

दुस-या दिवशी लवकरच जाम्पोर बीच वर पोहचलो.दमण पासून हा बीच ११ कि.मी अंतरावर आहे. मोटी दंमणच्या शेवटी हा अतिशय सुंदर असा किनारा आहे.लांबलचक किनारा,बारिक वाळू ,किना-यावर येणा-या मध्यम लाटा यामुळे हा बीच प्रेमात पडावे असा आहे.अत्यंत सुरक्षित बीच असल्याने लहानेमोठे सर्वच येथे मनसोक्त भिजतांना दिसत होते,समुद्रस्नानासाठी हा उत्तम किनारा आहे.उंटाची राईड ,पँराग्लायडींग.असे खेळ तेथे खेळता येतात.या बिचवर आम्ही खूपच मजा केली.येथून परततांना मोटि दमण फोर्ट पाहून घेतला.या किल्ल्याच्या आतील भागात अनेक सरकारी ईमारती आहेत .अतिशय देखणे असे चर्च आहे.कॅथेड्रल ऑफ बॉम जेसू हे 1603 मधलं चर्च म्हणजे लाकडावरील वास्तुकलेचा अतिशय सुंदर नमुना आहे.आतील भागात दीपस्तंभ आहे,

दमण पाहून आम्ही पुन्हा वापी रेल्वेस्थानकाकडे निघालो.मुंबईला जाणा-या गाडीला वेळ असल्याने आम्ही वापीतच जेवण करण्याचा निर्णय घेतला .वापी रेल्वेस्थानका जवळ असणा-या बापुज रेस्टाँरन्ट मध्ये आम्ही शिरलो .पंजाबी थाळीची आँर्डर दिली.उत्तम जेवण दमणला मिळाले नाही त्याची कमतरता येथे भरून निघाली.अतिशय चविष्ट जेवण येथे जेवायला मिळाले सोबत मधूर ताक होतेच.हे सर्व अगदी योग्य दरात, पोट्पूजा करून दिमतीला वापीतील प्रसिध्द नमकिन, केळ्याचे वेफर्स , निळीशार जांभळे ,चिकू घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

.

कसे जावे– पश्चिम रेल्वेवरील वापी रेल्वे स्थानकापर्यंत

पोहोचायचं , वापीवरून टॅक्सीने दरडोई २० रुपये किंवा पूर्ण टॅक्सी दीडशे रुपयांत दमणमध्ये नेऊन सोडते.स्वत:चे वाहन असल्यास पश्चिम दुतगती मार्गाने वापीपर्यंत पोहोचायचं आणि तिथून दमणकडे वळायचं.

कुठे रहाल – शनिवार-रविवार दमणला गर्दी असल्याने आधी बुकिंग करूनच दमणला निघावं.हॉटेल बुकिंगसाठी ओळ्खपत्र,पँनकार्ड असा कोणतातरी पुरावा आवश्यक आहे.

दमणमधील काही हॉटेल्स —मिरासोल लेक रिसॉर्ट 2220674. गुरुकृपा हॉटेल 2255046 अशोका हॉटेल 2254239.हॉटेल मिरामार – 2254471, 2250671, ब्रायटन हॉटेल : 2251208, 2251209, सॉव्हरेन हॉटेल 2255023, 2250236, नटराज हॉटेल 2254415, मरीना हॉटेल 2254420, दरिया दर्शन हॉटेल 2254386, , सिल्टन हॉटेल 2254558, सुमेर हाऊस 2254474.या शिवाय बजेट हॉटेल्सही येथे उपलब्ध आहेत. दमणचा एस.टि.डी कोड आहे( 0260)

…………………………………

— श्री.सुनिल पाटकर उर्फ सनी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..